पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav g20-india-2023

तंत्रज्ञान-आधारित विकास या विषयावरील अर्थसंकल्‍पपश्चात वेबिनारमध्ये पंतप्रधानांनी केलेले भाषण

Posted On: 02 MAR 2022 6:01PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 2 मार्च 2022

 

नमस्कार!

आपणा सर्वांना माहीत आहे. की, गेल्या दोन वर्षांपासून आपण एक नवीन परंपरा सुरू केली आहे. एकतर , आपण  अर्थसंकल्प महिनाभर आधी आधीच सादर करतो आणि अर्थसंकल्पाची अंमलबजावणी  1 एप्रिलपासून होते,  या दरम्यान  आपल्याला तयारीसाठी दोन महिने मिळतात. आपण  प्रयत्न करत आहोत की, अर्थसंकल्पासंदर्भात खाजगी, सार्वजनिक, राज्य सरकार, केंद्र सरकार, सरकारच्या विविध विभागांसह सर्व संबंधितांनी मिळून ,अर्थसंकल्पातील सर्व गोष्टीं आपल्याला प्रत्यक्षात कशाप्रकारे लागू करता येतील, विनाअडथळा या गोष्टी कशाप्रकारे मार्गी लावता येतील आणि त्याअनुकूल परिणाम साधण्यासाठी आपला भर कशाप्रकारे असावा, या अनुषंगाने  जितक्या सूचना तुम्हा लोकांकडून प्राप्त होतील यामुळे कदाचित  सरकारला  आपली  निर्णय  प्रक्रिया सुलभ करण्यास  मदत होईल.अंमलबजावणीचा मार्गदर्शक आराखडाही चांगल्या प्रकारे तयार होईल. आणि पूर्णविराम, स्वल्पविरामामुळे काही वेळा एखाद दुसरी  गोष्ट फायलींमध्ये  सहा-सहा महिने प्रलंबित राहते , त्या सर्व गोष्टी टाळण्यासाठी आम्हाला तुमच्यासोबत काम करायचे आहे. तुमच्या सूचना जाणून घ्यायच्या आहेत. अर्थसंकल्पात असे असायला हवे होते,असे  व्हायला हवे होते यासाठी ही चर्चा अपेक्षित नाही कारण ते आता शक्य नाही, कारण ते काम संसदेने केले आहे.पण ते काहीही असले तरी त्याचा उत्तम फायदा जनतेपर्यंत कसा पोहोचेल  देशाला त्याचा कशाप्रकारे फायदा होईल आणि आपण सर्व एकत्र कशाप्रकारे  काम करू शकतो, यासाठीच ही आपली  चर्चा आहे. यंदाच्या  अर्थसंकल्पात विज्ञान आणि तंत्रज्ञानाशी संबंधित निर्णय घेण्यात आल्याचे तुम्ही पाहिले असेल.हे सर्व निर्णय खरोखर महत्त्वाचे आहेत. अर्थसंकल्पीय घोषणांची अंमलबजावणी तितकीच जलद असावी, या दिशेने हे वेबिनार एक एकत्रित  प्रयत्न आहे.

मित्रांनो,

आपल्या सरकारसाठी विज्ञान आणि तंत्रज्ञान हे केवळ एक वेगळे क्षेत्रच  नाही.तर आज अर्थव्यवस्थेच्या क्षेत्रातील आपला  दृष्टीकोन हा  डिजिटल अर्थव्यवस्था आणि फिनटेक म्हणजेच आर्थिक तंत्रज्ञानावर आधारलेला आहे. पायाभूत सुविधांच्या क्षेत्रातील आपला विकासात्मक दृष्टीकोन  अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित आहे. सार्वजनिक सेवा आणि शेवटच्या टोकापर्यंत सेवा वितरण  देखील आता डेटाद्वारे डिजिटल मंचाशी जोडले जात आहे.आमच्यासाठी तंत्रज्ञान हे देशातील सामान्यहून सामान्य नागरिकांचे सक्षमीकरण करण्याचे एक सशक्त माध्यम आहे.आपल्यासाठी  तंत्रज्ञान हा देशाला आत्मनिर्भर बनवण्याचा मुख्य पाया आहे.आणि जेव्हा मी भारताच्या आत्मनिर्भरतेबद्दल बोलतो तेव्हा, आजही तुम्ही सकाळी अमेरिकेचे अध्यक्ष बायडेन  यांचे भाषण ऐकले असेल ,तेही अमेरिकेला आत्मनिर्भर करण्यासंदर्भात बोलले आहेत. अमेरिकेत मेक इन अमेरिका राबवण्यावर आज त्यांनी  खूप भर दिला आहे. आणि त्यामुळे आपल्याला माहीत आहे जगात ज्या नव्या प्रणाली  निर्माण होत आहेत त्यात  आपणही  आत्मनिर्भरतेसह पुढे जाणे आपल्यासाठी अत्यंत आवश्यक आहे आणि  केवळ याच गोष्टींवर या अर्थसंकल्पात  भर देण्यात आला आहे, हे तुम्ही पाहिलेच असेल.

मित्रांनो,

यंदा  आपल्या  अर्थसंकल्पात उदयोन्मुख  क्षेत्रांवर विशेष भर देण्यात आला आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता , भू- अवकाशीय प्रणाली , ड्रोन ते सेमी कंडक्टर्स आणि अंतराळ तंत्रज्ञानापर्यंत , जीनोमिक्स, औषोधोत्पादन  आणि स्वच्छताविषयक  तंत्रज्ञानापासून  ते 5जी पर्यंतची  ही सर्व क्षेत्रे आज देशाची  प्राधान्य क्षेत्रे आहेत. उदयोन्मुख  क्षेत्रांसाठी विषयानुरूप निधीला  प्रोत्साहन देण्याची बाब अर्थसंकल्पात मांडण्यात आली आहे.आपल्याला  माहिती आहे की यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये 5 जी  स्पेक्ट्रम लिलावासाठी अतिशय स्पष्ट मार्गदर्शक आराखडा मांडण्यात आला आहे. देशातील बळकट 5 जी  व्यवस्थेच्या माध्यमातून  या संबंधित डिझाइन-आधारित उत्पादनासाठी अर्थसंकल्पामध्ये  उत्पादन संलग्न प्रोत्साहन  योजना देखील प्रस्तावित केली आहे.मी विशेषत: आपल्या  खाजगी क्षेत्राला आवाहन  करेन की, या निर्णयांमुळे निर्माण होणाऱ्या नवीन शक्यतांवर सविस्तर चर्चा व्हावी आणि ठोस सूचनांसह आपण सामूहिक प्रयत्नाने पुढे जाऊया.

मित्रांनो,

असे म्हटले जाते की, विज्ञान हे वैश्विक आहे मात्र तंत्रज्ञान स्थानिक असले पाहिजे. विज्ञानातील तत्त्वे आपल्याला अवगत आहेत, पण जीवनमान सुलभ करण्यासाठी तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त वापर कसा करता येईल, यावरही आपल्याला भर द्यावा लागेल.आज आपण जलद गतीने घरे बांधत आहोत, रेल्वे-रस्ते , हवाईमार्ग -जलमार्ग  आणि ऑप्टिकल फायबरमध्येही अभूतपूर्व गुंतवणूक होत आहे. याला अधिक गती देण्याच्या अनुषंगाने आपण  पीएम  गतिशक्तीचा  दृष्टीकोन घेऊन मार्गक्रमण करत आहोत.  या दृष्टीकोनाला  तंत्रज्ञानाची मदत सातत्याने   कशी होईल यावर आपल्याला काम करायचे आहे. तुम्हाला माहीत आहे की , गृहनिर्माण क्षेत्रात देशातील 6 मोठ्या दीपस्तंभ  प्रकल्पांवर काम सुरू आहे.  घरांचे बांधकाम करताना आपण  आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत आहोत. तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आपण याला आणखी गती कशी देऊ शकतो आणि त्याचा विस्तार कसा करू शकतो यासाठी आम्हाला तुमचे सहकार्य हवे आहे , सक्रिय योगदान हवे आहे आणि नाविन्यपूर्ण कल्पनांसह आम्हाला ते हवे आहे. आज आपण वैद्यकशास्त्र पाहत आहोत, वैद्यकशास्त्र जवळपास तंत्रज्ञानावर आधारित झाले आहे.आता अधिकाधिक वैद्यकीय उपकरणांची निर्मिती भारतात व्हायला हवी आणि भारताच्या गरजा लक्षात घेऊन व्हायला हवी , त्यामध्ये तंत्रज्ञानाचा वापर कसा करता येईल याकडे आपण सर्वांनी लक्ष दिले पाहिजे. आणि कदाचित आपण त्यात अधिक योगदान देऊ शकता.
 
आज आपण बघू शकता, हे एक क्षेत्र किती वेगाने प्रगती करत आहे, पुढे जात आहे. ते क्षेत्र आहे गेमिंगचे ! जगात आज या क्षेत्राची खूप मोठी बाजारपेठ तयार झाली आहे. युवा पिढी या क्षेत्राशी अतिशय वेगाने जोडली गेली आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात आम्ही एव्हीजीसी म्हणजे अॅनिमेशन व्हिज्यूअल इफेक्टस गेमिंग कॉमिक वर मोठा भर दिला आहे.  या दिशेने देखील, भारताच्या माहिती तंत्रज्ञान क्षेत्राच्या सहभागाने, जगभरात प्रतिष्ठा मिळवली आहे. आता आपण अशा विशिष्ट भागात देखील आपली ताकद उभी करु शकतो. तुम्ही या दिशेने तुमचे प्रयत्न नेऊ शकता का? त्याचप्रमाणे भारतीय खेळण्यांची देखील खूप मोठी बाजारपेठ आहे. आणि आजकालच्या लहान मुलांनाही खेळण्यांमध्ये काही ना काही तंत्रज्ञान असलेले फार आवडते. मग आपण आपल्या देशातच, लहान मुलांसाठी अनुकूल अशा तंत्रज्ञानाचा वापर करुन तयार केलेली खेळणी आणि त्यांना जगभरातल्या बाजारपेठांमध्ये पोहोचवणे याचा विचार करू शकतो का?  

त्याचप्रमाणे, दूरसंचार क्षेत्रात नवे तंत्रज्ञान आणण्यासाठी आपल्या सर्वांना आपल्या प्रयत्नांना अधिक गती देण्याची गरज आहे. आपले सर्व्हर भारतातच असावेत, परदेशांवरील अवलंबित्व कमी व्हावे, आणि दूरसंचार क्षेत्राशी संबंधित सुरक्षाविषयक नवनवे पैलू यात जोडले जात आहेत. आपल्याला अतिशय जागृत राहून काम करणे आणि या दिशेने आपले प्रयत्न आपल्याला वाढवत न्यायचे आहेत. फीनटेक म्हणजेच वित्त-तंत्रज्ञान या क्षेत्रात देखील भारताने गेल्या काही काळात कमालीची कामगिरी केली आहे. लोकांना वाटत असे, आपल्या देशात हे क्षेत्र? मात्र, मोबाईल फोन्सच्या माध्यमातून गावातली माणसे देखील आता सहजपणे डिजिटल व्यवहार करत आहेत. याचा अर्थ हाच आहे, की फीनटेक मध्येही आधुनिक तंत्रज्ञानाचा समावेश करणे आज आपल्यासाठी काळाची गरज आहे. यात सुरक्षितता देखील आहे. फेब्रुवारी 2020 मध्ये देशाने भू-अवकाशीय डेटाबाबत देखील जुन्या पद्धती बदलल्या आहेत. यामुळे भू-अवकाशीय क्षेत्रासाठी अमर्याद संधी,नवनव्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. आपल्या खाजगी क्षेत्रांना देखील याचा पूर्ण लाभ मिळायला हवा.

मित्रांनो, 

कोविड काळात आपल्या स्वयंपूर्णतेपासून ते लस उत्पादनापर्यंत आपले जे विश्वासार्ह धोरण होते, ते सगळ्या जगाने पहिले आहे. हेच यश आता आपल्याला इतर सर्व क्षेत्रातही संपादन करायचे आहे. यात आपल्या उद्योगजगताची, आपल्या सर्वांचीच खूप मोठी जबाबदारी आहे. देशात एक मजबूत डेटा सुरक्षा आराखडा असणे देखील खूप आवश्यक आहे. डेटाचा जास्तीत जास्त लाभ मिळवण्यासाठी डेटा नियमन देखील अतिशय आवश्यक आहे. अशा स्थितीत त्याचा दर्जा आणि निकष देखील आपल्याला निश्चित करावे लागतील. आपण या दिशेने कसे पुढे जायचे, यास्तही आपण सगळे एकत्र येऊन, एक आराखडा निश्चित करु शकता.

मित्रांनो,

आज भारताकडे जगातील तिसऱ्या क्रमांकाची आणि सर्वात जलद गतीने वाढणारी स्टार्ट अप्स व्यवस्था आहे. मी आपल्या स्टार्ट अप्स ना हा विश्वास देतो की, सरकार त्यांच्यासोबत, संपूर्ण ताकदीनिशी उभे आहे.  अर्थसंकल्पात युवकांचे कौशल्य, पुनरकौशल्य आणि कौशल्ये अद्ययावत करणे, यासाठी एका पोर्टलची निर्मिती करण्याचा प्रस्तावही मांडण्यात आला आहे. यामुळे युवकांना एपीआय आधारित विश्वासार्ह कौशल्य ओळख, पेमेंट आणि संशोधनाच्या पातळ्याच्या माध्यमातून, चांगले रोजगार आणि संधी मिळतील.

मित्रांनो,

देशात उत्पादनाला प्रोत्साहन देण्यासाठी आम्ही 14 प्रमुख क्षेत्रांमध्ये  2 लाख कोटी रुपयांची उत्पादन-संलग्न-प्रोत्साहन योजना सुरु केली आहे.  या दिशेने पुढे जाण्यासाठी या वेबिनार मधून काही ठोस कल्पना मिळतील, अशी मला अपेक्षा आहे. याच्या निर्वेध अंमलबजावणीचे मार्ग आपण आम्हाला सांगा. नागरिकांच्या सेवेसाठी आपण ऑप्टिक फायबर चा देखील अधिक उत्तम उपयोग करु शकतो. आपल्या गावातील दुर्गम प्रदेशात बसलेला विद्यार्थी देखील भारतातील सर्वोत्तम शिक्षण व्यवस्थेचा लाभ या तंत्रज्ञानाच्या मदतीने घेऊ शकेल का? वैद्यकीय सेवांचा लाभ कसा घेऊ शकेल? कृषि क्षेत्रांत देखील नवनव्या संशोधनांचा लाभ छोटा शेतकरी कसा घेऊ शकेल ? तेव्हाच घेऊ शकेल जेव्हा त्याच्या हातात मोबाईल असेल. आज जगभरात सगळ्या गोष्टी उपलब्ध आहेत. आपल्याला फक्त त्या गोष्टींशी स्वतःला सुलभपणे जोडून घ्यायचे आहे. माझी ही इच्छा आहे आणि त्यासाठी मला तुम्हा सर्व मान्यवरांच्या सल्ल्यांची, सूचनांची गरज आहे.

मित्रांनो,

ई-कचऱ्यासारखी तंत्रज्ञानाशी संबंधित जी आव्हाने जगासमोर आहेत, त्यांचे समाधान देखील तंत्रज्ञानातूनच मिळणार आहे. माझा तुम्हाला विशेष आग्रह आहे, की या वेबिनार मध्ये आपण चक्राकार अर्थव्यवस्था, ई-कचरा व्यवस्थापन, आणि इलेक्ट्रिक वाहतूक अशा उपाययोजनांवर देखील भर द्यावा. देशाला उत्तम समाधान द्यावे. मला पूर्ण  विश्वास आहे की आपल्या प्रयत्नातून आपल्या ध्येयापर्यंत नक्कीच पोहोचेल. आणि मी पुन्हा एकदा आपल्याला सांगेन की, हा वेबिनार सरकारकडून आपल्याला ज्ञान देण्यासाठी नाही. तर या वेबिनारमधून सरकारला आपल्याकडून नवनवीन कल्पना आणि सूचना हव्या आहेत. नव्या पद्धती आम्हाला तुमच्याकडून शिकायच्या आहेत, जेणेकरुन आपण आपल्या कामांना नवी गती देऊ शकू. आपण जे पैसे यात लावले आहेत, जी तरतूद केली आहे, त्यावर आपण आपल्या पहिल्या तिमाहीत काही करुन दाखवू शकतो का? काही कालबद्ध कार्यक्रम तयार करु शकतो का? मला विश्वास आहे, की आपण या क्षेत्रांत आहात, आपल्याला सगळ्या बारकाव्यांची माहिती आहे. कुठे अडचणी आहेत, त्याची कल्पना आहे. काय केल्यामुळे जास्तीत जास्तीत योग्य प्रकारे कार्य होऊ शकेल, याची आपल्याला जाण आहे. तेव्हा आपण एकत्र बसून, या दिशेने पुढे वाटचाल करायची आहे. मी या वेबिनार साठी आपल्याला खूप खूप शुभेच्छा देतो.

धन्यवाद !


* * *

JPS/SRT/S.Chavan/R.Aghor/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com(Release ID: 1802374) Visitor Counter : 1064