पंतप्रधान कार्यालय
देशातील कोविड-19, ओमायक्रॉन आणि आरोग्य प्रणालींची सज्जता यांचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली उच्च स्तरीय बैठक
नव्या उत्परिवर्तकाचा विचार करता, आपण दक्ष आणि सावध असणे गरजेचे- पंतप्रधान
राज्यांमध्ये जिल्हा पातळीपासून सुरुवात करत सर्व आरोग्य प्रणाली बळकट असल्याची खातरजमा करा- पंतप्रधान
सध्याच्या परिस्थितीसंदर्भात सरकार दक्ष आहे आणि स्थितीची जाणीव आहे, संपूर्ण सरकार या दृष्टीकोनांतर्गत प्रतिबंध आणि व्यवस्थापनासाठी राज्यांना पाठबळ देण्यासाठी आणि पुढाकाराने कृती करण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे- पंतप्रधान
बाधितांच्या संपर्कात आलेल्यांचा तातडीने आणि प्रभावी पद्धतीने माग काढण्यावर भर असावा, लसीकरणाची गती वाढवा आणि आरोग्यविषयक पायाभूत सुविधा बळकट करा- पंतप्रधान
कमी लसीकरण झालेल्या, रुग्णसंख्या वाढत असलेल्या, अपुऱ्या पायाभूत सुविधा असलेल्या राज्यांच्या मदतीसाठी केंद्र सरकार पथके पाठवणार
Posted On:
23 DEC 2021 11:18PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 23 डिसेंबर 2021
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज देशातील कोविड-19 ची स्थिती आणि ओमायक्रॉन या नव्या चिंताजनक उत्परिवर्तकाचा संभाव्य धोका यांचा आढावा घेण्यासाठी एका उच्चस्तरीय बैठकीचे आयोजन करण्यात आले. या बैठकीत कोविड 19 प्रतिबंध आणि व्यवस्थापन, औषधे, ऑक्सिजन सिलेंडर्स आणि कॉन्सन्ट्रेटर्स, व्हेंटीलेटर्स, पीएसए प्लांट, आयसीयू/ऑक्सिजन सुविधा असलेल्या रुग्णशय्या, मानव संसाधन, आयटी हस्तक्षेप आणि लसीकरणाची सद्यस्थिती या बाबींचा देखील या आढाव्यात समावेश होता.
नव्या उत्परिवर्तकामुळे जगभरात निर्माण होऊ लागलेल्या परिस्थितीची माहिती यावेळी अधिकाऱ्यांनी पंतप्रधानांना दिली. उच्च लसीकरण झालेल्या देशातल्या परिस्थितीची आणि या देशांमध्ये असलेले ओमायक्रॉन उत्परिवर्तकाचे अस्तित्व याविषयीची माहिती पंतप्रधानांना देण्यात आली. ओमायक्रॉन या उत्परिवर्तकाला तोंड देण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेने सुचवलेल्या उपाययोजना आणि तंत्रज्ञान याविषयी देखील पंतप्रधानांना माहिती देण्यात आली. देशात कोविड-19 ची सद्यस्थिती आणि ओमायक्रॉन याची माहिती त्याचबरोबर जास्त रुग्णसंख्या असलेली राज्ये, उच्च संक्रमण दर असलेले जिल्हे आणि जास्त संख्या असलेले समूह यांच्याविषयीची माहिती पंतप्रधानांना सादरीकरणाद्वारे देण्यात आली. देशात आढळलेल्या ओमायक्रॉन रुग्णांचे तपशील, त्यांच्या प्रवासाचा इतिहास, लसीकरणाची स्थिती आणि बरे होण्याचे प्रमाण याची माहिती देखील देण्यात आली.
25 नोव्हेंबर 2021 रोजी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सर्व राज्यांसाठी पहिली मार्गदर्शक नियमावली जारी केल्यानंतर केलेल्या विविध उपाययोजनांबाबत पंतप्रधानांना माहिती देण्यात आली. आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी प्रवासाबाबतची सुधारित नियमावली, कोविड-19 सार्वजनिक आरोग्य प्रतिसादासंदर्भात राज्ये/ केंद्रशासित प्रदेशांसोबत आढावा बैठका, लसीकरणाला गती, ऑक्सिजन पुरवठा उपकरणांना रुग्णालयांमध्ये बसवणे याविषयी पंतप्रधानांना कळवण्यात आले.
अधिकाऱ्यांनी केलेल्या या सादरीकरणानंतर पंतप्रधानांनी सर्व पातळ्यावर अतिशय उच्च पातळीची दक्षता राखण्याचे आणि सावधगिरी बाळगण्याचे निर्देश दिले.
संपूर्ण सरकार या दृष्टीकोनांतर्गत प्रतिबंध आणि व्यवस्थापनासाठी राज्यांना पाठबळ देण्यासाठी आणि पुढाकाराने कृती करण्यासाठी राज्यांसोबत समन्वयाने काम करण्याची त्यांनी सूचना केली. या महामारीचा सामना करण्यासाठी केंद्र सरकारचे धोरण सक्रिय, केंद्रित, सहयोगी आणि सहकार्याचे आहे आणि भविष्यात आपल्या सर्व कृती यावरच आधारित असतील, असे निर्देश पंतप्रधानांनी अधिकाऱ्यांना दिले.
विषाणूचा नवीन प्रकार लक्षात घेता आपण सतर्क आणि सावधान रहायला हवे, असे निर्देश पंतप्रधानांनी दिले. ते म्हणाले, महामारी विरुद्धचा लढा अद्याप संपलेला नाही आणि आजही कोविड सुरक्षित वर्तनाचे काटेकोर पालन करण्याची नितांत गरज आहे.
नवीन प्रकारामुळे उद्भवलेल्या कोणत्याही आव्हानाला तोंड देण्यासाठी जिल्हा स्तरापासून सुरुवात करून राज्यांमधील आरोग्य यंत्रणा बळकट असल्याची खात्री करून घेण्याचे निर्देश पंतप्रधानांनी अधिकाऱ्यांना दिले. ऑक्सिजन पुरवठा उपकरणांची उपलब्धता आणि ती पूर्णपणे कार्यरत आहेत याची राज्यांनी खात्री करून घेणे महत्त्वाचे आहे, असे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले. त्यांनी अधिकाऱ्यांना राज्यांसोबत नियमितपणे काम करण्याचे आणि आरोग्य पायाभूत सुविधांच्या विविध घटकांच्या तयारीच्या स्थितीचा आढावा घेण्याचे निर्देश दिले ज्यामध्ये मानव संसाधनांचे प्रशिक्षण आणि क्षमता निर्मिती रुग्णवाहिकांची वेळेवर उपलब्धता, संस्थात्मक विलगीकरणासाठी कोविड सुविधा कार्यान्वित करण्याची राज्यांची तयारी, आणि गृह अलगीकरणात असलेल्यांवर प्रभावी देखरेख , टेलि-मेडिसिन आणि टेलि-कन्सल्टेशनसाठी माहिती तंत्रज्ञान साधनांचा प्रभावी वापर करण्याचे निर्देशही त्यांनी अधिकाऱ्यांना दिले.
नव्याने उद्भवणाऱ्या क्लस्टर्स आणि हॉटस्पॉट्सवर सक्रिय, त्वरित आणि प्रभावी देखरेख ठेवणे सुरू ठेवावे, असे त्यांनी नमूद केले. INSACOG प्रयोगशाळांमध्ये जीनोम सिक्वेन्सिंगसाठी पॉझिटिव्ह नमुने तातडीने पाठविण्याचे निर्देश त्यांनी दिले. वेळेवर प्रतिबंध आणि उपचारांसाठी बाधितांची त्वरित ओळख सुनिश्चित करण्यासाठी चाचण्या वाढवण्याचे निर्देशही पंतप्रधानांनी दिले. संक्रमणाचा प्रसार रोखण्यासाठी प्रभावी संपर्क शोध कार्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे, असे ते म्हणाले. तसेच केंद्र सरकारने कमी लसीकरण, वाढती रुग्णसंख्या , अपुऱ्या आरोग्य विषयक पायाभूत सुविधा असलेल्या राज्यांमध्ये परिस्थिती सुधारण्यासाठी मदत करण्यासाठी पथके पाठवावीत असे निर्देशही पंतप्रधानांनी अधिकाऱ्यांना दिले.
देशभरातील लसीकरणातील प्रगतीची पंतप्रधानांना माहिती देण्यात आली. पात्र लोकसंख्येपैकी 88% पेक्षा जास्त लोकांना कोविड 19 प्रतिबंधक लसीची पहिली मात्रा देण्यात आली आहे तर पात्र लोकसंख्येपैकी 60% पेक्षा जास्त लोकांना दुसरी मात्रा देण्यात आल्याची माहिती त्यांना देण्यात आली. अधिकाऱ्यांनी पंतप्रधानांना माहिती दिली की लोकांना एकत्र जमवण्यासाठी आणि त्यांचे लसीकरण करण्यासाठी घरोघरी भेट देऊन राबवण्यात येत असलेल्या हर घर दस्तक लसीकरण मोहिमेमुळे लोकांना कोविड 19 प्रतिबंधक लस घेण्यास प्रेरित करणे शक्य झाले आहे आणि लसीकरणाला चालना देण्यात उत्साहवर्धक परिणाम दिसून आले आहेत. पंतप्रधानांनी निर्देश दिले की राज्यांनी पात्र लोकसंख्येचे कोविड 19 विरूद्ध पूर्ण लसीकरण करण्यात आले आहे याची खात्री करणे आणि लक्ष्य पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे.
या बैठकीला कॅबिनेट सचिव डॉ. व्ही.के.पॉल, सदस्य (आरोग्य),नीती आयोग , गृह सचिव ए.के.भल्ला, केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाचे सचिव राजेश भूषण, सचिव (फार्मास्युटिकल्स), जैवतंत्रज्ञान विभागाचे सचिव डॉ.राजेश गोखले, आयसीएमआरचे महासंचालक डॉ. बलराम भार्गव, आयुष सचिव वैद्य राजेश कोटेचा, नगरविकास सचिव दुर्गा शंकर मिश्रा, एनएचएचे मुख्य कार्यकारी अधिकारी आर.एस. शर्मा , केंद्र सरकारचे प्रमुख वैज्ञानिक सल्लागार प्रा. के. विजय राघवन आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
Jaydevi PS/S.Kane/S.Patil/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1784704)
Visitor Counter : 405
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Bengali
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam