पंतप्रधान कार्यालय

पुणे येथील सिम्बॉयसिस विद्यापीठाच्या सुवर्ण महोत्सवी सोहळ्याचे पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन


सिम्बायोसिस आरोग्य धामचे केले उद्घाटन

“ज्ञानाचा प्रसार दूरवर आणि व्यापक झाला पाहिजे, संपूर्ण जगाला एक कुटुंब म्हणून जोडण्यासाठी ज्ञान हे माध्यम बनले पाहिजे, ही आपली संस्कृती आहे.मला आनंद आहे की, ही परंपरा आपल्या देशात अजूनही जिवंत आहे.''

“स्टार्टअप इंडिया, स्टँड अप इंडिया, मेक इन इंडिया आणि आत्मनिर्भर भारत यांसारखी अभियाने तुमच्या आकांक्षांचे प्रतिनिधित्व करत आहेत. आजचा भारत

नवोन्मेषी, सुधारणावादी आणि संपूर्ण जगाला प्रभावित करणारा आहे''.

पूर्वीच्या बचावात्मक आणि परावलंबी  मानसिकतेचा  दुष्परिणाम सहन न करणारी तुमची पिढी एक प्रकारे सुदैवी आहे. याचे श्रेय तुम्हा सर्वांना जाते, आपल्या तरुणाईला  जाते.”

“देशातील सरकारला आज देशातील तरुणांच्या सामर्थ्यावर विश्वास आहे. म्हणूनच आम्ही तुमच्यासाठी एकापाठोपाठ  एक क्षेत्र खुली करत आहोत ”

"भारताच्या वाढत्या प्रभावामुळेच आपण हजारो विद्यार्थ्यांना युक्रेनमधून आपल्या मायदेशी परत आणले आहे"

Posted On: 06 MAR 2022 3:22PM by PIB Mumbai

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पुणे येथील सिम्बॉयसिस विद्यापीठाच्या सुवर्ण महोत्सवी सोहळ्याचे उद्घाटन केले.त्यांनी सिम्बॉयसिस आरोग्य धामचेही उद्घाटन केले. यावेळी महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी  उपस्थित होते.

याप्रसंगी  सिम्बॉयसिसचे विद्यार्थी, प्राध्यापक आणि माजी विद्यार्थ्यांचे  अभिनंदन करताना,‘या संस्थेच्या वसुधैव कुटुंबकमया  ब्रीदवाक्याचा उल्लेख करत  पंतप्रधानांनी सांगितले की, विविध देशांतील विद्यार्थ्यांच्या रूपाने ही आधुनिक संस्था भारताच्या प्राचीन परंपरेचे प्रतिनिधित्व करत आहे. ज्ञानाचा प्रसार दूरवर आणि व्यापक  झाला पाहिजे, संपूर्ण जगाला एक कुटुंब म्हणून जोडण्यासाठी ज्ञान हे माध्यम बनले पाहिजे, ही आपली संस्कृती आहे.मला आनंद आहे की, ही परंपरा आपल्या देशात अजूनही जिवंत आहे.'', असे ते म्हणाले.

नव्या भारताचा  आत्मविश्वास अधोरेखित करत पंतप्रधानांनी नमूद केले की, भारत जगातील सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थांपैकी एक आहे आणि जगातील तिसरी सर्वात मोठी स्टार्ट अप व्यवस्था भारतात आहे. स्टार्टअप इंडिया, स्टँड अप इंडिया, मेक इन इंडिया आणि आत्मनिर्भर भारत यांसारखी अभियाने तुमच्या आकांक्षांचे प्रतिनिधित्व करत आहेत. आजचा भारत  नवोन्मेषी, सुधारणावादी आणि संपूर्ण जगाला प्रभावित करणारा आहे'', असे पंतप्रधानांनी सांगितले.  कोरोना लसीकरणाच्या संदर्भात भारताने आपली लक्षणीय कामगिरी जगाला कशाप्रकारे दाखवून दिली  हे पुणेकरांना चांगलेच माहीत आहे, असे पंतप्रधान म्हणाले.

त्यांनी भारताच्या प्रभावाकडे लक्ष वेधले  आणि ऑपरेशन गंगा मोहिमेद्वारे  युद्धग्रस्त युक्रेनमधून भारत आपल्या नागरिकांची सुखरूप सुटका करत  असल्याचे सांगितले. जगातील मोठ्या देशांना असे करणे कठीण जात आहे. पण भारताच्या वाढत्या प्रभावामुळेच आम्ही हजारो विद्यार्थ्यांना मायदेशी परत आणले आहे, असे त्यांनी सांगितले.

पंतप्रधानांनी देशातले  बदलती परिस्थिती  अधोरेखित केली. ते म्हणाले, "तुमची पिढी भाग्यवान आहे. तुमच्या पिढीला  पूर्वीच्या बचावात्मक आणि अवलंबून राहण्याच्या  मानसिकतेचा दुष्परिणाम सहन करावा लागला नाही.  देशात हे परिवर्तन घडवण्याचे जर  पहिले श्रेय  कोणाचे असेल तर ते तुम्हा सर्वांचे आहे, आपल्या युवा पिढीचे आहे.

पूर्वी आवाक्याबाहेर समजल्या जाणाऱ्या क्षेत्रांमध्ये भारत जागतिक नेता म्हणून उदयास आला आहे, असे पंतप्रधानांनी सांगितले.  भारत हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा मोबाईल उत्पादक देश बनला आहे. सात वर्षांपूर्वी भारतात फक्त 2 मोबाईल उत्पादक कंपन्या होत्या.  आज 200 हून अधिक उत्पादन युनिटस  या कामात गुंतलेली आहेत, असे ते म्हणाले. संरक्षण क्षेत्रातही जगातील  सर्वात मोठा आयातदार देश म्हणून ओळखला जाणारा भारत आता संरक्षण निर्यातदार होत  आहे. आज, दोन मोठ्या  संरक्षण संधी प्राप्त होत  आहेत, ज्याद्वारे  देशाच्या संरक्षण गरजा पूर्ण करण्यासाठी सर्वात मोठी आधुनिक शस्त्रे तयार केली जातील, असेही पंतप्रधानांनी सांगितले.

पंतप्रधानांनी विद्यार्थ्यांना विविध क्षेत्रे खुली झाल्याचा  पुरेपूर लाभ उठवण्याचे  आवाहन केले. जिओ-स्पेशियल अर्थात भू-अवकाशीय  प्रणालीड्रोन, सेमी-कंडक्टर आणि अंतराळ तंत्रज्ञान या क्षेत्रात अलिकडच्या काळात झालेल्या सुधारणांचा उल्लेख करून पंतप्रधान म्हणाले,देशातील सरकारचा आज देशातील तरुणांच्या सामर्थ्यावर विश्वास आहे. म्हणूनच आम्ही तुमच्यासाठी एकामागून एक क्षेत्रे खुली करत आहोत.

तुम्ही कोणत्याही क्षेत्रात असाल, तुम्ही तुमच्या करिअरसाठी ज्याप्रकारे ध्येय  ठरवता , त्याचप्रमाणे देशासाठी तुमची काही उद्दिष्टे असली पाहिजेत, असे मोदी म्हणाले. त्यांनी विद्यार्थ्यांना  स्थानिक समस्यांवर उपाय शोधण्याचे आवाहन केले.  त्यांना विद्यार्थ्यांना तंदुरुस्त तसेच आनंदी आणि उत्साही रहायला सांगितले. जेव्हा आपली उद्दिष्टे वैयक्तिक विकासाकडून राष्ट्रीय विकासाकडे वळतात तेव्हा राष्ट्र उभारणीत सहभागी झाल्याची भावना उफाळून येते, असे मोदी  म्हणाले.

पंतप्रधानांनी विद्यार्थ्याना दरवर्षी एक संकल्पना निवडून काम करण्याचे आवाहन केले आणि संकल्पना निवडताना  राष्ट्रीय आणि जागतिक गरजा डोळ्यांसमोर  ठेवून निवड करायला सांगितले. याचे निष्कर्ष  आणि कल्पना  पंतप्रधान  कार्यालयाबरोबर सामायिक करता येतील असे पंतप्रधान म्हणाले.

***

JPS/SK/SC/SK/PK

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1803349) Visitor Counter : 258