वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
वाणिज्य आणि उद्योग क्षेत्रात उद्भवू शकणारे अडथळे टाळण्यासाठी केंद्राने मदत कक्ष आणि नियंत्रण कक्षांची केली स्थापना
कोविड काळात कोणत्याही निर्बंधाविना वस्तू आणि अत्यावश्यक सामानाचे वितरण सुरु राहावे याची खातरजमा करण्यासाठी डीपीआयआयटी मदत कक्ष
महामारीच्या संकटात वाढ होत असताना आंतरराष्ट्रीय व्यापाराला आधार देण्यासाठी डीजीएफटीने कोविड-19 मदत कक्ष स्थापन केला
Posted On:
07 JAN 2022 4:40PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 7 जानेवारी 2022
देशभरात कोविड बाधितांच्या संख्येत अचानकपणे मोठी वाढ होत असताना, डीपीआयआयटी अर्थात उद्योग आणि देशांतर्गत व्यापार प्रोत्साहन विभागाने कोविड संसर्गाचा प्रसार रोखण्यासाठी राज्ये तसेच केंद्रशासित प्रदेशांनी उचललेल्या पावलांची दखल घेतली आहे. त्यामुळे, खबरदारीचा उपाय म्हणून आणि आपल्या व्यापारविषयक परिसंस्थेला आधार मिळावा म्हणून, डीपीआयआयटी, विविध राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी जर काही कोविड विषयक निर्बंध जारी केले असतील तर त्यामुळे, वस्तू आणि अत्यावश्यक सामानाची वाहतूक तसेच वितरण प्रक्रिया आणि त्यामध्ये उद्भवू शकणाऱ्या अडचणी यांवर लक्ष ठेवणार आहे.
निर्मिती, वाहतूक, वितरण, घाऊक क्षेत्रातील किंवा ई-वाणिज्य कंपन्यांना, साधन संपत्तीची जमवाजमव तसेच वस्तूंची वाहतूक आणि वितरण या बाबतीत कोणतीही अडचण आल्यास त्याविषयीची माहिती डीपीआयआयटी विभागाच्या खालील दूरध्वनी क्रमांकांवर तसेच ईमेल पत्त्यावर देता येईल:-
दूरध्वनी क्रमांक: + 91 11 23063554, 23060625
ईमेल: dpiit-controlroom[at]gov[dot]in
वर दिलेले दूरध्वनी क्रमांक 5 जानेवारी 2022 पासून सकाळी 9 ते रात्री 9 या वेळेत कार्यरत असतील. या नियंत्रण कक्षाच्या माध्यमातून विविध भागधारकांनी नोंदविलेल्या समस्यांबाबत संबंधित राज्य आणि केंद्र सरकारे उपाययोजना करतील. म्हणून भागधारकांना येणाऱ्या समस्या नियंत्रण कक्षाच्या वरील सुविधांच्या माध्यमातून नोंदविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
वाणिज्य विभाग आणि डीजीएफटी अर्थात परदेश व्यापार महासंचालनालय यांनी देखील, कोविड-19 बाधितांच्या संख्येत होत असलेली तीव्र वाढ लक्षात घेऊन आयात आणि निर्यात प्रक्रिया तसेच व्यापार क्षेत्राशी संबंधित भागधारकांना येत असेलल्या समस्यांवर बारकाईने लक्ष ठेवण्याचे काम हाती घेतले आहे. आंतरराष्ट्रीय व्यापाराशी संबंधित अडचणींवर योग्य उपाय शोधणे आणि या व्यापाराला आधार देणे यासाठी डीजीएफटीने कोविड-19 मदत कक्ष स्थापन केला आहे.
हा ‘कोविड-19 मदत कक्ष’ वाणिज्य विभाग आणि डीजीएफटी यांच्याशी संबंधित मुद्दे, आयात-निर्यात परवानेविषयक अडचणी, सीमाशुल्क विभागाची मंजुरी मिळण्यास लागणारा विलंब, आयात-निर्यातीशी संबंधित कागदपत्रांबाबतच्या समस्या, बँकिंग बाबतचे मुद्दे इत्यादी घटकांची संबंधित समस्यांमध्ये लक्ष घालणार आहे.केंद्र तसेच विविध राज्य सरकारांची इतर मंत्रालये, विभाग आणि संस्था यांच्याशी संबंधित असणाऱ्या व्यापारविषयक समस्यांचे एकत्रीकरण आणि पडताळणीचे काम देखील हा कक्ष करणार असून केंद्र तसेच विविध राज्य सरकारांची मदत मिळवून शक्य त्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी उपाययोजना शोधण्यासाठी योग्य समन्वय देखील साधेल.
आयात-निर्यात समुदाय डीजीएफटीच्या संकेतस्थळावर माहिती नोंदवू शकेल आणि त्यांना ज्या अडचणींची सोडवणूक अपेक्षित आहे त्यांची माहिती खालील टप्प्यांमध्ये सादर करू शकेल-
- डीजीएफटीच्या https://dgft.gov.in या संकेतस्थळाला भेट देऊन--> सेवा --> डीजीएफटी मदत कक्ष सेवा
- ‘नवी विनंती नोंदवा’ आणि नंतर ‘कोविड-19’ ही श्रेणी निवडा
- योग्य उप-श्रेणीची निवड करून त्यात संबंधित माहिती भरून सादर करा
अथवा, त्यांना त्यांच्या समस्यांची माहिती dgftedi[at]nic[dot]in या ईमेल पत्त्यावर कोविड-19 मदत कक्ष या विषय शीर्षकासह पाठविता येतील, किंवा 1800-111-550या टोल फ्री क्रमांकावर संपर्क करून कळविता येतील.
सादर करण्यात आलेल्या समस्यांवरील उपाययोजना आणि प्रतिक्रिया यांच्यावर डीजीएफटी मदतकक्ष सुविधेत असलेल्या स्थिती ट्रॅकरचा वापर करून लक्ष ठेवण्यात येईल. जेव्हा या समस्यांबाबत काही कार्यवाही होईल तेव्हा त्याबाबतचे ईमेल आणि लघु संदेश देखील संबंधित व्यक्ती/कंपन्यांना पाठविण्यात येतील. या सुविधेचा समर्पक पद्धतीने उपयोग करून घेण्याचे आवाहन व्यापार समुदायाला करण्यात आले आहे.
* * *
S.Patil/S.Chitnis/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1788359)
Visitor Counter : 204