संरक्षण मंत्रालय

वाढीव क्षमता असलेल्या ब्रह्मोस सुपरसोनिक क्रूझ क्षेपणास्त्राची ओदिशाच्या किनारपट्टीजवळ यशस्वी चाचणी

Posted On: 20 JAN 2022 5:37PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 20 जानेवारी 2022

अतिरिक्त स्वदेशी सामग्री आणि सुधारित कार्यक्षमता असलेल्या ब्रह्मोस या स्वनातीत (सुपरसोनिक) क्रूझ क्षेपणास्त्राची  20 जानेवारी 2022 रोजी सकाळी 10. 30 वाजता ओदिशाच्या किनारपट्टीजवळ चंडीपुर इथल्या एकात्मिक चाचणी केंद्रातून यशस्वी चाचणी घेण्यात आली. ब्रह्मोस एरोस्पेसने संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेच्या ( डिआरडीओ)  पथकाशी समन्वय साधून हे प्रक्षेपण केले.  या चाचणीत , क्षेपणास्त्राने मोहिमेच्या  सर्व उद्दिष्टांची पूर्तता झाली. ब्रह्मोस कार्यक्रमासाठी प्रक्षेपण चाचणी हा एक महत्त्वाचा टप्पा आहे. हे अत्यंत कुशल  क्षेपणास्त्र  अतिजलद वेगाने त्याच्या कमाल क्षमतेसह झेपावले आणि मोहिमेची सर्व उद्दिष्टे साध्य  करण्यात आली. क्षेपणास्त्र प्रगत स्वदेशी तंत्रज्ञानाने सुसज्ज होते आणि वाढीव कार्यक्षमता आणि कामगिरीसाठी सुधारित योग्य मार्गाचा अवलंब करण्यात आला. सुधारित नियंत्रण प्रणालीसह क्षेपणास्त्रात  अतिरिक्त क्षमता प्राप्त करण्यासाठी अनुरूप बदल  केले गेले .  या  चाचणीवर  पूर्व किनारपट्टी आणि जहाजांवर तैनात टेलीमेट्री, रडार आणि इलेक्ट्रो-ऑप्टिकल ट्रॅकिंग प्रणाली सह रेंज इन्स्ट्रुमेंटेशनच्या सर्व सेन्सर्सद्वारे देखरेख ठेवण्यात आली .

डीआरडीओ आणि रशियाच्या एनपीओएमच्या पथकांनी या  चाचणीत भाग  घेतला. ब्रह्मोस एरोस्पेस हा डीआरडीओ आणि  एनपीओएम, रशिया यांच्यातील संयुक्त उपक्रम असून , समुद्र आणि जमिनीवरील लक्ष्यांविरोधात परिणामकारकता आणि गंभीर हानी पोहचवण्याची क्षमता  वाढवण्यासाठी शक्तिशाली, ब्रह्मोस क्षेपणास्त्रामध्ये  सतत सुधारणा केली जात आहे. ब्रह्मोस ही शक्तिशाली क्षेपणास्त्र शस्त्र प्रणाली आहे जी यापूर्वीच  सशस्त्र दलांमध्ये समाविष्ट करण्यात आली आहे.

संरक्षण  मंत्री  राजनाथ सिंह यांनी यशस्वी चाचणीसाठी ब्रह्मोस,डीआरडीओ चमू आणि उद्योग क्षेत्राचे अभिनंदन केले आहे. संरक्षण संशोधन आणि विकास विभागाचे  सचिव आणि डीआरडीओचे अध्यक्ष डॉ जी सतीश रेड्डी यांनी शस्त्रास्त्र प्रणालीची कार्यक्षमता वाढवण्यासाठी आणि स्वदेशीकरणावर अधिक लक्ष केंद्रित करण्यासाठी वैज्ञानिक आणि अभियंत्यांनी केलेल्या सातत्यपूर्ण प्रयत्नांची प्रशंसा केली. ब्रह्मोसचे महासंचालक अतुल डी राणे यांनी  चाचणीत सहभागी एनपीओएम रशिया आणि डीआरडीओच्या संयुक्त चमूचे अभिनंदन केले.

 

M.Iyengar/S.Kane/P.Malandkar

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com(Release ID: 1791236) Visitor Counter : 374