गृह मंत्रालय
गुजरातमधील बनासकांठा जिल्ह्यातील नडाबेट येथे सीमा दर्शनसाठी नव्याने बांधलेल्या पर्यटन सुविधांचे केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांच्या हस्ते आज लोकार्पण
Posted On:
10 APR 2022 9:55PM by PIB Mumbai
केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी आज गुजरातमधील बनासकांठा जिल्ह्यातील नडाबेट येथे सीमा दर्शनसाठी नव्याने बांधलेल्या पर्यटन सुविधांचे लोकार्पण केले. अमित शाह यांनी नडाबेट बॉर्डर आउटपोस्ट सैनिक संमेलनाला संबोधित केले आणि जवानांशी संवादही साधला. यावेळी गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल आणि सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) महासंचालकांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
अमित शहा यांनी यावेळी बोलताना , सर्व देशवासियांना रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या, जीवनातील प्रत्येक भूमिका कशी निभावली पाहिजे यासाठी मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम यांचे जीवन सर्वोत्तम आदर्श आहे. एकही शब्द न बोलता आदर्श पुत्र, आदर्श पती, आदर्श राजा आणि आदर्श सेनापतीची भूमिका कशा प्रकारे निभावायला हवी, अशा प्रकारे आयुष्य जगत भगवान श्री राम यांनी उत्तम आदर्श मांडला.हा आदर्श घेऊन लोक वर्षानुवर्षे , युगानुयुगे प्रेरणा घेऊ शकतील असे ते म्हणाले.
केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री म्हणाले की, आज मी नडाबेटच्या या सीमेवर असणाऱ्या पर्यटनस्थळी आलो आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कल्पकतेला अभिवादन करावेसे वाटते, जोपर्यंत कोणी इथे येऊन पंतप्रधान मोदीजींची ही कल्पकता पाहत नाही तोपर्यंत ही बहुआयामी संकल्पना कोणालाच समजू शकत नाही.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकारने केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाचे जवान आणि त्यांच्या कुटुंबियांना देण्यात येणाऱ्या सुविधांमध्ये वाढ करण्यासाठी खूप काम केले आहे. ज्यात आरोग्य तपासणी आणि गृहनिर्माण सुविधेचा समावेश आहे. आयुष्मान सीएपीएफ कार्ड अंतर्गत, केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाच्या जवानांच्या कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीला कोणताही आजार झाल्यास ते कार्ड वापरून ते उपचार घेऊ शकतात, अशी माहिती शहा यांनी दिली.
नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यापासून देशाला जगातील प्रत्येक क्षेत्राला सर्वोच्च स्थानावर नेण्यासाठी नियोजनबद्ध प्रयत्न केले जात आहेत.हे प्रयत्न यशस्वी होतील कारण ,आपले सीमा सुरक्षा दलाचे जवान अभेद्य सुरक्षेसह सीमेवर पहारा देत आहेत ,यामुळेच सीमाभागात विकास शक्य आहे, असे त्यांनी सांगितले.
सीमा सुरक्षा दलाचे जवान रेतीची वादळे, कडक ऊन, कडाक्याची थंडी असतानाही आपल्या 6385 किमी लांबीच्या सीमेचे रक्षण करत आहेत . 1965 मध्ये 25 तुकड्यांपासून सुरू झालेल्या या दलात आज 193 तुकड्या आणि 60 आर्टिलरी रेजिमेंटमध्ये 2,65,000 जवान कार्यरत आहेत.देश आणि नागरिकांचा बीएसएफवर विश्वास असून 2,65,000 जवानांची ही फौज देशाच्या सुरक्षेची हमी आहे, असे अमित शाह म्हणाले.
काश्मीर खोऱ्यातील घुसखोरी रोखण्यासाठी, ईशान्येकडील आणि काही नक्षलग्रस्त भागात अंतर्गत सुरक्षा राखण्यासाठी असो किंवा , खाडीसारख्या अवघड भागातही गुडघ्यापर्यंतच्या दलदलीत तासनतास दक्ष राहणे असो अशा कठीण परिस्थितीत काम करणाऱ्या सीमा सुरक्षा दलाशिवाय जगात दुसरे कोणतीही सीमा सुरक्षा दल नसेल असे सांगत त्यांनी या दलाचा गौरवपूर्ण उल्लेख केला.
येथील सीमा सुरक्षा दलाचे शौर्य पाहून लहान मुलांनी आपल्या सीमा सुरक्षा दलाबद्दल आदराची भावना एक संस्कार म्हणून आत्मसात केली पाहिजे आणि देशाच्या सुरक्षेच्या क्षेत्रात मी ही काहीतरी करून दाखवेन हा निश्चय त्यांनी केला पाहिजे असे ते म्हणाले. आयुष्यभर कर्तव्य बजावल्याबद्दल मी बीएसएफमधील सर्वांचे आभार मानू इच्छितो आणि लोकांच्या वतीने तुमच्या शौर्याला सलाम करू इच्छितो असे शहा यांनी सांगितले.
जेव्हा आपण इथे येऊन नडाबेटच्या संपूर्ण प्रात्यक्षिक स्थळी गेल्यावर आणि येथून सीमेपर्यंत जाऊ तेव्हा आपल्याला समजेल की, अशा कठीण परिस्थितीत आपले सीमेचे रक्षक आपले संरक्षण करण्याचे काम कशा प्रकारे करत आहेत.येथे भेट दिल्याने मुलांच्या मनात देशभक्ती तसेच आपल्या सशस्त्र दले आणि आपल्या सीमांच्या सुरक्षेप्रती भावना जागृत होईल, असे गृहमंत्र्यांनी सांगितले. जेव्हा लोक इथे येतील तितकी पर्यटनाला चालना मिळेल आणि सीमेवरील गावांमधून स्थलांतराची मोठी समस्या दूर होईल तसेच रोजगाराच्या संधीही निर्माण होतील असा विश्वास व्यक्त करत सीमेवरील शेवटच्या गावात पोहोचण्याच्या प्रक्रियेची ही सुरुवात असल्याचे ते म्हणाले.
गुजरात सरकारने नडाबेटमधील सीमादर्शन कार्यक्रमावर 125 कोटी रुपये खर्च केले आहेत, 10 वर्षांनंतर, नडाबेटचे हे क्षेत्र बनासकांठा जिल्ह्यातील किमान पाच लाख लोकांच्या रोजगाराचे केंद्र बनेल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. या ठिकाणाची प्रसिध्दी व्हावी, अधिकाधिक लहान मुले येथे यावीत या दृष्टीने व्यवस्था करावी आणि येथे येणाऱ्या लोकांनी किमान एक रात्र बनासकांठा येथे मुक्काम करून बनासकांठालाही भेट द्यायला हवी असे अमित शहा यांनीं सांगितले.
येथील लहान मुलांना खेळण्यासाठीच्या सुविधा आणि 100 फूट उंच तिरंगा हे आकर्षणाचे केंद्र बनतील. येथे सहा दालने असून देशाच्या सर्व सीमांची ओळख या दालनाच्या माध्यमातून करून दिली जाईल. गुजरात पर्यटनासाठी गॅलरी बांधण्यात आली आहे आणि नडाबेट आणि बनासकांठा येथेही एक गॅलरी आहे.गुजरात पर्यटनासाठीही दालन तयार करण्यात आले असून नडाबेट आणि बनासकांठासाठीही एक दालन तयार करण्यात आले आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सीमा पर्यटनाचे मोठे स्वप्न आहे, येथे बीटिंग रिट्रीट सोहळा आकर्षणाचा केंद्रबिंदू असेल, सीमा भागातील पर्यटनाच्या माध्यमातून सीमा सुरक्षा, सीमेचे रक्षण करणाऱ्या जवानांशी जनसंवाद आणि जवानांबद्दल लोकांमध्ये आकर्षणाची भावना निर्माण ही तीन उद्दिष्टे या कार्यक्रमाद्वारे पूर्ण होतील असा विश्वास अमित शहा यांनी व्यक्त केला.
***
S.Patil/S.Chavan/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1815493)
Visitor Counter : 220