पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधान 18 ते 20 एप्रिल या कालावधीत गुजरात राज्याला देणार भेट


पंतप्रधान दाहोद येथील आदिजाति महासंमेलनाला भेट देतील आणि सुमारे 22,000 कोटी रुपये खर्चाच्या विविध विकासकामांची कोनशिला बसवतील.

पंतप्रधान जामनगर येथे जागतिक आरोग्य संघटनेच्या, पारंपरिक औषधविषयक जागतिक केंद्राची कोनशिला बसवतील तसेच ते गांधीनगर येथे होणाऱ्या वैश्विक आयुष गुंतवणूक आणि नवोन्मेष शिखर परिषदेचे उद्घाटन देखील करतील

बनासकांठा मधील दियोदर येथील बनास डेरी संकुलातील विविध विकास प्रकल्पांची कोनशिला ठेवून पंतप्रधान हे प्रकल्प राष्ट्राला अर्पण करतील

पंतप्रधान गांधीनगरमधील विद्यालयांसाठीच्या कमांड आणि कंट्रोल केंद्राला देखील भेट देतील.

Posted On: 16 APR 2022 4:45PM by PIB Mumbai

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 18 ते 20 एप्रिल या कालावधीत गुजरात राज्याला भेट देणार आहेत. 18 एप्रिल रोजी संध्याकाळी 6 च्या सुमाराला पंतप्रधान गांधीनगर येथील विद्यालयांसाठीच्या कमांड आणि कंट्रोल केंद्राला भेट देतील. 19 एप्रिल रोजी सकाळी 9.40 ला ते बनासकांठा मधील दियोदर येथील बनास डेरी संकुलातील विविध विकास प्रकल्पांची कोनशिला बसवून हे प्रकल्प राष्ट्राला अर्पण करतील. त्यानंतर दुपारी सुमारे साडेतीन वाजता ते जामनगर मधील जागतिक आरोग्य संघटनेच्या, पारंपारिक औषधविषयक जागतिक केंद्राची कोनशिला ठेवतील. तर 20 एप्रिल रोजी सकाळी साडेदहा च्या सुमारास ते गांधीनगर यथे होणाऱ्या वैश्विक आयुष गुंतवणूक आणि नवोन्मेष शिखर परिषदेचे उद्घाटन करतील. त्यानंतर दुपारी साडेतीन वाजता ते दाहोद येथील आदिजाति महा संमेलनाला उपस्थित राहतील आणि तेथील विविध विकासकामांची कोनशिला बसवतील.

 

पंतप्रधानांची विद्यालयांसाठीच्या कमांड आणि कंट्रोल केंद्राला भेट

पंतप्रधान 18 एप्रिल रोजी संध्याकाळी 6 च्या सुमाराला गांधीनगर येथील विद्यालयांसाठीच्या कमांड आणि कंट्रोल केंद्राला भेट देतील. हे केंद्र दर वर्षी 500 कोटीहून अधिक माहिती संच संकलित करते आणि विद्यार्थ्यांसाठी समग्र शिक्षण परिणामांच्या सुधारणेसाठी त्याचे बिग डाटा अॅनालिटिक्स, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि यांत्रिक शिक्षणपद्धतीचा वापर करून त्यांचे विचारपूर्वक विश्लेषण करते. हे केंद्र शिक्षण आणि विद्यार्थ्यांच्या दैनंदिन ऑनलाईन उपस्थितीवर लक्ष ठेवणे, विद्यार्थ्यांच्या अध्ययनाचे केंद्रीभूत समग्र आणि कालबद्ध मूल्यमापन करणे इत्यादी बाबतीत मदत करते. विद्यालयांसाठीचे कमांड आणि कंट्रोल केंद्राला जागतिक बँकेने वैश्विक स्तरावरील उत्तम पद्धतीचा दर्जा दिला आहे आणि त्यामुळे इतर देशांनी या केंद्राला भेट देऊन तेथील प्रक्रिया शिकून घेण्याला अधिक प्रोत्साहन मिळाले आहे.

 

बनासकांठा मधील दियोदर येथील बनास डेरी संकुलाला पंतप्रधानांची भेट

19 एप्रिल रोजी  सकाळी 9.40 वाजता बनासकांठा जिल्ह्यातील दियोदर येथे 600 कोटी रुपये खर्च करून उभारण्यात आलेल्या नव्या डेरी संकुलाचे आणि बटाटा प्रक्रिया संयंत्राचे राष्ट्रार्पण पंतप्रधानांच्या हस्ते होईल. हे नवे डेरी संकुल ग्रीनफिल्ड प्रकारचा म्हणजे संपूर्णतः नव्याने उभारण्यात आलेला प्रकल्प आहे. या प्रकल्पात दर दिवशी 30 लाख लिटर दुधावर प्रक्रिया करता येईल, 80 टन लोणी निर्मिती होईल, एक लाख लिटर आईस्क्रीम तयार करता येईल, 20 टन खवा तयार करता येईल आणि 6 टन चॉकलेट तयार होईल. बटाटा प्रक्रिया संयंत्राच्या मदतीने फ्रेंच फ्राईज, बटाट्याचे काप, आलू टिक्की, पॅटीस यांसारखी बटाट्याची विविध प्रक्रियायुक्त उत्पादने तयार करता येतील आणि त्यांच्यापैकी अनेक उत्पादनांची इतर देशात निर्यात देखील केली जाईल. हे प्रकल्प स्थानिक शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी उपयुक्त ठरतील आणि त्यातून या भागातील ग्रामीण अर्थव्यवस्थेला उभारी मिळेल.

पंतप्रधान या भेटीदरम्यान बनास कम्युनिटी रेडीओ केंद्राचे देखील लोकार्पण करतील. शेतकऱ्यांना कृषी आणि पशुपालन या विषयीची महत्त्वाची माहिती पुरविण्याच्या हेतूने हे कम्युनिटी रेडीओ केंद्र स्थापन करण्यात आले आहे. या केंद्राच्या माध्यमातून सुमारे 1700 गावांमधील 5 लाखांहून अधिक शेतकऱ्यांपर्यंत माहिती पोहचविता येईल अशी अपेक्षा आहे.

पालनपुर येथील बनास डेरी संकुलात चीज आणि व्हे भुकटीच्या निर्मितीसाठी सुरु करण्यात आलेल्या विस्तारित सुविधांचे देखील पंतप्रधान यावेळी लोकार्पण करतील. तसेच, दामा येथे स्थापन करण्यात आलेल्या सेंद्रीय खत आणि बायोगॅस संयंत्राचे राष्ट्रार्पण देखील पंतप्रधानांच्या हस्ते करण्यात येईल.

तसेच खिमाना, रतनपुरा-भिल्डी, राधनपूर आणि थावर येथे उभारण्यात आलेल्या 100 टन क्षमतेच्या चार गोबर गॅस संयंत्रांची कोनशिला देखील पंतप्रधानांच्या हस्ते बसवण्यात येईल.

 

डब्ल्यूएचओ ग्लोबल सेंटर फॉर ट्रेडिशनल मेडिसिन

मॉरिशसचे पंतप्रधान प्रविंद कुमार जुगनाथ आणि जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक डॉ. टेड्रोस गेब्रेयसस यांच्या उपस्थितीत पंतप्रधान जामनगरमध्ये 19 एप्रिल रोजी  3:30 वाजता डब्ल्यूएचओ ग्लोबल सेंटर फॉर ट्रेडिशनल मेडिसिन (जीसीटीएम ) ची पायाभरणी करतील. जीसीटीएम हे जगभरातील पारंपारिक औषधांसाठी पहिले आणि एकमेव जागतिक  केंद्र असेल. हे जागतिक निरामय आरोग्याचे आंतरराष्ट्रीय केंद्र म्हणून उदयाला  येईल.

 

जागतिक आयुष गुंतवणूक आणि नवोन्मेष शिखर परिषद

पंतप्रधानांच्या हस्ते 20 एप्रिल रोजी सकाळी 10:30 वाजता गुजरातमधील  गांधीनगर येथील महात्मा मंदिर येथे जागतिक आयुष गुंतवणूक आणि नवोन्मेष शिखर परिषदेचे उद्घाटन होणार आहे. यावेळी मॉरिशसचे पंतप्रधान आणि जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक  देखील उपस्थित राहणार आहेत. तीन दिवस चालणाऱ्या या शिखर परिषदेमध्ये 5 पूर्ण सत्रे, 8 गोलमेज, 6 कार्यशाळा आणि 2 परिसंवाद होणार असून  सुमारे 90 प्रख्यात वक्ते आणि 100 प्रदर्शक  उपस्थित राहणार आहेत.  गुंतवणूक क्षमतांचा शोध घेण्यात ही परिषद  मदत करेल आणि नवोन्मेष , संशोधन आणि विकास, स्टार्ट-अप परिसंस्था  आणि आरोग्य विषयक उद्योगाला चालना देईल. उद्योजक, शिक्षणतज्ज्ञ आणि विद्वानांना एकत्र आणण्यास परिषद मदत करेल आणि भविष्यातील सहकार्यांसाठी एक व्यासपीठ म्हणून काम करेल.

 

दाहोद येथील आदिजाती महासंमेलनात पंतप्रधान

पंतप्रधान 20 एप्रिल रोजी दाहोद येथे दुपारी 3:30 वाजता होणाऱ्या आदिजाती महासंमेलनाला उपस्थित राहतील. यावेळी  ते सुमारे 22,000 कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करतील. संमेलनात  2 लाखांहून अधिक लोकांचा सहभाग अपेक्षित आहे.

1400 कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. सुमारे 840 कोटी रुपये खर्चून  नर्मदा नदीच्या पात्रात  बांधण्यात आलेल्या दाहोद जिल्हा दक्षिण क्षेत्र प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेचे ते  उद्घाटन करतील. हे दाहोद जिल्ह्यातील आणि देवगड बारिया शहरातील सुमारे 280 गावांच्या पाणी पुरवठा संबंधी  गरजा पूर्ण करेल. सुमारे 335 कोटी रुपयांच्या दाहोद स्मार्ट सिटीच्या पाच प्रकल्पांचे उद्घाटनही पंतप्रधान करणार आहेत. या प्रकल्पांमध्ये इंटिग्रेटेड कमांड अँड कंट्रोल सेंटर (ICCC) इमारत , स्टॉर्म वॉटर ड्रेनेज सिस्टीम, सीवरेज कामे, घनकचरा व्यवस्थापन प्रणाली आणि रेन वॉटर हार्वेस्टिंग सिस्टीम यांचा समावेश आहे. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत, पंचमहाल आणि दाहोद जिल्ह्यातील 10,000 आदिवासींना 120 कोटी रुपयांचे लाभ दिले जातील. 66 केव्ही घोडिया सबस्टेशन, पंचावत  घरे, अंगणवाड्यांचे उद्घाटनही पंतप्रधान करणार आहेत.

पंतप्रधान दाहोदमधील कारखान्यात 9000 अश्वउर्जा  इलेक्ट्रिक लोकोमोटिव्हच्या निर्मितीसाठी पायाभरणी करतील. प्रकल्पाचा खर्च सुमारे 20,000 कोटी रुपये आहे. 1926 मध्ये स्टीम लोकोमोटिव्हच्या दुरुस्तीसाठी स्थापन केलेल्या दाहोद कार्यशाळेचे पायाभूत सुधारणांसह इलेक्ट्रिक लोकोमोटिव्ह उत्पादन कारखाना म्हणून उन्नतीकरण केले  जाईल. यातून  10,000 हून अधिक लोकांना प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार मिळेल.  राज्य सरकारच्या सुमारे 550 कोटी रुपयांच्या विविध प्रकल्पांचे भूमिपूजनही पंतप्रधान करणार आहेत. यामध्ये सुमारे  300 कोटी रुपयांच्या पाणीपुरवठ्याशी संबंधित प्रकल्पांचा समावेश आहे.सुमारे  175 कोटी रुपयांचा दाहोद स्मार्ट सिटी प्रकल्प, दुधीमती नदी प्रकल्प, घोडिया येथील गेटको उपकेंद्र  यासह इतर कामांचा यात समावेश आहे.

***

S.Patil/S.Chitnis/S.Kane/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1817310) Visitor Counter : 182