माहिती आणि प्रसारण मंत्रालय

केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी वर्ष 2021साठीच्या इंडियन फिल्म पर्सनल पर्सनॅलिटी ऑफ द इअर पुरस्काराची केली घोषणा


52व्या इफ्फीमध्ये हेमा मालिनी आणि प्रसून जोशी यांना या पुरस्कारांनी गौरवले जाणार

Posted On: 18 NOV 2021 8:14PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 18 नोव्हेंबर 2021

केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग सिंग ठाकूर यांनी वर्ष 2021 साठीच्या ‘इंडियन फिल्म पर्सनॅलिटी ऑफ द इअर’ पुरस्काराची घोषणा केली. या वर्षीचा पुरस्कार अभिनेत्री हेमा मालिनी आणि गीतकार प्रसून जोशी यांना जाहीर करण्यात आला आहे. पुरस्काराची घोषणा करताना ठाकूर म्हणाले, अभिनेत्री आणि उत्तर प्रदेशातील मथुरा येथून खासदार असलेल्या हेमा मालिनी आणि गीतकार तसेच केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाचे अध्यक्ष प्रसून जोशी यांना वर्ष 2021साठीचा इंडियन फिल्म पर्सनल पर्सनॅलिटी जाहीर करताना मला आनंद होत आहे. भारतीय चित्रपट क्षेत्रात गेली अनेक दशके त्यांनी महत्वाचे योगदान दिले आहे आणि प्रेक्षकांच्या अनेक पिढ्यांचे त्यांनी मनोरंजन केले आहे. जगभरात मानसन्मान आणि चाहते असलेले ते भारतीय चित्रपट सृष्टीचे आदर्श आहेत. गोव्यात होणाऱ्या 52 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात त्यांना हा पुरस्कार देण्यात येईल.

या पुरस्कारांचे मानकरी ठरलेल्या मान्यवरांविषयी माहिती :

श्रीमती हेमा मालिनी, अभिनेत्री, खासदार, मथुरा, उत्तरप्रदेश

सोळा ऑक्टोबर 1948 रोजी तामीळनाडूच्या अम्मनकुडी येथे जन्मलेल्या हेमा मालिनी, या भारतीय अभिनेत्री, लेखिका, दिग्दर्शिका, नृत्यांगना आणि राजकीय नेत्या आहेत. त्यांनी आपल्या चित्रपटक्षेत्रातील अभिनयाची कारकीर्द, 1963 साली, इडूसथियाम या तामीळ चित्रपटापासून सुरु केली. त्यानंतर, 1968 साली ‘सपनों का सौदागर’ या चित्रपटाद्वारे त्यांनी हिन्दी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. तेव्हापासून त्यांनी दीडशेपेक्षा अधिक चित्रपटातून अभिनय केला असून , त्यात शोले, सत्ते पे सत्ता, सीता और गीता, बागबान अशा चित्रपटांचा समावेश आहे.

‘ड्रीम गर्ल’ म्हणून लोकप्रिय असलेल्या हेमा मालिनी यांनी, आपल्या वैविध्यपूर्ण अभिनयासाठी आजवर अनेक पुरस्कार मिळवले आहेत. त्याशिवाय, 2000 साली,  देशाचा चौथा सर्वोच्च नागरी सन्मान पद्मश्री देखील त्यांना प्रदान करण्यात आला. हेमा मालिनी यांच्या भारतीय चित्रपटसृष्टीतील योगदानाची दखल घेत, 2012 साली पद्मपथ सिंघानिया विद्यापीठाने त्यांना मानद डॉक्टरेट ( विद्यावाचस्पति) पदवी प्रदान केली. राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळाचे अध्यक्षपदही त्यांनी भूषवले होते.

एक प्रशिक्षित भरतनाट्यम नृत्यांगना असलेल्या हेमा मालिनी यांना, भारतीय संस्कृती आणि नृत्यकलेतील योगदानाबद्दल, 2006 साली सोपोरी म्युझिक अँड परफॉरमिंग आर्ट अकादमीचा वितस्त पुरस्कार देखील मिळाला आहे. 2003-2009 या कालावधीत, त्या राज्यसभेच्या सदस्य होत्या. 2014 च्या सर्वसाधारण लोकसभा निवडणुकीत, मथुरा या मतदारसंघातून त्या निवडून आल्या.

प्रसून जोशी, गीतकार आणि अध्यक्ष, केंद्रीय चित्रपट प्रमाणीकरण बोर्ड (CBFC)

प्रसून जोशी हे कवी, लेखक, गीतकार, पटकथा लेखक आणि संवाद विशेषज्ञ आणि जाहिरात तज्ञ  आहेत. त्यांनी वयाच्या 17 व्या वर्षी गद्य आणि कवितांचे  पहिले पुस्तक प्रकाशित केले. सध्या ते मॅककॅन वर्ल्ड ग्रुप इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी  आणि त्यांच्या आशिया क्षेत्राचे  अध्यक्ष आहेत.

जोशी यांनी 2001 मध्ये राजकुमार संतोषी यांच्या लज्जा या चित्रपटातून गीतकार म्हणून भारतीय चित्रपटसृष्टीत प्रवेश केला आणि तेव्हापासून ते विविध लोकप्रिय आणि यशस्वी बॉलिवुड चित्रपटांचा एक भाग आहेत. आणि आज अभिजात कविता आणि साहित्याची महान परंपरा जनमानसात  जिवंत ठेवल्याबद्दल  त्यांची देशभरात ख्याती  आहे. तारे जमीन पर, रंग दे बसंती, भाग मिल्खा भाग, नीरजा , मणिकर्णिका, दिल्ली 6 आणि इतर अनेक चित्रपटांमधून त्यांनी आपल्या लेखनातून, लोकप्रिय शैलीतील उच्च क्षमतेच्या कामाद्वारे  समाजाला विधायक दिशा देता येते  हा विश्वास पुन्हा जागृत केला आहे.

जोशी यांना केवळ भारतातच नव्हे तर जागतिक स्तरावरही उचित मान -सन्मान मिळाला  आहे. तारे जमीन पर (2007) आणि चितगाव  (2013) मधील गीतांसाठी  त्यांना दोनदा सर्वोत्कृष्ट गीतासाठीचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला आहे. 2015 मध्ये, भारत सरकारने त्यांना कला, साहित्य आणि जाहिरात क्षेत्रातील योगदानाबद्दल पद्मश्री पुरस्कार देऊन सन्मानित केले. त्यांनी  अनेक वेळा फिल्मफेअर, आयफा, स्क्रीन सारखे लोकप्रिय चित्रपट पुरस्कार पटकावले आहेत. 2014 मध्ये त्यांना कान्स टायटॅनियम ज्युरीचे अध्यक्ष म्हणून आमंत्रित करण्यात आले होते. आंतरराष्ट्रीय कान्स लायन टायटॅनियम पुरस्काराचे अध्यक्ष असलेले ते पहिले आशियाई होते. त्यांना वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमने यंग ग्लोबल लीडर म्हणूनही नियुक्त केले होते.

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा  2010 च्या उद्‌घाटन आणि समारोप समारंभासाठी निवडक तीन सदस्यीय कोअर क्रिएटिव्ह सल्लागार समितीचा ते भाग होते. 52 व्या इफ्फी मध्ये ‘75 क्रिएटिव्ह माइंड्स ऑफ टुमारो’ साठी ग्रँड ज्युरीचे ते सदस्य देखील आहेत.

 

 

SP/RA/SK/PM

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1773044) Visitor Counter : 257