पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

अरुणाचल प्रदेशची सुवर्ण जयंती आणि 36 व्या राज्य स्थापना दिनाच्या समारंभाला पंतप्रधानांनी केले संबोधित


"अँग्लो-अबोर युद्ध असो किंवा स्वातंत्र्यानंतरच्या सीमेचे संरक्षण असो, अरुणाचलच्या लोकांच्या शौर्याच्या गाथा हा प्रत्येक भारतीयासाठी अनमोल वारसा आहे"

"सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास आणि सबका प्रयास" हा मार्ग अरुणाचल प्रदेशचे उज्वल भविष्य सुनिश्चित करेल"

"पूर्व भारत, विशेषत: ईशान्य भारत 21 व्या शतकात भारताच्या विकासाचे इंजिन असेल"

“आम्ही अरुणाचलला पूर्व आशियाचे प्रमुख प्रवेशद्वार बनवण्यासाठी पूर्ण ताकदीने कार्य करत आहोत.  अरुणाचलचे  धोरणात्मक महत्व लक्षात घेऊन या राज्यात आधुनिक पायाभूत सुविधा उभारल्या जात आहेत”

प्रविष्टि तिथि: 20 FEB 2022 12:03PM by PIB Mumbai

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अरुणाचल प्रदेशच्या सुवर्ण जयंती आणि 36 व्या राज्य स्थापना दिनानिमित्त अरुणाचल प्रदेशातील जनतेचे अभिनंदन केले आहे.  गेल्या 50 वर्षांत 'उगवत्या सूर्याची भूमी' म्हणून त्याची ओळख अधिक दृढ केल्याबद्दल त्यांनी  प्रशंसा  केली. त्यांनी भारतरत्न डॉ भूपेन हजारिका यांच्या अरुणाचल हमाराया प्रसिद्ध गाण्यातील ओळीही उद्धृत केल्या. पंतप्रधान आज अरुणाचल प्रदेशच्या सुवर्ण जयंती आणि ३६ व्या राज्य स्थापना दिनानिमित्त बोलत होते.

देशभक्ती आणि सामाजिक सौहार्दाची भावना दृढ केल्याबद्दल आणि देशाचा सांस्कृतिक वारसा जपल्याबद्दल पंतप्रधानांनी अरुणाचल प्रदेशची प्रशंसा केली. ज्यांनी देशासाठी आपले प्राण अर्पण केले, त्याअरुणाचल प्रदेशातील शहीदांना पंतप्रधानांनी श्रद्धांजली वाहिली अँग्लो-अबोर युद्ध असो किंवा स्वातंत्र्यानंतरच्या सीमेची सुरक्षा असो, अरुणाचलच्या लोकांच्या शौर्याच्या गाथा हा प्रत्येक भारतीयासाठी अमूल्य वारसा आहे, असे पंतप्रधान यावेळी म्हणाले.

पंतप्रधानांनी या राज्यात केलेल्या त्यांच्या अनेक दौऱ्यांचे स्मरण केले आणि मुख्यमंत्री श्री पेमा खांडू यांच्या नेतृत्वाखाली डबल-इंजिन-सरकारच्या अंतर्गत विकासाच्या गतीशीलतेबद्दल समाधान व्यक्त केले.  "सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास आणि सबका प्रयास"हा मार्गच अरुणाचल प्रदेशचे चांगले भविष्य सुनिश्चित करेल", असेही पंतप्रधान  म्हणाले.

21 व्या शतकात पूर्व भारत, विशेषत: ईशान्य भारत हे भारताच्या विकासाचे इंजिन असेल या विश्वासाचा पंतप्रधानांनी पुनरुच्चार केला. त्यांनी गेल्या 7 वर्षात केलेल्या उपाययोजनांची यादीही सादर केली.  संप्रेषण आणि ऊर्जा पायाभूत सुविधा या  क्षेत्रात व्यापक कार्य सुरू आहे आणि त्यामुळे अरुणाचल प्रदेशातील जीवन आणि व्यवसाय सुलभ होत आहेत.  प्रदेशातील सर्व राजधान्या प्राधान्यक्रमाने रेल्वेने जोडल्या जात आहेत.  आम्ही अरुणाचलला पूर्व आशियाचे प्रमुख प्रवेशद्वार बनवण्यासाठी पूर्ण ताकदीने कार्य करत आहोत. अरुणाचलच्या धोरणात्मक महत्त्व लक्षात घेऊन त्या पार्श्‍वभूमीवर राज्यात आधुनिक पायाभूत सुविधा उभारल्या जात आहेत, असे पंतप्रधान म्हणाले.

अरुणाचल प्रदेश निसर्ग आणि संस्कृतीशी सुसंगत राहून आपली  प्रगती करत असल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले.  तुमच्या प्रयत्नांमुळे अरुणाचल हे जैवविविधतेतील सर्वात महत्त्वाचे क्षेत्र आहे, असे सांगून पंतप्रधानांनी अरुणाचल प्रदेशातील लोकांचे अभिनंदन केले.

आरोग्य, शिक्षण, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरण आणि बचत गटांच्या विकासासाठी मुख्यमंत्र्यांनी केलेल्या प्रयत्नांवरही श्री मोदी यांनी संतोष व्यक्त केला.  राज्याच्या विकासासाठी सातत्याने काम करत असल्याबद्दल पंतप्रधानांनी केंद्रीय कायदा मंत्री किरेन रिजिजू यांचीही प्रशंसा केली.

अरुणाचलची पर्यटन क्षमता जागतिक स्तरावर नेण्याच्या आपल्या वचनबद्धतेचाही पंतप्रधानांनी पुनरुच्चार केला.

पंतप्रधानांचा अरुणाचल राज्य स्थापनादिनानिमित्तचा संदेश

***

S.Thakur/S.Patgaonkar/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(रिलीज़ आईडी: 1799819) आगंतुक पटल : 289
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Manipuri , Bengali , Assamese , Punjabi , Gujarati , Odia , Tamil , Telugu , Kannada , Malayalam