पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत कानपूर आयआयटीचा 54 वा दीक्षांत समारंभ संपन्न , ब्लॉकचेन आधारित डिजिटल पदव्यांचा केला प्रारंभ
राष्ट्राच्या अमृत काळाप्रमाणेच हा या विद्यार्थ्यांच्या जीवनातील ही अमृत काळ
आज देशाचा विचार आणि वृत्ती तुमच्याप्रमाणेच, याआधी कामचलाऊ वृत्ती असेल तर आज काम करण्याची आणि काम करून त्याचे फलित आणण्याची वृत्ती आहे
देशाने बराच काळ गमावला आहे, यामध्ये दोन पिढ्यांचा काळ गेला आहे म्हणूनच आपल्याला आता दोन मिनिटेही वाया घालवायची नाहीत
आज माझ्या बोलण्यात जर अधीरता भासत असेल तर आत्मनिर्भर भारतासाठी तुम्ही याच पद्धतीने अधीर व्हावे असे मला वाटते. आत्मनिर्भर भारत म्हणजे संपूर्ण स्वातंत्र्याचे मूळ स्वरूप आहे जिथे आपण कोणावरही अवलंबून नसू
तुम्ही जर आव्हानाच्या शोधात असाल तर तुम्ही शिकारी आणि आव्हान हे सावज आहे
आनंद आणि परोपकार सामायिक करण्याची वेळ येते त्यासाठी कोणताही पासवर्ड ठेवू नका मोकळेपणाने जीवनाचा आनंद घ्या
Posted On:
28 DEC 2021 4:07PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 28 डिसेंबर 2021
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत आज कानपूर आयआयटीचा 54 वा दीक्षांत समारंभ झाला यावेळी त्यांनी ब्लॉकचेन आधारित तंत्रज्ञानाद्वारे डिजिटल पदवी प्रदान केल्या.
आजचा दिवस हा कानपूरसाठी महत्वाचा दिवस आहे कारण या शहराला आज मेट्रो सुविधा मिळत आहे आणि त्याच बरोबर इथे उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या रूपाने कानपूर हे जगाला अनमोल भेट देत असल्याचे, संस्थेचे विद्यार्थी आणि प्राध्यापक यांना संबोधित करताना पंतप्रधान म्हणाले. आयआयटी कानपूर मध्ये प्रवेश घेतानाचे आपण आणि इथून पदवी घेऊन बाहेर पडतानाचे आपण यात मोठे परिवर्तन आपणाला जाणवत असेल असे पंतप्रधानांनी विद्यार्थ्यांच्या या नावाजलेल्या संस्थेतल्या प्रवासाबद्दल बोलताना सांगितले. इथे प्रवेश घेण्यापूर्वी अज्ञाताची भीती किंवा अज्ञाताबाबत प्रश्न आपल्या मनात असतील. मात्र आता अज्ञाताबाबतची भीती मनात नसेल, आता संपूर्ण जगाचा धांडोळा घेण्याचे धाडस आपल्याकडे असेल. आता अज्ञाताबद्दल शंका राहणार नाही,आता सर्वोत्तमतेची आस आणि जगात आपली कीर्ती पसरावी असे स्वप्न राहील, असे पंतप्रधान म्हणाले.
कानपूर शहराचा ऐतिहासिक आणि सामाजिक वारसा विषद करताना, असे वैविध्य लाभलेल्या भारतातल्या निवडक शहरांपैकी कानपूर एक असल्याचे पंतप्रधान म्हणाले. सत्ती चारूआ घाट ते मदारी पासी, नानासाहेब ते बटुकेश्वर दत्त, आपण जेव्हा या शहराला भेट देतो तेव्हा आपण स्वातंत्र्य लढ्यातल्या बलिदानाच्या आणि त्या झळाळत्या काळातल्या नावलौकीकाला स्पर्श करत असल्याची भावना निर्माण होत असल्याचे त्यांनी सांगितले.
उत्तीर्ण होऊन इथून बाहेर पडणाऱ्या विद्यार्थ्यांच्या जीवनातल्या सध्याच्या टप्प्याचे महत्व त्यांनी विशद केले. यासाठी त्यांनी 1930च्या काळाचे उदाहरण दिले. त्या काळात 20-25 वर्षाचे तरुण असणाऱ्या पिढीला 1947 पर्यंतचा, स्वातंत्र्य मिळवण्याचा प्रवास दीर्घ वाटला असेल. त्यांच्या जीवनातला तो सुवर्ण काळ होता. आज तुम्हीही अशाच प्रकारच्या सुवर्ण काळात प्रवेश करत आहात. राष्ट्राच्या अमृत काळाप्रमाणेच हा तुमच्या जीवनातलाही हा अमृत काळ आहे.
कानपूर आयआयटीच्या उत्तम कामगिरीबाबत आणि शक्यतांबाबत बोलताना सध्या तंत्रज्ञान हेच आजचे व्यावसयिक घडवत आहेत. कृत्रिम बुद्धीमत्ता, उर्जा, हवामानासंदर्भात समस्यांवर तोडगा,आरोग्य क्षेत्रातल्या उपायांमध्ये तंत्रज्ञान आणि आपत्ती व्यवस्थापन यासारख्या क्षेत्रात असलेला वाव त्यांनी दर्शवला. हे केवळ तुमचे दायित्व नव्हे तर अनेक पिढ्यांनी बाळगलेले स्वप्न पूर्ण करण्याचे भाग्य तुम्हाला लाभल्याचे पंतप्रधान म्हणाले.महत्वाकांक्षी उद्दिष्टे निश्चित करण्याचा आणि ती साध्य करण्यासाठी सर्वतोपरी मेहनत करण्याचा हा काळ असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले.
एकविसावे शतक हे संपूर्णपणे तंत्रज्ञान-प्रणित शतक असेल, यावर पंतप्रधानांनी भर दिला. या दशकातही, समाजातील विविध क्षेत्रात तंत्रज्ञानाचा प्रभाव वाढतच जाणार आहे. त्यादृष्टीने तंत्रज्ञानाशिवायचे आयुष्य अपूर्णच आहे, असे पंतप्रधान म्हणाले.आयुष्यातील तंत्रज्ञानाशी असलेली ही स्पर्धा विद्यार्थी नक्की जिंकतील, असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला. देशभरातील मुलांचा मूड आज काय आहे, याबद्दलचे आपले निरीक्षण पंतप्रधानांनी नोंदवले. “ आज देशाचा विचार आणि मनोवृत्ती तशीच आहे, जशी तुमची आहे. आधीचे काम जर निष्काळजी आणि घिसाडघाईचे असेल, तर आज मात्र, कृतीवर आणि त्या कृतीच्या फळावर भर देऊन काम केले जात आहे. आधी जर समस्यांपासून दूर पाळण्याची वृत्ती असेल, तर आजचा संकल्प या समस्या सोडवण्याचा आहे.” असे पंतप्रधान म्हणाले.
देशाच्या 25 व्या स्वातंत्र्यदिनापासूनच, देश घडवण्याचे संकल्प घेऊन काम सुरु व्हायला हवे होते, मात्र तसे न झाल्याने बहुमोल वेळ आपण वाया घालवला आहे. अशी खंत त्यांनी व्यक्त केली. “ज्यावेळी देशाच्या स्वातंत्र्याची 25 वर्षे पूर्ण झाली होती, तोपर्यंत आपल्या देशाला आत्मनिर्भर करण्यासाठी आपण बरेच काम पूर्ण करायला हवे होते. मात्र तेव्हापासून आतापर्यंत हे काम पूर्ण करण्यास बऱ्याच उशीर झाला आहे, त्यामुळे देशाचा बहुमोल वेळ वाया गेला आहे. या दरम्यान दोन पिढ्या गेल्या. त्यामुळे आज आपल्याला दोन क्षणही वाया घालवता येणार नाहीत,” असे पंतप्रधान पुढे म्हणाले.
‘कदाचित माझे बोलणे आपल्याला उतावळेपणाचे वाटत असेल, तर त्यामागे कारण हे आहे की आज इथून पदव्या घेऊन जाणाऱ्या मुलांनी याच पद्धतीने भारताला आत्मनिर्भर करण्यासाठी असेच उतावीळ व्हावे, अशी आपली इच्छा आहे,’ असे पंतप्रधान म्हणाले. “आत्मनिर्भर भारत, हा संपूर्ण स्वातंत्र्याचा पाया आहे , एका अशा राष्ट्राची उभारणी, जिथे आपण कोणावरही अवलंबून असणार नाही.” स्वामी विवेकानंद यांनी एकदा म्हटले होते, “ प्रत्येक देशाकडे इतरांना देण्यासाठी काही ना काही संदेश असतो, पूर्ण करण्यासाठी एक ध्येय असते. कुठेतरी पोहोचण्यासाठी एक प्राक्तन असते.मग आपण जर आत्मनिर्भर झालो नाहीत, तर आपला देश या उद्दिष्टांची पूर्तता कसा करु शकेल? देश त्याच्या ध्येयापर्यंत कसं पोहचू शकेल” असे पंतप्रधान म्हणाले.
अटल नवोन्मेष मिशन, पंतप्रधान संशोधन शिष्यवृत्ती आणि राष्ट्रीय शिक्षण धोरण यामधून एक नवीन स्वभाव आणि संधी तयार होत असल्याचं पंतप्रधान म्हणाले. उद्योगस्नेही वातावरण आणि धोरणात्मक अडथळे दूर केल्याचे परिणाम आता दिसू लागले आहेत. स्वातंत्र्याच्या 75व्या वर्षात, भारतात 75 पेक्षा जास्त युनिकॉर्न, 50,000 पेक्षा जास्त स्टार्ट अप्स आहेत, असं पंतप्रधान म्हणले. यापैकी 10,000 गेल्या केवळ 6 महिन्यात स्थापन झाले आहेत. आज भारत जगातील स्टार्ट अपचे दुसरे मोठे केंद्र म्हणून उदयास आले आहे. अनेक स्टार्ट अप्स हे आयआयटीच्या युवकांनी सुरु केले आहेत. विद्यार्थ्यांनी देशाची जगातली प्रतिमा अधिक उंचावण्यासाठी आपले योगदान द्यावे, असे पंतप्रधान म्हणले. ते म्हणले, “भारतीय कंपन्या आणि भारतीय उत्पादने जागतिक व्हावी असे कुठल्या भारतीयाला वाटणार नाही? ज्यांना आयआयटी बद्दल माहिती आहे, ज्यांना इथलं कौशल्य माहित आहे, इथले प्राध्यापक घेत असलेली मेहनत बघितली आहे, आयआयटीचे तरुण हे नक्कीच करू शकतील असा त्यांना विश्वास वाटेल.”
विद्यार्थ्यांनी आव्हानांपुढे आरामाला महत्व देऊ नये असा सल्ला पंतप्रधानांनी दिला. कारण, “तुम्हाला आवडो अथवा न आवडो, आयष्यात आव्हानं असणारच आहेत. जे त्यापासून पळतील ते त्यांना बळी पडतील. मात्र, जर तुम्ही आव्हानांच्या शोधात निघाले असाल, तर तुम्ही शिकारी आहात आणि आव्हानं तुमची शिकार,” असे पंतप्रधान म्हणाले.
आपला वैयक्तिक अनुभव सांगत, पंतप्रधानांनी विद्यार्थ्यांना सल्ला दिली की त्यांनी आपल्यातली संवेदनशीलता, कुतूहल, कल्पनाशक्ती आणि सृजनशीलता कायम जपावी. आयुष्यातल्या तंत्रज्ञान विरहित इतर सर्व गोष्टींबाबत देखील संवेदनशील रहा, असा सल्ला त्यांनी विद्यार्थ्यांना दिला. आपला आनंद आणि करुणा कोणाशी शेयर करतांना मनात कुठलाही पासवर्ड ठेवू नका, अगदी मोकळ्या मनाने आयुष्याचा आनंद घ्या.” असे पंतप्रधान म्हणाले.
* * *
Jaydevi PS/N.Chitale/R.Aghor/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1785814)
Visitor Counter : 347
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Bengali
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam