पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधानांच्या उपस्थितीत भारत-ऑस्ट्रेलिया दरम्यान आर्थिक सहकार्य आणि व्यापार करार-(IndAus ECTA) वर स्वाक्षरी


पंतप्रधान मॉरिसन आणि माजी पंतप्रधान टोनी अबॉट यांच्या नेतृत्वाबद्दल त्यांना दिले धन्यवाद

"अतिशय कमी कालावधीत इंडस एक्टा (IndAus ECTA) वर झालेल्या स्वाक्षरीमुळे दोन्ही देशांमधील परस्पर गहन विश्वास दिसला"

"या कराराच्या आधारे आम्ही पुरवठा साखळीची लवचिकता वाढवू शकू आणि इंडो-पॅसिफिक क्षेत्राच्या स्थिरतेसाठी देखील योगदान देऊ"

"हा करार दोन्ही देशांदरम्यान विद्यार्थी, व्यावसायिक आणि पर्यटकांना सुलभता प्रदान करेल, ज्यामुळे नागरिकांमध्ये परस्परसंबंध अधिक दृढ होतील"

विश्वचषक अंतिम क्रिकेट सामन्यासाठी ऑस्ट्रेलियाच्या महिला क्रिकेट संघाला पंतप्रधानांनी दिल्या शुभेच्छा

Posted On: 02 APR 2022 11:07AM by PIB Mumbai

 

भारत-ऑस्ट्रेलिया आर्थिक सहकार्य आणि व्यापार करारावर (IndAus ECTA) भारताचेय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांच्या उपस्थितीत आज केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग, ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण आणि वस्त्रोद्योग मंत्री पीयूष गोयल आणि ऑस्ट्रेलियाचे व्यापार, पर्यटन आणि गुंतवणूकमंत्री डॅन तेहान, यांनी एका आभासी पध्दतीने झालेल्या समारंभात स्वाक्षरी केली.

स्वाक्षरी झाल्यानंतर बोलताना, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नमूद केले की, गेल्या एका महिन्यात त्यांचा आणि ऑस्ट्रेलियन पंतप्रधानांचा हा तिसरा संवाद आहे. त्यांनी पंतप्रधान मॉरिसन यांच्या नेतृत्वाबद्दल आणि त्यांचे व्यापार दूत आणि ऑस्ट्रेलियाचे माजी पंतप्रधान टोनी अबॉट यांनी केलेल्या प्रयत्नांची प्रशंसा केली. तसेच यशस्वी आणि प्रभावीपणे झालेल्या सहभागासाठी त्यांनी ऑस्ट्रेलियाचे व्यापार मंत्री आणि त्यांच्या टीमचे अभिनंदन केले.

एवढ्या कमी कालावधीत इन्डस एक्टा (IndAus ECTA) करारावर स्वाक्षऱ्या झाल्याने दोन्ही देशांमधील परस्पर विश्वासाची गहनता दिसून येते, असे पंतप्रधान म्हणाले. एकमेकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी दोन्ही अर्थव्यवस्थांमध्ये असलेल्या प्रचंड क्षमता पंतप्रधानांनी अधोरेखित केल्या आणि या करारामुळे दोन्ही देशांना या संधींचा पुरेपूर लाभ होईल, असे पंतप्रधान म्हणाले. "हा आमच्या द्विपक्षीय संबंधांसाठी एक निर्णायक क्षण आहे"असे नमूद करत  पंतप्रधान पुढे म्हणाले, "या कराराच्या आधारे, आम्ही एकत्रितपणे, पुरवठा साखळीतील लवचिकता वाढवू शकू आणि इंडो-पॅसिफिक क्षेत्राच्या स्थिरतेसाठी देखील योगदान देऊ."

परस्पर जनसंबंध हा भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील संबंधांचा प्रमुख आधारस्तंभ असल्याचे सांगून पंतप्रधान म्हणाले, या करारामुळे दोन्ही देशांतील विद्यार्थी, व्यावसायिक आणि पर्यटकांना सुलभता होईल, ज्यामुळे हे संबंध अधिक दृढ होतील.

पंतप्रधानांनी विश्वचषक अंतिम सामन्यासाठी ऑस्ट्रेलियाच्या महिला क्रिकेट संघाला शुभेच्छाही दिल्या.

ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान मॉरिसन यांनीही अलीकडच्या वर्षात दोन्ही देशांमधील उल्लेखनीय सहकार्याची दखल घेतली आणि पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाबद्दल त्यांचे आभार मानले.  भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील वाढत्या नातेसंबंधातील आणखी एक महत्वपूर्ण टप्पा, असे या  इन्डस एक्टा (IndAus ECTA)या  कराराचे वर्णन करताना ऑस्ट्रेलियन पंतप्रधान म्हणाले, की परस्परसंबंधांचा विकासासाठी हा करार वचनबद्ध आहे.  व्यापार वृध्दी आणि आर्थिक सहकार्याव्यतिरिक्त, इन्डस एक्टा हा करार कार्यविस्तार, अभ्यास आणि पर्यटनाच्या संधींचा विस्तार करून दोन्ही देशांतील लोकांमधील प्रेमळ आणि घनिष्ठ संबंध अधिक दृढ करेल. दोन गतिमान क्षेत्रीय अर्थव्यवस्था आणि समविचारी लोकशाही या परस्पर लाभांसाठी एकत्र काम करत असल्याने सर्वात भव्य द्वारआता खुले झाले आहे, असा शक्तिशाली संकेत आपल्या व्यवसायांना मिळेल. याव्यतिरिक्त दोन बलशाली लोकशाही एकत्र काम करत आहेत आणि पुरवठा साखळीची सुरक्षा आणि लवचिकता सुनिश्चित करत आहेत असाही स्पष्ट संदेश हा  करार  देत आहेअसेही त्यांनी पुढे सांगितले.

भारत आणि ऑस्ट्रेलियन मंत्र्यांनी देखील या करारावर स्वाक्षरी करण्यापूर्वी दोन्ही देशांमधील संबंधांच्या वाढत्या सामर्थ्यावर आपले मत व्यक्त केले.

भारत-ऑस्ट्रेलियाचे वाढणारे आर्थिक आणि व्यावसायिक संबंध दोन्ही देशांमधील झपाट्याने वैविध्यपूर्ण आणि गहन होत जाणाऱ्या नातेसंबंधांच्या स्थिरतेत आणि सामर्थ्यामध्ये योगदान देतात. इन्डस एक्टा हा करार  ज्यामध्ये वस्तू आणि सेवांचा व्यापार समाविष्ट आहे आणि जो एक संतुलित आणि न्याय्य व्यापार करार आहे, तो दोन्ही देशांमधील आधीच सखोल, जवळचे आणि धोरणात्मक असलेले संबंध अधिक दृढ करेल आणि वस्तू आणि सेवांमधील द्विपक्षीय व्यापारात लक्षणीय वाढ करेल, नवीन रोजगार निर्माण करेल, तसेच संधी, राहणीमान उंचावेल आणि दोन्ही देशांतील लोकांचे सामान्य जनतेचे कल्याण करेल.

***

S.Thakur/S.Patgaonkar/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1812739) Visitor Counter : 335