संसदीय कामकाज मंत्रालय
संसदेचे हिवाळी अधिवेशन 2021 आज अनिश्चित काळासाठी संस्थगित झाले
अधिवेशनादरम्यान 24 दिवसांच्या कालावधीत 18 बैठका झाल्या
संसदेच्या दोन्ही सभागृहांनी 11 विधेयके मंजूर केली; 13 विधेयके- (12 लोकसभेत आणि 1 राज्यसभेत) मांडण्यात आली
लोकसभेत अंदाजे 82% आणि राज्यसभेत अंदाजे 48% कामकाज झाले
Posted On:
22 DEC 2021 4:24PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 22 डिसेंबर 2021
केंद्रीय संसदीय कार्य, कोळसा आणि खाण मंत्री, श्री प्रल्हाद जोशी, संसदीय कार्य राज्यमंत्री आणि सांस्कृतिक राज्यमंत्री श्री अर्जुन राम मेघवाल आणि संसदीय कार्य आणि परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री श्री व्ही. मुरलीधरन यांनी आज नवी दिल्ली येथे माध्यमांना संबोधित केले.
संसदेचे हिवाळी अधिवेशन, 2021 सोमवार, 29 नोव्हेंबर, 2021 रोजी सुरू झाले आणि गुरुवार, 23 डिसेंबर, 2021 रोजी संस्थगित होणार होते, ते बुधवार, 22 डिसेंबर 2021 रोजी अनिश्चित काळासाठी संस्थगित करण्यात आले. अत्यावश्यक सरकारी कामकाज पूर्ण झाल्याने अधिवेशन नियोजित 1 दिवसाआधीच तहकूब करण्यात आले. या अधिवेशनात 24 दिवसांच्या कालावधीत 18 बैठका झाल्या. अधिवेशनादरम्यान, 13 विधेयके (लोकसभेत 12 विधेयके आणि राज्यसभेत 1 विधेयक) मांडण्यात आली. संसदेच्या दोन्ही सभागृहांनी 11 विधेयके मंजूर केली.
2021- 22 या वर्षासाठीच्या अनुदानाच्या पुरवणी मागण्यांशी संबंधित विनियोजन विधेयक लोकसभेने मंजूर करुन, राज्यसभेत पाठवले होते. कलम 109(5) नुसार 14 दिवसांची मुदत संपल्यानंतर दोन्ही सभागृहांनी ते मंजूर केले आहे असे मानले जाईल.
संसदेच्या सभागृहांनी मांडलेल्या आणि पारित केलेल्या विधेयकांची संपूर्ण यादी परिशिष्टात जोडली आहे.
अध्यादेशाची जागा घेणारी तीन विधेयके:
केंद्रीय दक्षता आयोग (सुधारणा) अध्यादेश, 2021 (2021 चा 9), दिल्ली विशेष पोलिस आस्थापना (सुधारणा) अध्यादेश, 2021 (2021 चा 10) आणि अंमली औषधिद्रव्ये व मनोवर्ती पदार्थ विधिनिषिद्ध व्यापार प्रतिबंध अधिनियम, (2021 चा 8), राष्ट्रपतींनी 2021 हिवाळी अधिवेशनापूर्वी जारी केलेला अध्यादेश 2021 विचारात घेण्यात आला आणि सभागृहांनी मंजूर केला.
जैव विविधता (सुधारणा) विधेयक, 2021 हे एक विधेयक संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या संयुक्त समितीकडे पाठवण्यात आले आणि पाच विधेयके स्थायी समितीकडे पाठवली जात आहेत.
संसदेच्या सभागृहांनी मंजूर केलेल्या विधेयकांच्या जागी तीन अध्यादेशांसह काही महत्त्वाची विधेयके खालीलप्रमाणे आहेत:
- कृषी कायदे निरसन विधेयक, 2021
- धरण सुरक्षा विधेयक,2021
- सहाय्यक पुनरुत्पादक तंत्रज्ञान (नियमन) विधेयक, 2021.
- सरोगसी (नियमन) विधेयक, 2021.
- राष्ट्रीय औषधशास्त्र शिक्षण आणि संशोधन संस्था (सुधारणा) विधेयक
- उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश (वेतन आणि सेवा शर्ती) सुधारणा विधेयक, 2021.
- अंमली औषधिद्रव्ये व मनोवर्ती पदार्थ विधिनिषिद्ध व्यापार प्रतिबंध अधिनियम, 2021 .
- दिल्ली विशेष पोलिस आस्थापना (सुधारणा) अध्यादेश, 2021
- केंद्रीय दक्षता आयोग (सुधारणा) अध्यादेश
- निवडणूक कायदे (दुरुस्ती) विधेयक 2021
लोकसभेत नियम 193 अंतर्गत दोन अल्पकालीन चर्चा झाल्या:
- कोविड-19 महामारी आणि त्याच्याशी संबंधित विविध पैलू, आणि
- हवामान बदल.
राज्यसभेत देशातील कोविड-19 विषाणूच्या ओमायक्रॉन प्रकारामुळे उद्भवलेल्या परिस्थितीवर चर्चा झाली.
लोकसभेत अंदाजे 82% आणि राज्यसभेत अंदाजे 48% कामकाज झाले.
* * *
Jaydevi PS/V.Ghode/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1784216)
Visitor Counter : 393