युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय क्रीडा व युवा व्यवहारमंत्री अनुराग ठाकूर यांच्या हस्ते पुणे येथील अद्ययावत सुविधांनी युक्त तक्षशिला क्रीडा संकुलाचे उद्घाटन


पुण्यातील उद्योगजगताने क्रीडा क्षेत्रासाठी सीएसआरअंतर्गत भरीव मदत करण्याचे अनुराग ठाकूर यांचे आवाहन

Posted On: 29 MAY 2022 1:19PM by PIB Mumbai

पुणे-मुंबई /29 मे 2022

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार क्रीडा क्षेत्र आणि खेळाडूंना विशेष प्रोत्साहन देत आहे. त्यामुळेच भारताला टोकियो ऑलिम्पिक आणि इतर आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भरभरुन यश मिळाले असल्याचे प्रतिपादन केंद्रीय क्रीडा व युवा व्यवहार तसेच माहिती आणि प्रसारणमंत्री अनुराग ठाकूर यांनी केले. अनुराग ठाकूर यांच्या हस्ते शनिवारी संध्याकाळी पुणे येथे तक्षशिला या अद्ययावत क्रीडा संकुलाचे उद्घाटन करण्यात आले, त्याप्रसंगी ते बोलत होते. 2013-14 मध्ये क्रीडा क्षेत्रासाठी 1200 कोटी अर्थसंकल्पीय तरतूद होती, त्यात वाढ करुन 3000 कोटी रुपयांपेक्षा अधिक तरतूद केली आहे. खेलो इंडियासाठीची अर्थसंकल्पीय तरतूद गेल्यावर्षी 600 कोटी रुपये होती ती यावर्षी 950 कोटी रुपये केली आहे. त्याचे दृश्य परिणाम दिसून येत असल्याचे मंत्री म्हणाले. पुणे येथे अत्याधुनिक क्रीडा सुविधा उपलब्ध करुन दिल्याबद्दल त्यांनी लोकप्रतिनिधी, आयुक्त आणि इतर संस्थांचे अभिनंदन केले.

 

पंतप्रधान स्वतः क्रीडापटूंशी संवाद साधतात. त्यांना प्रोत्साहन देतात. पंतप्रधानांनी टोकिओ ऑलिम्पिकमधील केवळ पदकविजेत्या खेळाडूंशी नाही तर सहभागी झालेल्या सर्व क्रीडापटूंशी संवाद साधला, असे अनुराग ठाकूर म्हणाले. कोविड-19 च्या आव्हानात्मक परिस्थितीतही सरकारने खेळाडूंना प्रशिक्षणासाठी आवश्यक सोयी-सुविधा पुरवल्या, परदेशातील प्रशिक्षणाचा खर्च उचलला. एवढेच नाही तर सरकार 'टार्गेट ऑलिम्पिक पोडियम' योजनेच्या माध्यमातून खेळाडूंना निवासव्यवस्था, प्रशिक्षण, संतुलित आहार पुरवते तसेच दर महिन्याला 50,000 रुपये देते, अशी माहिती केंद्रीय मंत्र्यांनी दिली. मीराबाई चानूचे उदाहरण त्यांनी याप्रसंगी दिले.

अनुराग ठाकूर यांनी युवकांना “खेलोगो तो खिलोगे” हा पंतप्रधानांचा मंत्र आत्मसात करण्याचा सल्ला दिला. सुरुवातीपासूनच खेळासंबंधीच्या सर्व सुविधा उपलब्ध करुन दिल्या तर बालकांना खेळांमध्ये रुची निर्माण होते. त्याला योग्य वेळी प्रोत्साहन दिल्यास तो राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर चमकदार कामगिरी करतो, असे मंत्री म्हणाले. खेळामुळे व्यक्तिमत्व विकास घडून येतो, नेतृत्वगुण विकसित होतात, शारिरीक आणि बौद्धिक आरोग्य प्राप्त होते. एवढेच नाही तर नियमित व्यायाम आणि खेळामुळे आपण आरोग्य यंत्रणेवरील ताण कमी करु शकतो, असे मंत्री म्हणाले.

 

पुण्यातून जास्तीत जास्त क्रीडापटूंना प्रोत्साहन मिळावे, यासाठी उद्योगजगताने कार्पोरेट सामाजिक उत्तरदायित्व (सीएसाआर) च्या माध्यमातून भरघोस मदत करुन सुविधा उपलब्ध करुन देण्याचे आवाहन केंद्रीय मंत्र्यांनी याप्रसंगी केले.

भारतीय क्रीडा प्राधिकरणाने (Sports Authority of India) कुस्तीपटूंना योग्य प्रशिक्षण देण्यासाठी महाराष्ट्रातील तालमींकडे लक्ष पुरवले आहे, असे त्यांनी प्रसिद्ध अशा गुलशाची तालीम येथील सत्कारसोहळ्यात सांगितले. राज्याची ओळख असलेल्या ढोल-ताशा पथकाला राष्ट्रीय स्पर्धांमध्ये सादरीकरणाची संधी देणार असल्याचे अनुराग ठाकूर यांनी याप्रसंगी सांगितले.   

तक्षशिला क्रीडा संकुलाविषयी माहिती

आंतरराष्ट्रीय गुणवत्तेचे क्रीडापटू घडवण्याच्या उद्देशाने पुणे महानगरपालिकेने सुमारे 2 कोटी 10 लाख रुपयांची गुंतवणूक करून विमान नगर इथे तक्षशिला क्रीडा संकुल उभारले आहे.

*          बास्केट बॉल, वॉली बॉल आणि कबड्डी या खेळांसाठी क्रीडा संकुलात आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा विकसित करण्यात येत आहेत.

*           क्रीडापटूंसाठी उत्तमोत्तम दर्जाच्या सुविधांसह या संकुलात खुले जिम्नॅशियम आणि फुटबॉलचे मैदान

*           क्रीडा संकुलाच्या शेजारील आंतरराष्ट्रीय स्तरीय स्केटिंग सुविधेला अत्याधुनिक पुलाच्या आधारे संकुलाशी जोडून घेण्यात आले आहे.

*          1500 प्रेक्षक बसू शकतील असे प्रेक्षागृह संकुलातील जवळपास एक एकर जमिनीवर लवकरच बांधले जाणार आहे.

*           400 क्रीडापटूंना प्रशिक्षित करता येईल अशा व्यवस्था लवकरच सुरु करण्यात येत आहे.

***

PIB MH-Goa/Samajit/CYadav

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1829147) Visitor Counter : 207