सांस्कृतिक मंत्रालय
स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाचा भाग म्हणून केंद्रीय मंत्री मीनाक्षी लेखी यांच्या हस्ते, ‘भारताच्या दुर्लक्षित महिला स्वातंत्र्यसेनानी’या विषयावरील चित्रमय पुस्तकाचे प्रकाशन
Posted On:
27 JAN 2022 6:47PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 27 जानेवारी 2022
स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाचा भाग म्हणून नवी दिल्लीत आज केंद्रीय सांस्कृतिक कार्य राज्यमंत्री मीनाक्षी लेखी यांच्या हस्ते “भारतातील अज्ञात महिला स्वातंत्र्यसेनानी या विषयावरील चित्रमय पुस्तकाचे प्रकाशन झाले. भारतातील प्रसिद्ध प्रकाशन संस्था, अमर चित्र कथा यांच्या सहकार्याने ही पुस्तक प्रकाशित करण्यात आले आहे.
स्वातंत्र्य आंदोलनात, ज्यांनी स्वातंत्र्याची ज्योत लोकांच्या मनात जागृत केली आणि आंदोलनाचे नेतृत्व केले, देशभर हा आंदोलनात अग्नि प्रज्वलित ठेवला अशा काही अज्ञात महिला स्वातंत्र्यसेनानीच्या जीवनकार्याचा गौरव या चित्रमय पुस्तकात करण्यात आला आहे, असे मीनाक्षी लेखी यावेळी म्हणाल्या. ज्यांनी वसाहतवादी साम्राज्याविरुद्ध लढा दिला अशा राण्यांची कथा यात आहे. तसेच ज्यांनी भारतमातेसाठी आपले आयुष्य वेचले, जीवाचे बलिदान दिले, अशा महिलांची कथाही यात आहे, असे त्या पुढे म्हणाल्या.
जर आपण भारताच्या गौरवशाली इतिहासाकडे नजर टाकली, तर आपल्या दिसेल की भारताच्या संस्कृतीत सुरुवातीपासूनच महिलांचा सन्मान केला जात असे, तिथे स्त्री-पुरुष भेदभावाला थारा नव्हता. अनेक पुराव्यांवरुनही ही सिद्ध झाले आहे की महिलांमध्ये प्रत्यक्ष रणभूमीवर लढण्याचे धैर्यही होते आणि शौर्यही ! असेही त्यांनी सांगितले. या पुस्तकातील काही वीर महिलांच्या कथा उद्धृत करत मीनाक्षी लेखी म्हणाल्या की साम्राज्यवादी ब्रिटिश शासनाविरोधात महिलांनीही पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून विरोध प्रदर्शन केले होते. उदाहरण म्हणून त्यांनी राणी अब्बाक्का यांचे उदाहरण दिले, ज्यांनी कित्येक दशके पोर्तुगीज हल्ल्यांचा सामना केला. मात्र त्यांच्या दृष्टिकोनातून फारसा इतिहास कधी लिहिलाच गेला नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. आता मात्र, स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त अशा अज्ञात नायक-नायिकांचे स्वातंत्र्यलढ्यातील योगदान, त्याग प्रकाशात आणले जात आहे, असे लेखी यांनी सांगितले.
या प्रकाशनाबद्दल त्यांनी अमर चित्रकथाच्या संघाचे आभार मानले. देशातील मुलांच्या चारित्र्य घडवण्यात आणि त्यांच्यावर संस्कार करण्यात, अमर चित्र कथेने महत्वाचे योगदान दिले आहे, असा उल्लेखही त्यांनी केला.
अमर चित्र कथाच्या सहकार्याने, देशातील स्वातंत्र्यलढ्यात योगदान दिलेल्या 75 अज्ञात नायक/नायिकांच्या जीवनकार्यावर चित्रमय पुस्तके प्रकाशित करण्याचा निर्णय, सांस्कृतिक कार्य मंत्रालयाने घेतला आहे. याच मालिकेतील दुसरी आवृत्ती 25 अज्ञान आदिवासी स्वातंत्र्य सेनानी यांच्यावर असून, त्याचे काम प्रगतीपथावर आहे. तिसरी आणि अंतिम आवृत्ती, इतर क्षेत्रातील 30 अज्ञात नायकांविषयीची असणार आहे.
S.Thakur/R.Aghor/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1793020)
Visitor Counter : 320