पंतप्रधान कार्यालय

लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावाला पंतप्रधानांनी दिलेले उत्तर

Posted On: 07 FEB 2022 11:53PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 7 फेब्रुवारी 2022 

 

माननीय अध्‍यक्षजी,

राष्‍ट्रपतींच्या अभिभाषणाचे आभार मानण्यासाठी मी उभा आहे. आदरणीय राष्‍ट्रपतींनी अपल्या भाषणात आत्‍मनिर्भर भारत आणि महत्वाकांक्षी भारतासाठी गेल्या काही दिवसात केलेल्या प्रयत्नांचा विस्तृत लेखाजोखा मांडला. या महत्‍वपूर्ण भाषणावर आपली मतं, विचार मांडलेल्या सर्व आदरणीय सदस्यांचे मी आभार मानतो.

आदरणीय अध्‍यक्षजी,

माझं म्हणणं मांडण्यापूर्वी काल घडलेल्या घटनेबद्दल, दोन शब्द जरूर सांगायचे आहेत.

देशाने आदरणीय लतादीदी यांना गमावलं आहे. इतका प्रदीर्घकाळ ज्यांच्या आवाजाने मोहिनी घातली होती, देशाला प्रेरितही केलं, देशाला भावनांनी भारुन टाकलं. आणि एक अहर्निश, सांस्‍कृतिक वारसा मजबूत करत देशाच्या एकतेलाही...; सुमारे 36 भाषांमधे त्यांनी गाणी गायली. भारताची एकता आणि अखंडतेसाठीही हे एक अलौकीक प्रेरक उदाहरण आहे. मी आज आदरणीय लता दीदी यांना आदरपूर्वक श्रद्धांजली अर्पण करतो.

आदरणीय अध्‍यक्षजी,

दुसऱ्या महायुद्धानंतर जगात मोठं परिवर्तन घडून आलं याचा इतिहास साक्षीदार आहे.  एक नवीन जागतिक व्यवस्था ज्यामध्ये आपण सर्व जगत आहोत, मी स्पष्टपणे पाहू शकतो की कोरोनानंतर, जग एका नवीन जागतिक व्यवस्थेकडे, नवीन प्रणालींकडे वेगाने वाटचाल करत आहे.  हा एक महत्त्वाचा वळणबिंदू (टर्निंग पॉइंट) आहे. एक भारत म्हणून आपण ही संधी गमावता कामा नये.  मुख्य मंचावरही(टेबल) भारताचा आवाज बुलंद राहिला पाहिजे.  नेतृत्वाच्या भूमिकेबाबत भारताने स्वतःला कमी लेखता कामा नये.  या संदर्भात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव, स्वातंत्र्याची ७५ वर्षे ही एक प्रेरणादायी संधी आहे. ही प्रेरणादायी संधी साधून, नवनवीन संकल्प घेऊन, जेव्हा देश स्वातंत्र्याची शंभर वर्षे साजरी करेल, तोपर्यंत आपण पूर्ण सामर्थ्याने, पूर्ण शक्तीने, पूर्ण समर्पणाने, पूर्ण संकल्पाने देशाला त्या ठिकाणी नेऊन पोहोचू. ही संकल्पाची वेळ आहे.

आदरणीय अध्‍यक्षजी,

गेल्या काही वर्षांत, देशाने अनेक क्षेत्रांमध्ये पायाभूत सुविधांचे बळकटीकरण अनुभवले आहे.  आणि आम्ही मोठ्या ताकदीने पुढे आलो आहोत.  प्रधानमंत्री आवास योजना- गरिबांना राहण्यासाठी घर असावे, हा उपक्रम खूप दिवसांपासून सुरू आहे, पण वेग, व्यापकता, विशालता, वैविध्य यामुळे तिला त्यात स्थान मिळाले आहे. गरिबांच्या घराची किंमतही यामुळे लाखांहून अधिक आहे. आणि एक प्रकारे, ज्याला पक्के घर मिळते, तो गरीबही आज लखपतीच्या वर्गात मोडतो.  आज देशातील सर्वात गरीब व्यक्तीच्या घरात शौचालये आहेत, आज देशातील गावेही हगणदारीमुक्त झाली आहेत, हे ऐकून अभिमान वाटणार नाही असा कोण भारतीय असेल, कोणाला आनंद होणार नाही?  मी बसायला तयार आहे.  मी तुमचे आभार मानून सुरुवात करु?  खूप खूप धन्यवाद. तुमचे प्रेम चिरंतन राहो.

स्वातंत्र्याच्या इतक्या वर्षांनंतर जेव्हा गरिबांच्या घरात प्रकाश येतो तेव्हा त्याचा आनंद देशाच्या आनंदाला बळ देतो.  चुलीच्या धुरामुळे डोळ्यांची जळजळ होणाऱ्या आईला, गरीब आईला, ज्या देशात गॅस जोडणी प्रतिष्ठेचे लक्षण मानले जायचे, त्या देशात गरिबाच्या घरात गॅस जोडणी असायला हवी. धुराच्या चूलीपासून मुक्ती असेल तर त्याचा आनंद काही औरच असतो.

आज गरीबांचे बँकेत स्वतःचे खाते आहे, आज बँकेत न जाता, गरीब देखील त्यांच्या फोनवरून बँक खाते वापरतात.  थेट लाभ हस्तांतरणाअंतर्गत सरकारने दिलेली रक्कम थेट त्याच्या खात्यात पोहोचते, जर तुम्ही जमिनीशी जोडलेले असाल, तुम्ही लोकांमधे राहत असाल, तर या गोष्टी नक्कीच दिसतात.  पण दुर्दैवाची बाब म्हणजे तुमच्यापैकी अनेकजण असे आहेत की ज्यांची सुई 2014 मधेच अडकून पडली आहे आणि ते त्यातून बाहेर पडू शकलेले नाहीत.  आणि त्याचा परिणाम म्हणून तुम्ही काय दु:ख भोगले आहे,  तुम्ही स्वतःला अशा मन:स्थितीत जखडून ठेवले आहे;  देशातील जनता तुम्हाला ओळखून चुकली आहे.  काही जणांनी आधी ओळखलं आहे, काहींनी उशिरानं ओळखलं आणि येणार्‍या काळातही लोकांना यांची ओळख पटेल.  तुम्ही एवढे लांबलचक उपदेश देता, पण तुम्ही विसरलात की 50 वर्षे तुम्हालाही देशात इथे बसण्याचे सौभाग्य मिळाले होते आणि त्याचे कारण काय, याचा तुम्ही विचार करू शकत नाही.

आता तुम्ही बघा, नागालँडच्या जनतेने शेवटच्या वेळी 1998 मध्ये काँग्रेसला मतदान केले होते.  म्हणजे जवळपास 24 वर्षे झाली. ओडिशाने 1955 मध्ये तुम्हाला मतदान केले होते, तुम्हाला तेथे प्रवेश मिळाला नाही याला केवळ 27 वर्षे झाली.  1994 मध्ये तुम्ही पूर्ण बहुमताने गोव्यात जिंकलात, गोव्याने तुम्हाला स्वीकारले नाही त्याला 28 वर्षे झाली.  त्रिपुरातील लोकांनी शेवटच्या वेळी 1988 मध्ये म्हणजे 34 वर्षांपूर्वी तुम्हाला मतदान केले होते.  काँग्रेसची अवस्था यूपी, बिहार आणि गुजरात अशी आहे - शेवटी 1985 मध्ये म्हणजे 37 वर्षांपूर्वी तुम्हाला मतदान केले.  शेवटच्या वेळी पश्चिम बंगालच्या लोकांनी तुम्हाला जवळजवळ 50 वर्षांपूर्वी, 1972 मध्ये निवडले होते.  तामिळनाडूची जनता... मला हे मान्य आहे, जर तुम्ही त्या प्रतिष्ठेचे पालन करत असाल आणि या जागेचा वापर करत नसाल, हे अत्यंत दुर्दैवी आहे की सदनासारखी जागा देशासाठी उपयोगी पडायला हवी, तर त्याचा पक्षासाठी वापर करण्याचा प्रयत्न केला जातो आणि त्यामुळे त्याची उत्तरे देणे हा  आमचा नाईलाज होतो.

माननीय अध्‍यक्षजी,

तामिळनाडू- शेवटची तुम्हाला 1962 मध्ये म्हणजे सुमारे 60 वर्षांपूर्वी संधी मिळाली.  तेलंगणा बनवण्याचे श्रेय घेता, पण तेलंगणाची निर्मिती होऊनही तेथील जनतेने तुम्हाला स्वीकारले नाही.  झारखंडचा जन्म झाला, 20 वर्षे झाली, काँग्रेसला पूर्णपणे स्वीकारले नाही, मागच्या दाराने प्रवेश करण्याचा प्रयत्न करता.

माननीय अध्‍यक्षजी,

प्रश्न निवडणुकीच्या निकालाचा  नाही.  प्रश्न त्या लोकांच्या भावनांचा, त्यांच्या चांगुलपणाचा आहे.  एवढ्या मोठ्या लोकशाहीत इतकी वर्षे राज्य करूनही देशातील जनता त्यांना कायमचे का नाकारत आहे?  आणि जिथे लोकांनी योग्य मार्ग स्वीकारला आहे तिथे तुम्हाला पुन्हा प्रवेश दिला नाही.  इतकं सारं होऊनही...आम्ही एक निवडणूक हरलो ना, परिसंस्था महिनोंमहिने काय काय करते ठाऊक नाही.  इतके सारे पराभव पत्करूनही तुमचा अहंकार जात नाही आणि तुमची परिसंस्था तुमचा अहंकार जाऊ देत नाही. यावेळी अभिनंदनजी खूप शेर ऐकवत होते..चला मी ही संधी घेतो, मग त्यांना म्हणावे लागेल - वो जब दिन को रात कहें तो तुरंत मान जाओ,

नहीं मानोगे तो दिन में नकाब ओढ़ लेंगे। जरूरत हुई तो हकीकत को थोड़ा-बहुत मरोड़ लेंगे।

मगरूर है खुद की समझ पर बेइन्तिहा, उन्‍हें आईना मत दिखाओ। वो आईने को भी तोड़ देंगे।

आदरणीय अध्‍यक्षजी,

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव, स्वातंत्र्याच्या ७५ वर्षात आज देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहे आणि देश अमृत काळात प्रवेश करत आहे.  या स्वातंत्र्यलढ्यात ज्यांनी योगदान दिले, ते कोणत्या पक्षाचे होते  वा नव्हते… या पलिकडे विचार करत, देशासाठी समर्पण करणारे लोक, आपलं तारुण्य पणाला लावणारे याचं स्मरण तर प्रत्येकाने करायला हवं. त्यांच्या स्वप्नांचे स्मरण करून काही संकल्प करण्याची ही वेळ आहे.

आदरणीय अध्‍यक्षजी,

आपण सर्व  लोकशाहीसाठी संस्कृतीने, स्वभावाने, व्यवस्थेने वचनबद्ध आहोत. आणि आजपासून नव्हे तर शतकानुशतके.  पण हे ही खरं आहे की टीका हा जीवंत लोकशाहीचा अलंकार असला तरी अंधविरोध, हा लोकशाहीचा अपमान आहे.  सत्ता प्रयत्न, या भावनेने भारताने जे काही साध्य केले आहेे, चांगले झाले असते, ते खुल्या मनाने स्वीकारले असते, त्याचे स्वागत केले असते.  त्याचं कौतुक केलं असतं.

गेल्या दोन वर्षांत संपूर्ण जगातील मानव शंभर वर्षांतील सर्वात मोठ्या जागतिक महामारीच्या संकटाचा सामना करत आहेत.  ज्यांनी भारताच्या भूतकाळाच्या आधारे भारताला समजून घेण्याचा प्रयत्न केला, त्यांना शंका होती की एवढा मोठा देश, एवढी मोठी लोकसंख्या, एवढी विविधता, या सवयी, हा स्वभाव... कदाचित हा भारत एवढा मोठा लढा देऊ शकणार नाही.   भारत स्वतःला वाचवू शकणार नाही... ही त्यांची विचारसरणी होती.  पण आज काय परिस्थिती आहे... मेड इंडिया कोव्हॅक्सीन, कोविड लस जगात सर्वात प्रभावी आहेत.  आज भारत 100 टक्के पहिल्या लसमात्रेचे उद्दिष्ट जवळजवळ गाठत आहे.  आणि दुसऱ्या लसमात्रेचे प्रमाण सुमारे 80 टक्के - त्याचा टप्पाही पूर्ण झाला आहे.

माननीय अध्‍यक्षजी,

कोरोना एक वैश्विक महामारी होती, परंतु त्याचाही पक्षीय राजकारणासाठी वापर केला जात आहे. काय हे मानवतेसाठी चांगलं आहे?

माननीय अध्‍यक्ष ,

या  कोरोना काळात काँग्रेसने तर हद्दच केली.

माननीय अध्‍यक्ष ,

पहिल्या लाटेदरम्यान देश जेव्हा लॉकडाऊनचे पालन करत होता,  जेव्हा जागतिक आरोग्य संघटनेने जगभरातल्या लोकांना सल्ला दिला होता , सर्व आरोग्य तज्ञ सांगत होते जे जिथे आहेत ,  तिथेच त्यांनी थांबावं , संपूर्ण जगात हा संदेश दिला जात होता , कारण माणूस जिथे जाईल  आणि  जर तो कोरोना  संक्रमित असेल तर कोरोनाला  बरोबर घेऊन जाईल . तेव्हा काँग्रेसच्या लोकांनी काय केले,  मुंबईच्या रेल्वे स्थानकावर उभे राहून , मजुरांना मुंबई सोडून जाण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी तिकिटे  देण्यात आली , मोफत तिकिटे देण्यात आली . लोकांना जाण्यासाठी प्रेरित केलं गेलं , जा, महाराष्ट्रात आमच्यावर जो भार आहे तो जरा कमी होउदे,  तुम्ही उत्तर प्रदेशचे  आहात , तुम्ही बिहारचे आहात . जा , तिथे कोरोना पसरवा . तुम्ही हे खूप मोठे पाप केले आहे . खूप मोठे अफरातफरीचे वातावरण निर्माण केले.  तुम्ही  आमच्या मजूर बंधू-भगिनींना अनेक संकटांमध्ये ढकलून दिलंत.

माननीय अध्‍यक्ष ,

त्यावेळी  दिल्‍लीमध्ये असे सरकार होते, जे आहे.  त्या सरकारने तर जीपवर माईक बांधून  दिल्‍लीच्या झोपडपट्यांमध्ये गाडी फिरवून लोकांना सांगितले,  संकट मोठे आहे, पळा, गावी जा, घरी जा. आणि दिल्‍लीहून जाण्यासाठी बस उपलब्ध करून दिल्या, ...अर्ध्या रस्त्यात सोडून दिले आणि सगळ्या लोकांसाठी अनेक अडचणी निर्माण केल्या. आणि त्याचा परिणाम असा झाला की उत्तर प्रदेशात , उत्‍तराखंड,, पंजाब  इथे  कोरोनाचा संसर्ग इतका नव्हता , या पापामुळे कोरोना तिथेही पसरला.

माननीय अध्‍यक्ष ,

हे कसले राजकारण आहे ? मानवजातीवर संकट आले असताना हे कसले राजकारण केले जात आहे ?  हे पक्षीय राजकारण किती काळ चालेल?

आदरणीय अध्‍यक्ष  महोदय,

काँग्रेसच्या या वर्तनामुळे केवळ मीच नाही तर संपूर्ण देश अचंबित आहे. गेली दोन वर्षे देश शंभर वर्षातील सर्वात मोठ्या संकटाचा सामना करत आहेत . काही लोक तर ज्याप्रकारे  वागले, ज्यामुळे देश विचारात पडला आहे. हा देश तुमचा नाही का? या देशातील लोक तुमचे नाहीत का?  त्यांची सुख-दुःखे तुमची नाहीत का?  एवढे मोठे  संकट आले, अनेक राजकीय पक्षांच्या नेत्यांनो,  जरा तुम्ही  निरीक्षण करा, किती राजकीय पक्षाच्या नेत्यांनी , जे स्वतःला जनतेचे नेते मानतात , त्यांनी लोकांना विनंती केली आहे, आवाहन केले आहे , ..., कोरोनाचे असे एक संकट आहे, जागतिक महामारी आहे, ...तुम्ही  मास्‍क वापरा  , सतत हात धुवत रहा, सहा फुटांचे अंतर राखा. किती नेते आहेत  ..हे वारंवार देशातील जनतेला जर सांगितले असते, तर त्याचा भाजपा सरकारला काय फायदा झाला असता. मोदींना काय फायदा होणार होता. मात्र एवढ्या मोठ्या संकटातही एवढेसे पवित्र काम देखील केले नाही.

माननीय अध्‍यक्ष महोदय ,

काहो लोक असे आहेत, ज्यांना त्यांना प्रतीक्षा होती की कोरोना विषाणू ची प्रतिमा पुसून टाकेल. खूप वाट पाहिली , आणि कोरोनाने देखील तुमच्या धैर्याची मोठी परीक्षा घेतली. दररोज तुम्ही लोक इतरांचा अपमान करण्यासाठी  महात्‍मा गांधींचे नाव घेतात. महात्‍मा गांधींचा स्‍वदेशीचा नारा पुन्हा पुन्हा सांगण्यापासून आपल्याला कोण रोखत आहे. जर मोदी 'वोकल फॉर लोकल' म्हणत असतील, मोदी म्हणाले म्हणून हे शब्द विसरून जा . मात्र देश स्वयंपूर्ण व्हावा असे तुम्हाला वाटत नाही का?  महात्‍मा गांधींच्या आदर्शांबद्दल बोलले जाते, भारतात या  अभियानाला बळ देण्यासाठी, त्यात सहभागी होण्यात तुमचे काय जाते? त्याचे नेतृत्व तुम्ही करा. महात्‍मा गांधीजींच्या   स्‍वदेशी  निर्णयाला चालना द्या, देशाचे भले होईल. आणि असेही असू शकते की महात्मा गांधीजींची स्वप्ने प्रत्यक्षात साकार होताना पहायची तुमची इच्छा नसेल   आज संपूर्ण जग योगसाधनेसाठी भारताकडे पाहत आहे, एक प्रकारे कोरोना काळात तर योगाभ्यासाने जगभरात स्थान मिळवले आहे.  जगभरात कुठला भारतीय असेल,ज्याला योगसाधनेचा अभिमान वाटत नसेल? तुम्ही त्याचीही थट्टा केली, त्याचाही विरोध केलात . जर तुम्ही लोकांना सांगितले असते, की संकट काळात घरी आहात , योगसाधना करा.  तुम्हाला फायदा होईल तर बरे झाले असते .. ..काय नुकसान झाले असते . 'फिट इंडिया चळवळ  यशस्वी व्हावी, देशातील युवक सशक्त होवो,  सामर्थ्‍यवान होवो , तुमचा मोदींना विरोध असू  शकतो ..'फिट इंडिया चळवळ ' तुमचे राजकीय पक्षांचे  छोटे-छोटे मंच असतात. जर आपण सर्वांनी मिळून  'फिट इंडिया'  द्वारा देशाच्या युवा शक्तीला या सामर्थ्याच्या दिशेने पुढे जाण्यासाठी आवाहन केले असते , मात्र त्याचाही विरोध, त्याचीही थट्टा उडवली गेली.तुम्हाला काय झाले आहे ,मला कळत नाही आहे आणि म्हणूनच मी  आज हे सांगत आहे की तुमच्या लक्षात यावे की तुम्ही नक्की कुठे उभे आहात. आणि मी  इतिहास सांगितला .  60 वर्षापासून  15 वर्षांपर्यंतचा संपूर्ण कालखंड , एवढी राज्ये, कुणीही तुम्हाला घुसू देत नाही.

माननीय अध्‍यक्ष महोदय ,

कधी-कधी मी …हे अतिशय प्रेमाने सांगत आहे , नाराज होऊ नका.  माननीय अध्‍यक्ष महोदय, कधी कधी माझ्या मनात एक विचार येतो ,त्यांच्या वक्तव्यातून, त्यांच्या कार्यक्रमांमधून, त्यांच्या कृत्यातून ... ज्याप्रकारे तुम्ही बोलत आहात, ज्या प्रकारे मुद्दे मांडत आहात , असे वाटते की तुम्ही मनात हे ठरवून टाकले आहे की शंभर वर्षे सत्तेत यायचे नाही. असे करू नका हो, थोडी तरी आशा असती, थोडे तरी वाटले असते की , देशातली जनता पुन्हा हारतुरे घालेल , तर असे नका करू. आणि म्हणूनच ...आता तुम्हीच ठरवले आहे  100 वर्षांसाठी, तर मग मी देखील ठरवले.

माननीय अध्‍यक्ष महोदय ,

हे सभागृह या गोष्टीचे साक्षीदार आहेत की  कोरोना वैश्चिक महामारीमुळे जी स्थिती उत्पन्न  झाली, तिचा सामना करण्यासाठी भारताने जी काही रणनीती आखली , त्यासंदर्भात पहिल्या दिवसापासून काय बोलले गेले नाही. कुणी काय बोलले , आज ते स्वतः पाहतील तर हैराण होतील, असे कसे वदवून घेतले, कुणी वदवून घेतले.  माहित नाही , आपण काय बोलून गेलो.   जगातील अन्य लोकांबरोबर  मोठमोठ्या परिषदा घेऊन अशा गोष्टी बोलल्या गेल्या जेणेकरून संपूर्ण जगात भारताची बदनामी होईल. स्वतःचा टिकाव कायम राहावा यासाठी , आर्थिक आयोजन , भारत कसा चालला आहे ,काय- काय बोलले गेले. मोठमोठ्या पंडितांनी पाहिले होते, तुमची सगळी यंत्रणा कामाला लागली होती. आम्ही जे काही समजत होतो, देवाने जी काही समज दिली होती , मात्र समज पेक्षा समर्पण अधिक मोठे होते.  आणि जिथे समज पेक्षा  समर्पण अधिक असते, तिथे  देश आणि जगाला  अर्पण करण्याची ताकद देखील असते.  आणि ते आम्ही करून दाखवले आहे. आणि ज्या मार्गावरून आम्ही चाललो , आज जगातील अर्थ क्षेत्रातील सर्व विद्वान मंडळी ही गोष्ट मान्य करतात की भारताने जी आर्थिक धोरणे राबवून या  कोरोना कालखंडात स्वतःला पुढे नेले ते अनुकरणीय आहे. आणि आम्ही ते अनुभवतो देखील आहोत , आम्ही ते पाहिले आहे.

माननीय अध्‍यक्ष महोदय ,

भारत आज जगातील ज्या प्रमुख अर्थव्यवस्था आहेत, त्यामध्ये सर्वात वेगाने विकसित होत असलेली मोठी  अर्थव्‍यवस्‍था आहे.

या कोरोना कालखंडातही आपल्या शेतकऱ्यांनी विक्रमी उत्पादन घेतले ,  सरकारने विक्रमी खरेदी केली. जगातील अनेक देशांमध्ये जिथे उपासमारीचे संकट निर्माण झाले होते, आणि तुम्हाला माहीतच असेल, शंभर वर्षांपूर्वी जे संकट आले होते , त्याचा जो अहवाल आहे, त्यात म्हटले आहे की रोगामुळे मृत्यू पावलेल्यांची जितकी संख्या आहे , तेवढीच उपासमारीने मृत्यू पावलेल्यांची देखील मोठी संख्या आहे. त्यावेळच्या शंभर वर्षांपूर्वीच्या अहवालात म्हटले आहे. या देशाने कुणाचाही भुकेमुळे बळी जाऊ दिला नाही.  80 कोटींहून अधिक देशवासियाना मोफत अन्नधान्य  उपलब्‍ध करून दिले आणि आजही करत आहेत.

माननीय अध्‍यक्ष महोदय ,

आपली एकूण निर्यात ऐतिहासिक उच्चांकी स्तरावर आहे. आणि हे कोरोना काळात आहे. कृषी निर्यात  ऐतिहासिक सर्वोच्च स्तरावर पोहचली आहे. सॉफ्टवेअर निर्यात नव्या उंचीकडे मार्गक्रमण करत आहे. मोबाईल फोन निर्यातीने देखील  अभूतपूर्व वाढ नोंदवली आहे. संरक्षण सामुग्री निर्यात वाढत आहे , अनेकांना याचा त्रास होत आहे. ही   आत्मनिर्भर भारताची कमाल आहे की आज देश संरक्षण उत्पादन संबंधित निर्यातीच्या बाबतीतही आपली ओळख निर्माण करत आहे. एफडीआय आणि एफडीआय …

माननीय अध्यक्ष महोदय,

सभागृहात थोडी फार नोकझोक तर आवश्यक असतेच, थोडे गरम वातावरण होते. मात्र जेव्हा मर्यादेच्या बाहेर जाते तेव्हा वाटते की आपले सहकारी असे आहेत?

माननीय अध्यक्ष महोदय,

यांच्या पक्षाच्या एका खासदाराने चर्चेला प्रारंभ केला होता आणि इथे थोडीफार नोक-झोंक सुरु होती. आणि मी माझ्या खोलीत टीव्हीच्या पडद्यावर पाहत होतो की आमचे मंत्री त्यांच्या मागे गेले , सर्वांना थांबवले  आणि तेव्हा  तिथून आव्हान दिले गेले  की आम्ही सगळे  एकत्र आले तर तुमच्या नेत्याची अशी अवस्था करू. यामुळेच हे होत आहे का ?

माननीय अध्यक्ष महोदय ,

तुम्हा सर्वांना आता आपला  CR सुधारण्याचा प्रयत्न करायला हवा. आता मला वाटते की जेवढे केले आहे  त्यामुळे तुमचा CR ठीक झाला आहे. ज्या लोकांना नोंद करायची आहे , त्यांनी तुमच्या या पराक्रमाची नोंद केली आहे , आणखी का करता? या अधिवेशनातून कुणीही तुम्हाला बाहेर काढणार नाही,   विश्वास ठेवा ? अधिवेशनाच्या या सत्रातून तुम्हाला कुणी बडतर्फ करणार नाही, याची मी हमी देतो. या ठिकाणाहून तरतुम्ही  असेच वाचला आहात .

माननीय अध्यक्ष महोदय ,

विक्रमी अशी  FDI अर्थात  थेट परकीय गुंतवणूक  आज भारतात होत आहे. नवीकरणीय ऊर्जा क्षेत्रात  आज भारत जगातील अव्वल पाच देशांपैकी एक आहे.

माननीय अध्यक्ष महोदय,

हे सगळे शक्य झाले, कारण कोरोना काळात इतके मोठे संकट असूनही, आपली कर्तव्ये पार पाडत असताना, या संकटाच्या काळात देश वाचवायचा तर सुधारणा गरजेच्या होत्या. आणि आम्ही ज्या सुधारणा केल्या, त्यामुळेच आज आपण अशा प्रकारे, या स्थितीत येऊन पोहोचलो आहोत.

माननीय अध्यक्ष महोदय,

सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योगांसहीत, सर्व उद्योगांना हवी असलेली मदत दिली. नियम आणि प्रक्रिया सुलभ केल्या. आत्मनिर्भर भारताचा जो संकल्प आहे, तो प्रत्यक्षात उतरविण्यासाठी पूर्ण प्रयत्न केले. या सगळ्या उपलब्धी अशा परिस्थितीत मिळविल्या आहेत जेव्हा आंतरराष्ट्रीय स्तरावर, आर्थिक जगात फार मोठी उलथापालथ आज देखील होत आहे. पुरवठा साखळ्या पूर्णपणे कोलमडून पडल्या आहेत. लॉजिस्टिक मदतीवर संकट आले आहे. पुरवठा साखळ्या कोलमडून पडल्याने रासायनिक खतांवर फार मोठे संकट आले आहे आणि भारत आयातीवर अवलंबून आहे. देशावर कितीतरी मोठा आर्थिक ताण आला आहे. संपूर्ण जगात ही परिस्थिती निर्माण झाली असूनही भारताने शेतकऱ्यांवर या संकटाची सावली पडू दिली नाही. सगळा भार देशाने आपल्या खांद्यांवर घेतला आणि शेतकऱ्यांपर्यंत पोहोचू दिला नाही. भारतात खतांचा पुरवठा देखील अखंड सुरु ठेवला आहे. कोरानाच्या संकटकाळात भारताने आपल्या शेतीला, छोट्या शेतकऱ्यांना संकटातून बाहेर काढण्यासाठी मोठे निर्णय घेतले. मी कधी कधी विचार करतो, जे लोक आपल्या मुळांपासून तुटलेले आहेत, दोन - दोन, चार - चार पिढ्यांपासून महालांत बसण्याची सवय झाली आहे, त्यांना देशातल्या छोट्या शेतकऱ्यांच्या समस्या काय आहेत, हे समजू शकलेले नाही. त्यांच्या आजूबाजूला असलेले जितके शेतकरी त्यांच्यापर्यंत पोहोचू शकत होते, त्यांच्या पलीकडे ते बघू शकलेले नाहीत. आणि कधीतरी अशा लोकांना विचारू इच्छितो, की छोट्या शेतकऱ्यांविषयी तुम्हाला इतका द्वेष का आहे? छोट्या शेतकऱ्यांच्या कल्याणात तुम्ही अडथळे का आणत होतात? छोट्या शेतकऱ्यांना संकटात का टाकता? 

माननीय अध्यक्ष महोदय,

गरिबीपासून सुटका हवी असेल तर आपल्याला आपल्या छोट्या शेतकऱ्यांना सक्षम करावे लागेल. ग्रामीण अर्थव्यवस्थेला सशक्त करायचे असेल तर आपल्या छोट्या शेतकऱ्यांना सक्षम करावे लागेल. जर आपला छोटा शेतकरी सशक्त झाला, छोटासा जमिनीचा तुकडा असेल, दोन हेक्टर जमीन असेल तरी देखील आधुनिक करण्याचा तो प्रयत्न करेल, नवे शिकण्याचा प्रयत्न करेल आणि त्याला पाठबळ मिळाले तर देशाच्या अर्थरचनेला देखील शक्ती मिळेल. आणि म्हणूनच आधुनिकतेसाठी छोट्या शेतकऱ्यांवर लक्ष देण्याचा माझा प्रयत्न आहे. मात्र, ज्यांच्या मनात छोट्या शेतकऱ्यांविषयी द्वेष आहे, ज्यांनी छोट्या शेतकऱ्यांचे दुःख समजून घेतले नाही, त्यांना शेतकऱ्यांच्या नावावर राजकारण करण्याचा कुठलाच अधिकार नाही.

माननीय अध्यक्ष महोदय,

आपल्याला हे समजून घ्यावे लागेल सुमारे 100 वर्षांच्या पारतंत्र्याच्या काळात जी मानसिकता होती, ती स्वातंत्र्याच्या 75 वर्षांनंतर देखील काही लोक बदलू शकेले नाहीत. ही गुलामीची मानसिकता कुठल्याही राष्ट्राच्या प्रगतीत एक फार मोठं संकट असते.

मात्र माननीय अध्यक्ष महोदय,

आज देशात मला एक चित्र दिसत आहे. एक असा वर्ग, एक असा समुदाय आहे आज देखील गुलामीच्या त्या मानसिकतेत जगत आहे. आजही 19 व्या शतकातली कामे, तो विचार, त्यात अडकून पडला आहे आणि 20 व्या  शतकातले जे कायदे आहेत तेच त्यांना कायदे वाटतात.

माननीय अध्यक्ष महोदय,

गुलामीची मानसिकता, या 19 व्या शतकातील राहणीमान, 20 व्या शतकातील कायदे, 21 व्या शतकातील आकांक्षा पूर्ण करू शकत नाहीत. 21 व्या शतकानुसार आपल्याला बदलणे अत्यंत गरजेचे आहे.

माननीय अध्यक्ष महोदय,

जे बदल स्वीकारायला आपण नकार दिला त्यातून आपण काय मिळवले?  इतकी वर्षे मालवाहतूक मार्गिका प्रकल्प  अडकून पडला होता, अनेक वर्षे, त्यानंतर ती योजना बनली. 2006 मध्ये योजना तयार झाली, 2006 ते 2014 पर्यंत त्याचे काय झाले ते बघा. 2014 नंतर त्याला गती मिळाली. उत्तर प्रदेशात सहारनपुर प्रकल्प, 70 च्या दशकात सुरु झाला आणि त्याचा खर्च 100 पट वाढला. आम्ही आल्यानंतर आम्ही ते काम पूर्ण केले. ही कुठली विचारसरणी आहे? उत्तर प्रदेशातील अर्जुन धरण प्रकल्प 2009 मध्ये सुरु झाला. 2017 पर्यंत एक तृतीयांश खर्च झाला. आम्ही इतक्या कमी वेळात तो प्रकल्प पूर्ण केला. जर काँग्रेसकडे इतकी सत्ता होती, इतकी वर्षे सत्ता होती तर, चार धामसाठी बारमाही रस्ते बांधू शकली असती, पण नाही केले. जलमार्ग, संपूर्ण जगाने जलमार्गांचे महत्व ओळखले आहे. आपलाच देश होता की आम्ही जलमार्गांना नकार दिला. आज आमचे सरकार जलमार्गांवर काम करत आहे. जुन्या दृष्टिकोनामुळे गोरखपूरचा कारखाना बंद पडला होता, आमच्या दृष्टिकोनामुळे गोरखपूरचा खत कारखाना सुरु झाला आहे.

माननीय अध्यक्ष महोदय,

हे लोक असे आहेत जे जमिनीपासून तुटले आहेत, ज्यामुळे त्यांच्यासाठी फायलींचे व्यवहारच अजून महत्वाचे आहेत. फायलींवर सह्या केल्या, कोण आहे, भेटायला येईल का याचीच वाट बघत असतात. तुमच्यासाठी फाईल सर्वकाही आहे, आमच्यासाठी 130 कोटी देशवासियांचे लाईफ महत्वाचे आहे. तुम्ही फायलींत अडकून राहिले, आम्ही पूर्ण शक्ती एकवटून लाईफ बदलण्याचा प्रयत्न करत आहोत. आज त्यामुळेच पंतप्रधान गती शक्ती बृहद आराखडा एक सर्वसमावेशक दृष्टीकोनातून अमलात आणला जात आहे, तुकड्यातुकड्यांत नाही, एक अर्धवट काम कुठेतरी सुरु आहे, रस्ता बनतो आहे मग वीज विभागाचे लोक येऊन खोदायला सुरवात करतात. ते ठीक झाले की पाणीपुरवठा विभागाचे लोक येऊन खोदायला सुरवात करतात. या सगळ्या समस्यांवर मात करून आम्ही जिल्हा स्तरापर्यंत गती शक्ती बृहद आराखड्याच्या दिशेने काम करत आहोत. त्याच प्रकारे, आपल्या देशाचे वैशिष्ट्य लक्षात घेता, बहु आयामी वाहतूक व्यवस्था, आम्ही त्यावर खूप भर देत आहोत आणि याद्वारे संपर्क व्यवस्था जोडण्यावर आम्ही भर देत आहोत. स्वातंत्र्यानंतर सर्वात जास्त वेगाने ग्रामीण भागात कुठे रस्ते बनले असतील तर ते या पाच वर्षाच्या कालखंडात बनले आहेत.

माननीय अध्यक्ष महोदय,

राष्ट्रीय महामार्ग बनत आहेत. रेल्वे मार्गांचे विद्युतीकरण होत आहे. आज देश नवी विमानतळे, हेलीपोर्ट आणि जल ड्रोनचे जाळे उभे करत आहे. देशाच्या 6 लाखांहून जास्त गावांत ऑप्टीकल फायबर नेटवर्कचे काम सुरु आहे.

माननीय अध्येक्ष महोदय,

ही सर्व कामे अशी आहेत, जी रोजगार देतात. जास्तीत जास्त रोजगार याच कामांतून मिळतो. आधुनिक पायाभूत सुविधा आज देशाची गरज आहेत आणि त्यात अभूतपूर्व गुंतवणूक देखील होत आहे आणि त्यातूनच रोजगार निर्मिती होत आहे, विकास देखील होत आहे आणि विकासाचा वेग देखील वाढतो आहे. आणि म्हणूनच आज देश त्या दिशेने काम करत आहे.

माननीय अध्येक्ष महोदय,

अर्थव्यवस्था जितकी जास्त वाढेल, तितक्या जास्त रोजगाराच्या संधी निर्माण होतील. आणि याच ध्येयासाठी गेल्या सात वर्षांत आम्ही या गोष्टींवर लक्ष केंद्रित केले आहे. आणि त्याचा परिणाम आहे आपले आत्मनिर्भर भारत अभियान. उत्पादन असो किवा सेवा क्षेत्र, प्रत्येक क्षेत्रात आपले उत्पादन वाढत आहे, आपले उत्पन्न वाढत आहे. आत्मनिर्भर भारत अभियानाद्वारे आज आपण जागतिक पुरवठा साखळीचा हिस्सा बनत आहोत. भारतासाठी हे एक सुचिन्ह आहे. आमचे खास लक्ष सूक्ष्म लघु मध्यम उद्योग आणि वस्त्रोद्योग या सारख्या कामगार क्षेत्रावर आहे. सूक्ष्म लघु मध्यम उद्योगच्या मोठ्या व्यवस्थेत सुधारणा, सूक्ष्म लघु मध्यम उद्योगाच्या व्याख्येत सुधारणा करून आम्ही त्यांना देखील नव्या संधी उपलब्ध करून दिल्या आहेत. आपल्या लहान उद्योगांना संरक्षण देण्यासाठी सूक्ष्म लघु मध्यम उद्योगांसाठी सरकारने या कोरोनाच्या कठीण काळात तीन लाख कोटी रुपयांची विशेष योजना देखील सुरु केली आहे आणि त्याचा लाभ आपल्या सूक्ष्म लघु मध्यम उद्योग क्षेत्राला मिळाला आहे. आणि याचा अतिशय उत्तम अभ्यास एसबीआयने केला आहे. एसबीआयच्या अभ्यासानुसार साडे तेरा लाख सूक्ष्म लघु मध्यम उद्योग या योजनेमुळे देशोधडीला लागण्यापासून वाचले आहेत आणि एसबीआयचा अभ्यास सांगतो की, दीड कोटी नोकऱ्या वाचल्या आहेत आणि जवळजवळ 14 टक्के सूक्ष्म लघु मध्यम उद्योग कर्जामुळे अनुत्पादक मालमत्ता होण्याची शक्यता होती, त्यापासून वाचले आहेत.

माननीय अध्यक्ष महोदय,

जे सदस्य जमिनीवर जातात, लोकांना भेटतात, त्यांना याचा परिणाम दिसू शकतो. विरोधी पक्षातले अनेक सहकारी मला भेटतात तेव्हा म्हणतात की, साहेब या योजनेचा खूप मोठा फायदा मिळाला आहे. सूक्ष्म लघु मध्यम उद्योगाला संकटाच्या या काळात मोठा आधार दिला आहे.

माननीय अध्यक्ष महोदय,

त्याच प्रकारे, मुद्रा योजना किती यशस्वी झाली आहे, आपल्या कितीतरी माता - भगिनी या क्षेत्रात आल्या आहेत. लाखो लोक विनातारण कर्ज घेऊन आज स्वतःच्या रोजगाराच्या दिशेने पुढे गेले आहेत आणि स्वतः तर करतातच, एक - दोन लोकांना नोकरी देखील देतात. स्वनिधी योजना, रस्त्यावरचे फेरीवाले आपण कधी विचार केला नाही, स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा रस्त्यावरच्या फेरीवाल्यांना बँकेतून कर्ज मिळत आहे आणि आज रस्त्यावरचे फेरीवाले डिजिटल व्यवहार करत आहेत आणि कोट्यवधी कामगारांना लाभ मिळत आहे. आम्ही गरीब कामगारांसाठी दोन लाख कोटी रुपयांहून जास्त खर्च केला आहे. आत्मनिर्भर भारत योजनेत हजारो लाभार्थ्यांच्या खात्यात थेट पैसे जमा केले आहेत.

माननीय अध्यक्ष महोदय,

उद्योगांना गती देण्यासाठी उत्तम पायाभूत सुविधांची नितांत गरज असते. पंतप्रधान गती शक्ती बृहद आराखडा आपला लॉजिस्टिक खर्च खूप कमी करेल. आणि यामुळे देशात देखील कमी खर्चात माल वाहतूक होईल आणि निर्यातदार जगाशी स्पर्धा करू शकतील. आणि यासाठीच पंतप्रधान गती शक्ती योजना येणाऱ्या दिवसांत खूप फायदेशीर ठरणार आहे.

माननीय अध्यक्ष महोदय,

या सरकारने आणखी एक मोठे काम केले आहे आणि नव्या क्षेत्रांसाठी, उद्योजकांसाठी आम्ही ही सुविधा खुली करून दिली आहे. ही सुविधा म्हणजे आत्मनिर्भर भारत योजनेअंतर्गत देशाच्या अंतराळ, संरक्षण, ड्रोन्स, खनिकर्म या क्षेत्रांमध्ये विकास घडवून आणण्यात सहभागी होण्यासाठी आम्ही खासगी क्षेत्राला आमंत्रित केले आहे. देशातील उद्योजकांसाठी अधिक उत्तम वातावरण निर्माण करण्यासाठी अत्यंत सोप्या कर रचनेची सुरुवात आम्ही केली. कोणत्याही गोष्टीच्या परवानगीसाठी हजारो नियम लावले जात, या विभागातून हा दाखला आणा, त्या कार्यालयातून तो कागद आणा अश्या कितीतरी अटी पूर्ण कराव्या लागत, अशा प्रकारच्या सुमारे 25 हजार अनिवार्य परवानग्या आम्ही रद्द केल्या आहेत. मी तर आज राज्य सरकारांना देखील आग्रह करू इच्छितो की त्यांनी अशा कालबाह्य नियम आणि परवानग्या शोधून काढून त्या रद्द कराव्यात. कारण या सर्व परवानग्या, दाखले मिळविण्यासाठी देशाच्या नागरिकांना जो त्रास सहन करावा लागतो तो देखील तुम्ही समजून घेतला पाहिजे. देशात आज अनेक बाबतीत असलेले असे अडथळे काढून टाकले जात आहेत. देशांतर्गत उद्योगांना एक विशिष्ट पातळीवर आणण्यासाठी आम्ही एकामागून एक नवी पावले उचलत आहोत.

माननीय अध्यक्ष महोदय,

आपल्या देशात बऱ्याच काळापासून सर्वांची अशी मनोधारणा झालेली होती की सरकारच देशातील जनतेसाठी भाग्यविधाता आहे, आपल्याला सर्व गोष्टींसाठी सरकारवरच अवलंबून राहावे लागेल, इतर कोणीही आपल्या आशा आकांक्षा पूर्ण करू शकत नाही, आपले जे काही भले करेल ते सरकारच करेल. लोकांमध्ये हा समज अगदी पक्का बसलेला होता. आपल्या मनात आपण हा जो वृथा अभिमान बाळगला होता त्यामुळे देशाच्या सामर्थ्याची देखील हानी झाली आहे. आणि म्हणूनच, सर्वसामान्य युवा वर्ग, त्यांच्याकडील कौशल्ये, त्यांचे विकासाचे मार्ग याबद्दल आम्ही नव्याने विचार करायला सुरुवात केली. सगळ्याच गोष्टी सरकार करेल असे नसते. देशवासीयांची ताकद त्याहून कितीतरी पटीने अधिक असते. संपूर्ण सामर्थ्यानिशी जेव्हा देशवासीय संकटाला सामोरे जातात तेव्हा त्यातून फार उत्तम परिणाम साधता येतो. तुम्हीच लक्षात घ्या की 2014 पूर्वी आपल्या देशात फक्त 500 स्टार्ट अप्स होते. पण जेव्हा देशातील तरुणांना संधी दिली जाते तेव्हा त्यातून कशा प्रकारचे कार्य उभे राहते हे आपण पाहू शकतो, गेल्या सात वर्षांतील प्रगतीमुळे सध्या देशात 7000 स्टार्ट अप्स कार्यरत आहेत.  ही माझ्या देशातील युवकांची ताकद आहे. आणि यातून अनेक युनिकॉर्न देखील निर्माण होत आहेत. आणि यातील प्रत्येक युनिकॉर्न म्हणजे कित्येक हजार कोटी रुपये किमतीचा उद्योग होय.

माननीय अध्यक्ष महोदय,

अगदी कमी कालावधीतच भारतातील युनिकॉर्नची संख्या शतकाकडे वाटचाल करत आहे ही फार मोठी गोष्ट आहे. पूर्वीच्या काळी, हजारो कोटींची कंपनी उभारण्यासाठी अनेक दशकांचा वेळ खर्च होत असे. मात्र आजच्या काळात, आपल्या युवा वर्गाचे सामर्थ्य आणि सरकारच्या धोरणांमुळे एक दोन वर्षांतच हे तरुण हजारो कोटींचा व्यवसाय करताना दिसू लागत आहेत.

आणि माननीय अध्यक्ष जी,

आपण स्टार्ट अप्स युनिकॉर्नच्या बाबतीत जगातील पहिल्या तीन सर्वोत्तम देशांमध्ये स्थान पटकाविले आहे. असा कोण भारतीय असेल ज्याला या गोष्टीचा अभिमान वाटणार नाही? मात्र अशा वेळी सरकारचा अंतर्विरोध करण्याची सवय काही लोकांना लागली आहे. दिवस सुरु होतानाच मोदी मोदी करायला सुरुवात करतात, आज मी येथे पाहिले ना, आपले आदरणीय सांगत होते की, तुम्ही काय सतत मोदी, मोदी असा जप करत राहता, सकाळपासूनच तुमचा हा जप सुरु होतो. एक क्षणही तुम्ही मोदींशिवाय राहू शकत नाही. खरे सांगायचे तर मोदी तुम्हा सर्वांची प्राणशक्ती आहे.

आणि माननीय अध्यक्ष महोदय,

काही लोकांना या देशातील युवकांना, देशाच्या उद्योजकांना, देशातील सर्वोत्तम सर्जकांना घाबरविण्यात आनंद मिळतो. त्यांना भीती दाखवून हे लोक आनंदी होतात. लोकांच्या मनात पूर्वग्रह निर्माण करण्यात यांना समाधान मिळते. देशातील तरुण वर्ग या प्रकारांकडे दुर्लक्ष करतो आहे म्हणूनच देश प्रगती करत आहे.

माननीय अध्यक्ष जी,

आज देशात जे युनिकॉर्न आहेत त्यांच्यापैकी काहींमध्ये बहुराष्ट्रीय कंपन्या म्हणून स्थापित होण्याची क्षमता आहे. मात्र, काँग्रेस पक्षात असे काही लोक आहेत जे आपल्या या उद्योजकांवर अशी टिप्पणी करतात जी ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल. ते म्हणतात की हे उद्योजक म्हणजे कोरोना विषाणूचे नवे रूप आहेत. तुम्हीच सांगा बरे, हे उद्योजक कोरोना विषाणूचे नवे रूप आहेत?? हे लोक इतकाही विचार करत नाहीत कि आपण काय बोलतोय, कोणासाठी बोलतोय. यांनी जरा स्वतःमध्ये डोकावून पाहिले पाहिजे की आपण हे योग्य करतो आहोत का? यात काँग्रेस पक्षाचे देखील नुकसान होते आहे.

माननीय अध्यक्षजी,

जे लोक इतिहासापासून काही शिकत नाहीत ते इतिहासात विस्मृतीत जातात.

माननीय अध्यक्षजी,

मी हे अशासाठी म्हणतोय की, आपण जरा 60 ते 80 च्या दशकांच्या कालखंडात जे लोक देशाचे नेतृत्व करत होते त्यांचा विचार केला, त्या काळाचा विचार केला तर असे दिसते की, त्यावेळेस फक्त काँग्रेस पक्षच प्रमुख पक्ष म्हणून लोकांसमोर होता. काँग्रेस पक्षाचे सत्तेतील साथीदार काँग्रेस पक्षाच्या साथीने सत्तेचे सुख उपभोगत होते. आणि हेच लोक पंडित नेहरूंच्या सरकारला, इंदिराजींच्या सरकारला टाटा-बिर्लांचे सरकार म्हणत असत. देशाचे सरकार टाटा-बिर्लाच चालवीत आहे अशी टीका करत असत. 60 ते 80 च्या दशकात पंडित नेहरू आणि इंदिराजींबाबत असेच बोलले जात होते. आणि अशी टीका करणाऱ्या लोकांनी त्यांच्यासोबत सत्तेत भागीदारी करता करता त्यांच्या सवयीदेखील स्वीकारल्या. मला दिसत आहे की तुम्ही तुमचा दर्जा किती खालच्या पातळीपर्यंत घसरवून घेतला आहे. मला वाटते की आता पंचिंग बॅग बदलली असली तरी तुमची सवय काही बदललेली नाही. हेच लोक संसद भवनात तर टीका करण्याची हिंमत करतच असत पण सदनाबाहेर देखील टीका सुरु ठेवत जिथे संधी मिळेल तिथे गप्प न बसता ते बोलतच राहत असतील याबद्दल मला विश्वास आहे. आधी ते म्हणाले की मेक इन इंडिया प्रत्यक्षात साकार होऊ शकत नाही, पण आता त्यांना मेक इन इंडिया च्या उपक्रमांमध्ये आनंद मिळतो आहे. आपल्या देशासाठी सुरु केलेला मेक इन इंडिया उपक्रम यशस्वी होऊच शकत नाही असे म्हणत स्वतःच्याच देशासाठी असे विचार कोणी कधी करू शकतात का? अरे बाबांनो, आम्ही येऊन हे करतोय म्हणून तुम्हाला इतका त्रास होतोय तर तसे सांगा ना! देशासाठी अपशब्द का वापरताय? देशाविरुद्ध का बोलताय? म्हणे मेक इन इंडिया यशस्वी होऊच शकत नाही, असे सांगून या उपक्रमाची खिल्ली उडविण्यात आली. पण आज देशातील युवा शक्तीने, उद्योजकांनी हे यश मिळवून दाखविल्यावर आता तुम्ही चेष्टेचा विषय झाला आहात. आणि मेक इन इंडियाला मिळालेल्या यशामुळे तुम्हांला किती त्रास होत आहे याची मला फार चांगलीच जाणीव आहे.

माननीय अध्यक्ष महोदय,

मेक इन इंडिया मुळे काही लोकांना त्रास होतो आहे कारण मेक इन इंडियाचा अर्थ आहे कमिशन मिळण्याचे मार्ग बंद, भ्रष्टाचार करण्याचे रस्ते बंद, मेक इन इंडियाचा अर्थ आहे स्वतःची तिजोरी भरण्याचे मार्ग बंद. आणि म्हणून मेक इन इंडियालाच विरोध करा. या विरोधाचा अर्थ आहे, भारतातील जनतेच्या सामर्थ्याकडे दुर्लक्ष करण्याचे पाप, देशातील लघु उद्योजकांच्या सामर्थ्याचा अपमान, देशातील युवा वर्गाचा अपमान, देशातील नवोन्मेषी संशोधन क्षमतेचा अपमान.

माननीय अध्यक्ष जी,

देशात अशा प्रकारचे नकारात्मक, निराशाजनक वातावरण निर्माण करून ठेवले आहे. हे लोक स्वतः निराश आहेत, यशस्वी होऊ शकत नाहीत. म्हणून देशालाही अयशस्वी असल्याचा कलंक लावण्याचा जो खेळ खेळत आहेत त्याविरुद्ध आता देशातील तरुण वर्ग जागृत झाला आहे.

माननीय अध्यक्ष जी,

याआधी जे लोक सरकार चालवत होते, ज्यांनी 50 वर्षांपर्यंत देशाचा कारभार केला त्यांचा मेक इन इंडिया बाबत काय दृष्टीकोन होता हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. केवळ संरक्षण क्षेत्राचा विचार केला तरी सगळ्या गोष्टी आपल्या लक्षात येतात की हे लोक काय कामे करत होते, कसे करत होते, का करत होते आणि कोणासाठी करत होते हे सर्व स्पष्ट होते. त्यांच्या काळात काय व्हायचे की नव्या साधनांच्या खरदेसाठी एक प्रक्रिया अवलंबिली जायची. अनेक वर्षे ही प्रक्रिया सुरु राहत असे. आणि त्यावर जेव्हा अंतिम निर्णय घेतला जायचा तोपर्यंत ते साधन जुने होऊन गेलेले असायचे, आता तुम्हीच सांगा, कालबाह्य झालेल्या या साधनांच्या खरेदीसाठी आपण पैसे देत होतो, त्यातून देशाचे काय भले होणार? आम्ही ही संपूर्ण प्रक्रिया अधिक सोपी केली. गेली अनेक वर्षे संरक्षण क्षेत्राशी संबंधित ज्या प्रलंबित समस्या होत्या त्या सोडविण्याचा आम्ही प्रयत्न केला. यापूर्वीच्या काळात कोणताही आधुनिक मंच अथवा साधन मिळविण्यासाठी आपल्याला इतर देशांकडे हात पसरवा लागत होता. जेव्हा त्या गोष्टींची गरज भासायची तेव्हा घाईगडबडीत हे आणा, ते घ्या, अशा पद्धतीने खरेदी केली जायची. आपल्याला कोण विचारणार दादा? करून टाकली खरेदी, असा प्रकार चालायचा. अगदी सुट्या भागांसाठी देखील आपण इतर देशांवर अवलंबून होतो. पण, असे दुसऱ्यावर अवलंबून राहून आपण आपल्या देशाच्या संरक्षणाची खात्री बाळगू शकत नाही. यासाठी आपल्याकडे, विशिष्ट व्यवस्था असली पाहिजे, स्वतःची अशी यंत्रणा कार्यान्वित असली पाहिजे. संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भर होणे हे देखील देशसेवेचे एक मोठे कार्य आहे आणि आज मी देशातील तरुणांना आवाहन करतो की तुम्ही व्यावसायिक पेशा म्हणून या क्षेत्राची निवड करा. आपण सर्व मिळून ताकदीने उभे ठाकू.

माननीय अध्यक्ष महोदय,

या वेळच्या अर्थसंकल्पात देखील संरक्षण क्षेत्राशी संबंधित अधिकाधिक उपकरणे भारतातच निर्माण केली जातील, देशासाठी भारतीय कंपन्यांनी तयार केलेली उत्पादनेच खरेदी केली जातील अशी तरतूद आम्ही केली आहे. ही उत्पादने बाहेरच्या देशांतून आयात करण्याचे मार्ग बंद करण्याच्या दिशेने आपण प्रयत्न करत आहोत. आपल्या सेनेची गरज पूर्ण करण्यासोबतच आपला देश संरक्षण विषयक निर्मिती क्षेत्रातील एक मोठा तज्ञ म्हणून स्थापित होण्याचे स्वप्न देखील आपण उराशी बाळगून आहोत. आणि मला असा ठाम विश्वास आहे की आपला हा निर्धार नक्की पूर्ण होणार. मला माहित आहे की, संरक्षणविषयक सौद्यामध्ये कितीतरी मोठमोठ्या शक्ती भल्याभल्यांना विकत घेत असत. या शक्तींना मोदीने आवाहन दिले आहे. आणि म्हणूनच अनेकांना मोदींबद्दल नाराजीच आहे नव्हे तर मोदींचा राग देखील येणे स्वाभाविक आहे. आणि अशा लोकांचा राग वेळोवेळी व्यक्त देखील होत असतो.

माननीय अध्यक्ष महोदय,

विरोधी पक्षातील आमच्या काही सहकाऱ्यांनी सभागृहात महागाईचा मुद्दासुद्धा मांडला. जर आपल्याला ही काळजी जेंव्हा केंद्रात काँग्रेसच्या नेतृत्वाखाली संयुक्त पुरोगामी आघाडीचे सरकार होते तेंव्हा आपल्याला काळजी वाटली असती तर जास्त बरं वाटलं असतं आणि देशाचं भलं झालं असतं. हे दुःख तेंव्हाही जाणवायला हवं होतं. कदाचित आपण विसरला असाल तर मी आपल्याला आठवण करून देऊ इच्छितो. काँग्रेस सरकारच्या शेवटच्या पाच वर्षात जवळपास पूर्ण कालखंडात देशाला दुहेरी आकड्यांच्या महागाई दराला तोंड द्यावे लागत होते. आमच्या येण्याआधी ही परिस्थिती होती. काँग्रेसची धोरणं अशी होती की महागाई आपल्या नियंत्रणाबाहेर आहे असं सरकारला स्वतःलाच वाटत होतं.  2011 मध्ये त्यावेळच्या अर्थमंत्र्यांनी लोकांना बेशरमपणे हे सांगितलं होतं की, महागाई कमी करण्यासाठी अल्लाउद्दीनची जादू कामी येत नाही. आपल्या नेत्यांची असंवेदनशीलता. आपले चिदंबरमजी जे आजकाल वृत्तपत्रात अर्थव्यवस्थेवर लेख लिहितात, सरकारमध्ये होते तेंव्हा काय बोलत होते ? त्यावेळेस आपले नेते काय बोलत होते, 2012 मध्ये हे म्हणाले होते की लोकांना पंधरा रुपयाची पाण्याची बाटली आणि वीस रुपयाचे आईस्क्रीम खरेदी करताना त्रास होत नाही पण गहू- तांदूळा यावर एक रुपया वाढला तर सहन होत नाही. हे आपल्या नेत्यांचे बोलणे म्हणजे महागाई बद्दल किती असंवेदनशील भूमिका होती, ही खरी  चिंतेची बाब आहे.

माननीय अध्यक्ष महोदय,

महागाई हा देशाच्या सामान्य माणसाशी थेट जुळणारा मुद्दा आहे आणि आमच्या सरकारने एनडीए सरकारच्या पहिल्या दिवसापासूनच सतर्क आणि संवेदनाशील राहून ही समस्या बारकाईने सोडवायचा प्रयत्न केला आहे. आणि म्हणूनच आमच्या सरकारने महागाई नियंत्रण हे आपल्या आर्थिक धोरणातील प्राथमिक उद्दिष्ट मानले.

माननीय अध्यक्ष महोदय,

100 वर्षातून एकदा येणाऱ्या अशा या महामारीच्या कालखंडातही आमचा प्रयत्न होता की महागाई तसंच आवश्यक वस्तूंच्या किमती गगनाला भिडू नयेत.

सामान्य माणसांसाठी माननीय अध्यक्ष महोदय, महागाई- आवश्यक वस्तूंच्या किंमती गगनाला भिडू नये सामान्य माणसांसाठी विशेषतः गरिबांसाठी  महागाईने सहनशीलतेच्या सीमा ओलांडून जाऊ नये आणि महागाईला आटोक्यात राखण्यासाठी आम्ही काय केलं ते आकडे स्वतःच कथन करतील. काँग्रेसच्या काळात जिथे महागाई दर दोन अंकी होता, 10 टक्क्यांहून जास्त होता, तिथे 2014 पासून 2020 पर्यंत महागाई पाच टक्क्यांपेक्षा सुद्धा कमी राहिली आहे. कोरोना असूनही महागाई यावर्षी 5.2 टक्के आहे आणि त्यातही अन्न धान्याची महागाई 3 टक्‍क्‍यांहून कमी राहिली आहे. आपण आपल्या काळात जागतिक परिस्थितीचा हवाला देत स्वतःला सोडवून घेत होतात. तसंही महागाईवर काँग्रेसच्या राज्यात पंडित नेहरूजींनी लाल किल्ल्यावरून काय सांगितले ते जरा मला आपल्याला सांगायचे आहे. पंडित नेहरू, देशाचे पहिले पंतप्रधान, लाल किल्ल्यावरून बोलत आहेत. बघा आपण म्हणता ना की मी पंडितजींच नाव घेत नाही. आज मी पुन्हा पुन्हा बोलणार आहे. आज तर नेहरूजीच नेहरूजी. मजा घ्या!आपल्या नेत्यांनाही मजा येईल!

माननीय अध्यक्ष महोदय,

पंडित नेहरूंनी लाल किल्ल्यावरून म्हटले होते, आणि त्या काळात म्हटले होते जेंव्हा जागतिकीकरण नव्हते, अगदी थोडेही नव्हते त्यावेळी नेहरू जी लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करताना काय म्हणतात, कधी कधी कोरियात सुरू असलेली लढाई सुद्धा आपल्यावर परिणाम करते त्यामुळे वस्तूंच्या किमती वाढतात. हे होते नेहरूजी भारताचे पहिले प्रधानमंत्री. कधीकधी कोरियातील लढाईसुद्धा आपल्यावर परिणाम करते त्यामुळे वस्तूंच्या किंमती वाढत जातात आणि आपल्या नियंत्रणाबाहेर जातात. देशासमोर देशाचा पहिला पंतप्रधान हात वर करतो, आणि पुढे काय म्हणतात बघा आपल्याला उपयोगी पडेल. पुढे म्हणतात, पंडित नेहरू पुढे म्हणतात, जेंव्हा अमेरिकेत काहीही होते तेंव्हा त्याचा परिणाम वस्तूंच्या किंमतीवर होतो. बघा, तेंव्हा महागाईची समस्या किती गंभीर होती की लाल किल्ल्यावरून हात वर करावे लागले होते. नेहरूंजींनी तेंव्हा हे सांगितले होते. ‌

माननीय अध्यक्ष महोदय,

जर काँग्रेस सरकार आज सत्तेत असती तर आज देशाचं नशीबच की देश वाचला जर आपण आज असतात तर महागाई कोरोनाच्या खात्यावर मांडून झटकून निघून गेला असतात. परंतु आम्ही मोठ्या संवेदनशीलतेने या समस्येचं महत्व जाणून त्याच्या सोडवणुकीसाठी पूर्ण ताकदीनिशी काम करत आहोत. आज जगात अमेरिका आणि आर्थिक सहकार्य विकास संस्थेच्या (OECD) सदस्य देशांमध्ये सात टक्के महागाई आहे, जवळजवळ सात टक्के.  परंतु, माननीय अध्यक्ष महोदय आम्ही कोणावर तरी खापर फोडून पळून जाणाऱ्यातले नाही. आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करणाऱ्यातले आहोत. जबाबदारीने देशवासीयांना सोबत उभे राहणारे आहोत.

माननीय अध्यक्ष महोदय,

या सदनात गरिबी कमी करण्याबद्दल मोठं-मोठे आकडे दिले गेले पण एक गोष्ट विसरून गेलात. या देशातील गरीब माणूस एवढा विश्वासघातकी नाही. या देशातला गरीब माणूस इतका विश्वास घातकी नाही की एखादे सरकार त्यांच्या चांगल्यासाठी काम करेल आणि ते त्यात सरकारला सत्तेतून दूर करतील.  हा या देशातील गरिबांचा स्वभाव नाही. आपल्यावर ही दुर्दशा कशामुळे ओढवली की आपल्याला वाटले होते की घोषणा देऊन गरिबांना आपल्या जाळ्यात फसवून ठेवू शकाल परंतु गरीब माणूस जागा झाला. गरीब माणसाने आपल्याला ओळखले. या देशातील गरीब माणूस एवढा जागरुक आहे की आपल्याला 44 जागांवर थोपवले, 44 जागांवर आणून थोपवले. काँग्रेस 1971 पासून गरीबी हटाव या घोषणांच्या आधारे निवडणूका जिंकत होती. चाळीस वर्षानंतर गरिबी दूर तर झाली नाही पण काँग्रेसने नवीन परिभाषा बहाल केली.

माननीय अध्यक्ष महोदय,

देशातील तरुणांना ह्या गोष्टी कळणे महत्वाचे आहे आणि अध्यक्ष महोदय आपणच बघा की,.. व्यत्यय तेव्हा आणतात जेव्हा तुम्हाला अंदाज येतो की घाव खोल पोहोचला आहे. यांना माहिती आहे की आज संकटात सापडलो आहोत आणि काही लोक बोलून निघून जातात.. सहन करावे लागते या बिचाऱ्यांना.  

माननीय अध्यक्ष महोदय,

चाळीस वर्षानंतर गरीबी दूर तर झाली नाही पण गरीबांनी काँग्रेसला दूर केले आणि काँग्रेसने काय केले?.....माननीय अध्यक्ष महोदय, काँग्रेसने गरीबीची व्याख्या बदलली. 2013 मध्ये एकाच झटक्यात त्यांनी कागदावर 17 कोटी गरीब लोकांना श्रीमंत केले. हे कसे झाले या सत्याची देशातील युवकांना माहिती हवी. मी आपल्याला उदाहरण देतो. आपल्याला माहिती आहे पहिल्यांदा आपल्या देशात फर्स्ट क्लास पहिला वर्ग, दुसरा वर्ग आणि तिसरा वर्ग होता. पहिल्या वर्गाच्या दरवाजाच्या शेजारी एक रेष लिहिलेली होते. दुसरा वर्ग दर्शवण्यासाठी दोन रेषा लिहिल्या होत्या. तिसरा वर्ग मध्ये तीन रेषा.  यांना वाटले तिसऱ्या वर्गाचा मेसेज ठिक नाही नाही तेंव्हा त्यांनी एक रेषा काढून टाकली. ही यांची खरी पद्धत आहे. आणि खरोखर गरीबी दूर झाली असे यांना वाटते. दूर झाली तेंव्हा यांनी सगळे मूलभूत माहितीतले बदल अशाप्रकारे केले म्हणजे 17 करोड गरीब मोजणीत येणार नाहीत. अशाप्रकारे आकडे बदलण्याचे काम ते करत आले आहेत.
 
अध्यक्ष महोदय,

इथे काही तात्विक मुद्दे उपस्थित करण्याचे प्रयत्न झाले मी समजून घेण्याचे भरपूर प्रयत्न केले. कदाचित कोणाला कळले असतील तर अर्थात मला आत्तापर्यंत कोणीही असे मिळालेले नाही, पण कोणाला समजवायचे असतील तर मी समजून घेण्यासाठी तयार आहे. अशा काही गोष्टी येथे बोलल्या गेल्या.

माननीय अध्यक्ष महोदय,

सदनात राष्ट्रावर काही चर्चा झाली. ही चर्चा त्रासदायक आहे. माझे बोलणे पूर्ण करण्याआधी पुन्हा एकदा सांगू इच्छितो, मुद्दाम सांगू इच्छितो. बंगाली, मराठी, गुजराती, तामिळ, आंध्र, ओडिया, असामी, कन्नड, मल्याळी, सिंधी पंजाबी, पठाण, राजपूत आणि हिंदुस्तानी भाषिक जनतेने वसवलेला विशाल मध्य भाग अशी शेकडो वर्षांपासून आपली ओळख निर्माण करत आहे. याशिवाय या सर्वांचे गुणदोष साधारणपणे एकसारखेच आहेत. यांची माहिती जुन्या परंपरा आणि लिखाण मिळतेजुळते आहे. त्याचबरोबर या या सर्व कालखंडात ते अगदी स्पष्टपणे असे भारतीय बनले. ज्यांचा राष्ट्रीय वारसा एकच होता आणि नैतिक आणि मानसिक वैशिष्ट्येही एकसारखी होती.

अध्यक्ष महोदय,

‘आम्ही भारतीय’ यांची ही वैशिष्ट्ये सांगताना दोन गोष्टी ठळकपणे सांगणार आहोत.  राष्ट्रीय वारसा आणि ही गोष्ट पंडित नेहरूंची आहे.  ही गोष्ट पंडित नेहरूंनी सांगितली होती आणि त्यांच्या ‘भारत एक खोज’ मध्येही आहे. आमची राष्ट्रीय परंपरा एकसमान आहे आमची नैतिक आणि मानसिक वैशिष्ट्ये एकसारखी आहेत. संविधानात राष्ट्र शब्द येत नाही असे सांगून राष्ट्राचा अपमान केला गेला. संविधानाच्या प्रस्तावनेत लिहिलेला ‘राष्ट्र’ हा शब्द वाचनात आला नाही हे होऊच शकत नाही. काँग्रेस असा अपमान का करत आहे यावरही मी सविस्तर बोलणार आहे.

‘राष्ट्र’ म्हणजे कोणतीही सत्ता अथवा सरकारची व्यवस्था नाही. माननीय अध्यक्ष जी, आमच्यासाठी ‘राष्ट्र’ एक जिवंत आत्मा आहे आणि त्यामुळे हजारो वर्षांपासून देशवासी त्याच्याशी जोडले गेले आहेत आणि त्यासाठी संघर्षही करीत आहेत. आपल्याकडे विष्णू पुराणामध्ये म्हटले आहे की, हे काही कोणा एखाद्या पक्षाच्या नेत्याने लिहिलेले नाही. विष्णू पुराणात असे म्हटले आहे की - 

उत्तरम् यश समुदक्षय हिमावरे चरू दक्षिणम् । 

वर्षतत भारतम नाम भारत यत्र संतित ।।

याचा अर्थ असा आहे की, समुद्राच्या उत्तरकडे आणि हिमालयाच्या दक्षिणकडे जो देश आहे, त्याला भारत असे म्हणतात. तसेच या देशाच्या मुलांना, अपत्यांना भारतीय असे म्हणतात. विष्णू पुराणातला हा श्लोक जर काँग्रेसच्या लोकांना स्वीकृत नसेल तर मी आणखी एक उद्धृत येथे नमूद करू इच्छितो. कारण काही गोष्टींचे तुम्हा लोकांना वावडे असू शकते. मी उद्धृत करतोय -‘‘ एक क्षण असा येतो,  मात्र असा क्षण इतिहासात फार विरळा असतो. ज्यावेळी आपण जुन्या गोष्टींतून बाहेर पडून नवीन युगामध्ये पाऊल टाकतो, त्यावेळी एक युग समाप्त होते, त्यावेळी एका देशाचा दीर्घ काळापासून दबलेला आत्मा मुक्त होत असतो.’’ हे सुद्धा नेहरूजींचे भाष्य आहे. शेवटी कोणत्या राष्ट्राची गोष्ट नेहरू जी करीत होते? हे नेहरूजींनी म्हटले आहे. 

आणि माननीय अध्यक्ष जी, 

इथे तमिळींच्या भावनांना भडकाविण्याचा खूप मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करण्यात आला. राजकारणासाठी काँग्रेसची जी परंपरा आहे, ती त्यांनी इंग्रजांकडून घेतली आहे, असे दिसून येते. ‘फोडा आणि राज्य करा, तोडा आणि राज्य करा’ मात्र मी आज तमिळ भाषेतले महाकवी, माननीय अध्यक्ष जी, तमिळ भाषेचे महाकवी आणि स्वातंत्र्य सेनानी आदरणीय सुब्रह्मण्यम भारती यांनी जे लिहिले होते, त्याचा इथे पुनरूच्चार करू इच्छितो - इथे हे वाचताना माझ्या उच्चारणामध्ये काही चूक झाली तर तमिळ भाषकांनी मला माफ करावे. परंतु माझ्या मनात या लेखनाविषयी असलेला आदर आणि माझ्या भावना यामध्ये कोणत्याही प्रकारचा किंतू नाही, हे लक्षात घ्यावे. सुब्रह्मण्यम भारती यांनी असे म्हटले होते:- 

मनुम इमये मले एंगल मले, पनरूम उपनिक नुलेंगल दुले

पारमिसे एदोरू नुलइदहू पोले, पोनेरो भारत नाडेंगन नाडे 

पोडरूओम इते इम्मकिलेडे 

याचा भावार्थ जो उपलब्ध आहे, तो असा आहे  की- सुब्रह्मण्यम भारती जी जे काही म्हणतात ते त्यांनी तमिळ भाषेत सांगितले आहे. त्याचा  अनुवाद  मला जो उपलब्ध झाला आहे, तो मी आता इथं सांगणार आहे. - 

संपूर्ण सकल विश्वामध्य जो सन्मानित आहे, ज्याचा महिमा खूप मोठा आहे. अमर ग्रंथ जे आहेत, ते आमचे आहेत, तसेच उपनिषदांचा देश हाच आहे. 

सुब्रह्मण्यम भारती असे सांगतात की- आम्हा सर्वांना मिळणा-या यशाचे गान आम्ही गाऊ, असा हा स्वर्णिम देश असताना, जगामध्ये आमच्यापुढे कोण जाऊ शकेल? असा हा आमचा भारत देश आहे. 

सुब्रह्मण्यम भारतीजी यांच्या कवितेचा हा भाव आहे. ही कविता म्हणजे भारताची संस्तुती आहे आणि मी आज सर्व तमिळ नागरिकांना सलाम करू इच्छितो. ज्यावेळी आपले सरसेनाध्यक्ष- मुख्य संरक्षण अधिकारी रावत यांच्या हेलिकॉप्टरला अपघात होऊन त्यामध्ये त्यांचे निधन झाले आणि त्यांचे पार्थिव ज्यावेळी तामिळनाडूमधल्या विमानतळाकडे घेऊन जात होते, त्यावेळी ज्या मार्गावरून पार्थिव नेत होते, त्यावेळी माझे तमिळ भाई आणि माझ्या तमिळ भगिनी लाखोंच्या संख्येने रस्त्याच्या दुतर्फा कितीतरी तास रावत यांच्या पार्थिवाची वाट पहात रांगेत उभे होते. ज्यावेळी रावत यांचे पार्थिव ज्या भागात येत होते, त्या त्या भागातले तमिळनाडूवासी गौरवाने हात वर करून, साश्रू नयनाने म्हणत होते - ‘‘ वीर मणक्कम, वीर मणक्कम’’  हा माझा देश आहे. मात्र काँग्रेसला नेहमीच या गोष्टींविषयी व्देष वाटला आहे. विभाजनवादी मानसिकता त्यांच्या डीएनएमध्ये घुसली आहे. इंग्रज निघून गेले मात्र ‘फोडा आणि राज्य करा’ ही नीती काँग्रेसने आपले चरित्र बनवले आहे. आणि म्हणूनच आज काँग्रेस तुकडे -तुकडे गँगची नेता बनली आहे. 

माननीय अध्यक्ष जी, 

जे लोकशाही प्रक्रियेने आम्हाला रोखू शकत नाहीत, ते इथे बेशिस्त वर्तन करून आम्हाला रोखण्याचा प्रयत्न करीत आहेत. परंतु हे करतानाही त्यांना अपयशच येईल.  

माननीय अध्यक्ष महोदय, 

काँग्रेस पक्षाची सत्तेवर येण्याची इच्छा समाप्त झाली आहे. मात्र ज्यावेळी काही मिळूच शकत नाही, तर कमीत कमी काम बिघडवून टाकायचे, असे त्यांचे जे तत्वज्ञान आहे, ते निराशावादी आहे.  मात्र हा लोभ त्यांना नष्ट करणारा आहे. या मोहामुळे ते देशामध्ये ज्याप्रकारचे बीज रोवत आहेत ते विभाजनाची मुळे घट्ट करणारे आहे. सभागृहामध्ये अशा गोष्टींची चर्चा झाली की, त्यामुळे देशातल्या काही लोकांच्या भावना भडकविण्याचा भरपूर प्रयत्न केला गेला. गेल्या सात वर्षांमध्ये काँग्रेसची प्रत्येक कृती, प्रत्येक कृतीकडे जर अगदी बारकाईने पाहिले आणि प्रत्येक गोष्ट जर एकाच धाग्यामध्ये गुंफून पाहिले तर त्यांना नेमकी काय खेळी करायची आहे, हे स्पष्टपणे लक्षात येते. आणि त्यांची हीच खेळी मी आज मुक्तपणे सांगतोय. 

माननीय अध्यक्ष जी, 

तुम्हाला कोणतीही खेळी करायची असो, माननीय अध्यक्ष जी, असे अनेक लोक आले आणि गेले. लाखोंवेळी प्रयत्न केला गेला. स्वार्थासाठी अनेक गोष्टी केल्या. मात्र हा देश अजर-अमर आहे. या देशाला काहीही होवू शकणार नाही. ज्यांनी कोणी अशा प्रकारे प्रयत्न केला, त्यांना नेहमीच काही ना काही गमवावे लागले आहे. हा एक देश होता, श्रेष्ठ देश होता, हा एक देश आहे, हा देश श्रेष्ठच राहिल. याच विश्वासाने आम्ही पुढची मार्गक्रमण करीत आहोत. 

माननीय अध्यक्ष जी, 

इथे कर्तव्याविषयी बोलले तर त्याबद्दल नाराजी व्यक्त केली गेली. त्यामुळेही काही लोकांना त्रास होतो. देशाचे पंतप्रधान कर्तव्याविषयी का बोलतात, असा प्रश्न त्यांना पडतो. कर्तव्याची चर्चा होत असताना कोणत्यातरी गोष्टीला समजून घेण्यासाठी अथवा अयोग्य इराद्याने, विकृत विचाराने मांडणे, वाद उपस्थित करणे यामुळे ही मंडळी प्रसिद्धीच्या झोतात येत राहतात. मी हैराण झालो, कारण अचानक काँग्रेसला आता कर्तव्याविषयीच्या गोष्टी बोचायला लागल्या आहेत. 

माननीय अध्यक्ष जी, 

तुम्ही मंडळी म्हणत असता की, मोदीजी, नेहरूजींचे नाव घेत नाहीत. चला तर मग, आज मी तुमची इच्छा अगदी व्यवस्थित पूर्ण करतो आहे. तुमची तहान भागवून टाकतो. असे आहे पाहा, कर्तव्यांच्या संबंधामध्ये नेहरूजींनी काय म्हंटले होते, त्यांचेच वाक्य मी जरा उद्धृत करतो आणि ऐकवतो - 

माननीय अध्यक्ष जी, 

पंडित नेहरू जी, देशाचे पहिले पंतप्रधान - त्यांनी म्हटले होते की, ‘‘ मी आपल्याला पुन्हा सांगतो की, स्वतंत्र हिंदुस्तान आहे. स्वतंत्र हिंदुस्तानचा वर्धापनदिन आपण साजरा करतो. परंतु स्वातंत्र्याबरोबरच जबाबदाऱ्या असतात आणि कर्तव्याला वेगळ्या शब्दांमध्ये जबाबदारी असे म्हणतात’’. म्हणूनच जर कोणाला समजून घ्यायचे असेल तर समजावून सांगतो. कर्तव्याला दुस-या शब्दामध्ये जबाबदारी असे म्हणतात. आता हे पंडित नेहरू यांचे उद्गार आहेत.  ‘‘मी आपल्याला पुन्हा एकदा सांगतो की, स्वतंत्र हिंदुस्तान आहे. स्वतंत्र हिंदुस्तानचा वर्धापनदिन आपण साजरा करतो; मात्र स्वातंत्र्याबरोबरच जबाबदारीही असते. जबाबदारी काही फक्त राज्य करण्याची नाही, जबाबदारी प्रत्येक स्वतंत्र असलेल्या व्यक्तीची असते आणि जर आपल्याला ती जबाबदारी जाणवत नसेल, जर आपल्याला ती जबाबदारी समजत नसेत तर तुम्हाला स्वातंत्र्याचा अर्थ संपूर्णपणे समजलाच नाही, स्वातंत्र्याचे महत्व तुम्हाला समजू शकले नाही. आणि तुम्ही या स्वातंत्र्याला संपूर्णपणे वाचवू शकणार नाही, त्याचे रक्षण करू शकणार नाही.’’ आपण आपली कर्तव्य केली पाहिजेत याविषयी देशाचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरू जी यांनी म्हटले आहे, मात्र तुम्ही हे सर्व विसरून गेले आहात. 

माननीय अध्यक्ष जी, 

मला सभागृहाचा जास्त वेळ घेण्याची इच्छा नाही आणि ते ही थकले आहेत. माननीय अध्यक्ष जी, आपल्याकडे असे म्हटले आहे की - 

क्षणशः  कणशः श्चैव विद्यामर्थं च साधयेत्। 

क्षणे नष्टे कुतो विद्या कणे नष्टे कुतो धनम् ।। 

अर्थात विद्या, ज्ञान घेण्यासाठी एक -एक क्षण महत्वपूर्ण असतो. संपत्ती, साधने जमा करण्यासाठी एक-एक कण जमवणे आवश्यक असते. एक-एक क्षण वाया घालवला तर ज्ञान मिळू शकणार नाही. आणि एक-एक कण वाया घालवला, लहान-लहान साधने-स्त्रोतांचा सुयोग्य उपयोग केला गेला नाही तर ती साधने-स्त्रोत वाया जाणार आहेत. याविषयी काँग्रेस आणि त्यांच्या सहकारी मंडळींनी जरूर विचार मंथन करावे, असे माझे सांगणे आहे. तुम्ही इतिहासातल्या या महत्वपूर्ण क्षणांना नष्ट तर करीत नाहीत ना? मला ऐकवण्यासाठी, माझ्यावर टीका करण्यासाठी, माझ्या पक्षावर टीका करण्यासाठी खूप काही आहे आणि तुम्ही ते करूही शकता आणि भविष्यातही करीत रहा. त्यासाठी तुम्हाला भरपूर संधी मिळणार आहे. संधीची कोणत्याही प्रकारे कमतरता नाही. मात्र स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा हा काळ आहे, 75 व्या वर्षाचा हा अमृतकाळ म्हणजे भारताच्या विकास यात्रेमध्ये सकारात्मक योगदान देण्याचा काळ आहे. मी विरोधकांना आणि इथे बसलेल्या सर्व सहकारी मंडळींना आणि या सभागृहाच्या माध्यमातून देशवासियांनाही स्वातंत्र्याच्या या अमृत महोत्सवाला आपण नवीन संकल्पांबरोबर आत्मनिर्भर भारताचा संकल्पासह एकजूट होवू या असे आवाहन करतो. गेल्या 75 वर्षांमध्ये आपण ज्या ज्या क्षेत्रामध्ये कमी पडलो, त्या क्षेत्रांमध्ये काम पूर्ण करूया आणि आगामी 25 वर्षात 2047 मध्ये शताब्दी वर्ष येण्यापूर्वीच आपला देश कसा असावा, कसा बनावा, याचा संकल्प करून त्याप्रमाणे मार्गक्रमण करीत पुढे जावू. देशाच्या विकासासाठी सर्वांनी मिळून काम करायचे आहे. राजकारण आपल्या स्थानी आहे, आपण पक्षीय विचारांपासून वेगळे होवून देशाच्या विकासाची भावना मनात पक्की करून जगले पाहिजे. निवडणुकीच्या मैदानामध्ये जे काही करायचे आहे, ते करीत राहा. परंतु आपण देशहितासाठी पुढे यावे. अशी अपेक्षा ठेवतो. ज्यावेळी स्वातंत्र्याला शंभर वर्ष होतील, त्यावेळी अशाच प्रकारे सभागृहामध्ये जे लोक आसनस्थ झालेले असतील, ते जरूर चर्चा करतील आणि त्यांच्यादृष्टीने आपण एक मजबूत पायाभरणी केलेली असेल, त्यामुळे देश प्रगतीपथावर असेल. शंभर वर्षाच्या त्या प्रवासानंतर देश अशा लोकांच्या हाती गेला पाहिजे, म्हणजे त्यांना आपल्या देशाला आणखी पुढे न्यावा असे वाटेल. आपल्याला जो काही काळ मिळाला आहे, त्याचा अतिशय चांगला उपयोग केला पाहिजे, असाच विचार आपण केला पाहिजे. आपल्या स्वर्णिम भारताच्या निर्माणामध्ये आपण कोणतीही कसर बाकी, सोडून चालणार नाही. संपूर्ण सामर्थ्यानिशी आपण या कामाला लागावे. 

माननीय अध्यक्ष जी, 

मी पुन्हा एकदा राष्ट्रपतीजींच्या अभिभाषणाबद्दल धन्यवाद प्रस्तावाला अनुमोदन देतो. या चर्चेमध्ये सहभागी झालेल्या सभागृहातील सर्व माननीय खासदारांनाही पुन्हा एकदा धन्यवाद देतो. आपण जी संधी दिली, मध्ये-मध्ये रोखण्याचा प्रयत्न केला असतानाही मी सर्व विषयांवर स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला आहे. 

खूप- खूप धन्यवाद !! 


* * *

JPS/ST/SRT/Vinayak/Sushma/Radhika/Sanjana/Vijaya/Suvarna/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1796929) Visitor Counter : 706