पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधानांनी राष्ट्रीय सुरक्षा विद्यापीठाच्या इमारतीचे राष्ट्रार्पण केले आणि विद्यापीठाच्या पहिल्या दीक्षांत समारंभाला संबोधित केले


“ब्रिटीशांच्या अन्यायाविरुद्ध गांधीजींच्या नेतृत्वाखाली देशाने दिलेल्या लढ्यामुळे ब्रिटीश सरकारला भारतीयांच्या सामुहिक शक्तीची जाणीव झाली”

“गणवेशधारी कर्मचाऱ्यांपासून आपण सावध राहायला हवे असा एक समज पसरलेला होता. पण आता त्यात बदल घडून आला आहे. आता लोकांना गणवेशधारी कर्मचारी दिसले की त्यांना मदत मिळण्याची खात्री वाटू लागली आहे”

“देशाच्या सुरक्षा यंत्रणेला बळकट करण्यासाठी तणावमुक्त प्रशिक्षण उपक्रम ही आता काळाची गरज झाली आहे"

Posted On: 12 MAR 2022 4:05PM by PIB Mumbai

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज अहमदाबाद येथे आरआरयू अर्थात राष्ट्रीय सुरक्षा विद्यापीठाच्या इमारतीचे राष्ट्रार्पण केले आणि विद्यापीठाच्या पहिल्या दीक्षांत समारंभाला देखील संबोधित केले. केंद्रीय गृह व्यवहार आणि सहकार मंत्री अमित शाह, गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत आणि गुजरात राज्याचे मुख्यमंत्री भूपेंद्रभाई पटेल यांच्यासह अनेक मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते.

या कार्यक्रमात भाषणाला सुरुवात करतानाच पंतप्रधानांनी महात्मा गांधी आणि त्यांच्यासह दांडी यात्रेत सहभागी झालेल्या सर्वांना श्रद्धांजली वाहिली. ही महान यात्रा आजच्याच दिवशी सुरु करण्यात आली होती. ब्रिटीशांच्या अन्यायाविरुद्ध गांधीजींच्या नेतृत्वाखाली देशाने दिलेल्या लढ्यामुळे ब्रिटीश सरकारला भारतीयांच्या सामुहिक शक्तीची जाणीव झाली,, असे पंतप्रधान म्हणाले.

पंतप्रधान म्हणाले की सुरुवातीच्या ब्रिटीश सत्तेच्या काळात वसाहतीचे मालक असणाऱ्या ब्रिटीशांविरुद्ध सर्वसामान्य जनतेने शांत राहावे यासाठी त्यांच्यामध्ये भीती निर्माण करण्यावर अंतर्गत सुरक्षा व्यवस्थेची संकल्पना आधारलेली होती. तसेच, त्यावेळी संरक्षण दलांना तयारीसाठी मुबलक वेळ लागत होता त्यामुळे त्यावेळचे यासंदर्भातील चित्र अगदीच वेगळे होते. आताच्या काळात मात्र तंत्रज्ञान, वाहतूक आणि संपर्क व्यवस्था यांच्यात मोठ्या सुधारणा झाल्यामुळे आता तशी परिस्थिती राहिलेली नाही. आताच्या सुरक्षा यंत्रणेला लोकशाही व्यवस्थेत कार्य करण्यासाठी  वाटाघाटी करणे आणि इतर तत्सम सॉफ्ट स्किल्स प्रकारची कौशल्ये अवगत असणे आवश्यक आहे असे ते पुढे म्हणाले.

पोलीस आणि सुरक्षा यंत्रणांच्या कर्मचाऱ्यांची जनमानसातील प्रतिमा बदलण्याच्या गरजेवर त्यांनी भर दिला. लोकप्रिय संस्कृतीमध्ये पोलिसांचे करण्यात येणारे वर्णन देखील या संदर्भात उपयोगी पडलेले नाही असे ते म्हणाले. पोलीस कर्मचाऱ्यांनी महामारीच्या काळात केलेल्या मानवतावादी कार्याकडे त्यांनी उपस्थितांचे लक्ष वेधले. स्वातंत्र्यानंतरच्या काळात, देशातील सुरक्षा दलांमध्ये सुधारणा होण्याची गरज होती. गणवेशधारी कर्मचाऱ्यांपासून आपण सावध राहायला हवे असा एक समज तेव्हा पसरलेला होता. पण आता त्यात बदल घडून आला आहे. आता लोकांना गणवेशधारी कर्मचारी दिसले की त्यांना मदत मिळण्याची खात्री वाटू लागली आहे, पंतप्रधान म्हणाले.

कामाच्या ताणाशी सामना करत असताना पोलीस कर्मचाऱ्यांना एकत्र कुटुंब पद्धतीची मदत होण्याचे प्रमाण आता कमी होऊ लागले आहे याचा उल्लेख त्यांनी केला. कर्मचाऱ्यांना तणावाशी सामना करण्याचे प्रशिक्षण देऊन मानसिक विश्रांती मिळवून देण्यासाठी या दलांमध्ये योग विषयक तज्ञ प्रशिक्षकासह विशेष प्रशिक्षकांचा समावेश करण्याची गरज आहे यावर त्यांनी भर दिला. देशाच्या संरक्षण दलांना बळकट करण्यासाठी तणावमुक्त प्रशिक्षण उपक्रम ही आता काळाची गरज झाली आहे, पंतप्रधान पुढे म्हणाले.

संरक्षणविषयक कार्ये आणि पोलीस दलांची कामे यामध्ये तंत्रज्ञानाचा समावेश करण्याची गरज त्यांनी अधोरेखीत केली. ते म्हणाले की जर गुन्हेगार तंत्रज्ञानाचा वापर करत आहेत तर त्यांना अटकाव करण्यासाठी देखील तंत्रज्ञानच वापरावे लागेल. तंत्रज्ञानावर देण्यात येणारा भर दिव्यांग व्यक्तींना देखील या क्षेत्रात योगदान देण्यासाठी क्षमता प्रदान करू शकेल असे त्यांनी सांगितले.

गांधीनगर परिसरात राष्ट्रीय कायदा विद्यापीठ, सुरक्षा विद्यापीठ आणि न्यायवैद्यक शास्त्र विद्यापीठ आहे याचा उल्लेख करून पंतप्रधान म्हणाले की या तिन्ही संस्थांनी  त्यांच्याशी संबंधित क्षेत्रांमध्ये समग्र शिक्षण सुविधा निर्माण करण्यासाठी नियमितपणे संयुक्त परिसंवादांचे आयोजन करून तिन्ही संस्थांच्या कार्यात समतोल आणण्याची गरज आहे यावर त्यांनी भर दिला. ते म्हणाले, या विद्यापीठाला पोलीस विद्यापीठासारखेच मानण्याची चूक करू नका. हे सुरक्षा विद्यापीठ आहे. ही संस्था संपूर्णतः देशाच्या सुरक्षेसंबधी बाबींकडे लक्ष देण्यासाठी स्थापन केली आहे. मोठा जमाव आणि घोळक्याचे मानसशास्त्र, वाटाघाटी, पोषण आणि तंत्रज्ञान अशा विविध शाखांचे महत्त्व त्यांनी पुनःपुन्हा सांगितले.

विद्यार्थ्यांनी नेहमीच मानवतेच्या मूल्याला त्यांचा गणवेश आणि संबंधित कार्य यांचा अविभाज्य भाग मानावे आणि त्यांच्या प्रयत्नांमध्ये कधीही सेवावृत्तीची कमतरता पडू देऊ नये अशी विनंती पंतप्रधानांनी या विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांकडे केली. संरक्षण क्षेत्रात मुली आणि महिलांनी सहभागी होण्याचे प्रमाण वाढताना दिसत आहे याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. ते म्हणाले, संरक्षण क्षेत्रात आपल्याला अधिक प्रमाणात महिला सहभागी होताना दिसत आहेत. विज्ञान, शिक्षण अथवा संरक्षण असे कोणतेही क्षेत्र असो, महिला त्यात आघाडीवर राहून कार्य करत आहेत.

संस्थेचे ध्येय पुढे नेण्यात अशा कोणत्याही संस्थेच्या पहिल्या तुकडीची असलेली भूमिका पंतप्रधानांनी ठळकपणे मांडली. गुजरातला देशातील आघाडीचे औषधनिर्मिती करणारे राज्य म्हणून आकाराला आणण्यात  राज्यातील जुन्या फार्मसी महाविद्यालयांनी दिलेल्या योगदानाचा त्यांनी उल्लेख केला. त्याच धर्तीवर, आयआयएम अहमदाबाद या संस्थेने देशात सशक्त एमबीए शिक्षण व्यवस्थेची निर्मिती करण्यात पुढाकार घेतला याचा देखील त्यांनी उल्लेख केला.

तपासकामाच्या विविध शाखा, गुन्हेगारीबाबत न्यायदान आणि प्रशासकीय कामात अधिक सुधारणा करण्यासाठी उच्च दर्जाचे प्रशिक्षण घेतलेल्या मनुष्यबळाची गरज पूर्ण करण्यासाठी आरआरयू अर्थात राष्ट्रीय सुरक्षा विद्यापीठाची उभारणी करण्यात आली आहे. गुजरात सरकारने 2010 साली स्थापन केलेल्या सुरक्षा शक्ती विद्यापीठामध्ये अधिक सुधारणा करून केंद्र सरकारने राष्ट्रीय सुरक्षा विद्यापीठ या नावाचे राष्ट्रीत पातळीवरील पोलीस विद्यापीठ उभारले आहे. राष्ट्रीय पातळीवरील या महत्त्वाच्या विद्यापीठातील कामकाज 1 ऑक्टोबर 2020 पासून सुरु झाले. हे विद्यापीठ उद्योगांमधील ज्ञान आणि साधनसंपत्ती यांचा वापर करून खासगी क्षेत्राशी सहयोग विकसित करेल तसेच पोलीस आणि संरक्षण दलांशी संबंधित विविध क्षेत्रांमध्ये उत्कृष्टता केंद्रांची स्थापना देखील करेल.

आरआरयूमध्ये पोलीस कार्यातील तसेच अंतर्गत सुरक्षेच्या संदर्भातील पोलीस विज्ञान आणि व्यवस्थापन, गुन्हेगारी कायदा आणि न्याय, सायबर मानसशास्त्र, माहिती तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धीमत्ता आणि सायबर सुरक्षा, गुन्ह्यांचा तपास, धोरणात्मक भाषा विकसन, अंतर्गत संरक्षण आणि त्याविषयीची धोरणे, शारीरिक शिक्षण आणि क्रीडा तसेच  तटवर्ती आणि सागरी सुरक्षा अशा विविध विषयांमध्ये पदविका ते डॉक्टरेट पातळीपर्यंतचे शैक्षणिक अभ्यासक्रम उपलब्ध आहेत.

 

***

S.Tupe/S.Chitnis/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1805336) Visitor Counter : 405