आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ मनसुख मांडविया यांच्या हस्ते आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त कोविड-19 लसीकरणात सर्वोत्कृष्ट कामगिरी बजावणाऱ्या महिलांचा सत्कार



"महिलांच्या योगदानाशिवाय आरोग्य क्षेत्राचा विकास अपूर्ण" : डॉ मनसुख मांडविया

“कोविड-19 लसीकरण कार्यक्रमात भारत जगात आघाडीवर असल्याचे श्रेय देशभरातील आपल्या लसीकरणकर्त्या महिलांना जाते”—मांडवीया

Posted On: 08 MAR 2022 9:45PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 8 मार्च 2022

 

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ मनसुख मांडविया यांनी आज राष्ट्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण संस्था, नवी दिल्ली येथे आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त  कोविड-19 लसीकरणात  सर्वोत्कृष्ट  कामगिरी बजावणाऱ्या   देशभरातील महिलांचा  सत्कार केला. भारताच्या कोविड-19 लसीकरण कार्यक्रमाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी केलेल्या अथक प्रयत्नांचे यश  साजरे करण्यासाठी  हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या संपूर्ण प्रवासात महिला लसीकरणकर्त्यांनी आमूलाग्र  बदल घडवून आणला आहे. या वर्षीच्या आंतरराष्ट्रीय महिला दिनाची संकल्पना  “शाश्वत उद्यासाठी आज लैंगिक समानता” अशी  आहे.

केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी आरोग्य क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी आपल्या महिला योध्यांच्या  प्रयत्नांचे कौतुक केले. ते म्हणाले, “आरोग्य क्षेत्राचा विकास महिलांच्या योगदाना शिवाय अपूर्ण आहे. आपल्या  आशा आणि एएनएम कर्मचारी या  आरोग्य क्षेत्राच्या विकासाच्या आधारस्तंभ आहेत. आपल्या आशा कार्यकर्त्या देशाच्या सेवेसाठी अथक परिश्रम करत आहेत. त्या  शेवटच्या मैलापर्यंत पोहोचत आहेत, अवघड भूभाग  पार करत आहेत, प्रत्येक घरात जाऊन प्रत्येक पात्र व्यक्तीचे लसीकरण झाले आहे ना याची खात्री करत आहेत. हर घर दस्तक मोहिमेअंतर्गत, आपल्या आशा कार्यकर्त्यांनी प्रत्येक घराघरात पोहोचून, लस घ्यायला  प्रोत्साहन दिले आणि त्याद्वारे,लसीबद्दलची अनास्था, भीती दूर केली. आज जर भारत कोविड-19 लसीकरण कार्यक्रमात जागतिक आघाडीवर आहे , तर त्याचे श्रेय देशभरातील आपल्या  लसीकरणकर्त्या महिलांना  जाते.

डॉ.मनसुख मांडविया यांनी देशभरातील सर्व महिला लसीकरणकर्त्यांचे अभिनंदन केले आणि त्यांना सलाम केला.

केंद्रीय राज्यमंत्री डॉ.भारती प्रवीण पवार यांनी देशभरातील सर्व महिला लसीकरणकर्त्यांचे अभिनंदन केले. त्या म्हणाल्या, " पंतप्रधानांच्या दूरदृष्टीमुळे आणि देशभरातील सर्व  लसीकरणकर्त्यां महिलांच्या अथक प्रयत्नांमुळे ही लोकचळवळ बनली. " त्या पुढे म्हणाल्या की या महिला भारताच्या लसीकरण कार्यक्रमाच्या प्रणेत्या आहेत. सर्व अडचणींवर मात करत , या महिला प्रत्येक पात्र भारतीयाचे  लसीकरण सुनिश्चित करण्याचे  अथक प्रयत्न करत आहेत.

  

कोविड-19 लसीकरणात  सर्वोत्कृष्ट  कामगिरी बजावणाऱ्या   36 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील 72 महिलांना आज गौरवण्यात आले. महाराष्ट्रात सर्वाधिक लाभार्थ्यांचे लसीकरण केल्याबद्दल मुंबईतील नेसको कोविड लसीकरण केंद्रातील नीता पिंगळे आणि जसलोक रुग्णालयातील जीविका नाईक यांना यावेळी गौरवण्यात आले.

सर्व पुरस्कार विजेत्यांची लिंक पुढीलप्रमाणे :

https://drive.google.com/file/d/1GSBTq0vQjkTmxwiPgAcbKUxgjU51aN45/view?usp=sharing

* * *

R.Aghor/S.Kane/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1804151) Visitor Counter : 197