पंतप्रधान कार्यालय

नवी दिल्लीतल्या एम्सच्या झज्जर परिसरातल्या राष्ट्रीय कर्करोग संस्थेमध्ये इन्फोसिस फाँडेशन विश्राम सदनाच्या उद्‌घाटनप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण

Posted On: 21 OCT 2021 4:39PM by PIB Mumbai

नवी दिल्ली,  21 ऑक्टोबर 2021

नमस्कार जी!

हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर, केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडवियाजी, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉक्टर भारती पवारजी, हरियाणाचे आरोग्य मंत्री अनिल विजजी, इन्फोसिस फाँडेशनच्या अध्यक्षा सुधा मूर्ती जी, संसदेमधले माझे सहकारी, आमदार आणि इतर माननीय,

माझ्या बंधू आणि भगिनींनो,

आजच्या 21 ऑक्टोबर, 2021, या दिवसाची इतिहासामध्ये एक वेगळी नोंद झाली आहे. भारताने अगदी काही वेळापूर्वीच 100 कोटी मात्रांच्या लसीकरणाचा आकडा पार केला आहे. 100 वर्षांमध्ये आलेल्या सर्वात मोठ्या महामारीचा सामना करण्यासाठी देशाकडे आता 100 कोटी लसीच्या मात्रांचे मजबूत सुरक्षा कवच आहे. हे भारताने मिळवलेले यश आहे. प्रत्येक नागरिकाचे हे यश आहे. लसीची निर्मिती करणाऱ्या देशातल्या कंपन्या, लसीची वाहतूक करण्याचे काम करणारे कर्मयोगी, सर्वांना लस देण्यासाठी कार्यरत असलेले आरोग्य क्षेत्रातले व्यावसायिक, अशा सर्वांचे मी अगदी खुल्या मनाने, अगदी हृदयापासून खूप खूप आभार व्यक्त करतो.

आत्ताच काही वेळापूर्वी मी राम मनोहर लोहिया रूग्णालयामध्ये एका लसीकरण केंद्राला भेट देऊन आलो आहे. सर्वांमध्ये एक उत्साह आहे आणि त्याचबरोबर आपल्यावर असलेल्या जबाबदारीची जाणीवही आहे. आपण सर्वांनी मिळून कोरोनाला लवकरात लवकर हरवायचे आहे, अशी भावना सर्वांची आहे. मी प्रत्येक भारतवासियाचे अभिनंदन करतो. 100 कोटी लसीच्या मात्रा देण्याचे काम यशस्वीतेने पार पाडले, त्याचे संपूर्ण श्रेय प्रत्येक भारतीयाला अर्पण करतो.

मित्रांनो,

आज एम्स झज्जरमध्ये कर्करोगावर औषधोपचार करण्यासाठी येणा-या रूग्णांना एक खूप मोठी सुविधा मिळाली आहे. राष्ट्रीय कर्करोग संस्थेमध्ये बनविण्यात आलेले हे विश्राम सदन रूग्णांची आणि त्यांच्या नातेवाइकांची काळजी नक्कीच कमी करेल. कर्करोगासारख्या आजारामध्ये औषधोपचारासाठी रूग्णाला आणि त्याच्या नातेवाइकांना वारंवार रूग्णालयामध्ये जावे-यावे लागतेच. कधी-कधी तर डॉक्टरांचा सल्ला घेण्यासाठी, तर कधी तपासण्या करण्यासाठी, कधी रेडियो थेरपी, कधी कीमो थेरपी घेण्यासाठी यावे लागते. अशावेळी रूग्णांना, त्यांच्या नातेवाइकांना कुठे रहावे हा प्रश्न पडत असे. त्यांची खूप मोठी अडचण होत असे. आता राष्ट्रीय कर्करोग संस्थेमध्ये येणा-या रूग्णांची ही अडचण मोठ्या प्रमाणावर कमी होईल. विशेष करून हरियाणाचे लोक, दिल्ली आणि आजूबाजूच्या भागातून येणारे लोक, उत्तराखंडचे लोक, यांना या सदनाची खूप मोठी मदत मिळेल.

मित्रांनो,

यावेळी लाल किल्ल्यावरून दिलेल्या भाषणामध्ये मी एक गोष्ट सांगितली होती. मी म्हणालो होतो, ‘सबका प्रयास’! त्यावेळी मी सर्वांच्या प्रयत्नाविषयी काही बोललो होतो. क्षेत्र कोणतेही असो, त्या क्षेत्रामध्ये सामूहिक शक्तीने एकत्रितपणाने काम केले जाते, त्यावेळी सर्वांनी केलेले प्रयत्न दिसायला लागतात आणि परिवर्तनाची गतीही वाढत जाते. दहा मजल्यांचे हे विश्राम सदनही सर्वांच्या प्रयत्नांमुळे कोरोना काळामध्ये बनून तयार झाले आहे आणि या विश्राम सदनाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे, या कामामध्ये देशाचे सरकार आणि कॉर्पोरेट विश्व यांनी एकत्रित शक्ती लावली आहे. इन्फोसिस फाँडेशनने विश्राम सदनाची इमारत बनविली आहे तर यासाठी लागणारी जमीन आणि वीज-पाण्याचा खर्च एम्स झज्जरच्या वतीने केला गेला आहे. मी एम्सचे व्यवस्थापन आणि सुधा मूर्ती यांच्या समूहाने केलेल्या या सेवाकार्यासाठी आभार व्यक्त करतो. सुधा जी यांचे व्यक्तित्व जितके विनम्र आहे, सहज-सरल आहे, तितकीच त्यांच्या मनात गरिबांविषयी करूणा आहे. नर सेवेला नारायण सेवा मानणारे त्यांचे विचार, त्यांचे कार्य, प्रत्येकाला प्रेरणा देणारे आहे. या विश्राम सदनाच्या उभारणीसाठी त्यांनी दिलेल्या सहकार्याचे मी कौतुक करतो.

मित्रांनो,

भारताच्या कॉर्पोरेट क्षेत्राने, खाजगी क्षेत्राने, सामाजिक संघटनांनी देशामध्ये आरोग्य सेवा, सुविधा बळकट करण्यायसाठी सातत्याने आपले योगदान दिले आहे. आयुष्मान भारत, पीएम-जेएवायसुद्धा याचे एक उत्तम उदाहरण आहे. या योजनेअंतर्गत आत्तापर्यंत सव्वा दोन कोटींपेक्षा जास्त रूग्णांवर मोफत औषधोपचार करण्यात आले आहेत आणि हे औषधोपचार सरकारी रूग्णालयांबरोबरच खाजगी रूग्णालयांमध्येही करण्यात आले आहेत. आयुष्मान योजनेमध्ये देशातील हजारो रूग्णालय जोडले गेले आहेत. त्यामध्ये जवळपास 10 हजार खाजगी क्षेत्रातील आहेत.

मित्रांनो,

सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रामध्ये होत असलेली भागीदारी, वैद्यकीय पायाभूत सुविधा आणि वैद्यकीय शिक्षण यांच्या अभूतपूर्व विस्तारासाठीही कामी येत आहे. आज ज्यावेळी आपण देशातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये कमीत कमी एक वैद्यकीय महाविद्यालय बनविण्यावर भर देत आहोत, त्यावेळी खाजगी क्षेत्राची भूमिकाही अतिशय महत्वाची आहे. या भागीदारीला बळकटी देण्यासाठी वैद्यकीय शिक्षणाशी जोडलेल्या प्रशासकीय कामामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर सुधारणा करण्यात आल्या आहेत. राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची निर्मिती झाल्यानंतर, भारतामध्ये खाजगी वैद्यकीय महाविद्यालये सुरू करणे अधिक सुलभ झाले आहे.

मित्रांनो,

आपल्याकडे असे म्हणतात की, ‘‘दान दिए धन ना घटे, नदी ना घटे नीर’’ याचा अर्थ असा आहे की, दान करण्याने धन कधी कमी होत नाही तर ते वाढते. म्हणूनच जितकी सेवा केली जाईल, दान केले जाईल, तितकीच संपत्ती वाढणार आहे. याचा अर्थ एका पद्धतीने आपण जे दान देतो, सेवा करतो, त्यामुळे आपलीच अधिक आणि व्यापक प्रगती होणार आहे. मला विश्वास आहे, आज हरियाणातल्या झज्जरमध्ये विश्राम सदन हे विश्वास सदन म्हणूनही काम करणार आहे. देशातल्या इतर लोकांनाही अशाच प्रकारची आणखी विश्राम सदन, बनविण्याची प्रेरणा देणार आहे. देशामध्ये जितके एम्स आहेत, तसेच जितके नवीन एम्स बनविण्यात येत आहेत, त्या सर्व ठिकाणी रूग्णांना, त्यांच्या नातेवाइकांना रात्रीच्यावेळी वास्तव्य करण्याची सुविधा जरूर निर्माण व्हावी यासाठी केंद्र सरकार आपल्याबाजूनेही  प्रयत्न करीत आहे.

मित्रांनो,

आपल्या आजारपणाला कंटाळलेला रुग्ण आणि रुग्णाच्या नातेवाईकांना थोड्या सुविधा मिळाल्या तर आजारपणाशी झुंज घेण्याची त्यांची इच्छाशक्ती मजबूत होते.या सुविधा देणे म्हणजे एक प्रकारे त्यांची सेवाच आहे जेव्हा रुग्णाला आयुष्यमान भारत योजनेच्या अंतर्गत विनामूल्य उपचार मिळतात तेव्हा ती एक प्रकारे रुग्णांची सेवाच असते. ही सेवेची भावना असल्यामुळे आमच्या सरकारने  कॅन्सरच्या जवळपास चारशे औषधांच्या किमती कमी करण्यासाठी पावले उचलली. ही सेवेची भावनाच आहे ज्याच्यामुळे गरिबांना जन औषधी केंद्रांमधून अतिशय स्वस्त आणि अगदी कमी किमतीत औषधे दिली जात आहेत आणि ज्यांच्या घरात कधीकधी वर्षभर औषधे घ्यावी लागतात अशा मध्यमवर्गीय कुटुंबाची वर्षाला दहा , बारा  पंधरा हजार रुपयांची बचत होते. रुग्णालयात प्रत्येक प्रकारच्या आवश्यक सुविधा मिळाव्यात, वेळ घेणे सोपे आणि सोयीचे असावेवेळ घेताना कोणतीही अडचण येऊ नये याकडेही लक्ष दिले जात आहे. मला आनंद वाटतो की आज भारतात इन्फोसिस फाउंडेशनसारख्या अनेक संस्था 'सेवा परमो धर्म' हा सेवाभाव बाळगून  गरीबांना मदत करत आहेत. त्यांचे जगणे सोपे करत आहेत  आणि ज्याप्रकारे आत्ता सुधाजींनी पत्रम पुष्पमची गोष्ट सविस्तर सांगितली तसेच मला वाटते, प्रत्येक नागरिकाचे हे कर्तव्यच आहे की आपल्या जीवनात जेव्हा केव्हा कोणतेही फुल सेवाभावाने समर्पित करण्याचा क्षण येईल तेव्हा तो व्यर्थ दवडता कामा नये

मित्रांनो,

स्वतंत्रता दिवसाच्या अमृत महोत्सवी कालखंडात एक मजबूत आरोग्यसेवा पद्धती विकसित करण्याच्या दिशेने भारत वेगाने आगेकूच करत आहे. गावा गावात सर्वदूरपर्यंत पसरलेली हेल्थ अँड वेलनेस केंद्रे, आरोग्य क्षेत्रात मानवी संसाधन विकास , नव्या वैद्यकीय संस्थांची निर्मिती अशाप्रकारे याच्याशी दुवा साधणारे काम देशाच्या कानाकोपऱ्यात सुरू आहे. हा संकल्प निश्चितच खूप मोठ्या  स्वरुपाचा आहे परंतु समाज आणि सरकार संपूर्ण शक्तीनिशी काम करेल तर आपण आपले लक्ष्य खूप लवकर गाठू शकू. आपल्या लक्षात असेल की काही काळापूर्वी एक नाविन्यपूर्ण कल्पना अस्तित्वात होती. सेल्फ फॉर सोसायटी म्हणजेच 'समाजासाठी आपण'. याच्याशी जोडून घेत हजारो संस्था आणि लाखो लोक समाजाच्या हितार्थ आपले योगदान देतात. भविष्यात आपल्या प्रयत्नांना वेग देत संघटितपणे पुढे गेले पाहिजे. जास्तीत जास्त लोकांना जोडून घेत याबाबतीत जागृती केली पाहिजे. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात एका आरोग्यपूर्ण आणि संपन्न भविष्यासाठी आपणा सर्वांना मिळून काम करत राहायला हवे आणि आपल्या सर्वांच्या प्रयत्नांनीच हे साध्य होईल, समाजाच्या सामुदायिक शक्तीमुळेच हे साध्य होईल.

मी पुन्हा एकदा सुधाजी, इन्फोसिस फाउंडेशनला धन्यवाद देतो. मी आज जेव्हा हरियाणाच्या भूमी वरील लोकांशी बोलत आहे तेव्हा मी त्यांना अजून काही सांगू इच्छितो ते म्हणजे मला हरियाणापासून खूप काही शिकायला मिळालं हे माझं भाग्यच आहे. जीवनातील एक मोठा कालखंड मला हरियाणात काम करायची संधी देऊन गेला. मी येथील बरीचशी सरकारे जवळून पाहिली आहेत. अनेक दशकांनंतर हरियाणात मनोहरलाल खट्टरजींच्या नेतृत्वाला नेकपणे व इमानदारीने काम करणारे सरकार मिळाले आहे. असे सरकार मिळाले आहे जे  दिवस रात्र हरियाणाच्या उज्ज्वल भविष्याचा विचार करते.  मला ठाऊक आहे आत्ता मीडियाचे लक्ष अशा रचनात्मक आणि सकारात्मक गोष्टींवर  जात नाही. परंतु केव्हा ना केव्हा जेव्हा जेव्हा हरियाणाचे मूल्यांकन होईल तेव्हा गेल्या पाच दशकांतील सर्वात उत्तम काम करणारे, नाविन्यपूर्ण काम करणारे , द्रष्ट्या विचारांनी काम करणारे हे हरयाणा सरकार आहे. आणि मनोहर लालना मी वर्षानुवर्षे पाहत आलो आहे परंतु आत्ता मला दिसते आहे की मुख्यमंत्री म्हणून त्यांची प्रतिभा ज्याप्रकारे बहरली आहे अनेक विविध कार्यक्रम ते ज्या प्रकारे मनापासून पार पाडत आले आहेत, ज्याप्रकारे नाविन्यपूर्ण कार्यक्रम करत आहेत की भारत सरकारला सुद्धा वाटते हरियाणाचा हा एक प्रयोग संपूर्ण देशभरात राबवून बघावा. असे काही प्रयोग आम्ही केले आहेत. म्हणूनच आज जेव्हा मी हरयाणाच्या भूमीवर राहून त्यांच्याशी बोलत आहे तेव्हा मी नक्की सांगेन की मनोहरलालजींचे नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीच्या या टीमने ज्याप्रकारे हरियाणाची सेवा  केली आहे तसेच दूरदर्शी विचार करून हा पाया घातला आहे ते हरियाणाच्या उज्वल भविष्याची मोठी ताकद बनणार आहे. पुन्हा मनोहरलालजींना सार्वजनिकरित्या खूप खूप शुभेच्छा देतो. त्यांच्या संपूर्ण टीमला खुप खुप शुभेच्छा देतो आणि आपल्या सर्वांचे मनापासून खूप आभार मानतो.

 

JPS/ST/SB/VS/PM

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1765479) Visitor Counter : 184