आदिवासी विकास मंत्रालय
केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री, श्री अमित शाह उद्या मणिपूरच्या तामेंगलाँग जिल्ह्यातील लुआंगकाओ गावात राणी गैडिनलियू आदिवासी स्वातंत्र्य सैनिक संग्रहालयाची बसविणार कोनशीला
प्रविष्टि तिथि:
21 NOV 2021 7:33PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 21 नोव्हेंबर 2021
केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री, श्री अमित शाह मणीपूरचे मुख्यमंत्री नॉन्ग्थोबम आणि केंद्रीय आदिवासी व्यवहार मंत्री अर्जुन मुंडा आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत उद्या इंफाळच्या पूर्वेच्या तामेंगलाँग जिल्ह्यातील लुआंगकाओ गावातील सिटी कन्व्हेन्शन सेंटर, येथील राणी गैडिनलियू आदिवासी स्वातंत्र्यसैनिक संग्रहालयाची , दृकश्राव्य माध्यमाद्वारे कोनशीला बसवणार आहेत.
या प्रकल्पाला भारत सरकारच्या आदिवासी कार्य मंत्रालयाद्वारे मंजूरी देण्यात आली असून याची किंमत अंदाजे 15 कोटी रुपये आहे. राज्य मंत्रिमंडळाने तामेंगलाँग जिल्ह्यातील लुआंगकाओ गावात हे संग्रहालय स्थापन करण्याचा निर्णय घेतला होता, जे प्रख्यात स्वातंत्र्यसैनिक राणी गैडिनलिऊ यांचे जन्मस्थान आहे आणि या संग्रहालयाला राणी गैडिनलियू आदिवासी स्वातंत्र्य सैनिक संग्रहालय असे नाव देण्याचे ठरविण्यात आले. आदिवासी कार्य मंत्रालय 15 नोव्हेंबरपासून सुरू आझादी का अमृत महोत्सव सप्ताह साजरा करत आहे, ज्याचा आरंभ पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी आदिवासी (जनजाती) गौरव दिन म्हणून केला होता.
राणी गैडिनलिउ यांचा जन्म 26 जानेवारी 1915 रोजी मणिपूर राज्यातील तामेंगलाँग जिल्ह्यातील ताओसेम उपविभागातील लुआंगकाओ गावात झाला होता. वयाच्या 13 व्या वर्षी त्यांचा जडोनांग यांच्याशी परिचय झाला आणि त्यांच्या सामाजिक, धार्मिक आणि राजकीय चळवळीत त्या लेफ्टनंट बनल्या. 1926 किंवा 1927 च्या सुमारास जडोनांगसोबतच्या चार वर्षांच्या सहवासामुळे त्या ब्रिटिशांविरुद्ध लढण्यास सज्ज झाल्या. जडोनांग हुतात्मा झाल्यानंतर, गैडिनलियू यांनी चळवळीचे नेतृत्व हाती घेतले. जडोनांगच्या हौतात्म्यानंतर गैडिनलियू ने ब्रिटिशांविरुद्ध कडवे बंड सुरू केले, ज्यामुळे ब्रिटीशांनी तिला 14 वर्षे तुरुंगवासाची सजा दिली आणि अखेर 1947 मध्ये तिची सुटका झाली.
ब्रिटिशांविरुद्धच्या दिलेल्या कडव्या संघर्षामुळे तिला “राणी” असे संबोधले जाऊ लागले. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर तिची तुरा तुरुंगातून सुटका झाली. 17 फेब्रुवारी 1993 रोजी तिच्या मूळ गावी लुआंगकाओ येथे राणी गैडिनलिउ हिचे निधन झाले.
तिला 1972 मध्ये ताम्रपत्र, 1982 मध्ये पद्मभूषण, 1983 मध्ये विवेकानंद सेवा सन्मान, 1991 मध्ये स्त्री शक्ती पुरस्कार आणि मरणोत्तर 1996 मध्ये भगवान बिरसा मुंडा पुरस्कार अशा विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. भारत सरकारने 1996 मध्ये राणी गैडिनलियू यांच्या स्मरणार्थ टपाल तिकीट जारी केले. 2015 मध्ये तिच्या जन्मशताब्दी समारंभाच्या निमित्ताने भारताच्या पंतप्रधानांनी शंभर रुपयांचे एक नाणे आणि पाच रुपयांचे चलनी नाणे जारी केले. भारतीय तटरक्षक दलाने 19 ऑक्टोबर, 2016 रोजी "आयसीजीएस (ICGS) राणी गैडिनलिउ” हे जलद गस्ती जहाज नामकरण स्विकारून नियुक्त केले.
या प्रकल्पामुळे मणिपूरमध्ये पर्यटन विकास होऊन सामाजिक-आर्थिक वृध्दी होईल आणि पर्यटन क्षेत्राला वाव निर्माण होईल अशी आशा आहे.
G.Chippalkatti/S.Patgaonkar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1773777)
आगंतुक पटल : 322