पंतप्रधान कार्यालय

तामिळनाडूमध्ये 11 नवीन वैद्यकीय महाविद्यालये आणि केंद्रीय अभिजात तमिळ संस्थेच्या नवीन संकुलाच्या उद्‌घाटनप्रसंगी पंतप्रधानांनी केलेले भाषण

Posted On: 12 JAN 2022 8:47PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 12 जानेवारी 2022

 

तामिळनाडूचे राज्यपाल आर.एन.रवी, तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टॅलिन, कॅबिनेट मंत्री  मनसुख मांडविया, मंत्रिमंडळातील माझे सहकारी एल. मुरुगन, भारती पवार जी, तमिळनाडू सरकारचे मंत्री, संसद सदस्य, तामिळनाडू विधानसभेचे सदस्य,

तमिळनाडूच्या भगिनींनो वणक्कम ! मी तुम्हा सर्वांना पोंगल आणि मकर संक्रांतीच्या शुभेच्छा देऊन सुरुवात करतो.जसे एक प्रसिद्ध गाणे आहे -

தை பிறந்தால் வழி பிறக்கும்

आज आपण  दोन खास कारणांसाठी भेटत आहोत:11 वैद्यकीय महाविद्यालयांचे उद्घाटन. आणि केंद्रीय अभिजात तमिळ संस्थेच्या  नवीन इमारतीचे उद्घाटन.अशा प्रकारे, आपण आपल्या समाजाचे  आरोग्य अधिक वाढवत आहोत आणि आपल्या संस्कृतीशी संबंध अधिक दृढ करत आहोत.

मित्रांनो,

वैद्यकीय शिक्षण जी  अभ्यासासाठी सर्वाधिक पसंती  असलेली शाखा आहे.भारतातील डॉक्टरांच्या कमतरतेची समस्या सर्वश्रुत होती.मात्र ही समस्या सोडविण्यासाठी पुरेसे प्रयत्न झाले नाहीत.कदाचित स्वार्थी हितसंबंधांनी आधीच्या सरकारांना योग्य निर्णय घेऊ दिले नाहीत.आणि, वैद्यकीय शिक्षण प्रवेश ही  एक समस्या बनून राहिली. आम्ही कार्यभार  स्वीकारल्यापासून आमच्या सरकारने ही तफावत दूर करण्याचे काम केले आहे.     2014 मध्ये आपल्या देशात 387 वैद्यकीय महाविद्यालये होती. गेल्या सात वर्षांत ही संख्या 596  वैद्यकीय महाविद्यालयांपर्यंत पोहोचली आहे. यात 54 टक्के वाढ झाली आहे. 2014 मध्ये, आपल्या देशात सुमारे 82 हजार वैद्यकीय पदवी आणि पदव्युत्तर जागा होत्या.गेल्या सात वर्षांत ही संख्या सुमारे 1 लाख 48 हजार जागांपर्यंत पोहोचली आहे.

यात सुमारे 80 टक्के वाढ झाली आहे. 2014 मध्ये देशात फक्त सात एम्स  होत्या.पण 2014 नंतर मान्यताप्राप्त एम्सची संख्या बावीस पर्यंत वाढली आहे.त्याचबरोबर वैद्यकीय शिक्षण क्षेत्र अधिक पारदर्शक करण्यासाठी विविध सुधारणा करण्यात आल्या आहेत. गुणवत्तेशी तडजोड न करता वैद्यकीय महाविद्यालये आणि रुग्णालये उभारण्यासाठीच्या  नियमावलीत  शिथिलता आणली आहे.

मित्रांनो,

मला असे सांगण्यात आले की, कोणत्याही एका राज्यात एकाच वेळी 11 वैद्यकीय महाविद्यालयांचे उद्घाटन होण्याची ही पहिलीच वेळ असेल. काही दिवसांपूर्वी मी उत्तर प्रदेशमध्ये एकाच वेळी 9 वैद्यकीय महाविद्यालयांचे उद्घाटन केले होते.त्यामुळे मी माझाच विक्रम मोडत आहे. प्रादेशिक असमतोल दूर करणे महत्त्वाचे आहे, या पार्श्वभूमीवरउद्घाटन झालेल्या वैद्यकीय महाविद्यालयांपैकी 2 महाविद्यालये रामनाथपुरम आणि विरुधुनगर या आकांक्षी  जिल्ह्यांमध्ये आहेत, हे पाहून आनंद वाटला. हे असे जिल्हे आहेत जिथे विकासाच्या गरजांवर विशेष लक्ष देण्याची गरज आहे.एक महाविद्यालय निलगिरीच्या दुर्गम डोंगराळ जिल्ह्यात आहे.

मित्रांनो,

संपूर्ण आयुष्यात एकदाच आलेल्या कोविड-19 महामारीने आरोग्य क्षेत्राचे महत्त्व पुन्हा अधोरेखित केले आहे. आरोग्य सेवेत गुंतवणूक करणाऱ्या समाजांचे भविष्य चांगले असेल.भारत सरकारने या क्षेत्रात अनेक सुधारणा केल्या आहेत. गरीबांना उच्च दर्जाची आणि परवडणारी आरोग्यसेवा उपलब्ध करून देणाऱ्या आयुष्मान भारत चे आभार. गुडघा प्रत्यारोपण आणि स्टेंटचा खर्च पूर्वीच्या  तुलनेत एक तृतीयांश झाला आहे. पीएम-जन औषधी योजनेने स्वस्त औषधे उपलब्ध करून देत  क्रांती घडवून आणली आहे.भारतात अशी 8000 हून अधिक जनौषधी दुकाने  आहेत. या योजनेमुळे गरीब आणि मध्यमवर्गीयांना विशेष मदत झाली आहे.औषधांवर होणारा खर्च  मोठ्या प्रमाणात कमी झाला  आहे. महिलांमध्ये निरोगी जीवनशैलीबद्दल जागरूकता निर्माण करण्याच्या दृष्टीने, 1 रुपयात सॅनिटरी नॅपकिन्स उपलब्ध करून दिले जात आहेत. मी तामिळनाडूच्या जनतेला या योजनेचा पुरेपूर लाभ घेण्याचे आवाहन करेन.  विशेषत: जिल्हा स्तरावरील आरोग्य पायाभूत सुविधा आणि आरोग्य संशोधनातील गंभीर तफावत दूर करणे हे पंप्रधान  आयुष्मान भारत पायाभूत सुविधा अभियानाचे उद्दिष्ट आहे. पुढील पाच वर्षांत तामिळनाडूला तीन हजार कोटींहून अधिक रुपयांचे सहाय्य प्रदान केले जाईल. यामुळे राज्यभरात शहरी आरोग्य आणि निरामयता  केंद्रे, जिल्हा सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळा आणि गंभीर आजारांवरील उपचार विभागांची स्थापना करण्यास  मदत होईल.याचा मोठा फायदा तामिळनाडूच्या लोकांना होणार आहे.

मित्रांनो,

येत्या काही वर्षांमध्ये   दर्जेदार  आणि परवडणारी आरोग्य सेवा देणारा देश  म्हणून मी भारताकडे पाहत आहे. वैद्यकीय पर्यटनाचे महत्वाचे केंद्र  होण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व गोष्टी भारतात आहेत. आपल्या  डॉक्टरांच्या कौशल्यावर आधारावर मी हे म्हणत आहे. मी वैद्यकीय जगताला  टेली-मेडिसिनकडेही लक्ष देण्याचे आवाहन करतो.आज, जगाने भारतीय उपचार पद्धतींचीही  दखल घेतली आहे, ज्या निरामयतेला पुढे घेऊन जाणाऱ्या आहेत. यामध्ये योग, आयुर्वेद आणि सिद्ध यांचा समावेश आहे. जगाला समजेल अशा भाषेत या उपचार पद्धती लोकप्रिय करण्यासाठी आम्ही काम करत आहोत.

मित्रांनो,

केंद्रीय अभिजात तमीळ संस्थेच्या  नवीन इमारतीमुळे तमिळ अभ्यास अधिक लोकप्रिय होईल.हे विद्यार्थी आणि संशोधकांना एक व्यापक पार्श्वभूमी  देखील प्रदान करेल. मला सांगण्यात आले आहे कीतमिळ तिरुक्कुरलचे विविध भारतीय आणि परदेशी भाषांमध्ये भाषांतर करण्याचा  केंद्रीय अभिजात तमीळ संस्थेचा मानस आहे.             

हे एक चांगले पाऊल आहे.तमिळ भाषा आणि संस्कृतीच्या समृद्धतेचे  मला नेहमीच आकर्षण वाटत आले आहे.जेव्हा मला संयुक्त राष्ट्रांमध्ये जगातील सर्वात प्राचीन भाषा तामिळमध्ये काही शब्द बोलण्याची संधी मिळाली,तो माझ्या आयुष्यातील सर्वात आनंदाचा क्षण होता. प्राचीन काळातील समृद्ध समाज आणि संस्कृतीला जाणून घेण्यासाठी अभिजात संगम हे एक आपले साधन आहे. बनारस हिंदू विद्यापीठात तमिळ अभ्यासावरील  'सुब्रमण्य  भारती अध्यासन' स्थापन करण्याचा मानही आमच्या सरकारला मिळाला. माझ्या संसदीय मतदारसंघात असलेले हे अध्यासन तमिळबद्दल अधिक कुतूहल निर्माण करेल. जेव्हा मी तिरुक्कुरलचे गुजरातीमध्ये भाषांतर करण्याच्या प्रक्रियेचा आरंभ केला , तेव्हा मला माहित होते की या कालातीत कार्याचे समृद्ध विचार गुजरातच्या लोकांशी जोडले जातील आणि प्राचीन तमिळ साहित्यात अधिक रस निर्माण करतील.

मित्रांनो,

आम्ही आपल्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 मध्ये भारतीय भाषा आणि भारतीय ज्ञान प्रणालींच्या संवर्धनावर जास्त भर दिला आहे.माध्यमिक  किंवा मध्यम स्तरावरील शालेय शिक्षणात तमिळ भाषेचा अभ्यास आता अभिजात भाषा म्हणून करता येईल. शालेय विद्यार्थ्यांना ज्या ध्वनी चित्रफितीच्या माध्यमातून  विविध भारतीय भाषांमधील 100 वाक्ये परिचित होतात, त्या भाषा-संगममधील एक भाषा ही तमिळ आहे.भारतवाणी प्रकल्पांतर्गत तमिळ भाषेतील सर्वात मोठी ई-सामग्री डिजिटल करण्यात आली आहे

मित्रांनो,

आम्ही शाळांमध्ये मातृभाषा आणि स्थानिक भाषांमध्ये शिक्षणाला प्रोत्साहन देत आहोत.आमच्या सरकारने  विद्यार्थ्यांना भारतीय भाषांमध्येही अभियांत्रिकीसारखे  तांत्रिक अभ्यासक्रम उपलब्ध करून देण्यास सुरुवात केली आहे. तामिळनाडूने अनेक प्रतिभावंत  अभियंते निर्माण केले आहेत.त्यापैकी अनेक जण आघाडीच्या जागतिक तंत्रज्ञान आणि व्यवसायाचे नेतृत्व करत आहेत. एसटीइएम  अभ्यासक्रमांमध्ये तमिळ भाषा सामग्री विकसित करण्यास मदत करण्याचे आवाहन  मी या प्रतिभावान तमिळ अनिवासींना  करतो.  इंग्रजी भाषेच्या ऑनलाइन अभ्यासक्रमांचे भाषांतर तमिळसह बारा वेगवेगळ्या भारतीय भाषांमध्ये करण्यासाठी आम्ही एक कृत्रिम बुद्धिमत्तेवर  आधारित भाषा अनुवाद साधन विकसित करत आहोत.

मित्रांनो, भारताची विविधता ही आपली ताकद आहे. ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’ हा उपक्रम विविधतेतील एकतेची भावना वाढीस लावण्याचा  आणि आपल्या लोकांना जवळ आणण्याचा प्रयत्न करतो. जेव्हा हरिद्वारमधील एका लहान मुलाला तिरुवल्लुवरची मूर्ती दिसते आणि तिची   महानता समजते तेव्हा त्याच्या कोवळ्या  मनात 'एक भारत, श्रेष्ठ भारत'चे बीज रुजते.हरियाणातील एका मुलाने कन्याकुमारी येथील रॉक मेमोरिअलला भेट दिल्यावर अशीच भावना दिसून येते. तामिळनाडू किंवा केरळमधील मुले जेव्हा वीर बाल दिवसाबद्दल जाणून घेतात तेव्हा ते साहिबजादेंच्या जीवनाशी आणि त्यांनी दिलेल्या संदेशाशी जोडली जातात. या मातीतील  थोर सुपुत्रांनी  आपल्या प्राणांची आहुती दिली पण आपल्या आदर्शांशी कधीही तडजोड केली नाही. इतर संस्कृतींचा शोध घेण्याचा प्रयत्न करूया. मी तुम्हाला खात्री देतो की तुम्ही त्याचा आनंद घ्याल.

मित्रांनो,

मी समारोप  करण्यापूर्वी, मी तुम्हा सर्वांना विनंती करू इच्छितो की तुम्ही सर्व कोविड-19 प्रतिबंधाशी संबंधित विशेषतः मास्क वापरणे यांसारख्या नियमांचे पालन करावेभारताच्या लसीकरण मोहिमेत उल्लेखनीय प्रगती होत आहे.गेल्या काही दिवसांपासून 15 ते 18 वयोगटातील किशोरवयीन मुलांना  लसीची मात्रा मिळू लागली आहे. वृद्ध आणि आरोग्यसेवेतील कर्मचार्‍यांसाठी खबरदारीसाठीची मात्रा देण्यास   देखील सुरूवात   झाली आहे. जे पात्र आहेत त्यांना मी लसीकरणासाठी आवाहन करतो.

सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास आणि सबका प्रयास या मंत्राने प्रेरित होऊन, 135 कोटी भारतीयांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र येऊन काम केले पाहिजे.महामारीपासून धडा घेऊन  आम्ही आपल्या सर्व देशवासियांना सर्वसमावेशक आणि दर्जेदार आरोग्य सेवा सुनिश्चित करण्यासाठी काम करत आहोत.आपण आपल्या समृद्ध संस्कृतीतून शिकून भावी पिढ्यांसाठी अमृत काळाचा  पाया रचला पाहिजे.पोंगल निमित्त सर्वांना पुन्हा एकदा हार्दिक शुभेच्छा.आपल्या सर्वांना शांती आणि समृद्धी लाभो.

वणक्कम.

धन्यवाद.

 

S.Patil/S.Chavan/P.Malandkar

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1789641) Visitor Counter : 201