आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

कोविड -19 संदर्भात अद्ययावत माहिती


जगात नव्या रूपातला SARS-CoV-2 (ओमिक्रॉन ) आढळल्याच्या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय प्रवाश्यांसाठी भारताने जारी केल्या सुधारित मार्गदर्शक सूचना

जोखमीचे देश म्हणून वर्गवारी केलेल्या देशांमधून भारतात येणाऱ्या सर्व प्रवाश्यांना (कोविड-19 लसीकरणाची कोणतीही स्थिती असली तरी) भारतात आल्यानंतर विमानतळावर आगमनोत्तर कोविड-19 चाचणी अनिवार्य असल्याचे मार्गदर्शक सूचनांमध्ये नमूद

Posted On: 29 NOV 2021 3:35PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 29 नोव्‍हेंबर 2021 

 

कोविड-19 महामारीच्या व्यवस्थापनासाठी तत्पर दृष्टीकोन जारी राखत केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने 28 नोव्हेंबर 2021ला ‘आंतरराष्ट्रीय प्रवाश्यांच्या आगमनाबाबत’ सुधारित मार्गदर्शक सूचना जारी केल्या. जोखमीचे देश म्हणून वर्गवारी केलेल्या देशांमधून भारतात येणाऱ्या सर्व प्रवाश्यांना (कोविड-19 लसीकरणाची कोणतीही स्थिती असली तरी) भारतात आल्यानंतर विमानतळावर आगमनोत्तर कोविड-19 चाचणी अनिवार्य असून,  निघण्यापूर्वी 72 तास आधी केलेल्या कोविड-19 चाचणी व्यतिरिक्त ही चाचणी करायची असल्याचे मार्गदर्शक सूचनांमध्ये नमूद करण्यात आले आहे. या चाचणीत प्रवासी पॉझीटीव्ह आढळल्यास त्यांचे विलगीकरण करून वैद्यकीय व्यवस्थापन नियमानुसार पुढील कार्यवाही होईल. त्याचबरोबर जनुकीय क्रम निर्धारणासाठी नमुने घेण्यात येतील. चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आलेले प्रवासी विमानतळ सोडून जाऊ शकतात मात्र त्यांना सात दिवस गृह विलगीकरणात राहावे लागेल, त्यानंतर भारतात आल्याच्या आठव्या दिवशी पुन्हा चाचणी करावी लागेल आणि 7 दिवस स्व देखरेख ठेवावी लागेल.

याशिवाय ओमिक्रॉन विषाणू आढळल्याचे वृत्त असणाऱ्या  देशांची वाढती संख्या लक्षात घेता, जोखमीचे देश अशी वर्गवारी नसलेल्या देशामधून आलेल्या प्रवाश्यांपैकी कोणत्याही 5% प्रवाश्यांची विमानतळावर कोविड -19 चाचणी करण्यात येईल असे सध्याच्या मार्गदर्शक सूचनांमध्ये म्हटले आहे.

विमानतळावर, गृह विलगीकरणात कोविड-19 पॉझीटीव्ह आढळलेल्या सर्वांचे नमुने विवक्षित इन्साकॉग नेटवर्क प्रयोगशाळेत, ओमिक्रॉनसह  SARS-CoV-2 चे अस्तित्व ओळखण्यासाठी पाठवले जातील.

B.1.1.529 (ओमिक्रॉन) ची पहिली नोंद 24 नोव्हेंबर 2021 मध्ये जागतिक आरोग्य संघटनेकडे झाली. SARS-CoV-2 विषाणू उत्पारीवर्तना बाबत संघटनेच्या  तांत्रिक सल्लागार गटाने याचे वर्गीकरण चिंताजनक (व्हीओसी) असे केले आहे. या  स्वरुपात मोठ्या प्रमाणात उत्परिवर्तन झाल्याचे लक्षात घेऊन आणि यामुळे हा विषाणू अधिक संसर्गजन्य होणार असल्याचे लक्षात घेऊन ही वर्गवारी करण्यात आली आहे. यासंदर्भातल्या परिस्थितीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालय लक्ष ठेवून आहे.

राज्यांनी आंतरराष्ट्रीय प्रवाश्यांवर काटेकोर लक्ष ठेवावे, चाचण्या वाढवाव्यात, कोविड-19 हॉटस्पॉट वर बारकाईने लक्ष ठेवावे, जनुकीय क्रम निर्धारणासाठी नमुने घेण्यासह पायाभूत सुविधांमध्ये वृद्धी सुनिश्चित करावी अशा सूचना राज्यांना देण्यात आल्या आहेत. 

महामारीच्या उत्परिवर्तन होणाऱ्या स्वरूपाकडे केंद्रीय आरोग्य मंत्रालय बारकाईने लक्ष ठेवून आहे. सामुदायिक स्तरावर कोविड-19 व्यवस्थापना अंतर्गत कोविडला प्रतिबंध करणारे वर्तन (मास्कचा वापर, दोन व्यक्तींमध्ये सुयोग्य अंतर, हातांची स्वच्छता, कोविड-19 प्रतिबंधक लस, यावरच भर देण्यात आला आहे.

नव्या मार्गदर्शक सूचना 1 डिसेंबर  2021 पासून अमलात येतील. तपशीलवार मार्गदर्शक सूचना इथे उपलब्ध आहेत.

(https://www.mohfw.gov.in/pdf/GuidelinesforInternationalarrival28112021.pdf

 

* * *

S.Tupe/N.Chitale/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1776126) Visitor Counter : 501