पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

'आझादी के अमृतमहोत्सव से स्वर्णिम भारत की ओर' (स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाकडून स्वर्णिम भारताच्या दिशेने) या उपक्रमाच्या राष्ट्रीय प्रारंभ सोहळ्यात पंतप्रधानांचे बीजभाषण


ब्रह्मकुमारी समुदायाच्या सात कार्यक्रमांचा पंतप्रधानांच्या हस्ते प्रारंभ

Posted On: 20 JAN 2022 3:22PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 20 जानेवारी 2022

'आझादी के अमृतमहोत्सव से स्वर्णिम भारत की ओर' (स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाकडून स्वर्णिम भारताच्या दिशेने) या उपक्रमाच्या राष्ट्रीय प्रारंभ सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज बीजभाषण केले. तसेच यावेळी ब्रह्मकुमारी समुदायाच्या सात कार्यक्रमांचाही पंतप्रधानांच्या हस्ते प्रारंभ झाला. लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला, राजस्थानचे राज्यपाल कालराज मिश्रा, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत, गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, केंद्रीय मंत्री जी.किशन रेड्डी, भूपेंद्र यादव, अर्जुनराम मेघवाल, परषोत्तम रुपाला, कैलाश चौधरी आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

"ब्रह्मकुमारी संस्थेने 'आझादी का अमृतमहोत्सव' साजरा करताना आखलेल्या या कार्यक्रमातून, सुवर्णमयी भारताप्रती असणाऱ्या भावना, त्यासाठीचा उत्साह आणि प्रेरणा प्रतीत होत आहे." अशी भावना पंतप्रधानांनी व्यक्त केली. 'एकीकडे व्यक्तिगत आकांक्षा आणि यश आणि दुसरीकडे राष्ट्राच्या आकांक्षा आणि यश- यांमध्ये कोणताही फरक नाही. देशाच्या प्रगतीतच आपली प्रगती सामावलेली असते.'- असेही ते म्हणाले. "राष्ट्राचे अस्तित्व आपल्यातूनच उमटते आणि आपले अस्तित्व राष्ट्रामधून उमलते. याची जाणीव हीच नवभारताच्या उभारणीतील आपणा सर्व भारतीयांची सर्वात मोठी शक्ती आहे. देश आज जे जे काही करत आहे, त्यामध्ये 'सबका प्रयास (सर्वांचे प्रयत्न)' समाविष्ट आहेत.' असे पंतप्रधानांनी सांगितले. 'सबका साथ, सबका  विकास,सबका विश्वास, सबका प्रयास (सर्वांची साथ, सर्वांचा विकास, सर्वांचा विश्वास, सर्वांचे प्रयत्न)' हे देशाचे दिशादर्शक  असल्याचेही ते म्हणाले.

नवभारताच्या अभिनव आणि प्रगतिशील अशा नवविचारांवर तसेच नव्या दृष्टिकोनावरही पंतप्रधानांनी मत व्यक्त केले. "आज आपण एक अशी व्यवस्था निर्माण करत आहोत, जेथे भेदभावाला अजिबात वाव नाही. समानता आणि सामाजिक न्याय या मूल्यांवर भक्कमपणे आधारित अशा समाजाची उभारणी आपण करत आहोत." असेही ते म्हणाले.

स्रियांची महनीयता आणि त्यांच्याप्रती पूज्यभाव बाळगण्याच्या भारतीय परंपरेबद्दलही पंतप्रधान बोलले. "स्त्रियांविषयी जुनाट आणि अंधःकारमय विचारांच्या गर्तेत सारे जग गुरफटले असताना, भारतात मात्र मातृशक्ती आणि देवता म्हणून स्रिया पूजल्या जात होत्या. आपल्या देशात गार्गी, मैत्रेयी, अनुसूया, अरुंधती, आणि मदालसा अशा विदुषी होऊन गेल्या, त्यांनी समाजासाठी ज्ञानदानाचे पवित्र कार्य केले." असे ते म्हणाले. भारतीय इतिहासाच्या विभिन्न युगांमध्ये अद्वितीय स्रियांनी दिलेल्या अतुलनीय योगदानाचा त्यांनी गौरवपूर्ण उल्लेख केला. अंधःकारमय अशा मध्ययुगीन काळात, या देशात पन्नादायी आणि मीराबाई यांसारख्या महनीय स्रिया होऊन गेल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच स्वातंत्र्यलढ्याच्या काळातही अनेक स्रियांनी त्याग आणि समर्पणाचे दर्शन घडविले. कित्तूरच्या राणी चेन्नम्मा मातांगिनी हाजरा, राणी लक्ष्मीबाई, वीरांगना झलकारी बाई यांच्यापासून ते सामाजिक क्षेत्रात अहिल्याबाई होळकर, सावित्रीबाई फुले अशा थोर स्रियांनी भारताची ओळख टिकवून ठेवली. पंतप्रधानांनी नजीकच्या काळातील काही बदलांचा आढावाही घेतला. स्रियांचा सैन्यदलात प्रवेश, वाढीव प्रसूती रजा, मंत्रिमंडळातील स्रियांचे प्रमाण वाढवण्याच्या आणि अधिक प्रतिनिधित्व देण्याच्या माध्यमातून स्रियांचा राजकीय सहभाग वाढवण्यासाठी केले गेलेले प्रयत्न यांचा उल्लेख करत, या साऱ्यांतून स्रियांचा आत्मविश्वास नव्याने उभारण्यासाठी परिश्रम घेतले जात असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. 'या चळवळीचे नेतृत्व समाजानेच स्वीकारले असून, देशातील स्री-पुरुष प्रमाण सुधारले आहे'- अशा शब्दात पंतप्रधानांनी समाधान व्यक्त केले.

पंतप्रधानांनी प्रत्येकाला  आपली संस्कृती, आपली सभ्यता, आपली मूल्ये जिवंत ठेवण्याचे आणि आपले अध्यात्म आणि आपली विविधता जपण्याचे आणि त्याला प्रोत्साहन देण्याचे  आवाहन केले. त्याचबरोबर तंत्रज्ञान, पायाभूत सुविधा, शिक्षण आणि आरोग्य प्रणालींचे  सातत्याने आधुनिकीकरण करण्याच्या गरजेवर त्यांनी भर दिला.

अमृत काळ हा झोपेत स्वप्न पाहण्यासाठी नव्हे तर जागेपणी तुमचे संकल्प पूर्ण करण्यासाठी आहे. पुढली  25 वर्षे कठोर  परिश्रम, त्याग आणि ‘तपस्या’चा काळ आहे. गुलामगिरीच्या शेकडो वर्षांमध्ये  आपल्या समाजाने जे गमावले ते परत मिळवण्यासाठी हा 25 वर्षांचा कालावधी आहे असे पंतप्रधानांनी नमूद केले .

पंतप्रधान म्हणाले की, स्वातंत्र्यानंतरच्या 75 वर्षांत कर्तव्यांकडे दुर्लक्ष करणे आणि त्यांना सर्वोच्च प्राधान्य न देणे  या  वाईट वृत्तीने  राष्ट्रीय जीवनात शिरकाव केला आहे, हे मान्य केले पाहिजे. या काळात आपण केवळ  हक्कांबद्दल बोलण्यात आणि लढण्यात वेळ घालवला, असे त्यांनी नमूद केले.  काही प्रमाणात अधिकारांबाबत  चर्चा बरोबर असू शकते, परंतु स्वतःची कर्तव्ये पूर्णपणे विसरल्यामुळे भारताला कमकुवत राखण्यात मोठी भूमिका बजावली आहे यावर त्यांनी भर दिला. पंतप्रधानांनी सर्वांना आवाहन केले की, देशातील प्रत्येक नागरिकाच्या हृदयात कर्तव्याचा दीप पेटवा . आपण सर्व मिळून देशाला कर्तव्याच्या मार्गावर पुढे नेऊ, त्यामुळे   समाजातील दुष्प्रवृत्ती देखील  दूर होतील आणि देश नवी शिखरे गाठेल .

आंतरराष्ट्रीय स्तरावरही भारताची प्रतिमा मलिन करण्याच्या प्रवृत्तीबद्दल पंतप्रधानांनी खेद व्यक्त केला. हे केवळ राजकारण आहे असे सांगून आपण यापासून दूर जाऊ शकत नाही. हे राजकारण नाही, हा आपल्या देशाचा प्रश्न आहे. आज जेव्हा आपण स्वातंत्र्याचा  अमृत महोत्सव साजरा करत आहोत, तेव्हा जगाने भारताला योग्य रीतीने  ओळखले पाहिजे, ही देखील आपली जबाबदारी आहे, असे त्यांनी  नमूद केले. ज्या संघटना आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्यरत आहेत, त्यांनी भारताचे योग्य  चित्र इतर देशांतील लोकांपर्यंत पोहचवले पाहिजे आणि भारताविषयी पसरवल्या जाणाऱ्या अफवा खोडून  सत्य सांगावे, असे  पंतप्रधान म्हणाले.  ब्रह्म कुमारीसारख्या संघटनांनी  लोकांना भारतात येण्यासाठी आणि देशाबद्दल जाणून घेण्यासाठी प्रोत्साहित करावे  असे आवाहनही त्यांनी केले.

M.Chopade/J.Waishampayan/S.Kane/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1791194) Visitor Counter : 410