माहिती आणि प्रसारण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय मंत्री अनुराग सिंह ठाकूर यांच्या हस्ते इफ्फी-52 मधील भारतीय पॅनोरामा विभागाचे उद्घाटन

आशय उत्तम असेल तर भारतीय चित्रपट जागतिक प्रेक्षकांपर्यंत सहज पोहोचू शकतात- अनुराग सिंह ठाकूर

चित्रपट, आपल्या आकांक्षा आणि स्वप्नांचे प्रतिबिंब: हिमाचल प्रदेशचे राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर

सेमखोर: इफ्फीमध्ये प्रदर्शित होणारा दिमासा भाषेतील पहिलाच चित्रपट

‘वेद- द व्हीजनरी’ हा उद्घाटनाचा चित्रपट (कथा-बाह्य-भारतीय पॅनोरामा) चित्रपट निर्मात्यांचा संघर्ष आणि चिकाटीचे दर्शन घडवणारा

Posted On: 21 NOV 2021 4:52PM by PIB Mumbai

पणजी, 21 नोव्‍हेंबर 2021 

 

भारताच्या कानाकोपऱ्यातून निवडलेल्या कथांचा पेटारा, आपल्यासमोर मोठ्या पडद्यावर प्रभावीपणे उघडला जाईल, हे वचन पूर्ण करण्यास कटिबद्ध असलेल्या भारतीय पॅनोरामा विभागाचे आज गोव्यात सुरु असलेल्या 52 व्या इफ्फीमध्ये उद्घाटन झाले.

केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग सिंह ठाकूर यांच्या हस्ते 52 व्या इफ्फीदरम्यान हे उद्घाटन झाले. यावेळी हिमाचल प्रदेशचे राज्यपाल विश्वनाथ आर्लेकर देखील उपस्थित होते.  

उद्घाटनाच्या समारंभात या इफफीमध्ये भारतीय पॅनोरामा विभागात अधिकृतरित्या निवडल्या गेलेल्या 24 फीचर व्यावसायिक कथा आधारित चित्रपट)  आणि 20 नॉन फीचर चित्रपटांची ओळख करुन देण्यात आली.

हिमाचल प्रदेशचे राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर आणि केंद्रीय मंत्र्यांच्या हस्ते, यावेळी या विभागातील उद्घाटनाचे चित्रपट, सेमखोर (फीचर) आणि वेद- द व्हीजनरी (नॉन फीचर) या दोन्हीचे   चित्रपट निर्माते, कलाकार आणि तंत्रज्ञांचा सत्कार करण्यात आला. तसेच, महोत्सव सहभागाचे प्रमाणपत्रही देण्यात आले.

यावेळी चित्रपट निर्मात्यांचे अभिनंदन करतांना, केंद्रीय मंत्री म्हणाले- “ आपण सर्वांनी देशाच्या कानाकोपऱ्यातून, दुर्गम भागातून, कथा मिळवण्यासाठी प्रयत्न आणि संघर्ष केला आहे. आज चित्रपटाचा आशय सर्वात महत्वाचा आहे, आणि तुमच्याकडे जर दर्जेदार आशय आणि भक्कम कथानक असेल. तर तुमचे चित्रपट केवळ राष्ट्रीयच नाही तर आंतरराष्ट्रीय पातळीवरील प्रेक्षकांपर्यंतही पोहोचतील. आपल्याकडे कौशल्य आणि प्रतिभा भरपूर आहे आणि आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने आपण इफफीला नव्या उंचीवर घेऊन जाऊ.” यावेळी अनुराग ठाकूर यांनी इफ्फी गोव्याच्या भूमीत आणणारे माजी मुख्यमंत्री दिवंगत मनोहर पर्रीकर यांचेही स्मरण केले.

“पूर्वी आपण बघायचो की, एखाद्या चित्रपटासाठी केवळ अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्माते, यांनाच पुरस्कार दिले जात असत.मात्र आता आपण तंत्रज्ञांचाही, चित्रपट निर्मितीसाठी पडद्यामागे काम करणाऱ्यांचाही सन्मान करतो आहोत, कारण कोणताही चित्रपट पूर्ण होण्यात त्यांची भूमिका महत्वाची ठरते.”  परदेशी चित्रपट निर्मात्यांनी भारतात यावे आणि इथे चित्रीकरण करावे, असे आवाहन देखील ठाकूर यांनी केले.

यावेळी उपस्थितांशी संवाद साधतांना हिमाचल प्रदेशचे राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर म्हणाले-“ मी काही चित्रपट समीक्षक नाही, किंवा मी चित्रपटांचा खूप चाहताही नाही. मात्र, मी भारतीय पॅनोरामा विभाग नेहमीच बघतो. त्यातून आपल्या समाजाचे प्रतिबिंब जाणवते. मी अत्यंत अभिमानाने हे सांगू इच्छितो, की भारतीय चित्रपटातून, आपल्या समाजाचे प्रतिबिंब अत्यंत अप्रतिम पद्धतीने मांडले आहे. आपल्या समाजाच्या आकांक्षा, गरजा आणि संघर्ष परिणामकारकपणे या चित्रपटातून मांडले असतात.”

फीचर फिल्म विभागात उद्घाटनाचा चित्रपट असलेला सेमखोर, हा इफ्फीच्या भारतीय पॅनोरामामध्ये प्रदर्शित होणारा, दिमासा भाषेतील हा  पहिलाच चित्रपट आहे. ऐमी बरुआ, या चित्रपटाच्या दिग्दर्शिका असून, त्यांनी या सन्मानाबद्दल इफ्फीचे आभार मानले आहेत. सेमखोर हा चित्रपट, सामाजिकदृष्ट्या निषिद्ध समजल्या जाणाऱ्या विषयांवर चर्चा करणारा असून, या चित्रपटाच्या माध्यमातून, आपण आसाममधील दिमासा समुदायाला कराव्या लागणाऱ्या संघर्षांना वाचा फोडण्याचा प्रयत्न केला आहे, असेही ऐमी बरुआ यांनी सांगितले.

या विभागात- नॉन फीचर म्हणजेच कथा बाह्य चित्रपटांमधील उद्घाटनाचा चित्रपट, वेद-द व्हिजनरी चे दिग्दर्शक राजीव प्रकाश म्हणाले, की, “ही कथा, चित्रपट निर्मिती क्षेत्रात असलेल्या माझ्या वडलांच्या चिकाटीची, धैर्याची कथा आहे. त्यांचे या क्षेत्रातील प्रयत्न, जे कायमच भारतीय चित्रपटांच्या इतिहासाचा भाग असतील, तेच या सिनेमात दाखवण्यात आले आहेत”.

या फीचर आणि नॉन फीचर चित्रपटांची निवड करणाऱ्या ज्यूरी सदस्यांचा देखील यावेळी सत्कार करण्यात आला.

भारतीय पॅनोरामा हा इफ्फीमधील एक सर्वात महत्वाचा विभाग असून, या अंतर्गत, चित्रपटकलेला प्रोत्साहन आणि व्यासपीठ उपलब्ध करुन देण्यासाठी समकालीन भारतीय चित्रपट या विभागात दाखवले जातात. भारतीय चित्रपट आणि भारताची समृद्ध संस्कृती आणि चित्रपट कलेला प्रोत्साहन देण्यासाठी 1978 साली हा विभाग इफ्फीमध्ये समाविष्ट करण्यात आला.

भारतीय पॅनोरामामधील उद्घाटनाच्या चित्रपटांची माहिती:

सेमखोर

दिरो हा  सेमखोर मधील  समसा जमातीतला तरुण  आहे. दिरो  मरण पावल्यावर, सुईण म्हणून काम करणारी त्याची पत्नी त्यांच्या तीन मुलांचे  संगोपन करते . ती  तिची एकुलती एक मुलगी मुरी हिचे वयाच्या अवघ्या अकरा वर्षी दिनारशी लग्न लावते.  दुर्दैवाने, मुलीला जन्म दिल्यानंतर मुरीचा मृत्यू होतो. सेमखोर इथल्या  प्रथेनुसार, जर बाळंतपणात स्त्रीचा मृत्यू झाला तर  आईसह  बाळाला जिवंत दफन केले जाते. पण दिरोची  पत्नी मुरीच्या बाळाचे रक्षण करते, जे  सेमखोरमध्ये नवी पहाट झाल्याचे द्योतक आहे.

वेद...द व्हिजनरी

चित्रपट निर्माते वेद प्रकाश यांची  कथा आणि 1939-1975 या काळात छोट्या माहितीपटांच्या  चित्रीकरणाचे जग जिंकण्याचा त्यांचा प्रवास हा चित्रपट   उलगडून दाखवतो. वेद प्रकाश यांनी केलेल्या  उल्लेखनीय  कामांमध्ये जानेवारी 1948 मध्ये महात्मा गांधींच्या अंत्यसंस्काराचा वृत्तांत याचा समावेश  आहे , ज्याला 1949 मध्ये ब्रिटिश अकादमी पुरस्कारांसाठी नामांकन मिळाले होते; भारत स्वतंत्र झाल्यानंतरचे  सत्ता परिवर्तन; भारताच्या फाळणीनंतरची शोकांतिका इत्यादी.  वेद प्रकाश यांनी भारताच्या  प्रारंभिक वर्षांमधीलबहुतांश सर्व घटना आणि घडामोडी यांचे चित्रीकरण केले असून त्या  काळातील ही दृक्श्राव्य माध्यमातील ठेवा म्हणजे त्यांच्या मेहनतीची आणि कलाकृतीतील सौंदर्याच्या विचारांची आपल्याला मिळालेली   देणगी आहे.

* * *

Jaydevi PS/S.Kane/R.Aghor/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com(Release ID: 1773732) Visitor Counter : 144