ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक पुरवठा मंत्रालय

ग्राहकांनी उच्च दर्जाच्या उत्पादनांची मागणी करावी जेणेकरून भारत वस्तू आणि सेवांच्या वितरणात जागतिक स्तरावर अग्रगण्य म्हणून स्थापित होऊ शकेल - केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी जागतिक ग्राहक अधिकार दिनानिमित्त ग्राहकांना केले आवाहन


कोणत्याही परिस्थितीत ग्राहकांच्या हिताचे संरक्षण झाले पाहिजे पण या संदर्भातील कायद्यांचा छोटे व्यावसायिक आणि व्यापारी यांना त्रास देण्यासाठी दुरुपयोग केला जाऊ नये: केंद्रीय मंत्री पीयूष गोयल

Posted On: 15 MAR 2022 8:22PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 15 मार्च 2022

 

केंद्रीय ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण, वस्त्रोद्योग, वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल म्हणाले की ग्राहकांच्या हिताचे संरक्षण करण्यासाठी तसेच उच्च दर्जाची उत्पादने आणि सेवा यांच्या निर्मितीला प्रोत्साहन देण्यासाठी कायद्यांची प्रभावी अंमलबजावणी आवश्यक आहे मात्र, छोटे व्यावसायिक आणि व्यापारी यांचा छळ करण्यासाठी या कायद्यांतील तरतुदीचा वापर होता कामा नये.

जागतिक ग्राहक अधिकार दिनानिमित्त “न्याय्य डिजिटल अर्थपुरवठा” या विषयावर आयोजित करण्यात आलेल्या एक दिवसीय कार्यक्रमात बोलताना केंद्रीय मंत्री गोयल यांनी छोट्या व्यापाऱ्यांची परिस्थिती विषद केली आणि ते म्हणाले: “कायद्याच्या नावाखाली छोटे व्यावसायिक आणि लहान व्यापाऱ्यांची होत असलेली छळवणूक थांबली पाहिजे.”   

आपल्या उद्घाटनपर भाषणात त्यांनी कायदेशीर वजनमापे शास्त्र कायद्यातील काही तरतुदींना गुन्हा या वर्गवारीतून  मुक्त करण्याची गरज असल्याचा मुद्दा त्यांनी मांडला.या  संदर्भात  समस्येवर संबंधित भागधारकांनी अधिक सविस्तर चर्चा करावी असे आवाहन त्यांनी केले.

ग्राहकांचे हित तसेच अधिकार  यांचे संरक्षण करण्यासाठी विविध संस्थांनी हाती घेतलेल्या उपक्रमांचे गोयल यांनी कौतुक केले. केंद्रीय ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण, पर्यावरण,वने आणि हवामान बदल राज्यमंत्री अश्विनीकुमार चौबे, साध्वी निरंजन ज्योती, इन्फोसिसचे बिगर कार्यकारी अध्यक्ष नंदन निलकेणी यांच्यासह अनेक मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते.

दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींविरुद्ध ग्राहक व्यवहार मंत्रालयाने केलेल्या कारवाईच्या घटना केंद्रीय मंत्र्यांनी उपस्थितांशी सामायिक केल्या. ते म्हणाले कि, जगातील पहिल्या क्रमांकाची टूथपेस्ट असल्याचा दावा जाहिरातींमधून करणाऱ्या टूथपेस्ट कंपनीवर कारवाई करण्यात आली. तसेच उत्पादनांचा साठा अगदी अल्प काळात  संपूर्णपणे विकला गेल्याचा दावा करणाऱ्या  दुसऱ्या एका कंपनीविरुद्ध देखील अशीच कारवाई करण्यात आली.

ते पुढे म्हणाले, “जर तुम्हांला ग्राहकांच्या शक्तीचा अंदाज घ्यायचा असेल तर भारताकडे पहा आणि उच्च दर्जाच्या उत्पादनांची सक्रियतेने मागणी करणाऱ्या ग्राहकांनी भारतातील कंपन्यांना अधिक चांगल्या दर्जाच्या वस्तू उत्पादित करण्यास कसे प्रेरित केले आहे तेही लक्षात घ्या.”

केंद्रीय मंत्री गोयल म्हणाले की, आज जागतिक ग्राहक हक्क  दिन आहे. हक्कासोबतच अधिकाऱ्यांवर तसेच ग्राहकांवर जबाबदारी देखील येऊन पडते. “ग्राहकांच्या सोयीसाठी मी ग्राहक न्यायालयाचे कामकाज आभासी पद्धतीने करण्याची सूचना मांडली आहे,” ते म्हणाले.

गोयल यांनी आज भारतीय मानक ब्युरोने हाती घेतलेल्या दर्जा प्रमाणीकरणाच्या कामाबाबत देखील माहिती दिली. हॉलमार्किंगच्या सुविधेमुळे  दर्जा, शुद्धता आणि पारदर्शकता यांच्या बाबतीत असलेल्या ग्राहकांच्या हक्कांची पूर्तता होत आहे याचा त्यांनी उल्लेख केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या  'सबका साथ, सबका विकास आणि सबका प्रयास' या मंत्राचे अनुकरण करत , सर्व राज्य सरकारे,उद्योग संस्था आणि संबंधितांना आवाहन केले की सचोटीपूर्ण  व्यवसायांना संधी उपलब्ध करून देतानाच विद्यमान कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या आणि ग्राहकहिताच्या आड येणाऱ्या अनुचित व्यवसाय प्रथांवर कठोर कारवाई करण्यात यावी. 

ग्राहकसंरक्षणाचे उद्दिष्ट असलेल्या  सरकारच्या  नवीन धोरणात्मक निर्णयांना उद्योगधंद्यांनी पाठिंबा देण्याचे गोयल यांनी  अधोरेखित केले.  व्यवसाय तसेच ग्राहक संरक्षणासाठी सर्वांगीण वातावरण तयार करण्यासाठी सरकारसोबत भरीव काम करण्याचे आवाहनही त्यांनी केले. 

ग्राहकांनी अधिक जागरूक राहणे, दर्जेदार उत्पादनांची मागणी करणे आणि त्याद्वारे उच्च दर्जाचे उत्पादन आणि सेवा प्रदान करण्यात भारताला जागतिक आघाडीवर नेण्याचा प्रयत्न करणे आवश्यक असल्यावरही  त्यांनी भर दिला.

ग्राहकांच्या तक्रारी ऑनलाइन दाखल करून घेण्यास सक्षम असलेल्या ई-दाखिल पोर्टलच्या प्रगतीचे  केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी कौतुक केले आणि अधिकाऱ्यांना सर्व प्रकरणांमध्ये आभासी सुनावणीची सुविधा देण्याचे आवाहन केले. त्यांनी सर्व राज्य सरकारांना त्यांच्या रिक्त जागा लवकरात लवकर भरण्याचे आवाहन केले.

कार्यक्रमाला  प्रमुख पाहुणे म्हणून  नंदन नीलेकणी उपस्थित होते. बदलत्या डिजिटल प्लॅटफॉर्मसोबत  बदलण्याची गरज आणि वाढत्या जटिल डिजिटल प्रोटोकॉलसोबत  ग्राहक निवारण पद्धती त्याप्रमाणे सज्ज असण्याची  आवश्यकता त्यांनी  अधोरेखित करत सरकारच्या  सर्वांगीण दृष्टिकोनाची गरज व्यक्त केली. 

ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण आणि ग्रामीण विकास मंत्रालयाच्या राज्यमंत्री साध्वी निरंजन  ज्योती यांनी आपल्या भाषणात, डिजिटल तंत्रज्ञान आणि नवीन व्यवसाय प्रारूपे आर्थिक सेवांसह गरीब आणि बहिष्कृत कुटुंबांपर्यंत पोहोचण्याची आपली क्षमता पूर्णपणे बदलत असल्याचे अधोरेखित केले. 

ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण आणि पर्यावरण, वने आणि हवामान बदल मंत्रालयाचे राज्यमंत्री अश्विनी कुमार चौबे यांनी आपल्या भाषणात अभिनव नियामक दृष्टिकोन आणि ग्राहक संरक्षण व सक्षमीकरण केंद्रित  डिजिटल वित्तीय सेवा आणि उत्पादनांच्या गरजेवर भर दिला.


* * *

N.Chitale/S.Chitnis/S.Kakade/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1806342) Visitor Counter : 285