पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पर्यावरणास्नेही जीवनशैलीचा पुरस्कार करणाऱ्या 'लाइफ मूव्हमेंट' या जागतिक उपक्रमाचा पंतप्रधानांच्या हस्ते प्रारंभ

"आपल्या पृथ्वीसमोरील आव्हानांचा सामना करण्यासाठी मानवकेंद्रित सामूहिक प्रयत्न व ठोस कृती करणे आणि त्याद्वारे शाश्वत विकासाला चालना देणे ही काळाची गरज"

"भूतकाळातून काही गोष्टी घेऊन मिशन लाईफ वर्तमानात काम करते व भविष्यावर नजर ठेवते"

"कमी वापरा, पुन्हा वापरा आणि आणि पुनर्चक्रीकरण करा- या आमच्या जीवनपटात विणलेल्या संकल्पना आहेत. चक्राकार अर्थव्यवस्था हा आमच्या संस्कृतीचा आणि जीवनशैलीचा अविभाज्य घटक आहे"

"जेव्हा तंत्रज्ञान आणि परंपरा मिसळून जातात, तेव्हा जीवनदृष्टी आणखी विस्तारते आणि पुढे मार्गक्रमण करते"

"आपली पृथ्वी एकच आहे, पण आपले प्रयत्न मात्र अनेक असले पाहिजेत- एक पृथ्वी, अनेक प्रयत्न"

"पर्यावरणानुकूल आचरणाला चालना देण्याच्या दृष्टीने नागरिकांच्या प्रत्यक्ष कृतीचा पुरस्कार करणाऱ्या या जागतिक उपक्रमासाठी पुढाकार घेतल्याबद्दल मी भारताचे पंतप्रधान मोदी यांचे अभिनंदन करतो."- बिल गेट्स

"हवामानबदल, पर्यावरण संवर्धन आणि मानवी आचरण या विषयांत, जगाचे नेतृत्व भारताकडे आणि पंतप्रधान मोदींकडे आले आहे"- प्रा

Posted On: 05 JUN 2022 7:31PM by PIB Mumbai

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे आज, पर्यावरणस्नेही जीवनशैलीचा पुरस्कार करणाऱ्या 'लाईफ मूव्हमेंट' या जागतिक उपक्रमाचा प्रारंभ केला. 'लाइफस्टाइल फॉर द एनविरोन्मेन्ट' च्या इंग्रजी आद्याक्षरांवरून या उपक्रमाचे नाव ठेवण्यात आले आहे. जगभरातील शिक्षणतज्ज्ञ, विद्यापीठे, संशोधन संस्था इत्यादींकडून कल्पना आणि सूचना मागविण्यासाठी 'लाईफ ग्लोबल कॉल फॉर पेपर्स' या कार्यक्रमाचा प्रारंभ आज झाला. जगभरातील व्यक्ती, समुदाय आणि संस्थांनी पर्यावरणानुकूल आणि पर्यावरणाचे भान असणारी जीवनशैली अंगीकारावी, यासाठी त्यांचा पाठपुरावा करणाऱ्या संकल्पना याद्वारे मागवण्यात येत आहेत.

"'लाइफस्टाइल फॉर द एनविरोन्मेन्ट' म्हणजे लाईफ मूव्हमेंट या जागतिक उपक्रमाचा प्रारंभ करण्यासाठी आजचा दिवस अतिशय सुयोग्य आहे. आपण लाईफ चा म्हणजे लाइफस्टाइल फॉर द एनविरोन्मेन्ट या चळवळीचा प्रारंभ करत आहोत." असे उद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी काढले. "आपल्या पृथ्वीसमोरील आव्हानांचा सामना करण्यासाठी मानवकेंद्रित सामूहिक प्रयत्न व ठोस कृती करणे आणि त्याद्वारे शाश्वत विकासाला चालना देणे ही काळाची गरज आहे" असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले.

गेल्यावर्षी कॉप 26 परिषदेत आपण या जागतिक उपक्रमाचा प्रस्ताव मांडल्याची आठवण पंतप्रधानांनी यावेळी करून दिली. आपल्या ग्रहाला- पृथ्वीला साजेशी, तिला अनुकूल अशी व तिला हानिकारक नसलेली अशी जीवनशैली अंगीकारणे, हा लाईफ उपक्रमाचा मूळ दृष्टिकोन आहे, असे त्यांनी सांगितले. असे जीवन जगणाऱ्यांना 'प्रो-प्लॅनेट पीपल' म्हणजेच 'पृथ्वीच्या अनुकूल पक्षातील लोक' असे संबोधले जाते. मिशन लाईफ भूतकाळातून काही गोष्टी घेऊन वर्तमानात काम करते व भविष्यावर नजर ठेवते, असे पंतप्रधानांनी स्पष्ट केले. तसेच यासंदर्भात भारतीय संस्कृतीचा अन्वयार्थ जगासमोर उलगडताना ते म्हणाले, "कमी वापरा, पुन्हा वापरा आणि आणि पुनर्चक्रीकरण करा- या आमच्या जीवनपटात विणलेल्या संकल्पना आहेत. चक्राकार अर्थव्यवस्था हा आमच्या संस्कृतीचा आणि जीवनशैलीचा अविभाज्य घटक आहे"

भारतात पर्यावरणासाठी अनेक चांगल्या गोष्टी करण्याची संधी दिल्याबद्दल पंतप्रधानांनी 1.3 अब्ज भारतीयांचे आभार मानले. भारताचे वनक्षेत्र वाढत आहे तसेच सिंह, वाघ, बिबटे, हत्ती आणि गेंडे अशा वन्यजीवांची संख्याही वाढते आहे. भारताने आपल्या सध्याच्या विद्युत निर्मितीच्या क्षमतेच्या 40% वीज जीवाश्मेतर इंधनांपासून मिळविण्याचे आपले उद्दिष्ट नियत वेळेच्या 9 वर्षे आधीच संपादन केल्याचेही पंतप्रधानांनी नमूद केले. पेट्रोलमध्ये 10% इथेनॉल मिश्रणाचे उद्दिष्टही नोव्हेम्बर 2022 या निर्धारित मुदतीच्या पाच महिने आधीच पूर्ण झाले आहे. 2013-14 ,मध्ये मिश्रणाचे हे प्रमाण फारतर 1.5% होते तर 2019-20 मध्ये ते 5% झाले होते. हे लक्षात घेता, आजचे यश नक्कीच मोठे आहे, असे ते म्हणाले. सरकार पुनर्नवीकरणक्षम उर्जेला मोठे प्राधान्य देत असल्याचेही त्यांनी सांगितले. यापुढे अभिनव संकल्पना आणि विचारांना मुक्त आकाश मिळण्याचा काळ आहे, असे सांगून ते पुढे म्हणाले, "जेव्हा तंत्रज्ञान आणि परंपरा मिसळून जातात, तेव्हा जीवनदृष्टी आणखी विस्तारते आणि पुढे मार्गक्रमण करते".

महात्मा गांधी यांनी शून्य कार्बन जीवनशैलीविषयी विचार मांडले होते, याचे पंतप्रधानांनी स्मरण करून दिले. आपल्या दैनंदिन जीवनात पर्याय निवडताना, सर्वाधिक शाश्वत/ संतुलित पर्याय निवडावा, असे आवाहन त्यांनी केले. 'पुन्हा वापरा, कमी वापरा आणि पुनर्चक्रीकरण करा' हे तत्त्व अंगीकारण्याचेही आवाहन त्यांनी सहभागी जनसमुदायाला केले. "आपली पृथ्वी एकच आहे, पण आपले प्रयत्न मात्र अनेक असले पाहिजेत- एक पृथ्वी, अनेक प्रयत्न", असे ते म्हणाले. अधिक चांगल्या पर्यावरणासाठी आणि जागतिक हवामानाचे आरोग्य सुधारण्यासाठी केल्या जाणाऱ्या कोणत्याही प्रयत्नांना पाठिंबा देण्यास भारत तयार आहे. आणि आमच्या देशाने आजवर केलेली कामगिरीच पुरेशी बोलकी आहे" असे पंतप्रधानांनी आवर्जून सांगितले.

या कार्यक्रमात जगभरच्या अनेक मान्यवरांनी सहभाग नोंदवला. यामध्ये बिल अँड मेलिंडा गेट्स फाउंडेशनचे सह-अध्यक्ष बिल गेट्स, हवामान अर्थतज्ज्ञ निकोलस स्टर्न, 'नज थिअरी'चे लेखक प्रा.कॅस संस्टेन, वर्ल्ड रिसोर्सेस इन्स्टिट्यूटचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि अध्यक्ष अनिरुद्ध दासगुप्ता, यु.एन.इ.पी. प्रमुख इंगर अँडरसन, एचिम स्टायनर, यूएनडीपी प्रमुख आणि जागतिक बँकेचे अध्यक्ष डेव्हिड मालपास यांचा समावेश होता. केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव, आणि नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत हेही यावेळी उपस्थित होते.

वाढत्या उत्सर्जनात कपात करण्यासाठी भारतात सुरु असलेले प्रयत्न आणि भारताने स्वीकारलेले जगाचे नेतृत्व, याने स्फूर्ती मिळाली, असे मनोगत बिल गेट्स यांनी व्यक्त केले. "लाईफ चळवळीबद्दल माहिती मिळाल्यावर आणि सामूहिक कृतीची पूर्ण शक्ती पणाला लावण्यासाठीची या चळवळीची क्षमता जाणवून माझा उत्साह वाढला आहे. हरितगृह वायूंचे उत्सर्जन पूर्णपणे टाळण्यासाठी आपल्याला अभिनव तंत्रज्ञानाची आणि सर्वांच्या सहभागाची गरज आहे. या अभिनव तंत्रज्ञानाचा व्यापक पातळीवर स्वीकार होण्यासाठी प्रचंड प्रमाणात गुंतवणूक होण्याची आणि सार्वजनिक-खासगी भागीदारी घडून येण्याची गरज आहे, इतकेच नव्हे तर लोकांनीही व्यक्तिगत पातळीवर त्या तंत्रज्ञानासाठी मागणी वाढवणे गरजेचे आहे. व्यक्तिगत कृतींमुळे बाजारपेठेला संकेत मिळतील आणि त्यातून सरकारांना आणि व्यावसायिकांना या अभिनव संकल्पनांमध्ये गुंतवणूक करण्याची प्रेरणा मिळेल, आपल्याला आवश्यक असणारे तोडगे शोधण्याची प्रेरणा मिळेल." असे मत गेट्स यांनी व्यक्त केले. "पर्यावरणानुकूल आचरणाला चालना देण्याच्या दृष्टीने नागरिकांच्या प्रत्यक्ष कृतीचा पुरस्कार करणाऱ्या या जागतिक उपक्रमासाठी पुढाकार घेतल्याबद्दल मी भारताचे पंतप्रधान मोदी यांचे अभिनंदन करतो. आपण एकत्रितपणे एक हरित औद्योगिक क्रांती घडवून आणू  शकतो"- असेही बिल गेट्स म्हणाले. "हवामान बदलाच्या समस्येचा सामना करण्यासाठी सामूहिक जागतिक कृतीची आज सर्वाधिक गरज आहे. आणि आपली हवामानविषयक उद्दिष्टे गाठण्यासाठी भारताची भूमिका आणि नेतृत्व अत्यंत महत्त्वाचे आहे" असेही गेट्स म्हणाले.

"हवामानबदल, पर्यावरण संवर्धन आणि मानवी आचरण या विषयांत, जगाचे नेतृत्व भारताकडे आणि पंतप्रधान मोदींकडे आले आहे, आणि आपल्यापैकी अनेकजण स्फूर्ती आणि नवकल्पनांसाठी भारताकडे आशेने बघत आहेत" अशा शब्दांत प्रा.कॅस संस्टेन यांनी भारताबद्दल विश्वास व्यक्त केला. आचरणात/ वर्तनात बदल घडवून आणण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या 'ईएएसटी' या आराखड्याबद्दल संस्टेन यांनी विचार मांडले. सोपे, आकर्षक, समाजस्नेही आणि कालोचित या शब्दांसाठीच्या इंग्रजी अद्याक्षरांवरून ईएएसटी हे नाव पडले आहे. प्रा.संस्टेन यांनी आज यामध्ये एफ ची भर घालून त्यापासून फीस्ट असे लघुरूप बनवले. पर्यावरणस्नेही कार्यक्रमांमध्ये येणाऱ्या गमतीचा/ मजेचा भाग म्हणून फन अशा अर्थी त्यांनी हा बदल सुचवला. नजीकच्या भूतकाळात भारताने पर्यावरणविषयक कार्यक्रम रंजक करून दाखवले आहेत, असेही ते यासंदर्भात म्हणाले.

यु.एन.इ.पी. प्रमुख इंगर अँडरसन यांनीही याप्रसंगी लाईफ च्या प्रारंभाचे स्वागत करत आपले विचार प्रकट केले. "एक अब्जापेक्षा अधिक लोकसंख्या असणारा आणि नवोन्मेष आणि उद्योजकतेच्या उत्साहाने परिपूर्ण असा भारत पर्यावरणाविषयीच्या जागतिक कृतीच्या केंद्रस्थानी आहे", असे त्या म्हणाल्या.

"जगाच्या मंचावर पर्यावरणासाठी निर्णायक कृती करण्यासाठी भारतासारखे देश गतिज ऊर्जेचे काम करत आहेत. यामध्ये आंतरराष्ट्रीय सौर संघटन, आपत्तीतून टिकाव धरणाऱ्या पायाभूत सुविधांसंदर्भातील देशांचा संघ (Coalition for Disaster Resilient Infrastructure) आणि 'एक सूर्य, एक जग, एक ग्रिड' अशा अत्याधुनिक आणि अग्रणी उपक्रमांतुन भारताने केलेल्या कार्याचा समावेश होतो ", असे मत यूएनडीपी प्रमुख एचिम स्टायनर यांनी व्यक्त केले.

वर्ल्ड रिसोर्सेस इन्स्टिट्यूटचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि अध्यक्ष अनिरुद्ध दासगुप्ता यांनी, अतिशय गरजेच्या अशा या जागतिक चळवळीबद्दल आणि संवाद प्रस्थापित करण्याबद्दल पंतप्रधानांचे आभार मानले. 'आपण कसे जगावे, आपण कसा उपभोग घेतला पाहिजे, आणि आपण पृथ्वीची कशी काळजी घेतली पाहिजे' याविषयीच्या संवादाची सुरुवात केल्याबद्दल त्यांनी पंतप्रधानांना धन्यवाद दिले.

हवामान अर्थतज्ज्ञ निकोलस स्टर्न यांनी ग्लासगो येथील कॉप 26 परिषदेतील पंतप्रधानांच्या अविस्मरणीय भाषणाच्या आठवणी जागवल्या. 'विकासाच्या नव्या मार्गाची स्फूर्तिदायी दृष्टी देणारे भाषण, अशा शब्दांत त्यांनी या भाषणाचा गौरव केला. "मानवसमूहांची जीवनशैली उंचावणे आणि भावी पिढ्यांचे भवितव्य सुरक्षित राखणे या दोन्ही बाबतींत ही एकविसाव्या शतकाची यशोगाथा आहे", असेही ते म्हणाले.

भारतीय सांस्कृतिक अवकाशात पर्यावरणाला केंद्रस्थान देणाऱ्या प्राचीन भारतीय वाङ्मयातील श्लोकांचे स्मरण, जागतिक बँकेचे अध्यक्ष डेव्हिड मालपास यांनी यावेळी केले. गुजरातमध्ये 2019 मध्ये नागरी सेवांच्या क्षमता बांधणीच्या संदर्भात पंतप्रधान मोदी यांच्याबरोबर काम करताना त्यांचे या कामातील अगत्य आणि त्याची तातडीची गरज जाणवल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच त्यांनी, स्वच्छ भारत, जन धन, पोषण अशा महत्त्वपूर्ण कार्यक्रमांतून वित्तीय समावेशन आणि सक्षमीकरणासाठी होत असलेल्या प्रयत्नांचे कौतुक केले. तसेच स्थानिक पातळीवर उपक्रम राबवण्याच्या पद्धतीची प्रशंसा केली.

गेल्यावर्षी ग्लासगो येथे भरलेल्या सव्विसाव्या संयुक्त राष्ट्र हवामानबदलविषयक पक्षांच्या परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाईफ या उपक्रमाची संकल्पना मांडली होती. पर्यावरणाचे भान राखून त्यानुसार आखलेल्या जीवनशैलीचा पुरस्कार यामध्ये केला आहे. अशा जीवनशैलीमध्ये, साधनसंपत्तीचा 'निर्मम नाशकारक उपभोग' घेण्याऐवजी 'आवर्जून अंतःकरणपूर्वक उपयोजन' करण्यावर भर दिला जातो.

***

S.Kane/J.Waishampayan/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com(Release ID: 1831396) Visitor Counter : 123