पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी उत्तराखंडमध्ये 17,500 कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या 23 प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली
"उत्तराखंडच्या लोकांचे सामर्थ्यच या दशकाला उत्तराखंडचे दशक बनवेल"
“लखवार प्रकल्पाचा विचार पहिल्यांदा 1976 मध्ये झाला होता. आज 46 वर्षांनंतर आमच्या सरकारने त्याची पायाभरणी केली आहे. हा विलंब गुन्हेगारीपेक्षा कमी नाही”
"भूतकाळातील उपेक्षा आणि अडचणी आता सुविधा आणि सुसंवादात रूपांतरित होत आहेत"
"आज दिल्ली आणि डेहराडूनमध्ये सरकारे सत्तेच्या लालसेने नव्हे तर सेवेच्या भावनेने चालवली जात आहेत"
“तुमची स्वप्ने आमचे संकल्प आहेत; तुमची आकांक्षा आमची प्रेरणा आहे; आणि तुमची प्रत्येक गरज पूर्ण करणे ही आमची जबाबदारी आहे”
Posted On:
30 DEC 2021 6:28PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 30 डिसेंबर 2021
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज उत्तराखंडमध्ये 17,500 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या 23 प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली. 1976 मध्ये पहिल्यांदा ज्या प्रकल्पाची संकल्पना मांडण्यात आली आणि त्यानंतर तो प्रकल्प अनेक वर्षांपासून प्रलंबित होता अशा लाखवार बहुउद्देशीय प्रकल्पाची पायाभरणी त्यांनी केली. त्यांनी 8700 कोटी रुपयांच्या रस्ते प्रकल्पांचे देखील उद्घाटन आणि पायाभरणी केली.
या रस्ते प्रकल्पांमुळे दुर्गम, ग्रामीण आणि सीमावर्ती भागात कनेक्टिव्हिटी सुधारण्याचे पंतप्रधानांचे स्वप्न प्रत्यक्षात येईल. कैलास मानसरोवर यात्रेसाठी देखील सुधारित दळणवळण सुविधा उपलब्ध होतील. उधम सिंग नगर येथे एम्स ऋषिकेश सॅटेलाईट सेंटर आणि पिथौरागढ येथील जगजीवन राम शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची पायाभरणीही त्यांनी केली. ही सॅटेलाईट सेंटर्स देशाच्या सर्व भागात जागतिक दर्जाच्या वैद्यकीय सुविधा पुरविण्याच्या पंतप्रधानांच्या प्रयत्नांना अनुसरून असतील. त्यांनी काशीपूर येथे अरोमा पार्क आणि सितारगंज येथे प्लॅस्टिक इंडस्ट्रियल पार्क आणि राज्यभरात गृहनिर्माण, स्वच्छता आणि पिण्याच्या पाण्याच्या पुरवठ्याशी संबंधित अनेक उपक्रमांची पायाभरणी केली.
यावेळी एका सार्वजनिक सभेला संबोधित करताना पंतप्रधानांनी कुमाऊंसोबत त्यांचे प्रदीर्घ काळापासून संबंध असल्याची आठवण करून दिली आणि त्यांना उत्तराखंडी टोपी देऊन सन्मानित केल्याबद्दल प्रदेशातील लोकांचे आभार मानले.
हे दशक उत्तराखंडचे दशक आहे, असे त्यांना का वाटते हे यावेळी पंतप्रधानांनी स्पष्ट केले. उत्तराखंडमधील लोकांचे सामर्थ्य या दशकाला उत्तराखंडचे दशक बनवेल, असे पंतप्रधान म्हणाले. उत्तराखंडमध्ये वाढणारी आधुनिक पायाभूत सुविधा, चार धाम प्रकल्प, नवीन रेल्वे मार्ग बांधले जात आहेत, यामुळे हे दशक उत्तराखंडचे दशक ठरेल. जलविद्युत, उद्योग, पर्यटन, नैसर्गिक शेती आणि संपर्कव्यवस्था या क्षेत्रात उत्तराखंडने केलेल्या प्रगतीचाही त्यांनी उल्लेख केला ज्यामुळे हे दशक उत्तराखंडचे दशक होईल असे ते म्हणाले.
डोंगराळ भागांच्या विकासासाठी अथकपणे काम करणारा विचारप्रवाह आणि डोंगराळ प्रदेशांना विकासापासून दूर ठेवणारा विचारप्रवाह यातील फरक पंतप्रधानांनी स्पष्ट केला. ते म्हणाले, विकास आणि सुविधांच्या अभावी अनेकांनी या प्रदेशातून इतर ठिकाणी स्थलांतर केले. सबका साथ सबका विकास या भावनेने सरकार काम करत असल्याचे ते म्हणाले. ते म्हणाले की, उधम सिंग नगर येथे एम्स ऋषिकेश उपग्रह केंद्र आणि पिथौरागढ येथील जगजीवन राम शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या पायाभरणीमुळे राज्यातील वैद्यकीय पायाभूत सुविधा मजबूत होतील. ते म्हणाले की, आज सुरू होणाऱ्या प्रकल्पांसह राज्यातील कनेक्टिव्हिटी सुधारेल. ते म्हणाले की, आज जी पायाभरणी होत आहे ती प्रतिज्ञापत्रे आहेत ज्याचा पूर्ण संकल्पाने पाठपुरावा केला जाईल. ते म्हणाले की, भूतकाळातील वंचना आणि अडचणी आता सुविधा आणि सुसंवादात रूपांतरित होत आहेत. हर घर जल, शौचालय, उज्ज्वला योजना, प्रधानमंत्री आवास योजना यांच्या माध्यमातून गेल्या सात वर्षात महिलांना जीवनात नवनवीन सुविधा आणि सन्मान मिळत असल्याचेही ते म्हणाले.
पंतप्रधान म्हणाले की, सरकारी योजनांमध्ये विलंब हा पूर्वी सरकारमध्ये असलेल्यांचा कायमचा पायंडा होता. “आज उत्तराखंडमध्ये सुरू झालेल्या लखवार प्रकल्पाचाही तोच इतिहास आहे. या प्रकल्पाचा विचार पहिल्यांदा 1976 मध्ये झाला होता. आज 46 वर्षांनंतर आपल्या सरकारने त्याच्या कामाची पायाभरणी केली आहे. हा विलंब गुन्ह्यापेक्षा कमी नाही,” ते म्हणाले.
पंतप्रधान म्हणाले की, सरकार गंगोत्री ते गंगासागर या अभियानामध्ये गुंतले आहे. स्वच्छतागृहे, उत्तम सांडपाणी व्यवस्था आणि जलशुद्धीकरणाच्या आधुनिक सुविधांमुळे गंगेत पडणाऱ्या नाल्यांची संख्या झपाट्याने कमी होत आहे. त्याचप्रमाणे नैनितालमधील तलावांची व्यवस्था ठेवली जात आहे. केंद्र सरकारने नैनिताल येथील देवस्थळ येथे देशातील सर्वात मोठी ऑप्टिकल दुर्बीण उभारली असल्याचे पंतप्रधान म्हणाले. यामुळे देश-विदेशातील शास्त्रज्ञांना नवी सुविधा तर मिळालीच, शिवाय या क्षेत्राला नवी ओळख मिळाली आहे. आज दिल्ली आणि डेहराडूनमध्ये सरकार सत्तेच्या लालसेने चालत नाही तर सेवेच्या भावनेने चालते.
सीमावर्ती राज्य असूनही संरक्षणाशी संबंधित अनेक गरजांकडे दुर्लक्ष करण्यात आल्याबद्दल पंतप्रधानांनी शोक व्यक्त केला. कनेक्टिव्हिटीसोबतच राष्ट्रीय सुरक्षेच्या प्रत्येक बाबीकडे दुर्लक्ष करण्यात आले होते. ते म्हणाले की सैनिकांना कनेक्टिव्हिटी, आवश्यक चिलखत, दारूगोळा आणि शस्त्रास्त्रे आणि हल्लेखोर आणि दहशतवाद्यांना चोख प्रत्युत्तर देण्यासाठी देखील प्रतीक्षा करावी लागत होती.
उत्तराखंडला विकासाचा वेग वाढवायचा आहे. ते म्हणाले, “तुमची स्वप्ने आमचे संकल्प आहेत; तुमची इच्छा आमची प्रेरणा आहे; आणि तुमची प्रत्येक गरज पूर्ण करणे ही आमची जबाबदारी आहे.” ते म्हणाले की, उत्तराखंडच्या लोकांचा निर्धार हे दशक उत्तराखंडचे दशक बनवेल.
JPS/NC/SP/VJ/PM
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1786383)
Visitor Counter : 249
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam