आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
खाजगी कोविड प्रतिबंधक लसीकरण केंद्रांवर 18 ते 59 वर्षे या गटातील नागरिकांना खबरदारीची मात्रा देण्यासंदर्भात राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांसाठी मार्गदर्शनपर कार्यक्रम
खाजगी कोविड प्रतिबंधक लसीकरण केंद्रांचे संचालक नागरिकांकडून लसीच्या मात्रेची किंमत आणि त्याव्यतिरिक्त जास्तीत जास्त 150 रुपये लसीकरणाचे सेवा शुल्क म्हणून आकारू शकतात
Posted On:
09 APR 2022 4:28PM by PIB Mumbai
देशातील 18 ते 59 वर्षे वयोगटातील नागरिकांना खाजगी कोविड प्रतिबंधक लसीकरण केंद्रांवर लसीची खबरदारीची मात्रा देण्यासंदर्भात आज 09 एप्रिल 2022 रोजी सकाळी साडेदहा वाजता केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण सचिवांच्या अध्यक्षतेखाली सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या आरोग्य सचिवांनी मार्गदर्शनपर बैठक घेतली .
नागरिकांनी ज्या प्रकारच्या लसीची पहिली आणि दुसरी मात्रा घेतली आहे त्याच प्रकारच्या लसीचा वापर त्यांना खबरदारीची मात्रा देताना करण्यात यावा यावर केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण सचिवांनी अधिक भर दिला आहे. खबरदारीची मात्रा देय असलेल्या सर्व लाभार्थ्यांची कोविन पोर्टलवर आधीच नोंदणी झालेली असल्यामुळे आता या मात्रेसाठी नव्याने नोंदणी करण्याची गरज नाही अशी देखील माहिती या बैठकीत देण्यात आली.
या टप्प्यात झालेल्या प्रत्येक लसीकरणाची नोंद कोविन पोर्टलवर करणे अनिवार्य आहे यावर भर देण्यात आला आहे. तसेच खाजगी लसीकरण केंद्रांमध्ये ‘ऑनलाईन’ आणि ‘प्रत्यक्ष हजर राहून’ अशा दोन्ही पर्यायांद्वारे नोंदणी तसेच लसीकरणाची सोय उपलब्ध असेल अशी माहिती बैठकीत देण्यात आली.
केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार खाजगी लसीकरण केंद्रांनी लसीकरण करण्याच्या जागेवर सर्व आवश्यक व्यवस्था करणे अनिवार्य आहे. लसीकरण केलेल्या नागरिकांकडून लसीच्या किंमतीव्यतिरिक्त ही केंद्रे जास्तीतजास्त 150 रुपये लसीकरण सेवा शुल्क म्हणून आकारू शकतात. आरोग्य सेवा क्षेत्रातील कर्मचारी, आघाडीच्या फळीतील कर्मचारी आणि 60 वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या सर्व नागरिकांना पूर्वीप्रमाणेच सरकारी लसीकरण केंद्रावर होत असलेल्या निःशुल्क लसीकरणासह कोणत्याही कोविड प्रतिबंधक लसीकरण केंद्रावर खबरदारीची मात्रा घेता येईल.
कोविड प्रतिबंधक लसीच्या खबरदारीच्या मात्रेसाठी पात्र ठरलेल्या विस्तारित लोकसंख्येकरिता आवश्यक सुविधा आणि लसीकरण प्रमाणपत्रात नागरिकांना दुरुस्ती करणे शक्य व्हावे यासाठी देखील, कोविन मंचावर अंतर्भूत करण्यात आलेल्या विविध नव्या सोयींबाबत राज्यातील कर्मचाऱ्यांना माहिती देण्यासाठी तपशीलवार सादरीकरण करण्यात आले.
सध्या 12 वर्षांहून अधिक वयाच्या किशोरवयीनांना लसीची पहिली आणि दुसरी मात्रा देण्यासाठी सुरु असलेल्या मोफत कोविड प्रतिबंधक मोहीमेला अधिक वेग देण्याचा सल्ला या बैठकीत राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना देण्यात आला. तसेच सरकारी कोविड प्रतिबंधक केंद्रांवर आरोग्य सेवा क्षेत्रातील कर्मचारी, आघाडीच्या फळीतील कर्मचारी आणि 60 वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या अधिकाधिक नागरिकांना कोविड प्रतिबंधक लसीची खबरदारीची मात्रा दिली जाईल याकडे लक्ष देण्याच्या सूचना देखील त्यांना देण्यात आल्या.
केंद्रीय आरोग्य विभागाचे अतिरिक्त सचिव डॉ.मोहन अग्नानी आणि केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी यांच्यासह केंद्रीय आरोग्य सचिव आणि राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे अभियान संचालक तसेच राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश प्रशासनातील इतर अधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे घेतलेल्या या बैठकीला उपस्थित होते.
***
Jaydevi PS/S.Chitnis/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1815203)
Visitor Counter : 235