पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

अफगाणिस्तानसंदर्भातल्या जी 20 विशेष शिखर परिषदेत पंतप्रधान झाले सहभागी

Posted On: 12 OCT 2021 11:05PM by PIB Mumbai

नवी दिल्ली,  12 ऑक्टोबर 2021

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अफगाणिस्तानसंदर्भातल्या जी 20 विशेष शिखर परिषदेत दुरदृष्य प्रणालीद्वारे सहभागी झाले.जी -20 चे विद्यमान अध्यक्ष असणाऱ्या इटलीने ही बैठक आयोजित केली होती. इटलीचे पंतप्रधान मारीओ द्रागी या बैठकीच्या अध्यक्ष स्थानी होते. अफगाणिस्तान मधली मानवविषयक परिस्थिती, दहशतवादाबाबत चिंता आणि मानवाधिकार या संदर्भात बैठकीत विचार विनिमय करण्यात आला.

अफगाणीस्तानमधल्या सध्याच्या परिस्थितीबाबत आढावा घेण्यासाठी बैठक आयोजित करण्यासाठी इटलीने घेतलेल्या पुढाकाराचे पंतप्रधानांनी स्वागत केले. भारत आणि अफगाणीस्तान यांच्या जनतेमध्ये शतकांपासून असलेल्या संबंधांचा त्यांनी उल्लेख केला. गेल्या दोन दशकांमध्ये अफगाणीस्तानमध्ये सामाजिक-आर्थिक विकासाला चालना, युवक आणि महिलांसाठी क्षमता वृद्धी यामध्ये भारताने योगदान दिले आहे. अफगाणीस्तानमध्ये  500 पेक्षा जास्त विकास प्रकल्पांची भारताने अंमलबजावणी केल्याचे स्मरण त्यांनी केले.

अफगाणी जनतेला भारतासाठी मित्रत्वाची भावना असल्याचे पंतप्रधान म्हणाले. उपासमार आणि कुपोषणाचा सामना करणाऱ्या अफगाणी जनतेच्या वेदना प्रत्येक भारतीयाला जाणवतात. अफगाणीस्तानला मानवतेच्या दृष्टीकोनातून तातडीने आणि विनाव्यत्यय मदत आंतरराष्ट्रीय समुदायाने सुनिश्चित करण्याच्या आवश्यकतेवर त्यांनी भर दिला.

क्षेत्रीय आणि जागतिक स्तरावर अफगाण क्षेत्र कट्टरता आणि दहशतवाद यांचा स्त्रोत होऊ नये हे सुनिश्चित करण्याच्या गरजेवरही त्यांनी भर दिला. कट्टरतावाद, दहशतवाद, शस्त्रास्त्र आणि अमली पदार्थांची तस्करी यांच्यातल्या संबंधा विरोधातल्या संयुक्त लढा व्यापक करण्याच्या आवश्यकतेवर पंतप्रधानांनी भर दिला.

अफगाणीस्तानमधल्या गेल्या 20 वर्षातल्या सामाजिक-आर्थिक लाभांचे जतन करण्यासाठी आणि कट्टरतावादी मानसिकतेचा प्रसार रोखण्यासाठी, महिला आणि अल्पसंख्याक यांचा समावेश असलेले समावेशक प्रशासनाचे आवाहन पंतप्रधानांनी केले. अफगाणीस्तानमध्ये संयुक्त राष्ट्रांच्या महत्वपूर्ण भूमिकेसाठी त्यांनी आपला पाठींबा दर्शवला आणि  अफगाणीस्तानबाबत संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या प्रस्ताव 2593 मधल्या संदेशासाठी जी-20 च्या नव्याने समर्थनाचे आवाहन केले. आंतरराष्ट्रीय समुदायाला एकजुटीने आंतरराष्ट्रीय प्रतिसादाचे आवाहन त्यांनी केले, याविना अफगाणीस्तानमधल्या सद्य स्थितीत बदल घडवणे कठीण होईल.    

 

 

 

S.Tupe/N.Chitale/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1763417) Visitor Counter : 320