पंतप्रधान कार्यालय

कोविड संदर्भातील दुसऱ्या जागतिक आभासी शिखर परिषदेच्या उद्‌घाटनपर सत्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण

Posted On: 12 MAY 2022 10:04PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 12 मे 2022

 

अध्यक्ष बायडेन

उपाध्यक्ष हॅरिस

उपस्थित मान्यवर

नमस्कार !

कोविड महामारीमुळे मानवी जीवन आणि पुरवठा साखळ्या यांच्यात अडचणी निर्माण होणे सुरुच आहे आणि त्यासोबतच मुक्त समाजाच्या सहनशक्तीची देखील परीक्षा घेतली जात आहे. भारतात, आपण या महामारीविरुद्ध लोकाभिमुख धोरण स्वीकारले आहे. या वर्षीच्या आमच्या वार्षिक आरोग्यसेवेच्या तरतुदीसाठी आम्ही आतापर्यंतचा आरोग्य क्षेत्रासाठीचा सर्वात जास्त निधी राखून ठेवला आहे.

आमचा लसीकरण कार्यक्रम हा जगातील सर्वात मोठा लसीकरण कार्यक्रम आहे. आपण देशातील सुमारे 90% प्रौढ लोकांचे आणि 50 दशलक्षाहून अधिक मुलांचे संपूर्ण लसीकरण केले आहे. जागतिक आरोग्य संघटनेने मान्यता दिलेल्या चार प्रकारच्या लसींचे उत्पादन भारतात केले जाते आणि या वर्षी लसीच्या पाच अब्ज मात्रांचे उत्पादन करण्याची क्षमता भारताने विकसित केली आहे.

आम्ही द्विपक्षीय पद्धतीने आणि कोवॅक्सच्या माध्यमातून जगातील 98 देशांना 200 दशलक्षांहून अधिक मात्रांचा पुरवठा केला आहे. भारताने, संसर्गनिश्चिती चाचण्या, उपचार आणि माहिती व्यवस्थापनाकरिता अत्यंत कमी खर्चात होऊ शकणारे कोविड प्रतिबंधक तंत्रज्ञान विकसित केले आहे. आम्ही या पद्धतींची माहिती इतर देशांना देखील देऊ केली आहे.

भारताच्या जीनोमिक्स संघाने या विषाणूविषयी जगाकडे असलेल्या माहितीच्या साठ्यात मोठी भर घातली आहे. आणि मला हे सांगण्यास अत्यंत आनंद वाटतो की आम्ही माहितीचे हे जाळे आमच्या शेजारच्या देशांपर्यंत विस्तारित करणार आहोत.

भारतात, कोविड विरोधातील लढ्याला पाठबळ पुरविण्यासाठी आणि प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी आम्ही आमच्या पारंपरिक औषधांचा मोठ्या प्रमाणावर वापर केला आणि असंख्य जीव वाचविले.

गेल्या महिन्यात, आम्ही भारतात, जागतिक आरोग्य संघटनेच्या पारंपारिक औषध केंद्राची पायाभरणी केली. प्राचीन काळापासून चालत आलेले हे ज्ञान संपूर्ण जगाला उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने हे केंद्र सुरु करण्यात येत आहे.

महोदय,

भविष्यात येऊ घातलेल्या आरोग्यविषयक आपत्तींशी लढण्यासाठी समन्वयीत जागतिक प्रतिसादाची गरज भासेल हे तर आता स्पष्ट झाले आहे. आपण सर्वांनी लवचिक स्वरूपाच्या जागतिक पुरवठा साखळीची उभारणी केली पाहिजे आणि लसी तसेच औषधे यांचे समान प्रमाणात वितरण शक्य केले पाहिजे.

जागतिक व्यापार संघटनेचे नियम, विशेषतः टीआरआयपीएस अर्थात बौद्धिक मालमत्ता हक्कांच्या व्यापार संबंधी दृष्टीकोनाच्या संदर्भातील नियम अधिक लवचिक असणे गरजेचे आहे. अधिक संवेदनशील जागतिक आरोग्य सुरक्षाविषयक स्थापत्य उभारण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेची पुनर्रचना आणि सशक्तीकरण झाले पाहिजे.

पुरवठा साखळ्या स्थिर आणि अंदाज येण्याजोग्या असाव्या याकरिता लसींना तसेच इतर औषधोपचारांना मान्यता देण्यासाठीची जागतिक आरोग्य संघटनेची प्रक्रिया अधिक सुलभ करण्यात यावी अशी आमची मागणी आहे. जागतिक समुदायाचा जबाबदार सदस्य म्हणून भारत या प्रयत्नांमध्ये महत्त्वाची भूमिका निभावण्यासाठी सज्ज आहे.

धन्यवाद.

खूप खूप धन्यवाद.

 

 

 

 

S.Patil/S.Chitnis/P.Malandkar

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com(Release ID: 1824926) Visitor Counter : 171