आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधानांच्या ‘हर घर दस्तक’ अभियानाला बळकटी देण्याबाबत केंद्रीय मंत्री डॉ. मनसुख मांडवीय यांनी विविध राज्यांच्या आरोग्यमंत्र्यांशी केली चर्चा


कोविड प्रतिबंधक लसीच्या संरक्षक कवचापासून एकही नागरिक वंचित राहणार नाही याची सुनिश्चिती करण्यासाठी एकत्रितपणे प्रयत्न करण्याचे राज्यांच्या आरोग्य मंत्र्यांना केले आवाहन

राज्यांना आवश्यक लसीच्या पुरवठ्याबाबत आश्वस्त करत देशात लसीचा तुटवडा नसल्याचे केंद्रीय मंत्र्यांचे  ठाम प्रतिपादन

Posted On: 11 NOV 2021 5:05PM by PIB Mumbai

 

देशातील एकही पात्र नागरिक कोविड प्रतिबंधक लसीच्या संरक्षक कवचापासून वंचित राहू नये याची सहयोगात्मक आणि विविध सहभागींच्या प्रयत्नांच्या माध्यमातून एकत्रितपणे सुनिश्चिती केली पाहिजे असे केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ. मनसुख मांडवीय यांनी म्हटले आहे. देशाच्या काना-कोपऱ्यापर्यंत आणि प्रत्येक घरापर्यंत पोहोचून आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हर घर दस्तकअभियाना अंतर्गत लोकांना या लसीच्या दोन्ही मात्रा घेण्यासाठी प्रोत्साहित केले पाहिजे असे ते म्हणाले. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ.भारती पवार यांच्या उपस्थितीत आज केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी विविध राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या आरोग्यमंत्र्यांशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीदरम्यान देशातील विविध राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये कोविड-19 चा प्रतिबंध आणि व्यवस्थापन याकरिता सुरु असलेल्या आरोग्यविषयक सरकारी उपक्रमांचा आढावा देखील घेण्यात आला.

महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे तसेच गोव्याचे आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांच्यासह केरळ,कर्नाटक,दिल्ली,मध्यप्रदेश झारखंड यासह इतर राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांचे आरोग्यमंत्री तसेच मुख्य सचिव, अतिरिक्त मुख्य सचिव आणि राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे अभियान संचालक देखील या बैठकीला उपस्थित होते.

सद्यस्थितीला देशातील लोकसंख्येपैकी 79% प्रौढांनी कोविड-19 प्रतिबंधक लसीची पहिली मात्र तर 38% प्रौढांनी या लसीची दुसरी मात्रा घेतली आहे अशी माहिती केंद्रीय मंत्र्यांनी दिली. देशातील 12 कोटींहून अधिक लाभार्थी नागरिक कोविड-19 प्रतिबंधक लसीच्या दुसऱ्या मात्रेसाठी पात्र झाले आहेत हे लक्षात आणून देत हर घर दस्तकअभियानादरम्यान सर्व प्रौढ नागरिकांना लसीची पहिली मात्रा दिली गेली आहे आणि दुसऱ्या मात्रेसाठी पात्र असलेल्यांना ही मात्रा घेण्यासाठी प्रोत्साहित केले जात आहे याची सुनिश्चिती करून घेण्याची आग्रही विनंती त्यांनी राज्यांच्या आरोग्य मंत्र्यांना केली.

हर घर दस्तकअभियानाला बळकटी देण्यासाठी पंतप्रधानांनी आखलेल्या धोरणानुसार गावांमध्ये आधीच प्रचार पथकांचीनियुक्ती करण्यात यावी. ज्यायोगे गावकऱ्यांमध्ये या मोहिमेबद्दल जाणीव निर्माण करण्यासाठीच्या अभियानासोबतच ही पथके पात्र नागरिकांना लस घेण्यासाठी प्रोत्साहित करण्याचे आणि त्यांना माहिती देण्याचे काम खात्रीलायक पद्धतीने करतील. त्यानंतर लसीकरण पथकत्या गावातील पात्र नागरिकांना लसीची पहिली आणि दुसरी मात्रा दिली जाईल याची सुनिश्चिती करतील याचा केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी पुनरुच्चार केला.

वर्तनात्मक परिवर्तन त्वरित घडवून आणण्यासाठी मुले अत्यंत उत्तमपणे प्रचारकाचे काम करू शकतील म्हणून संपूर्ण लसीकरणाचा संदेश सर्वदूर पोहोचवण्यासाठी मुलांची मदत घेण्याचा सल्ला त्यांनी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना दिला.

डॉ. मांडवीय यांनी सुचविले की, बस स्थानके, रेल्वे स्थानके, विशेषतः महानगरांतील अशा गर्दीच्या ठिकाणी आपण कोविड प्रतिबंधक लसीकरण केंद्रे सुरु करूया. काही राज्यांनी, बस,रेल्वे,रिक्षा इत्यादी वाहनांतून उतरणाऱ्या प्रवाशांना लसीच्या मात्रा घेण्यासाठी प्रोत्साहित करण्याच्या दृष्टीने थांबवा आणि विचारून घ्याअशा मोहिमा देखील सुरु केल्या आहेत. हर घर दस्तकअभियानातील प्रत्येक दिवस लाभार्थ्यांच्या विविध गटांना लस घेण्यासाठी प्रेरित करून लसीकरण करण्यासाठी समर्पित करायला हवा अशा सूचना त्यांनी केल्या. एक दिवस व्यापाऱ्यांसाठी, एक दिवस फिरत्या विक्रेत्यांसाठी, किरकोळ विक्रेत्यांसाठी, दुकानदारांसाठी समर्पित करता येऊ शकेल, इतर दिवशी आपण रिक्षा ओढणारे आणि वाहन चालक अशांसाठी ठेवू शकतो तर एक दिवस मजूर आणि शेतकऱ्यांसाठी राखून ठेवता येईल. असे त्यांनी पुढे सांगितले.

सरकारी आरोग्य यंत्रणेद्वारे सध्या सुरु असलेल्या कोविड प्रतिबंधक आणि व्यवस्थापन उपाययोजनांचा आढावा घेताना केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी कोविड आजाराचा पूर्णपणे नायनाट अजून झालेला नाही असा इशारा सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना दिला. कोविड आजाराचा धोका आता संपला आहे असा विचार आपण करता कामा नये. जगात अजूनही कोविड संसर्गग्रस्तांची संख्या वाढत आहे. प्रतिबंधक लसीकरण आणि कोविडला प्रतिबंध करण्यासाठी अनुरूप आचरण या दोन्हींच्या मदतीने पुढे जायला हवे, यावर त्यांनी भर दिला.  

कोविड व्यवस्थापनासाठी लसींचा, औषधांचा तसेच आर्थिक आणि तंत्रज्ञान विषयक साधनांचा पुरवठा केल्याबद्दल उपस्थित सर्व राज्यांच्या आरोग्यमंत्र्यांनी केंद्र सरकारप्रती कृतज्ञता व्यक्त केली. लसीकरणाचे प्रमाण अत्युच्च ठेवण्यासाठी, विशेषतः ज्या जिल्ह्यांमध्ये लसीकरणाचे प्रमाण आतापर्यंत कमी होते तेथे लक्ष केंद्रित करण्यासाठी केलेल्या अभिनव उपाययोजना देखील राज्यांनी या बैठकीत सर्वांशी सामायिक केल्या.

***

N.Chitale/S.Chitnis/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1770957) Visitor Counter : 246