माहिती आणि प्रसारण मंत्रालय
मार्टिन स्कोर्सेज आणि इस्टेवान स्झाबो यांना सत्यजित रे जीवनगौरव पुरस्काराने केले जाणार सन्मानित
केंद्रीय मंत्री श्री अनुराग सिंह ठाकूर यांनी गोव्यात होणाऱ्या 52 व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवा संदर्भात केल्या प्रमुख घोषणा
वैविध्यपूर्ण कथावस्तूमुळे भारत एक आशयसंपन्न उपखंड ठरला : श्री ठाकूर
यंदाच्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात नवीन तंत्रज्ञानाचा स्वीकार , प्रमुख ओटीटी मंचाना सहभागी होण्यासाठी केले आमंत्रित
यंदा इफ्फीच्या सोबतीने होणार ब्रिक्स देशांचा चित्रपट महोत्सव
आझादी का अमृत महोत्सवाच्या निमित्ताने '75 क्रिएटिव्ह माइंड्स ऑफ टुमॉरो' स्पर्धा; नोव्हेंबरमध्ये गोवा येथे होणाऱ्या महोत्सवात विजेते होणार सहभागी
आंतरराष्ट्रीय विभागात 96 देशांतील विक्रमी 624 चित्रपटांचा सहभाग
कार्लोस सौरा दिग्दर्शित द किंग ऑफ ऑल द वर्ल्ड (एल रे डी तोडो एल मुंडो) चित्रपटाने होणार महोत्सवाची सुरुवात
पॅरिसमधील दृश्य संवाद आणि कलांसाठी प्रसिद्ध पॅरिसमधील संस्था गोबिलिन्स -स्कूल एल 'इमेज’ घेणार विशेष आभासी वर्ग
यंदाच्या 52 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात श्री इस्टेवान स्झाबो आणि श्री मार्टिन स्कोर्सेस यांना सत्यजित रे जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे अशी घोषणा केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री श्री अनुराग ठाकूर यांनी केली.
मेस्टिस्टो (1981) फादर (1966) सारख्या उत्कृष्ट कलाकृतींसाठी ओळखले जाणारे इस्तवान स्झाबो हे गेल्या अनेक दशकांतले समीक्षकांनी गौरवलेल्या प्रमुख हंगेरियन चित्रपट दिग्दर्शकांपैकी एक आहेत. तर मार्टिन स्कॉर्सेझ हे हॉलीवूडच्या नव्याधारेतील प्रमुख व्यक्तीमत्व आहेत, त्यांना चित्रपट इतिहासातील सर्वात महान आणि प्रभावशाली दिग्दर्शकांपैकी एक मानले जाते.
“भारत कथा सांगणाऱ्यांचा देश आहे; आमच्या कथांमधे जगाचा सार पकडला गेला आहे. भारताच्या वैविध्यपूर्ण कथावस्तू त्यामुळे आपल्याला एक समर्पक आणि 'आशयघन उपखंड' बनवतात असे श्री अनुराग ठाकूर यांनी सांगितले.
भारतातील सर्वात प्रतिष्ठित चित्रपट महोत्सवाची 52 वी आवृत्ती येत्या 20 ते 28 नोव्हेंबर, 2021 या कालावधीत सागरकिनाऱ्याने संपन्न अशा गोवा राज्यात आयोजित केली जाणार आहे.
ओटीटी (ओव्हर द टॉप, दृक् श्राव्य आशय प्रदर्शित करणारे ऑनलाइन व्यासपीठ) मंचाशी संबंधित आघाडीच्या संस्थांबरोबर सहयोग
यंदा इफ्फीने प्रथमच ओटीटी मंचाशी संबंधित आघाडीच्या संस्थांना महोत्सवात सहभागी होण्यासाठी आमंत्रित केले आहे. नेटफ्लिक्स, अॅमेझॉन प्राइम, झी5, व्हूट आणि सोनी लिव हे पहिल्यांदाच विशेष वर्ग, नव्या आशयाचे सादरीकरण आणि पूर्वावलोकन, संग्रहीत चित्रपटांचे प्रदर्शन आणि इतर विविध प्रत्यक्ष तसेच आभासी माध्यमातील कार्यक्रमांद्वारे महोत्सवात सहभागी होणार असल्याची माहिती श्री ठाकूर यांनी दिली.
ओटीटी मंचावर चित्रपट पाहण्याचा कल वाढत आहे अशात इफ्फी अर्थात भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव हे नवीन तंत्रज्ञान प्रथमच स्वीकारत असून त्यामुळे चित्रपट उद्योगातील कलाकारांना ओटीटी संस्थांबरोबर संवाद साधण्यासाठी मंत्रालय एक व्यासपीठ प्रदान करत आहे असे श्री ठाकूर म्हणाले.
या महोत्सवादरम्यान ‘इमेज अँड आर्ट्स, गोबेलिन्स-स्कूल एल'इमेज या पॅरिस इथल्या संस्थेच्या सहकार्याने नेटफ्लिक्स एका 3 दिवसीय विशेष आभासी वर्गाचे आयोजन करत आहे.
याशिवाय जेन कॅम्पियनच्या 'द पॉवर ऑफ द डॉग' चा भारतातील प्रीमियर नेटफ्लिक्स, आयोजित करणार आहे. तसेच रवीना टंडन आणि आशुतोष राणा अभिनीत आगामी धमाका चित्रपटाचे विशेष सादरीकरण यावेळी होणार आहे. गुन्हे थरारपट मालिकेतील ‘अरण्यक’ च्या पहिल्या भागाचे पूर्वावलोकनही या महोत्सवात केले जाईल.
सोनीलिव्ह या ओटीटी मंचाने ‘स्कॅम-1992’ या वेबसिरीजचे पटकथा लेखक - सुमित पुरोहित आणि सौरव दे यांच्या विशेष वर्गाचे आयोजन या महोत्सवादरम्यान केले आहे. स्टुडिओ नेक्स्टचे व्यवसाय प्रमुख इंद्रनील चक्रवर्ती हे याचे संचालन करतील .
झी 5 या ओटीटी मंच इफ्फीसाठी नितेश तिवारी आणि अश्विनी अय्यर यांची पेस आणि भूपती यांच्यावर आधारित ब्रेक पॉईंट विशेष वेब सिरीज प्रदर्शित करणार आहे.
आझादी का अमृत महोत्सवाच्या निमित्ताने '75 क्रिएटिव्ह माइंड्स ऑफ टुमॉरो'
‘भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव हा देशभरातील तरुण नवोदित प्रतिभेला मुख्य प्रवाहातील चित्रपट निर्माते आणि उद्योगाशी जोडण्यासाठी एक व्यासपीठ प्रदान करेल ‘ अशी मोठी घोषणा करताना श्री अनुराग ठाकूर म्हणाले, 75 सर्जनशील कलावंतांना (35 वर्षांखालील) उद्योगातील शिर्ष प्रमुखांशी संवाद साधण्यासाठी आणि महोत्सवातील विशेष वर्गांना उपस्थित राहण्यासाठी आमंत्रित केले जाईल. देशभरातील तरुण चित्रपट निर्मात्यांसाठीच्याएका स्पर्धेद्वारे या तरुणांची निवड केली जाईल. 75 तरुण चित्रपट निर्माते, अभिनेते, गायक, पटकथा लेखक आणि इतरांना जागतिक स्तरावर मान्यताप्राप्त कार्यक्रमात त्यांची प्रतिभा दाखवण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देणे हे या स्पर्धेचे उद्दिष्ट आहे.
या स्पर्धेसाठी ऑनलाईन अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख 30 ऑक्टोबर, 2021 आहे. '75 क्रिएटिव्ह माइंड्स ऑफ टुमॉरो 'साठी चित्रपट दाखल करण्याबाबतची तपशीलवार मार्गदर्शक सूचना , अर्जासह www.dff.gov.in आणि www.iffi.org. वर उपलब्ध आहेत.
ब्रिक्स राष्ट्र चित्रपट महोत्सव
यंदा ब्रिक्स चित्रपट महोत्सवाच्या माध्यमातून इफ्फीमध्ये पहिल्यांदा पाच ब्रिक्स राष्ट्रांचे चित्रपट प्रदर्शित केले जातील. ब्राझील, रशिया, दक्षिण आफ्रिका, चीन आणि भारत हे पाच देश 52 व्या इफ्फी अर्थात भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामधील लक्षवेधी देश असतील असे ठाकूर यांनी जाहीर केले.
यंदाच्या इफ्फीच्या शुभारंभी चित्रपटाची घोषणा करताना श्री ठाकूर म्हणाले की, कार्लोस सौरा दिग्दर्शित 'द किंग ऑफ ऑल वर्ल्ड' (एल रे डी तोडो एल मुंडो) या चित्रपटाने महोत्सवाची सुरवात होईल आणि हा या चित्रपटाचा आंतरराष्ट्रीय प्रीमियर देखील असेल. व्हेनिस फिल्म फेस्टिव्हलमध्ये सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक पुरस्कार विजेते जेन कॅम्पियन दिग्दर्शित द पॉवर ऑफ द डॉग हा चित्रपट मिड फेस्ट फिल्म म्हणून महोतसवादरम्यान दाखवला जाईल. जगभरातील प्रमुख आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांत गौरवलेल्या 30 चित्रपटांची निवड ही 52 व्या इफ्फी मधील महोत्सव कॅलिडोस्कोप आणि वर्ल्ड पॅनोरमा या विभागामध्ये प्रदर्शनासाठी करण्यात आली आहे.
52 व्या इफ्फीमध्ये दिवंगत चित्रपट अभिनेते दिलीप कुमार यांच्यासह सुमित्रा भावे, बुद्धदेब दासगुप्ता, संचारी विजय, सुरेखा सिक्री, जीन-पॉल बेलमोंडो, बर्ट्रँड टेवेनिअर, ख्रिस्तोफर प्लमर आणि जीन क्लॉड कॅरीअर यांना आदरांजली अर्पण केली जाईल.
52 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील आंतरराष्ट्रीय स्पर्धा विभागातील चित्रपटांचे परीक्षण करण्यासाठी खालील ज्युरींचा समावेश आहे.
सुश्री राखनबानीतेमाद (67 वर्ष) इराण | चित्रपट निर्मात्या - ज्युरी अध्यक्ष
श्री स्टीफन वूली (65 वर्षे) | ब्रिटन | चित्रपट निर्माता, दिग्दर्शक
श्री सिरो गुएरा (40 वर्षे) | कोलंबिया | चित्रपट निर्माता
श्री विमुक्ति जयसुंदरा (44 वर्ष) | श्रीलंका | चित्रपट निर्माता
श्री निल माधव पांडा (47 वर्ष) | भारत | चित्रपट निर्माता
सिंहावलोकन
52 व्या IFFI मधील सिंहावलोकन विभागात प्रख्यात हंगेरियन चित्रपट निर्माते श्री बेला तार यांचे चित्रपट प्रमुख आकर्षण असतील. त्यांच्या चित्रपटांनी बर्लिन, कान आणि लोकर्नो चित्रपट महोत्सवात प्रशंसा मिळवली आहे. ते एक असे स्वतंत्र चित्रपट निर्माते आहेत ज्यांनी स्वतःची दृश्य शैली तयार केली आहे.
सिंहावलोकन कार्यक्रमात, रशियन चित्रपट निर्माते आणि स्टेज डायरेक्टर श्री आंद्रेई कोन्चालोव्स्की यांच्या कारकिर्दीचा ही आढावा घेतला जाणार आहे . त्यांच्या चित्रपटांनी असंख्य पुरस्कार मिळवले आहेत ज्यात कान्स महोत्सव ग्रँड प्रिक्स स्पेशल डु ज्युरी, एक FIPRESCI पुरस्कार, दोन सिल्व्हर लायन्स, तीन गोल्डन ईगल पुरस्कार आणि प्राइमटाइम एमी पुरस्कार यांचा समावेश आहे.
सिंहावलोकन विभागात दादासाहेब फाळके पुरस्कार विजेते श्री रजनीकांत यांचाही समावेश असेल.
काल्पनिक ब्रिटिश गुप्तहेर जेम्स बाँडची मोठ्या पडद्यावर प्रथम भूमिका करणारे अभिनेते सर सीन कॉनरी यांना या महोत्सवात विशेष आदरांजली अर्पण केली जाईल.
****
Jaydevi PS/ V Ghode / V Joshi /CY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1765690)
Visitor Counter : 333