पंतप्रधान कार्यालय

मध्य प्रदेश स्टार्टअप कॉन्क्लेव्हमध्ये पंतप्रधानांनी मध्य प्रदेश स्टार्टअप धोरणाचा केला प्रारंभ


“ताज्या दमाच्या युवकांमुळे देशाच्या विकासाला नव्यानं चालना मिळत आहे.”

“आठ वर्षांच्या अल्प काळात  देशाच्या स्टार्टअप गाथेमध्ये  मोठ्या प्रमाणावर परिवर्तन झाले आहे”

2014  नंतर सरकारनं  तरुणांच्या नवोन्मेशावर  विश्वास ठेवला आणि एक अनुकूल परिसंस्था निर्माण केली”

7 वर्षांपूर्वी स्टार्ट-अप इंडियाची सुरुवात करणे हे कल्पनांना नावीन्यपूर्ण करण्यासाठी आणि त्यांना उद्योगाकडे नेण्यासाठी एक मोठे पाऊल होते”

“भारतात व्यवसाय सुलभतेवर आणि  जीवनमान सुखकर करण्यावर अभूतपूर्व भर आहे”

Posted On: 13 MAY 2022 8:39PM by PIB Mumbai

 

मध्य प्रदेश स्टार्टअप कॉन्क्लेव्हमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल इंदूर इथं मध्य प्रदेश स्टार्टअप धोरणाचा दूरदृश्य प्रणालीद्वारे शुभारंभ केला. त्यांनी स्टार्टअप इकोसिस्टिम अर्थात परिसंस्थेला चालना देणाऱ्या आणि ती सुलभ करणाऱ्या मध्य प्रदेश स्टार्टअप पोर्टलचेही उद्घाटन केले. त्यांनी स्टार्टअप व्यावसायिकांशीही संवाद साधला.

शॉप किराणा या किराणा ऑनलाइन स्टोअरचे संस्थापक श्री तनु तेजस सारस्वत यांच्याकडून पंतप्रधानांनी त्यांची पार्श्वभूमी आणि हा व्यवसाय सुरू करण्याची कल्पना कशी सुचली याची माहिती घेतली.त्यांच्या व्यवसायातल्या संधी आणि विकास याबाबतही त्यांनी विचारपूस केली.  त्यांच्या  स्टार्टअपशी  किती किराणा दुकाने जोडली गेली आहेत आणि त्यांनी उद्योगासाठी इंदूर का निवडले, असेहीपंतप्रधानांनी विचारले.

पंतप्रधान स्ट्रीटव्हेंडर आत्मनिर्भर निधी अर्थात पंतप्रधान स्वनिधी योजनेचा लाभ घेतलेल्या रस्त्यावरील विक्रेत्यांना संघटित करता येईल का, असा प्रश्नही पंतप्रधानांनी विचारला.भोपाळ येथील उमंग श्रीधर डिझाईन प्रायव्हेट लिमिटेडच्या संस्थापक उमंग श्रीधर यांच्याशी पंतप्रधानांनी संवाद साधला. खादी मध्ये त्यांनी केलेले नवीन प्रयोग आणि मोठ्या कंपन्यांसाठी त्यांनी तयार केलेली उत्पादने याविषयी पंतप्रधानांनी माहिती घेतली. त्यांनी 2014  मध्ये कंपनी सुरू केल्यामुळे सरकारसोबत स्टार्टअपचा प्रवास संलग्न राहिला आहे, असं उमंग यांनी सांगितलं. महिला कर्मचाऱ्यांच्या कामाबद्दलही त्यांनी पंतप्रधानांना माहिती दिली. काम करताना त्यांच्या स्टार्टअपमधील महिलांमध्ये त्यांनी घडवून आणलेल्या सुधारणा आणि मूल्यवर्धनाबद्दल पंतप्रधानांनी विचारपूस केली. त्यांच्या स्टार्टअपमध्ये

महिला कारागिरांच्या उत्पन्नात जवळपास 300 टक्क्यांनी वाढ झाल्याची माहिती त्यांनी दिली. या महिलांना कारागीर ते उद्योजक बनण्याचे प्रशिक्षण देत असल्याचं उमंग यांनी पंतप्रधानांना सांगितले.

पंतप्रधानांनी त्यांच्या काशीतील कामाचीही माहिती घेतली. एक रोजगारनिर्माती असल्याबद्दल तसेच त्यांच्या प्रेरणादायी कार्याबद्दल पंतप्रधानांनी उमंग यांचे कौतुक केले.

इंदूर येथील तौसिफ खान यांच्याशी पंतप्रधानांनी संवाद साधला. त्यांची संस्था शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी काम करत आहे, असे त्यांनी पंतप्रधानांना सांगितले. त्यांनी तांत्रिक उपाय तयार केले असून डिजिटल आणि भौतिक साधनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत ते पोहाचवण्यात येत आहेत  अशी माहिती खान यांनी दिली.  स्टार्टअपशी निगडित शेतकऱ्यांसाठी माती परीक्षण सुविधा उपलब्ध केली जाऊ शकते का, असा प्रश्न पंतप्रधानांनी त्यांना विचारला. तेव्हा स्टार्टअपच्या

माती परीक्षण करण्याच्या पद्धती आणि अहवाल डिजिटल पद्धतीने शेअर करण्याच्या पद्धतींबद्दल त्यांना माहिती देण्यात आली. शेतकऱ्यांनी सेंद्रिय आणि सूक्ष्मजीव खत वापरावे यासाठीही प्रोत्साहन दिलेजात असल्याचे खान यांनी नमूद केले. नैसर्गिक शेती करण्याबत शेतकऱ्यांचे काय मत आहे,अशी विचारणाही पंतप्रधानांनी केली. इंदूर स्वच्छ सर्वेक्षणात उत्कृष्ट कामगिरी करत आहे त्याप्रमाणे

इंदूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनीही रसायनमुक्त शेतीचा आदर्श घालून द्यावा अशी अपेक्षा पंतप्रधानांनी व्यक्त केली.

तरुणांमुळे देशाच्या विकासाला नवी गती मिळत आहे. सक्रिय स्टार्टअप धोरणामुळे  ऊर्जा असलेले मेहनती स्टार्टअप नेतृत्व देशात तयार होत असल्याचे मत पंतप्रधानांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना मांडले. 8 वर्षांच्या अल्प कालावधीत स्टार्टअप  जगतात मोठे परिवर्तन झाल्याचे ते म्हणाले. 2014  मध्ये हे  सरकार स्थापन झाले तेव्हा देशातील स्टार्टअपची संख्या होती सुमारे 300-400.आज जवळपास 70 हजार मान्यताप्राप्त स्टार्टअप्स आहेत. दर 7-8 दिवसांनी देशात एक नवीन युनिकॉर्न तयार होत असल्याची  माहितीही त्यांनी दिली.

पंतप्रधानांनी स्टार्ट अप्सच्या विविधतेचीही दखल घेतली. सुमारे 50%  स्टार्टअप द्वितीय  तृतीय श्रेणी शहरांमधील आहेत. या स्टार्टअप्सने अनेक राज्ये आणि शहरे व्यापली आहेत. ते 50 हून अधिक उद्योगांशी संबंधित आहेत.वास्तव जगातील समस्यांवर हे स्टार्टअप तोडगा काढतात, असेही त्यांनी स्पष्ट केले.  आजचे स्टार्टअप भविष्यातील आंतरराष्ट्रीय कंपन्यात रुपांतरीत होत आहेत, असे त्यांनी पुढे सांगितले. 8  वर्षांपूर्वी स्टार्टअपच्या संकल्पनेवर काही लोकांची चर्चा होत असे आता स्टार्टअप हा सामान्य लोकांमध्ये चर्चेचा विषय झाला आहे, हा बदल असाच अचानक झाला नसून तो एका चांगल्या धोरणाचा परिणाम आहे,असे ते म्हणाले.

पंतप्रधान मोदी यांनी, समस्यांवर  नाविन्यपूर्ण उपायांद्वारे तोडगा आस भारताला नेहमीच राहिली आहे असे सांगून, माहिती तंत्रज्ञानातील क्रांतीच्या गतीला प्रोत्साहनाचा अभाव आणि संधीला वाव  देण्यात आलेले अपयश याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली. तेव्हाचे अवघे दशक घोटाळे आणि त्या काळातील गोंधळाच्या स्थितीतच वाया गेले. ते म्हणाले की, 2014  नंतर सरकारने भारतीय तरूणांच्या नाविन्यतेच्या ताकदीवरील विश्वास प्रस्थापित केला आणि अनुकूल वातावरण तयार केले. स्टार्ट अप क्षेत्राला चालना देण्यासाठी कल्पना ते नाविन्यपूर्णता ते उद्योग असा संपूर्ण आराखडा तयार करून त्या द्वारे त्रिआयामी दृष्टिकोन तयार केल्याची माहिती त्यांनी दिली. ते म्हणाले की, या धोरणाचा पहिला भाग  स्टार्ट अप कल्पनेची धारणा, नाविन्यपूर्णता, स्टार्ट अप स्थापन केल्यावर त्यासाठी सुरूवातीच्या काळात सर्व प्रकारचा सहयोग देणे (इनक्युबेट) आणि उद्योग हा होता. या प्रक्रियांशी संबंधित संस्था स्थापन करण्यात येऊन त्या मजबूत करण्यात आल्या. दुसरे म्हणजे, सरकारी नियम सुलभ करण्यात आले. तिसरे म्हणजे, नवीन परिसंस्था तयार करून नाविन्यपूर्णतेबद्दलच्या मानसिकतेत बदल घडवून आणला.  हे लक्षात घेऊन, हॅकेथॉनसारखे स्पर्धात्मक कार्यक्रम आयोजित करण्यात आले, ज्यात 15  लाख प्रतिभाशाली नवतरूणांनी सहभाग घेऊन स्टार्ट अपसाठी एक परिसंस्था तयार केली.

पंतप्रधान म्हणाले की, 7  वर्षांपूर्वी सुरू करण्यात आलेला स्टार्ट अप इंडिया हा कार्यक्रम कल्पनांचे रूपांतर नाविन्यपूर्ण उपक्रमांमध्ये करण्यात आणि  ते उद्योगांपर्यंत पोहचवण्याच्या दिशेने मोठे पाऊल होते. त्यानंतर एक वर्षाने शाळांमध्ये विद्यार्थ्यांसाठी विविध शास्त्रीय कल्पनांवर प्रयोग करून त्या विकसित करण्यास सहाय्य करणाऱ्या  अटल टिंकरिंग प्रयोगशाळा आणि उच्च शिक्षण  संस्थांमध्ये इनक्युबेशन सेंटर्ससह अटल इनोवेशन मिशन सुरू करण्यात आले. आता दहा हजारांहून अधिक शाळांमध्ये अशा टिंकरिंग लॅब्ज असून 75  लाख विद्यार्थ्यांना नाविन्यपूर्ण उपक्रमांसाठी अनुकूल वातावरणाचा लाभ मिळत आहे. त्याचप्रमाणे, राष्ट्रीय शैक्षणिक धोरणही अशा नवीन उपक्रमांना चालना देत आहे. या क्षेत्रात खासगी गुंतवणूक वाढत आहे.

ते म्हणाले की, अंतराळ क्षेत्र, मॅपिंग , ड्रोन्स आदी क्षेत्रात सुधारणा राबवण्यात आल्याने स्टार्ट अप्ससाठी नवनवीन संधी खुल्या होत आहेत. स्टार्ट अप्समध्ये तयार झालेली उत्पादने बाजारपेठेत आणण्यात सहजता येण्यासाठी, जीईएम (GeM) पोर्टल  स्थापित करण्यात आले. या जीईएम संकेतस्थळावर 13  हजाराहून अधिक स्टार्ट अप्सची नोंदणी झाली असून या संकेतस्थळावरून 6500  कोटी रूपयांपेक्षा अधिक व्यवसाय झाला आहे. डिजिटल इंडियाने स्टार्ट अप्सचा विकास आणि नवीन बाजारपेठा खुल्या होण्यास प्रमुख चालना दिली आहे. पंतप्रधान म्हणाले की, पर्यटन क्षेत्राचा विकास करण्यात स्टार्ट अप्सची प्रमुख भूमिका राहिली आहे. स्थानिक उत्पादनांना जागतिक बाजारात नेण्यासाठी व्होकल फॉर लोकल कल्पनेला चालना देण्यातही स्टार्ट अप्स सहाय्य करतील. आदिवासींना आपल्या कलाकुसरीच्या वस्तु आणि उत्पादने बाजारात आणण्यासाठीही स्टार्ट अप्स मदत करू शकतात. गेमिंग उद्योग आणि खेळणी उद्योगांना सरकार मोठ्या प्रमाणात चालना देत आहे. स्टार्ट अप्ससाठी कृत्रिम बुद्धिमत्ता, इंटरनेट ऑफ थिंग्ज, रोबोटिक्स, बिग डेटा आदी तंत्रज्ञानांचा समावेश असलेल्या अत्यंत उच्च तंत्रज्ञानांची (फ्रंटियर टेक्नॉलॉजी)  असलेली क्षमताही त्यांनी नमूद केली.  800 हून अधिक भारतीय स्टार्ट अप्स क्रीडा क्षेत्रात गुंतलेले आहेत, अशी माहितीही त्यांनी दिली.

पंतप्रधान म्हणाले की, भारताच्या या यशाला आपल्याला नवीन गती आणि उंची दिली पाहिजे. जी 20  समूहात भारत आज जगातील सर्वात जलद गतिने वाढणारी अर्थव्यवस्था आहे. ते असेही म्हणाले की, भारत जगातील तिसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे. स्मार्टफोन्स, विदा (डेटा) वापर  याबाबतीत भारत पहिल्या स्थानावर तर इंटरनेट वापरकर्त्याच्या बाबतीत दुसऱ्या स्थानावर आहे. जागतिक किरकोळ निर्देशांकात भारत दुसऱ्या स्थानावर असून जगातील सर्वात मोठ्या उर्जा  ग्राहक देशांमध्ये  तिसऱ्या  क्रमांकावर  आहे तर भारत जगातील तिसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी ग्राहक बाजारपेठ आहे. यावर्षी भारताने 470 अब्ज डॉलर्सची व्यापारी निर्यात करून नवीन विक्रम प्रस्थापित केला आहे. पायाभूत क्षेत्रात आज अभूतपूर्व गुंतवणूक होत आहे. भारतात व्यवसायानुकूलता आणि जीवन सुखकर करण्याच्या बाबतीत अभूतपूर्व जोर दिला जात आहे. ही तथ्ये प्रत्येक भारतीयाची मान अभिमानाने उंच करतील आणि या दशकात नव्या उर्जेसह भारताची विकासगाथा पुढे नेतील, हा विश्वास निर्माण करतील. अमृत काळातील आमचे प्रयत्न देशाची दिशा निश्चित करतील आणि आमच्या सामूहिक प्रयत्नांच्या माध्यमातून आम्ही देशाच्या आकांक्षांची पूर्तता करू, असे पंतप्रधान म्हणाले.

***

N.Chitale/P.Jambhekar/U.Kulkarni/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1825392) Visitor Counter : 218