पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

लोकशाही शिखर परिषदेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले राष्ट्रीय निवेदन

Posted On: 10 DEC 2021 9:53PM by PIB Mumbai

 

महामहीम,

नमस्कार!

या शिखर परिषदेमध्ये जगातल्या सर्वात मोठ्या लोकशाहीचे प्रतिनिधित्व करताना मला अभिमान वाटतो. लोकशाही म्हणजे जणू आमचा आत्मा असून तो आमच्या संस्कृतीचा  जतन केलेला अविभाज्य घटक आहे. लिच्छावी आणि शाक्य यांच्यासारख्या नगरांमध्ये 2500 वर्षांपूर्वी लोकांच्या द्वारे निवडून आलेली प्रजासत्ताक व्यवस्था भारतात विकसित झाली होती. अशाच प्रकारची लोकशाही संस्कृती 10 व्या शतकातल्या उत्तरामेरूर’’ शिलालेखामध्ये दिसून आली आहे. त्यामुळे लोकशाहीच्या सहभागाची तत्वे संहिताबद्ध झाल्याचे स्पष्ट होते. अशा लोकशाहीच्या भावनेमुळे आणि ती भावना जतन करण्यासाठी केलेल्या आचरणामुळे  प्राचीन भारत सर्वात समृद्ध बनला होता. अनेक शतकांच्या वसाहतवादी राजवटीला भारतीयांच्या लोकशाही भावनेला दाबून टाकता आले नाही. भारताला मिळालेल्या स्वातंत्र्यामुळे लोकशाही मार्गाने पुन्हा एकदा अभिव्यक्ती करणे शक्य झाले. आणि गेल्या 75 वर्षांमध्ये तर लोकशाही राष्ट्र उभारणीची एक अतुलनीय कथा निर्माण झाली आहे.

ही कथा सर्व क्षेत्रातल्या अभूतपूर्व सामाजिक- आर्थिक समावेशाची आहे. आरोग्य, शिक्षण आणि मानवाच्या कल्याणामध्ये अकल्पनीय प्रमाणामध्ये निरंतर होत असलेल्या सुधारणांची कथा आहे. भारताच्या या कथेने संपूर्ण विश्वाला एक स्पष्ट संदेश दिला आहे. तो म्हणजे, लोकशाहीच सर्व काही देवू शकते, लोकशाहीनेच सगळे काही दिले आहे आणि यापुढेही लोकशाहीच निरंतर सर्व काही देत राहील.

 

सन्माननीय महोदय,

बहुपक्षीय निवडणुका, स्वतंत्र न्यायव्यवस्था आणि मुक्त प्रसार माध्यमे यांच्या सारखी संरचनात्मक वैशिष्ट्ये ही लोकशाहीची महत्वाची साधने आहेत. तथापि, लोकशाहीचे मूलभूत सामर्थ्यअगदी मूळ आत्मा, चैतन्य म्हणजे आपले नागरिक आहेत आणि आपल्या समाजामध्ये असलेली भावना तसेच नैतिकता आहे. लोकशाही काही केवळ लोकांची, लोकांकडून आणि लोकांसाठी नाही तर लोकांसोबत, लोकांमध्येही असते.

 

सन्माननीय महोदय,

जगातल्या वेगवेगळ्या भागांमध्ये लोकशाही विकासासाठी विविध मार्गांचा अवलंब केला गेला आहे. आपल्याला एकमेकांकडून बरेच काही शिकण्यासारखे आहे. आपल्या सर्वांनाच लोकशाही पद्धती आणि कार्यप्रणालीमध्ये सातत्याने सुधारणा घडवून आणण्याची गरज आहे. आणि आपण सर्वांनी समावेशकता, पारदर्शकता, मानवी प्रतिष्ठा, प्रतिसादात्मक तक्रार निवारण आणि सत्तेचे विकेंद्रीकरण करण्याच्या कार्याचा विस्तार सातत्याने केला पाहिजे.

या संदर्भामध्ये, लोकशाहीत सहकार्य वृद्धिंगत करण्यासाठी आजची विधानसभा एक उत्तम व्यासपीठ प्रदान करीत आहे. मुक्त आणि निःष्पक्ष निवडणुका व्हाव्यात यासाठी आणि अभिनव डिजिटल पर्यायाव्दारे शासनाच्या सर्व विभागांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी भारताला आपले कौशल्य सामायिक करताना आनंद वाटतो. समाज माध्यमे आणि क्रिप्टो-करन्सी यांच्यासारख्या नवीन तंत्रज्ञानासाठी आपण संयुक्तपणे वैश्विक मापदंड तयार करण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे त्यांचा वापर लोकशाहीला अधिक सशक्त बनविण्यासाठी  होऊ शकेल. या नवीन गोष्टींमुळे लोकशाही कमकुवत होणार नाही, हे आपण पाहिले पाहिजे.

 

सन्माननीय महोदय,

आपण सर्वांनी एकत्रितपणे काम करून, लोकशाहीमध्येच आपल्या नागरिकांच्या आकांक्षांची पूर्तता करू शकतो आणि मानवतेच्या दृष्टिकोनातून लोकशाही भावनेने काम करू शकतो. या उदात्त प्रयत्नांसाठी लोकशाहीवादी भारत सर्वांना सहकार्य करण्यासाठी सदैव सज्ज आहे.

धन्यवाद! खूप खूप धन्यवाद!

***

S.Patil/S.Bedekar/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1780352) Visitor Counter : 372