गृह मंत्रालय
केंद्रीय गृह तसेच सहकार मंत्री अमित शाह यांच्या हस्ते अंदमान-निकोबार द्वीपसमूहातील नेताजी सुभाषचंद्र बोस बेटावरील विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि भूमिपूजन
अंदमान निकोबार हे स्थान मुळातच स्वातंत्र्य चळवळीचे तीर्थक्षेत्र आहे, देशातील प्रत्येक युवकाने येथे काळ्या पाण्याची शिक्षा भोगलेल्यांचे दुःख जाणून, समजून त्याचे दर्शन घेतले पाहिजे
आपले जीवन भारताच्या विकासासाठी,उन्नतीसाठी आणि देशाचा गौरव वाढविण्यासाठी समर्पित करण्याची आपली इच्छा असेल तर आपल्याला कोणीच अडवू शकत नाही, स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करण्यामागचे आपले हेच उद्दिष्ट आहे
Posted On:
16 OCT 2021 9:57PM by PIB Mumbai
केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी आज अंदमान निकोबार द्वीपसमूहातील नेताजी सुभाषचंद्र बोस बेटावरून विविध विकास योजनांचे उद्घाटन तसेच भूमिपूजन केले. शाह यांनी यावेळी, राणी लक्ष्मीबाई बेट, शहीद बेटावरील पर्यावरण-स्नेही पर्यटन प्रकल्प, स्वराज बेटावरील जल विमानतळ आणि इतर विकास योजनांचे हवाई सर्वेक्षण केले. या प्रसंगी, अंदमान-निकोबार द्वीपसमूहाचे उपराज्यपाल अॅडमिरल डी.के.जोशी (सेवानिवृत्त) आणि केंद्रीय गृह सचिव यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमादरम्यान केलेल्या भाषणात केंद्रीय मंत्री शाह म्हणाले की ते या ठिकाणी येऊन अत्यंत रोमांचित झाले आहेत, आणि याचे कारण म्हणजे आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी इंग्रज सत्तेविरुद्ध अनेक वर्षे आपण लढलो, त्याचा परिणाम म्हणून 1947 साली आपल्या देशाला संपूर्ण स्वातंत्र्य मिळाले, पण नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी 1943 मध्येच हा भाग इंगज राजवटीच्या जोखडाखालून दोन वर्षे स्वतंत्र केला होता. संपूर्ण देशभरातील देश्भक्तांसाठी, विशेषतः युवा वर्गासाठी हे स्थान अत्यंत महत्त्वपूर्ण असायला हवे कारण याच ठिकाणी नेताजींनी पहिल्यांदा दोन रात्री निवास केला आणि इथेच नेताजींनी सर्वात प्रथम तिरंगा फडकविला होता.
आपण देशभर स्वातंत्र्य प्राप्तीचा अमृतमहोत्सव साजरा करीत आहोत आणि याच्या माध्यमातून आपण लहान मुले आणि युवा वर्गाच्या मनात देशभक्तीची भावना जागृत करण्याचा प्रयत्न करीत आहोत, जेणेकरून या भावनेच्या आधारावरच ही मुले नव्या आणि महान भारताच्या उभारणीच्या कार्यात योगदान देतील. आणि त्यातून भारताला संपूर्ण विश्वात मोठे करून सुयोग्य स्थानी पोहोचण्याचे जे स्वप्न पंतप्रधान मोदींनी पाहिले आहे ते साकार करण्याच्या दिशेने आपली नवी पिढी मार्गक्रमण करेल, असे अमित शाह यावेळी म्हणाले.
अंदमान निकोबार हे स्थान मुळातच स्वातंत्र्य चळवळीचे तीर्थक्षेत्र आहे, देशातील प्रत्येक युवकाने येथे काळ्या पाण्याची शिक्षा भोगलेल्यांचे दुःख जाणून, समजून त्याचे दर्शन घेतले पाहिजे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. इथल्या सेल्युलर तुरुंगात वीर सावरकर यांनी दहा वर्ष शिक्षा भोगली, भाई परमानंद, संन्याल जी यांनी देखील शिक्षा भोगल्या, तो तुरुंग या देशाच्या युवा पिढीने एकदा बघितला तरी त्यांना कळेल की ज्या स्वतंत्र भारतात आपण मोकळेपणी श्वास घेत आहोत ते स्वातंत्र्य मिळविण्यासाठी आपण किती मोठी किंमत मोजली आहे. जोपर्यंत एखादी व्यक्ती सेल्युलर तुरुंगात जावून तिथल्या यातनामय जीवनाचे चित्रण आणि वर्णन प्रत्यक्ष बघत नाही तोपर्यंत त्याला ही कल्पनाच येणार नाही की कशा प्रकारे अगणित यातना सहन करूनही स्वातंत्र्य सैनिक भारताच्या स्वातंत्र्यप्राप्तीसाठी अथकपणे लढत राहिले, अशा भावना शाह यांनी यावेळी व्यक्त केल्या.
स्वातंत्र्याच्या या अमृतमहोत्सवी वर्षात येथे आल्यावर एका आगळ्या प्रेरणेचा अनुभव येतो आहे. असे गृहमंत्री पुढे म्हणाले. इथली हवा आजही वीर सावरकर आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या प्रेरक आयुष्यांनी भारलेली आहे. शाह यांनी देशभरातील युवकांना एकदा तरी अंदमान निकोबारला भेट देण्याचे आणि स्वातंत्र्य संग्रामाच्या या तीर्थक्षेत्राचे दर्शन घेण्याचे आवाहन केले. आता आपला देश स्वतंत्र झालेला आहे आणि नेताजी, वीर सावरकर आणि अशा कित्येक प्रसिध्द आणि अप्रसिध्द स्वातंत्र्य सैनिकांच्या स्वप्नातील भारताची उभारणी करण्याची जबाबदारी युवा पिढीची आहे, आमची आहे ही प्रेरणा आपल्या येणाऱ्या पिढ्यांना मिळावी या हेतूने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथील तीन बेटांचे शहीद, स्वराज आणि सुभाष असे नामकरण केले आहे, असे शाह यांनी सांगितले. आपल्याला देशासाठी स्वातंत्र्य मिळविण्यासाठीच्या लढ्यात सहभागी होण्याची संधी मिळाली नाही ,पण देशकल्याणासाठी जीवन जगण्याची संधी आपल्यापासून कोणीच हिरावून घेऊ शकत नाही. आपले जीवन भारताच्या विकासासाठी,उन्नतीसाठी आणि देशाचा गौरव वाढविण्यासाठी समर्पित करण्याची आपली इच्छा असेल तर आपल्याला कोणीच अडवू शकत नाही, स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करण्यामागचे आपले हेच उद्दिष्ट आहे असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री शाह यांनी केले.
आज अंदमान निकोबार द्वीपसमूहामध्ये 299 कोटी रुपये खर्चाच्या 14 प्रकल्पांचे उद्घाटन तसेच 643 कोटी रुपये खर्चाच्या 12 विकास योजनांचे भूमिपूजन झाले आहे, अशी माहिती शाह यांनी दिली. अंदमान बेटासारख्या लहान परिसरात केंद्र सरकार सुमारे 1,000 कोटी रुपये खर्चाच्या विकासकामांची सुरुवात आज करीत आहे. ज्या पुलाचे आज लोकार्पण झाले आहे त्या पुलाला आझाद हिंद सेना पूल असे नाव देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे, असेही त्यांनी सांगितले. या पुलाच्या एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे प्रवास करणारा प्रत्येक जण नेताजींनी त्यांच्या जीवनात देशासाठी केलेला 35,000 किलोमीटरचा अथक प्रवास, त्यांचे साहस आणि त्यांच्या पराक्रमाला श्रद्धांजली देत जावा अशी अपेक्षा केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी यावेळी व्यक्त केली.
***
R.Aghor/S.Chitnis/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1764445)
Visitor Counter : 357