माहिती आणि प्रसारण मंत्रालय
खेलो इंडिया विद्यापीठ स्पर्धांचे डी.डी. स्पोर्ट्स वाहिनीवरुन थेट प्रसारण
Posted On:
23 APR 2022 5:20PM by PIB Mumbai
संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या खेलो इंडिया विद्यापीठ क्रीडा स्पर्धां 2021,बाबत एक आनंदाची वार्ता म्हणजे, क्रीडा रसिकांना ह्या स्पर्धा आता, दूरदर्शनच्या डीडी स्पोर्ट्स या वाहिनीवर थेट बघता येणार आहेत. केवळ टीव्हीवरच नाही, तर मोबाईलवरही, 24 एप्रिल म्हणजे उद्यापासून सुरु होणारे सर्व सामने प्रेक्षकांना थेट बघता येतील.
2020 पासून सुरु झालेल्या या क्रीडा स्पर्धा, ‘खेलो इंडिया’ या उपक्रमाचा भाग असून, भारतातील क्रीडा संस्कृती पुनरुज्जीवित करण्याचा हा प्रयत्न आहे, खेलो इंडियाची दुसरी आवृत्ती, 24 एप्रिल ते 3 मे दरम्यान होणार आहे. उद्या म्हणजेच 24 एप्रिलला शुभारंभ तर 3 मे रोजी स्पर्धांची सांगता होईल.
भारतात विविध खेळांसाठी एक भक्कम पाया निर्माण करण्याच्या उद्देशाने सुरु करण्यात आलेल्या खेलो इंडिया विद्यापीठ स्पर्धा, या राष्ट्रीय स्तरावर होणाऱ्या वार्षिक क्रीडा स्पर्धा आहेत. ज्यात, देशभरातील, विविध क्रीडाप्रकारातील खेळाडू सहभागी होत असतात. या देशातील, सर्वात मोठ्या विद्यापीठस्तरीय क्रीडा स्पर्धा आहेत. देशातील क्रीडा नैपुण्याचा शोध घेणे आणि, 18 ते 25 वर्षे वयोगटातील खेळाडूंना ऑलिंपिक तसेच आशियाई स्पर्धांसाठी प्रशिक्षण देण्याच्या उद्देशाने या स्पर्धा भरविल्या जातात.
भारतीय क्रीडा प्राधिकरणाशी समन्वय साधून, डीडी स्पोर्ट्सने या संपूर्ण स्पर्धांसाठी व्यापक व्यवस्था केल्या आहेत. या स्पर्धांमधे, 175 विद्यापीठांमधील 3800 खेळाडू सहभागी होण्याची अपेक्षा आहे. मैदानी स्पर्धा, व्हॉलिबॉल, जलतरण, बास्केटबॉल, भारोत्तलन, कबड्डी, कराटे आणि योगासने अशा सर्व स्पर्धा होणार असून त्यांचे थेट प्रक्षेपण डीडी स्पोर्ट्स वरुन दाखवले जाईल. तर जुडो, टेनिस, मल्लखांब, तिरंदाजी, तलवारबाजी, फुटबॉल, टेबल-टेनिस, बॅडमिंटन, हॉकी, नेमबाजी आणि मुष्टियुद्ध, या स्पर्धा ध्वनीमुद्रित पद्धतीने दाखवल्या जातील. या वर्षीच्या स्पर्धेत, 20 क्रीडाप्रकार होतील, गेल्या वर्षी 18 क्रीडाप्रकारांच्या स्पर्धा झाल्या होत्या, मात्र यंदा त्यात योगासने आणि मल्लखांब हे दोन क्रीडाप्रकार समाविष्ट करण्यात आले आहेत.
टीव्ही प्रसारणाशिवाय, इतर माध्यमातून प्रेक्षकांपर्यंत या स्पर्धा पोचवण्यासाठी, प्रसारभारतीच्या स्पोर्ट्स युट्यूब चॅनेलवरुन चार ठिकाणी स्पर्धांचे थेट प्रक्षेपण केले जाईल. या प्रक्षेपणासह, इंग्रजी आणि हिन्दीतून समालोचन आणि ग्राफिक्स देखील दाखवले जातील.
डीडी स्पोर्ट्स वर दररोज सकाळी 9 ते संध्याकाळी 6 पर्यंत थेट/ध्वनिमुदित कार्यक्रम दाखवले जातील.
***
S.Patil/R.Aghor/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1819326)
Visitor Counter : 195