पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाराणसी इथे काशी विश्वनाथ धामचे केले उद्घाटन


विश्वनाथ धाम म्हणजे केवळ भव्य इमारत नव्हे तर भारताच्या सनातन संस्कृतीचे ते प्रतिक आहे.आपल्या आध्यात्मिक आत्म्याचे, भारताच्या प्राचीन काळाचे, परंपरेचे, भारताच्या चैतन्याचे आणि गतिमानतेचे हे प्रतिक - पंतप्रधान

काशी विश्वनाथ धामचे बांधकाम करणाऱ्या मजुरांसमवेत घेतले भोजन आणि त्यांचा केला सत्कार

Posted On: 13 DEC 2021 5:10PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 13 डिसेंबर 2021

 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज वाराणसी इथे काशी विश्वनाथ धामचे उद्घाटन केले. काशी इथे कालभैरव मंदिर आणि काशी विश्वनाथ धाम इथे त्यांनी प्रार्थना केली. गंगा नदीवर त्यांनी स्नानही केले.

नगर कोतवाल, भगवान काल भैरव यांच्या चरणी नमन करून पंतप्रधानांनी आपल्या संबोधनाला सुरवात केली. यांच्या आशीर्वादाशिवाय काहीही विशेष घडू शकत नाही असे पंतप्रधान म्हणाले. पंतप्रधानांनी भगवानाकडे देशवासीयांसाठी आशीर्वादाची प्रार्थना केली.काशी नगरीत एखाद्याने प्रवेश करताच ती व्यक्ती सर्व बंधनातून मुक्त होते असे त्यांनी पुरणाचा दाखला देऊन सांगितले. आपण इथे प्रवेश करताच भगवान विश्वेश्वराचे आशीर्वाद, एक  अलौकिक  चैतन्य आपल्या अंतरात्म्याला जागृत करते. विश्वनाथ धामचे  हे  संपूर्ण नवे संकुल म्हणजे केवळ भव्य इमारत नव्हे तर आपल्या भारताच्या सनातन संस्कृतीचे ते प्रतिक आहे. आपल्या आध्यात्मिक आत्म्याचे ते प्रतिक आहे. भारताच्या प्राचीनतेचे, परंपरेचे, भारताच्या चैतन्याचे आणि गतिमानतेचे ते प्रतिक असल्याचे पंतप्रधान  म्हणाले. इथे आल्यानंतर केवळ श्रद्धा  नव्हे तर  प्राचीन वैभवाचीही  प्रचीती आपल्याला जाणवेल. प्राचीन आणि नाविन्यता यांचा अनोखा संगम आपल्याला दिसेल. प्राचीनतेमधली  प्रेरणा भविष्याला कशी दिशा देते याची प्रचीती आपल्याला विश्वनाथ धाम संकुलात येत असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले.

याआधी केवळ 3000 चौरस फुट असलेला मंदिर परिसर आता पाच लाख चौरस फुटापर्यंत विस्तारला आहे. आता 50000 - 75000  भाविक मंदिर आणि मंदिर परिसराला भेट देऊ शकतात. प्रथम गंगा माता दर्शन मग गंगा नदीवर स्नान आणि तेथून थेट विश्वनाथ धाम असे त्यांनी सांगितले.

काशी नगरीचे महात्म्य वर्णन करताना काशी अविनाशी आणि भगवान शिवांच्या छायाछत्राखाली असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. या भव्य संकुलाचे बांधकाम करणाऱ्या प्रत्येक मजुराचे त्यांनी आभार मानले. कोरोना मुळेही त्यांनी कामात खंड पडू दिला नाही. त्यांनी मजुरांची भेट घेऊन त्यांचा सत्कार केला. धाम बांधणीसाठी काम करणाऱ्या मजुरांसमवेत पंतप्रधानांनी भोजन घेतले. कारागीर, बांधकामाशी निगडीत लोक, प्रशासन आणि  इथे  राहणाऱ्या कुटुंबांचीही त्यांनी प्रशंसा केली. काशी विश्वनाथ धाम प्रकल्प पूर्णत्वाला नेण्यासाठी अविरत परिश्रम घेणाऱ्या उत्तर प्रदेश सरकार, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचेही पंतप्रधानांनी अभिनंदन केले.  

आक्रमणकर्त्यांनी या शहरावर आक्रमण केले, नष्ट करण्याचा प्रयत्न केला. औरंगजेबाचे अत्याचार आणि दहशतीचे हे शहर साक्षीदार आहे. ज्याने तलवारीच्या धाकावर संस्कृती बदलण्याचा, कट्टरतेखाली संस्कृती चिरडण्याचा प्रयत्न केला. मात्र या देशाची भूमी ही उर्वरित जगापेक्षा आगळी आहे.इथे  जर औरंगजेब आला  असेल तर इथे महाराज शिवाजीही घडले आहेत. जर कोणी सालार मसूद आला तर राजा सुहेलदेव सारखे शूर योद्धे भारताच्या एकतेच्या सामर्थ्याची जाणीव करून देतात.अगदी ब्रिटीश काळातही हेस्टिंगच्या बाबतीत काय घडले होते  हे काशीची जनता जाणते असे पंतप्रधान म्हणाले.

पंतप्रधानांनी काशीची शोभा आणि महत्त्व यांचे वर्णन केले. काशी ही केवळ शब्दांची गोष्ट नसून ती संवेदनांची निर्मिती आहे, असे मत त्यांनी नोंदवले. काशी ती आहे - जिथे जागृती हेच जीवन आहे; काशी ती आहे - जिथे मृत्यू देखील एक उत्सव आहे; काशी ती आहे - जिथे सत्य ही संस्कृती आहे; काशी म्हणजे आपुलकीची परंपरा आहे. ते पुढे म्हणाले की, वाराणसी हे ते शहर आहे जिथून जगद्गुरू शंकराचार्यांनी श्री डोम राजाच्या पवित्रतेतून प्रेरणा घेतली आणि देशाला एकतेच्या धाग्याने बांधण्याचा संकल्प केला. हे ते ठिकाण आहे जिथे गोस्वामी तुलसीदासांनी भगवान शंकराच्या प्रेरणेने रामचरितमानस सारखी अलौकिक रचनेची निर्मिती केली. पंतप्रधान पुढे म्हणाले की भगवान बुद्धांचे ज्ञान जगासमोर सारनाथ येथे प्रकट झाले. समाजाच्या उन्नतीसाठी कबीरदासांसारखे ऋषी इथे अवतरले. समाजाला एकत्र आणायचे असेल तर ही काशी संत रैदासांच्या भक्तीचे केंद्र बनले आहे, असेही पंतप्रधान म्हणाले.

पंतप्रधान म्हणाले की, काशी ही चार जैन तीर्थंकरांची भूमी आहे, अहिंसा आणि तपस्येचे प्रतीक आहे. राजा हरिश्चंद्राच्या सचोटीपासून वल्लभाचार्य, रामानंद जी यांच्या ज्ञानापर्यंत. चैतन्य महाप्रभू, समर्थ गुरु रामदासांपासून स्वामी विवेकानंद, मदन मोहन मालवीय यांच्यापर्यंत. काशीची पवित्र भूमी म्हणजे ऋषी, आचार्य यांच्यासारख्या अगणित लोकांचे निवास आहे. छत्रपती शिवाजी महाराज इथे आले, अशी टिप्पणी पंतप्रधानांनी केली. राणी लक्ष्मीबाईंपासून ते चंद्रशेखर आझादांपर्यंत अनेक लढवय्यांची काशी ही कर्मभूमी आहे. भारतेंदू हरिश्चंद्र, जयशंकर प्रसाद, मुन्शी प्रेमचंद, पंडित रविशंकर आणि बिस्मिल्ला खान यांसारखे प्रतिभावंत या महान शहरातील आहेत, असे ते म्हणाले.

काशी विश्वनाथ धामचे समर्पण भारताला निर्णायक दिशा देईल आणि उज्ज्वल भविष्याकडे नेईल, असे पंतप्रधान म्हणाले. हे संकुल आपल्या कर्तृत्वाचा आणि कर्तव्याचा साक्षीदार आहे. दृढनिश्चय आणि एकत्रित विचाराने काहीही अशक्य नाही. पंतप्रधान म्हणाले, “अकल्पनीय गोष्टी सत्यात उतरवण्याची ताकद भारतीयांमध्ये आहे. आम्हाला तपस्या माहित आहे, तपश्चर्या माहित आहे आणि देशासाठी रात्रंदिवस कसे घालवायचे हे आम्हाला माहित आहे. आव्हान कितीही मोठे असले तरी आपण भारतीय मिळून त्याचा पराभव करू शकतो.”

आजचा भारत आपला गमावलेला वारसा पुन्हा जिवंत करत असल्याचे पंतप्रधान म्हणाले. येथे काशीमध्ये माता अन्नपूर्णा स्वतः वास करते. काशीतून चोरीला गेलेली अन्नपूर्णा मातेची मूर्ती आता शतकाच्या प्रतीक्षेनंतर पुन्हा काशीत स्थापन झाल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला.

त्यांच्यासाठी देव माणसांच्या रूपात येतो आणि त्यांच्यासाठी प्रत्येक भारतीय देवाचा अंश आहे, असे पंतप्रधान म्हणाले. त्यांनी देशासाठी लोकांना तीन संकल्प घेण्यास सांगितले - स्वच्छता, निर्मिती आणि आत्मनिर्भर भारतासाठी निरंतर प्रयत्न.

पंतप्रधानांनी स्वच्छतेला जीवनाचा मार्ग म्हटले आणि या उपक्रमात, विशेषत: नमामि गंगे अभियानामध्ये लोकसहभागाचे आवाहन केले. गुलामगिरीच्या प्रदीर्घ काळाने आमचा आत्मविश्वास अशा प्रकारे तोडला की आमचा स्वतःच्या निर्मितीवरचा विश्वास उडाला असे पंतप्रधान म्हणाले. आज या हजार वर्षांची परंपरा असलेल्या काशीतून मी प्रत्येक देशवासीयाला आवाहन करतो, पूर्ण आत्मविश्वासाने निर्मिती करा, नाविन्यपूर्ण गोष्टी करा, नाविन्यपूर्ण मार्गाने करा.

पंतप्रधान म्हणाले की, स्वावलंबी भारतासाठी आपले प्रयत्न वाढवण्याचा तिसरा संकल्प आज घेण्याची गरज आहे. भारत स्वातंत्र्याची शंभर वर्षे साजरी करेल तेव्हा भारत कसा असेल, यासाठी आपल्याला या ‘अमृत काळा’मध्ये, स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षी काम करावे लागेल, असे पंतप्रधानांनी भाषणाच्या समारोप प्रसंगी सांगितले.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


* * *

M.Chopade/Nilima/Vasanti/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1780982) Visitor Counter : 253