पंतप्रधान कार्यालय

भारत-मध्य आशिया आभासी शिखर परिषद

Posted On: 27 JAN 2022 9:40PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 27 जानेवारी 2022

पहिल्या भारत-मध्य आशिया शिखर परिषदेचे यजमानपद पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज, म्हणजेच 27 जानेवारी 2022 रोजी भूषवले. या परिषदेला, कझाकस्तान, कीर्गीस्तान, ताझिकिस्तान, तुर्कमेनिस्तान अणि उज्बेकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष सहभागी झाले होते. भारत अणि मध्य आशिया दरम्यानच्या राजनैतिक संबंधांना 30 वर्षे पूर्ण झाल्याचे औचित्य साधत, ही पहिली भारत-मध्य आशिया परिषद आयोजित करण्यात आली आहे.

या परिषदेत, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मध्य अशियातील नेत्यांनी, भारत अणि मध्य अशियाचे संबंध नव्या उंचीवर नेण्यासाठीच्या पुढच्या पावलांविषयी चर्चा केली. एक ऐतिहासिक निर्णय घेत, सर्व नेत्यांनी, शिखर परिषदेच्या यंत्रणेला संस्थात्मक स्वरूप देत, दर दोन वर्षांनी ही परिषद आयोजित करण्यावर सर्वसहमती झाली. तसेच, या शिखर परिषदेसाठीची पूर्वतयारी करण्यासाठी परराष्ट्र मंत्री, व्यापार मंत्री, सांस्कृतिक कार्य मंत्री आणि सुरक्षा परिषदांचे सचिव यांच्यात नियमित स्वरुपात बैठका घेत, पण या परिषदेत सहमती झाली. या यंत्रणेला पाठबळ देण्यासाठी नवी दिल्लीत भारत-मध्य आशिया परिषदेचे सचिवालयही स्थापन केले जाणार आहे.

व्यापार आणि संपर्क व्यवस्था, विकासात सहकार्य, संरक्षण आणि सुरक्षा, आणि विशेषकरून सांस्कृतिक आणि लोकांचा एकमेकांशी संपर्क या क्षेत्रात सहकार्य वाढविण्यासाठी दूरगामी परिणाम करणाऱ्या प्रस्तावांवर नेत्यांनी चर्चा केली. यात उर्जा आणि संपर्क या विषयावरची गोलमेज, अफगाणिस्तान आणि चाबाहार बंदर वापरावर वरिष्ठ अधिकारी स्तरावर संयुक्त कार्यकारी गट; बौद्ध धर्माचा विचार मांडणारी प्रदर्शने मध्य आशियायी देशांत भरवणे आणि भारत - मध्य आशियात वापरल्या जाणाऱ्या सामायिक शब्दांचा  शब्दकोश, संयुक्त दहशतवाद विरोधी कृती, मध्य आशियायी देशांतून दर वर्षी तरुणांच्या 100 सदस्यीय शिष्टमंडळाची भारत भेट आणि मध्य आशियाई राजनैतिक अधिकाऱ्यांसाठी विशेष प्रशिक्षण यांचा समावेश होता.

अफगाणिस्तानात असलेली परिस्थिती आणि त्यात होणारे बदल या विषयी पंतप्रधान मोदी यांनी मध्य आशियायी नेत्यांशी चर्चा केली. अफगाणिस्तानात शांतता, सुरक्षा आणि स्थैर्य राहावे आणि जनतेचे खऱ्या अर्थाने प्रतिनिधित्व करणारे सर्वसमावेशक सरकार असावे यासाठी नेत्यांनी पुन्हा एकदा पाठिंबा दिला. भारत अफगाणी जनतेला मानवतेच्या दृष्टीकोनातून मदत करत राहील, यासाठी भारत कटिबद्ध असल्याची पंतप्रधानांनी ग्वाही दिली.

यावेळी, सर्व नेत्यांनी एक सर्वसमावेशक संयुक्त जाहीरनामा देखील स्वीकृत केला. भारत- मध्य आशिया भागीदारी दीर्घकालीन आणि सर्वसमावेशक करण्यासाठी, सर्व देशांच्या सामायिक दूरदृष्टीचे प्रतिबिंब या जाहीरनाम्यात आहे.    

 

 

 

S.Thakur/R.Aghor/P.Malandkar

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1793091) Visitor Counter : 514