पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

नेपाळच्या पंतप्रधानांसमवेत संयुक्त पत्रकार परिषदेत पंतप्रधान, नरेंद्र मोदी यांचे वक्तव्य

Posted On: 02 APR 2022 2:17PM by PIB Mumbai

 

महामहिम,

पंतप्रधान शेर बहादूर देउबा जी,

मान्यवर प्रतिनिधी,

प्रसारमाध्यमांचे सहकारी,

 

नमस्कार!

पंतप्रधान देउबा जी यांचे भारतात स्वागत करताना मला खूप आनंद होत आहे. आज भारतीय नववर्ष आणि नवरात्रीच्या पावन प्रसंगी देउबा जींचे आगमन झाले आहे. मी त्यांना आणि भारत आणि नेपाळमधील सर्व नागरिकांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा देतो.

देउबाजी हे भारताचे जुने स्नेही आहेत. पंतप्रधान म्हणून त्यांचा हा पाचवा भारत दौरा आहे. भारत-नेपाळ संबंधांच्या विकासात देउबाजींनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

 

मित्रांनो,

भारत आणि नेपाळची मैत्री, आपल्या लोकांचे परस्पर संबंध, असे उदाहरण जगात कुठेही पहायला मिळत नाही. आपली सभ्यता, आपली संस्कृती, आपल्या देवाणघेवाणीचे बंध प्राचीन काळापासून जोडलेले आहेत. अनादी काळापासून आपण एकमेकांच्या सुख-दु:खाचे सोबती आहोत. आमच्या भागीदारीचा आधार म्हणजे आमच्या लोकांमधील परस्पर संबंध आणि त्यांच्यातील देवाणघेवाण. हे आपल्या नातेसंबंधांना उर्जा देतात, ते टिकवून ठेवतात.

नेपाळच्या संदर्भात भारताची धोरणे आणि त्याचे प्रयत्न या भावनेनेच प्रेरित आहेत. नेपाळच्या शांतता, प्रगती आणि विकासाच्या प्रवासात भारत हा खंबीर भागीदार आहे आणि कायम राहील.

 

मित्रांनो,

आज देउबाजी आणि मी या सर्व विषयांवर आणि इतर अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर फलदायी संवाद साधला. आम्ही आमच्या सहकार्याच्या विविध पैलूंवर चर्चा केली, विविध प्रकल्पांच्या प्रगतीचा आढावा घेतला आणि भविष्यातील आराखड्याबाबतही चर्चा केली.

ऊर्जा क्षेत्रातील सहकार्याच्या संधींचा पुरेपूर फायदा घेतला पाहिजे यावर आम्ही दोघांनी सहमती दर्शवली. ऊर्जा महामंडळाबाबत आमचे संयुक्त दृष्टिकोन निवेदन भविष्यातील सहकार्यासाठी ब्लू प्रिंट ठरेल. पंचेश्वर प्रकल्पात वेगाने प्रगती करण्याच्या महत्त्वावर आम्ही भर दिला. हा प्रकल्प परिसराच्या विकासात कायापालट करणारा ठरणार आहे. नेपाळच्या जलविद्युत विकास योजनांमध्ये भारतीय कंपन्यांच्या अधिक सहभागाच्या विषयावरही आम्ही सहमती दर्शवली. नेपाळ आपली अतिरिक्त वीज भारताला निर्यात करत आहे ही आनंदाची बाब आहे. नेपाळच्या आर्थिक प्रगतीला त्याचा चांगला हातभार लागेल. मला कळवण्यास आनंद होत आहे की नेपाळमधून वीज आयात करण्याचे आणखी अनेक प्रस्ताव मंजूर केले जात आहेत.

नेपाळ आंतरराष्ट्रीय सौर आघाडीचा सदस्य बनला आहे याचा मला आनंद आहे. यामुळे आपल्या प्रदेशात शाश्वत, किफायतशीर आणि स्वच्छ ऊर्जेला चालना मिळेल.

 

मित्रांनो,

सर्व बाबतीत व्यापार आणि सीमापार संपर्क व्यवस्थेच्या पुढाकारांना प्राधान्य देण्याचे पंतप्रधान देउबा जी आणि मी मान्य केले आहे. जयनगर-कुर्था रेल्वे मार्ग हा त्याचाच एक भाग आहे. अशा योजनांमुळे दोन्ही देशांतील लोकांमध्ये सुरळीत, विनासायास देवाणघेवाण होण्यास मोठा हातभार लागेल.

नेपाळमध्ये रुपे कार्डची सुरुवात ही आमच्या आर्थिक संपर्कात एक नवीन अध्याय जोडेल. नेपाळ पोलीस अकादमी, नेपाळगंज येथील एकात्मिक तपास चौकी आणि रामायण सर्किट इत्यादी इतर प्रकल्पही दोन्ही देशांना निकट आणतील.

 

मित्रांनो,

भारत आणि नेपाळच्या खुल्या सीमेचा असामाजिक घटकांकडून गैरवापर होत असल्याच्या मुद्द्यावरही आज आम्ही चर्चा केली. आमच्या संरक्षण आणि सुरक्षा संस्थांमध्ये घनिष्ठ सहकार्य राखण्यावरही आम्ही भर दिला. मला खात्री आहे की आजची आमची चर्चा भारत-नेपाळ संबंधांच्या भविष्यासाठी महत्त्वाकांक्षी उद्दिष्टे निश्चित करण्यासाठी प्रभावी ठरेल.

 

देउबाजी,

तुम्ही उद्या काशीला भेट द्याल. नेपाळ आणि बनारसचे शतकानुशतके जुने नाते आहे. मला खात्री आहे की काशीचे नवे रूप पाहून तुम्ही नक्कीच प्रभावित व्हाल. पुन्हा एकदा मी तुमचे आणि तुमच्या शिष्टमंडळाचे भारतात स्वागत करतो.

खूप खूप धन्यवाद!

***

Jaydevi PS/V.Joshi/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1815404) अभ्यागत कक्ष : 150