पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी अहमदाबादमध्ये गुजरात पंचायत महासंमेलनाला संबोधित केले
“आज आपण अमृत महोत्सव साजरा करत असताना बापूंचे 'ग्रामीण विकासाचे ' स्वप्न साकार केले पाहिजे”
"दीड लाख पंचायत प्रतिनिधी एकत्रितपणे चर्चा करतात यापेक्षा मोठे भारतीय लोकशाहीच्या सामर्थ्याचे दुसरे कुठले प्रतीक नाही"
Posted On:
11 MAR 2022 8:23PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 11 मार्च 2022
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज अहमदाबादमध्ये गुजरात पंचायत महासंमेलनाला संबोधित केले. या कार्यक्रमाला राज्यभरातील पंचायत राज प्रतिनिधी उपस्थित होते.
गुजरात ही बापू आणि सरदार वल्लभभाई पटेल यांची भूमी असल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले. ते म्हणाले, “बापू नेहमीच ग्रामीण विकास, स्वावलंबी खेडे याबद्दल बोलायचे. आज आपण अमृत महोत्सव साजरा करत असताना आपण बापूंचे ग्रामीण विकासाचे स्वप्न पूर्ण करायला हवे.
महामारीचे शिस्तबद्ध आणि उत्तम प्रकारे व्यवस्थापन केल्याबद्दल पंतप्रधानांनी गुजरातच्या पंचायत आणि गावांच्या भूमिकेची प्रशंसा केली. गुजरातमध्ये महिला पंचायत प्रतिनिधींची संख्या पुरुष प्रतिनिधींपेक्षा जास्त असल्याचेही त्यांनी नमूद केले. ते म्हणाले की, दीड लाखांहून अधिक पंचायत प्रतिनिधी एकत्रितपणे विचारमंथन करतात , यापेक्षा मोठे भारतीय लोकशाहीच्या सामर्थ्याचे प्रतीक अन्य कुठलेही नाही.
पंतप्रधानांनी पंचायत सदस्यांना छोट्या मात्र अतिशय मूलभूत उपक्रमांसह गावाचा विकास कसा सुनिश्चित करता येईल याबाबत मार्गदर्शन केले. त्यांनी त्यांच्या शाळेचा वाढदिवस किंवा स्थापना दिवस साजरा करण्याचा सल्ला दिला. याद्वारे , त्यांनी शाळेचा परिसर आणि वर्ग स्वच्छ करण्याचा आणि शाळेसाठी चांगले उपक्रम हाती घेण्याची सूचना केली. 23 ऑगस्टपर्यंत देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहे, असे सांगून त्यांनी या काळात गावात 75 प्रभातफेरी काढण्याची सूचना केली.
पुढे वाटचाल करताना , त्यांनी या कालावधीत 75 कार्यक्रम आयोजित करण्याची सूचना केली. ज्यामध्ये संपूर्ण गावातील लोकांनी एकत्र येऊन गावाच्या सर्वांगीण विकासाचा विचार करावा. आणखी एक सूचना यात जोडून ते म्हणाले की, भारतीय स्वातंत्र्याच्या 75 वर्षांनिमित्त गावांनी 75 झाडे लावून एक छोटे जंगल तयार करावे. प्रत्येक गावात किमान 75 शेतकरी असावेत जे नैसर्गिक शेतीचा अवलंब करतात. ते म्हणाले की, वसुंधरेची खते आणि रसायनांच्या विषापासून मुक्तता झाली पाहिजे. पावसाच्या पाण्याचे संवर्धन करण्यासाठी 75 शेततळी तयार करावीत जेणेकरुन भूगर्भातील पाण्याची पातळी वाढेल आणि उन्हाळ्याच्या दिवसात मदत होईल असे पंतप्रधान म्हणाले.
पाय आणि तोंडाच्या आजारापासून गुरांचे संरक्षण करण्यासाठी ते लसीकरणापासून वंचित राहणार नाहीत याची काळजी घेण्याची सूचनाही त्यांनी केली. पंतप्रधानांनी त्यांना पंचायत भवनात आणि रस्त्यांवर विजेची बचत करण्यासाठी एलईडी दिवे वापरण्याचे आवाहन केले. तसेच सेवानिवृत्त शासकीय कर्मचाऱ्यांना गावागावात एकत्र आणून गावाचा वाढदिवस साजरा करण्यात यावा ज्यामध्ये लोक एकत्र येऊन जनतेच्या कल्याणाची चर्चा करतील असे ते म्हणाले. त्यांनी पंचायत सदस्यांना सूचना केली की एका सदस्याने दिवसातून किमान 15 मिनिटांसाठी स्थानिक शाळेला भेट द्यावी जेणेकरून गावातील शाळांवर कडक देखरेख राहील आणि शिक्षण आणि स्वच्छतेचा दर्जा उत्तम राहील. त्यांनी पंचायत सदस्यांना जनतेला सरकारसाठी महत्वपूर्ण असलेल्या सामायिक सेवा केंद्रांचा (सीएससी) जास्तीत जास्त लाभ घेण्याबाबत जागृत करण्याचे आवाहन केले. यामुळे लोकांना रेल्वे आरक्षणासाठी मोठ्या शहरांमध्ये जाणे टाळण्यास मदत होईल. भाषणाच्या शेवटी पंतप्रधानांनी पंचायत सदस्यांना हे सुनिश्चित करायला सांगितले की एकही मूल शाळा सोडणार नाही आणि एकही मूल त्यांच्या पात्रतेनुसार शाळेत किंवा अंगणवाडीत दाखल होण्यापासून वंचित राहणार नाही. उपस्थित पंचायत सदस्यांकडून पंतप्रधानांनी आश्वासन मागितले तेव्हा त्यांनी टाळ्यांच्या कडकडाटात होकार दिला.
S.Patil/S.Kane/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1805198)
Visitor Counter : 197
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam