पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्ली येथे युरोपीय आयोगाच्या अध्यक्ष उर्सुला वॉन डर लेयेन यांची भेट घेऊन चर्चा केली

Posted On: 25 APR 2022 8:06PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 25 एप्रिल 2022

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज युरोपीय आयोगाच्या अध्यक्ष उर्सुला वॉन डर लेयेन यांचे नवी दिल्ली येथे स्वागत केले.

यावर्षी होणाऱ्या रायसीना संवादामध्ये उद्‌घाटनपर भाषण करण्याचे मान्य केल्याबद्दल पंतप्रधानांनी  युरोपीय आयोगाच्या अध्यक्षांचे आभार मानले. आजच्या दिवशी काही वेळाने होणारे त्यांचे भाषण ऐकण्यासाठी आपण उत्सुक आहोत असे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले.

भारत आणि युरोप हे मोठ्या आकाराचे आणि चैतन्यमय लोकशाही समाज समान प्रकारची मूल्ये जपतात तसेच अनेक जागतिक पातळीवरील विषयांच्या बाबतीत दोन्ही देशांचे समान मत आहे यावर दोन्ही नेत्यांचे बैठकीत एकमत झाले.

आजच्या बैठकीत दोन्ही नेत्यांनी मुक्त व्यापार करार आणि गुंतवणूक करार यांच्या संदर्भात आगामी काळात पुन्हा सुरु होणाऱ्या वाटाघाटींसह भारत-युरोपियन युनियन धोरणात्मक भागीदारीतील प्रगतीचा आढावा घेतला. भारत आणि युरोपियन युनियन यांच्यातील संबंधांच्या सर्व पैलूंचे राजकीय पातळीवरील निरीक्षण सादर करण्यासाठी तसेच दोन्ही देशांदरम्यान सहकार्याच्या विविध क्षेत्रांमध्ये समन्वय सुनिश्चित करण्यासाठी उच्च-स्तरीय व्यापार आणि तंत्रज्ञान आयोग स्थापन करण्याबाबत पंतप्रधान आणि युरोपीय आयोगाच्या अध्यक्षांनी मान्यता दिली.

हरित हायड्रोजन सारख्या क्षेत्रांमध्ये भारत आणि युरोपियन युनियन यांच्यामध्ये होऊ शकणाऱ्या सहकारी संबंधांच्या शक्यतेसह हवामान विषयक समस्यांवर दोन्ही नेत्यांनी या बैठकीत विस्तृत चर्चा केली. अजूनही सर्वांसमोर असलेल्या कोविड-19 संसर्गाच्या आव्हानाबाबत देखील त्यांनी विचारविनिमय केला आणि कोविड प्रतिबंधक लस तसेच इतर औषधांचा जगाच्या सर्व  भागात न्याय्य पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी प्रयत्न करण्यावर भर दिला.

त्याचबरोबर, या बैठकीत युक्रेनमधील परिस्थिती तसेच हिंद-प्रशांत भागातील घडामोडींसह प्रादेशिकदृष्ट्या महत्त्वाच्या इतर अनेक भू-राजकीय समस्यांवर चर्चा झाली.

 

 

 

 

R.Aghor/S.Chitnis/P.Malandkar

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com(Release ID: 1819960) Visitor Counter : 243