पंतप्रधान कार्यालय
ग्लासगो इथ् कॉप-26 शिखर परिषदेत पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी केलेले राष्ट्रीय संबोधन
Posted On:
01 NOV 2021 11:30PM by PIB Mumbai
मित्रांनो,
हजारो वर्षांपूर्वी ज्या भूमीने हा मंत्र दिला होता, त्या भूमीचे आज मी प्रतिनिधित्व करत आहे.
सम्-गच्छ-ध्वम् ,
सम्-व-दद्वम् ,
सम् वो मानसि जानताम्।
आज एकविसाव्या शतकात हा मंत्र अधिक महत्त्वाचा झाला आहे, प्रासंगिक ठरला आहे.
सम-गच्छ-ध्वम् म्हणजे सर्वांनी एकत्र पुढे जावे; साम-व-दद्वम् म्हणजे सर्वांनी मिळून मिसळून संवाद साधला पाहिजे आणि साम वो मनानासि जातनम् म्हणजे सर्वांची मनेही एकमेकांशी एकरूप झाली पाहिजेत.
मित्रांनो,
मी पहिल्यांदा पॅरिस इथे हवामान परिषदेसाठी आलो होतो, तेव्हा जगभरात दिल्या जात असलेल्याला अनेक आश्वासनांमध्ये आपलाही एक संकल्प जोडण्याचा माझा हेतू नव्हता तर
संपूर्ण मानवतेबद्दल वाटत असलेल्या काळजीपोटी मी आलो. मी त्या संस्कृतीचा प्रतिनिधी म्हणून आलो होतो ज्याने 'सर्व भवनतु सुखिन: म्हणजे सर्व सुखी होवोत' असा संदेश दिला आहे. आणि म्हणूनच पॅरिसमधील कार्यक्रम माझ्यासाठी केवळ परिषद नाही तर ती एक संवेदना होती, ती एक वचनबद्धता होती.
आणि ती आश्वासने भारत जगाला देत नव्हता, तर ती आश्वासने, १२५ कोटी भारतीय स्वत:ला देत होते. मला आनंद आहे की भारतासारखा विकसनशील देश, जो कोट्यवधी लोकांना गरिबीतून बाहेर काढण्यासाठी काम करत आहे, कोट्यवधी लोकांच्या सुगम राहाणीमानासाठी रात्रंदिवस काम करत आहे. जो आज जगाच्या लोकसंख्येच्या 17 टक्के असूनही, उत्सर्जनाबाबतीत फक्त 5 टक्के जबाबदार आहे, भारताने आपले कर्तव्य पार पाडण्यात कोणतीही कसर सोडली नाही.
आज संपूर्ण जगाचा असा विश्वास आहे की भारत ही एकमेव मोठी अर्थव्यवस्था आहे, ज्याने पॅरिस वचनबद्धतेला कसोशीने पूर्ण केले आहे. आम्ही संकल्पबद्ध होऊन, कठोर परिश्रम करत परिणामांप्रत जात आहोत.
मित्रांनो,
मी आज जेव्हा तुमच्यामध्ये आलो आहे, तेव्हा मी तुमच्यासोबत भारताचा कामगिरीचा लेखाजोखाही घेऊन आलो आहे. माझे शब्द केवळ शब्द नाहीत, ते भावी पिढीच्या उज्ज्वल भविष्यासाठी एक जयघोष आहे.
आज, स्थापित नूतनीकरणक्षम ऊर्जा क्षमतेमध्ये भारत जगात चौथ्या क्रमांकावर आहे. भारताच्या बिगर-जीवाश्म इंधन ऊर्जेत गेल्या 7 वर्षांत 25% पेक्षा जास्त वाढ झाली आहे. आणि आता ती आपल्या मिश्र ऊर्जा प्रमाणाच्या 40% पर्यंत पोहोचली आहे.
मित्रांनो,
जगातील एकूण लोकसंख्येपेक्षा जास्त प्रवासी दरवर्षी भारतीय रेल्वेने प्रवास करतात. या विशाल रेल्वे यंत्रणेने 2030 पर्यंत स्वतःला 'नेट झिरो' बनवण्याचे लक्ष्य ठेवले आहे. केवळ या उपक्रमामुळे वार्षिक 60 दशलक्ष टन कर्ब उत्सर्जन कमी होईल. त्याचप्रमाणे, आमच्या व्यापक एलईडी बल्ब मोहीमेमुळे दरवर्षी 40 दशलक्ष टन उत्सर्जन कमी होत आहे. भारत दृढ इच्छाशक्तीने अशाच अनेक उपक्रमांवर वेगाने काम करत आहे.
यासोबतच भारताने आंतरराष्ट्रीय पातळीवर जगाला सहकार्य करण्यासाठी संस्थात्मक उपायही दिले आहेत. सौर उर्जेतील क्रांतिकारी पावलाच्या स्वरुपात आम्ही आंतरराष्ट्रीय सौर आघाडीची सुरुवात केली.
आम्ही हवामान अनुकूलतेसाठी आपत्ती प्रतिरोधक पायाभूत सुविधांकरता एक आघाडी तयार केली आहे. कोट्यवधी लोकांचे जीव वाचवण्यासाठी हा एक संवेदनशील आणि महत्त्वाचा उपक्रम आहे.
मित्रांनो,
मला तुमचे लक्ष आणखी एका महत्त्वाच्या विषयावर केंद्रित करायचे आहे. हवामान बदलामध्ये जीवनशैलीचा मोठा वाटा आहे हे आज जग मानत आहे. मी आज तुम्हाला केवळ "एक-शब्द" असलेल्या चळवळीचा प्रस्ताव देतो.
हा एक-शब्द.. एक शब्द, हवामानाच्या संदर्भात, (एक जग-) एक जगाचा मूलाधार बनू शकतो, अधिष्ठान बनू शकतो. तो एक शब्द आहे- लाईफ… एल, आय, एफ, इ, म्हणजेच पर्यावरणासाठी जीवनशैली. पर्यावरणासाठी जीवनशैली ही (लाइफ) एक मोहीम म्हणून पुढे नेण्याची. त्याकरता आपण सर्वांनी एकत्र येण्याची, सामूहिक सहभागासह एकत्र येण्याची आज गरज आहे.
ही पर्यावरणासंबंधी जागरूक जीवनशैली जनआंदोलन बनू शकते. निरर्थक आणि विध्वंसक उपभोगाऐवजी मनापासून आणि जाणीवपूर्वक उपभोग घेण्याची आजच्या काळात गरज आहे
ही चळवळ एकत्रितपणे, मासेमारी, शेती, आरोग्य, आहारातील निवड, पॅकेजिंगसाठी वापरले जाणारे साहित्य , गृहनिर्माण, आदरातिथ्य, पर्यटन, वस्रप्रावरणे, फॅशन, जल व्यवस्थापन, उर्जा यासारख्या विविध क्षेत्रांशी संबंधित असलेली उद्दिष्टे निश्चित करू शकते आणि यासारख्या अनेक क्षेत्रात क्रांतिकारी बदल घडवून आणू शकते.
हे असे विषय आहेत जिथे आपल्यापैकी प्रत्येकाला दररोज जाणीवपूर्वक निवड करावी लागते. जगभरातील कोट्यवधी आणि अब्जावधी लोकांच्या या दैनंदिन निवडीमुळे हवामान बदलाविरुद्धचा लढा दररोज कोट्यवधी पावले पुढे नेला जाईल. आणि मी याला आर्थिक आधारावर, वैज्ञानिक आधारावर, गेल्या शतकातील अनुभवांच्या आधारावर, प्रत्येक कसोटीवर यशस्वी ठरणारी मोहिम मानतो. स्वपासून समष्टिपर्यंतचा हा मार्ग आहे. अहं ते वयंच्या कल्याणाचा हाच मार्ग आहे.
मित्रांनो,
हवामान बदलावरील या जागतिक विचारमंथनादरम्यान, भारताच्या वतीने, या आव्हानाचा सामना करण्यासाठी मी पाच अमृत तत्वे, पंचामृत सादर करू इच्छितो.
पहिले- भारत 2030 पर्यंत आपली गैर-जीवाश्म ऊर्जा क्षमता 500 गिगावॅट इतकी वाढवेल .
दुसरे- 2030 पर्यंत भारत आपल्या उर्जेच्या 50 टक्के गरजा अक्षय ऊर्जेतून पूर्ण करेल.
तिसरे- 2030 पर्यंत भारत एकूण अनुमानित कार्बन उत्सर्जन एक अब्ज टनांनी कमी करेल.
चौथे- 2030 पर्यंत भारत आपल्या अर्थव्यवस्थेची कार्बन तीव्रता 45 टक्क्यांपेक्षा कमी करेल.
आणि पाचवे- 2070 पर्यंत भारत नेट झिरोचे लक्ष्य गाठेल.
हवामाना संबंधित कार्यात हे पंचामृत
भारताचे अभूतपूर्व योगदान असेल.
मित्रांनो,
हवामाना संबंधित वित्तपुरवठ्याबाबत आजपर्यंत दिलेली आश्वासने पोकळ असल्याचे सत्य आपल्या सर्वांनाच माहीत आहे. आपण सर्वजण हवामान कृतीबाबत आपली महत्त्वाकांक्षा वाढवत असताना, हवामाना संबंधित वित्तपुरवठ्याची वैश्विक महत्त्वाकांक्षा पॅरिस करारावेळी होती तीच राहू शकत नाही.
भारताने आज, जेव्हा नवीन वचनबद्धता आणि नवीन उर्जेसह पुढे जाण्याचा संकल्प केला आहे, अशा वेळी हवामान वित्तपुरवठा आणि कमी किमतीच्या हवामान तंत्रज्ञानाचे हस्तांतरण अधिक महत्त्वाचे ठरते.
विकसित देशांनी शक्य तितक्या लवकर एक ट्रिलियन डॉलर्सचा हवामान वित्तपुरवठा करावा अशी भारताची अपेक्षा आहे. जे देश हवामान वित्तपुरवठा विषयक आश्वासने पाळत नाहीत, त्यांच्यावर दबाव आणला पाहिजे हाच योग्य न्याय असेल.
मित्रांनो,
भारत आज हवामानाच्या मुद्यावर मोठ्या धैर्याने आणि मोठ्या महत्त्वाकांक्षेने पुढे जात आहे. भारत इतर सर्व विकसनशील देशांचेही दु:ख जाणतो, ते सामायिक करतो आणि त्यांच्या अपेक्षा यापुढेही निरंतर व्यक्त करत राहील. बर्याच विकसनशील देशांसाठी तर, हवामान बदल त्यांच्या अस्तित्वावरच घोंघावणारे मोठे संकट आहे.
जगाला वाचवण्यासाठी आज मोठी पावले उचलावी लागतील, ही काळाची गरज आहे आणि यातूनच या मंचाची प्रासंगिकताही सिद्ध होईल.
मला विश्वास आहे की ग्लासगो इथे घेतलेले निर्णय आपल्या भावी पिढ्यांचे भविष्य वाचवतील, त्यांना सुरक्षित आणि समृद्ध जीवनाची भेट देतील.
अध्यक्ष महोदय, मी जास्त वेळ घेतला त्याबद्दल क्षमस्व, पण विकसनशील देशांचा आवाज उठवणे हे मी माझे कर्तव्य समजतो. त्यामुळे मी त्यावर भर दिला आहे. मी पुन्हा एकदा तुमचे खूप खूप आभार मानतो!
धन्यवाद.
***
JaideviPS/VinayakG/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1768867)
Visitor Counter : 456
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Assamese
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam