पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधानांच्या हस्ते उत्तर प्रदेशात गोरखपूरमधील विविध विकास प्रकल्पांचे लोकार्पण


एम्स (एआयआयएमएस), खत प्रकल्प आणि आयसीएमआर केंद्राचे उद्‌घाटन

दुहेरी इंजिनच्या सरकारने विकासकामांचा वेग दुप्पट केला: पंतप्रधान

"वंचित आणि शोषितांचा विचार करणारे सरकार कठोर परिश्रम करते आणि परिणामही देते"

"आजचा कार्यक्रम काहीही अशक्य नाही अशा नवभारताच्या दृढनिश्चयाचा पुरावा आहे "

ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी केलेल्या कामाबद्दल पंतप्रधानांनी उत्तर प्रदेश सरकारचे केले कौतुक

Posted On: 07 DEC 2021 7:15PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 7 डिसेंबर 2021

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशातील गोरखपूर येथे विविध विकास प्रकल्प राष्ट्राला समर्पित केले.

अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (एम्स) आणि खत प्रकल्पाचे उद्‌घाटन तसेच गोरखपूरमध्ये भारतीय वैद्यकीय सशोधन परिषदेच्या (आयसीएमआर) प्रादेशिक वैद्यकीय संशोधन केंद्राच्या नवीन इमारतीसाठी पंतप्रधानांनी उत्तर प्रदेशातील जनतेचे अभिनंदन केले.  एम्स आणि खतनिर्मिती प्रकल्पाची पायाभरणी 5 वर्षांपूर्वी केली होती आणि आज उद्‌घाटन केल्याचे सांगत, एकदा का प्रकल्प हाती घेतले की ते पूर्ण करण्याची सरकारची कार्यशैली याद्वारे अधोरेखित होते असे ते म्हणाले.

दुहेरी इंजिनाचे सरकार असते तेव्हा विकासकामांच्या अंमलबजावणीचा वेगही दुप्पट होतो, अशी टीपण्णी पंतप्रधानांनी केली. ते म्हणाले, जेव्हा काम चांगल्या हेतूने केले जाते, तेव्हा संकटेही अडथळा ठरू शकत नाहीत.  जेव्हा गरीब, असुरक्षित आणि वंचितांची काळजी घेणारे सरकार असते तेव्हा ते कठोर परिश्रम करते आणि त्यांना सोबत घेऊन परिणामही दर्शवते. नवभारताचा निर्धार केला जातो तेव्हा कोणतीही गोष्ट अशक्य नसते याचाच पुरावा हा आजचा कार्यक्रम असल्याचे ते म्हणाले.

बहुआयामी दृष्टिकोनातून, सरकारने युरियाचे 100% कडुलिंब लेपन करुन युरियाचा गैरवापर थांबवला. कोट्यवधी शेतकऱ्यांना मृदा आरोग्य कार्ड दिले जात आहेत, जेणेकरून ते त्यांच्या शेतीसाठी कोणत्या प्रकारचे खत आवश्यक आहे हे ठरवू शकतील.  युरियाचे उत्पादन वाढवण्यावर सरकारने भर दिला असल्याचे पंतप्रधान म्हणाले.  उत्पादन वाढवण्यासाठी बंद खत प्रकल्प देखील पुन्हा उघडण्यास भाग पाडले गेले.  देशाच्या विविध भागात 5 खत प्रकल्प पूर्ण झाल्यामुळे देशात 60 लाख टन युरिया उपलब्ध होणार असल्याची माहिती पंतप्रधानांनी दिली.

नजीकच्या काळात ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी केलेल्या अभूतपूर्व कामाबद्दल पंतप्रधानांनी उत्तर प्रदेश सरकारचे कौतुक केले.  ऊस उत्पादक शेतकऱ्यांना 300 रुपयांपर्यंतच्या मोबदला वाढीबद्दल आणि गेल्या सरकारांनी 10 वर्षांच्या काळात जेवढा मोबदला ऊस  उत्पादक शेतकऱ्यांना दिला होता तेवढा आपल्या चार वर्षांच्या कार्यकाळात दिल्याबद्दल त्यांनी सरकारचे कौतुक केले.

स्वातंत्र्य मिळाल्यापासून या शतकाच्या सुरूवातीपर्यंत देशात एकच एम्स होती.  माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी आणखी 6 एम्संना मान्यता दिली होती, गेल्या 7 वर्षांत 16 नवीन एम्स बांधण्याचे काम देशभरात सुरू आहे असे पंतप्रधान म्हणाले. देशातील प्रत्येक जिल्ह्यात किमान एक वैद्यकीय महाविद्यालय असले पाहिजे, हे त्यांच्या सरकारचे उद्दिष्ट त्यांनी जाहीर केले.

या भागातील शेतकऱ्यांसाठी आणि रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी गोरखपूरमधील खत प्रकल्पाचे महत्त्व सर्वांनाच ठाऊक असल्याचे पंतप्रधान म्हणाले.  ते म्हणाले की, प्रकल्पाचे महत्त्व असूनही, पूर्वीच्या सरकारांनी ते पुन्हा सुरू करण्यात रस दाखवला नाही.  गोरखपूरमध्ये एम्सची मागणी वर्षानुवर्षे होत असल्याचे सर्वांनाच माहीत होते.  पण 2017 पूर्वी सरकार चालवणाऱ्यांनी गोरखपूरमध्ये एम्सच्या उभारणीसाठी जमीन उपलब्ध करून देण्याबाबत प्रतिकूल कारणे देण्याचे सर्व प्रकार केले.  या भागात जपानी एन्सेफलायटीसच्या रुग्णांमधे लक्षणीय घट झाल्याचे आणि वैद्यकीय पायाभूत सुविधांमध्ये वाढ झाल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले.  "एम्स आणि आसीएमआर केंद्रामुळे, जपानी एन्सेफलायटीस विरुद्धच्या लढ्याला नवीन बळ मिळेल", असे ते म्हणाले.

अधिकाराच्या प्रदर्शनाचे राजकारण, सत्तेचे राजकारण, घोटाळे आणि माफियांनी भूतकाळात राज्यातील जनतेचा छळ केला, अशी टीका पंतप्रधानांनी केली.  अशा प्रवृत्तीपासून सावध राहण्याचे आवाहन त्यांनी केले.

पंतप्रधान म्हणाले की आज आमच्या सरकारने गरिबांसाठी सरकारी गोदामे उघडली आहेत आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री प्रत्येक घरात अन्न पोहोचवण्यात व्यस्त आहेत. उत्तर प्रदेशातील सुमारे 15 कोटी लोकांना त्याचा लाभ मिळत आहे असेही ते पुढे म्हणाले.  अलीकडेच, पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेला होळीच्या पुढेही मुदतवाढ देण्यात आली आहे.  यापूर्वीच्या सरकारांनी गुन्हेगारांना संरक्षण देऊन उत्तर प्रदेशचे नाव बदनाम केले होते. आज माफिया तुरुंगात आहेत आणि गुंतवणूकदार उत्तर प्रदेशात मुक्तपणे गुंतवणूक करत आहेत. दुहेरी इंजिनचा हा दुहेरी विकास आहे.  त्यामुळे उत्तर प्रदेशचा दुहेरी इंजिन सरकारवर विश्वास आहे, असेही ते म्हणाले.

 

 

R.Aghor/V.Ghode/P.Malandkar

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1778993) Visitor Counter : 228