इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी नॅसकॉमच्या ‘डिझाईन आणि इंजिनीअरिंग समिट’च्या 13 व्या आवृत्तीला केले संबोधित

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2015 मध्ये डिजिटल इंडियाला सुरुवात केल्यापासून भारताची जागतिक नवोन्मेष निर्देशांकात आगेकूच

50 सर्वात नाविन्यपूर्ण जागतिक कंपन्यांपैकी 70% पेक्षा जास्त संशोधन आणि विकास केंद्र भारतात आहेत: माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर

उत्पादन, अभियांत्रिकी, डिजिटलकरणाच्या वाढत्या संधी भारताच्या ट्रिलियन डॉलर्सच्या डिजिटल अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यात महत्त्वाची भूमिका बजावतील: माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर

Posted On: 06 OCT 2021 6:41PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 6  ऑक्टोबर 2021

इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान, कौशल्य विकास आणि उद्योजकता राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर, आज 'इंजीनियरिंग द नेक्स्ट' या संकल्पनेसह नॅसकॉमने आयोजित केलेल्या 'डिझाईन आणि इंजिनीअरिंग समिट'च्या 13 व्या आवृत्तीला आभासी माध्यमातून उपस्थित होते. 6 ते 7 ऑक्टोबर 2021 रोजी आयोजित करण्यात आलेले हे शिखर संमेलन जागतिक अभियांत्रिकी आणि डिझाईन संबंधित प्रयत्नांचा उत्सव साजरा करत आहे. यात 4 उद्दिष्टांवर विशेष लक्ष केंद्रित केले आहे-  मूल्य वाढीसाठी संशोधन तसेच नवोन्मेषाला प्रोत्साहन देणे, प्रमाण आणि विकासासाठी सहनिर्मिती, ग्राहकांच्या यशासाठी डिजिटलायझेशन आणि जलद उत्पादन, कामाच्या चौकटीचे भविष्य परिभाषित करणे आणि व्यवसायाला स्थिरतेच्या उद्दिष्टांशी जोडणे.

अभियांत्रिकी, संशोधन आणि विकास (ER&D) क्षेत्र 31 अब्ज डॉलर्सपेक्षा अधिक महसूल निर्माण करते आणि 1000 पेक्षा जास्त जागतिक कंपन्यांचा आधार आहे असे त्यांनी नमूद केले. विविध क्षेत्रांमध्ये उत्पादनाच्या संशोधन आणि विकासासाठी त्या कंपन्यांनी भारतात केंद्रे स्थापन केली आहेत. याव्यतिरिक्त, अव्वल 50 अभियांत्रिकी सेवा प्रदात्यांपैकी 12 जणांची मुख्यालये भारतात आहेत आणि आघाडीच्या 50 सेवा प्रदात्यांपैकी 44 जणांचे इआर अँड डी भारतात संचालित आहेत. 50 सर्वात नाविन्यपूर्ण जागतिक कंपन्यांपैकी 70% पेक्षा जास्त संशोधन आणि विकास केंद्र भारतात आहेत. आपण वापरत असलेल्या जवळजवळ प्रत्येक उत्पादनामध्ये 'इंडिया इनसाइड' अर्थात भारतीय स्पर्श आहे असे ते म्हणाले.

"अजून सर्वोत्तम बाहेर येणे बाकी आहे आणि उत्पादन, अभियांत्रिकी आणि डिजिटलीकरणाच्या अस्पर्शित संधी पुढील 5 वर्षात ट्रिलियन डॉलरच्या डिजिटल अर्थव्यवस्थेच्या आपल्या लक्ष्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावू शकतात" असे ते म्हणाले.

महामारीने नवोन्मेषाकरता एक अपरिवर्तनीय बदल निर्माण केला आहे. संपर्कविरहित प्रणाली, बुद्धिमत्ता आणि विश्लेषण तसेच सॉफ्टवेअर नेतृत्व प्रणालीद्वारे उत्पादनांची रचना, अभियांत्रिकी आणि सेवा कशी दिली जावी याच्या नवीन संधी निर्माण केल्या जात आहेत. यात एम्बेडेड सिस्टम्स, डिजिटल इनोव्हेशन आणि सायबर सुरक्षेमधे क्षमता बदलण्याची मागणी होत आहे.

या कार्यक्रमाची `इंजीनियरिंग द नेक्स्ट 'वर आधारित एक मनोरंजक संकल्पना असल्याचे चंद्रशेखर यांनी नमूद केले. भारताने या सर्वाचे नेतृत्व केले पाहिजे - जगासाठी आणि भारतासाठी नाविन्यपूर्ण उपाय तयार करणेपुढील अब्जोंची व्यवस्था तयार करणे, एसडीजी ध्येय साध्य करण्यास सक्षम करतील असे उपाय शोधणे आणि पुढील महामारी टाळण्यासाठी उपाय तयार करू शकतील. "माझ्यासाठी स्वत: एक अभियंता म्हणून, बांधकामाचा आनंद हा एक कौतुकास्पद विषय आहे आणि जेव्हा आपल्या देशाच्या विकास आणि नावीन्यपूर्णतेशी तो जोडला जातो, तेव्हा तो अधिकच प्रशंसनीय बनतो."

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2015 मध्ये डिजिटल इंडिया उपक्रमाची सुरुवात केल्यापासून, भारताची जागतिक नवोन्मेष निर्देशांकात आगेकूच सुरु आहे. सध्या तो 46 व्या क्रमांकावर आहे, 2016 मध्ये 66 व्या क्रमांकावर होता. त्यात 20-अंकाची सुधारणा झाली आहे. भारतात एक नवीन उत्साह आणि आपल्या स्टार्ट-अप उद्योजकांमधे आपण करू शकतो ही उमेद निर्माण झाली आहे. 2021 मध्ये 27 युनिकॉर्न आणि 20 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त निधी आला आहे. भारतातील स्टार्ट-अप आयपीओची वाढ, हे स्टार्ट-अप्सचे वर्ष असल्याचे दर्शवते.

पंतप्रधानांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली भारताची महत्त्वाकांक्षा वाढत आणि विस्तारत आहेत. केवळ स्टार्ट-अप्सलाच नाही तर सरकारच्या पीएलआय योजनेला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला आहे. फक्त इलेक्ट्रॉनिक्स हार्डवेअरसाठी मंजूर प्रस्तावांमुळे पुढील 4 वर्षात 22 अब्ज डॉलर्सपेक्षा अधिक उत्पादन अपेक्षित आहे. पीएलआय योजना, कापड, वाहन इत्यादी क्षेत्रांमध्ये विस्तारित केली गेली आहे. मेक इन इंडियाची दिशा जागतिक आणि भारतीय कंपन्यांना देशात उत्पादन करण्यासाठी आकर्षित करत आहे. ईआर अँड डी सेक्टरचा विचार करता हे खूप महत्वाचे आहे. भारत देशातील डिझाईन, अभियांत्रिकी आणि निर्मितीसह एक एकीकृत भागीदार असू शकतो.

आपल्या भाषणाचा समारोप करताना, चंद्रशेखर यांनी नमूद केले की तंत्रज्ञान आणि कौशल्य यांच्यातील घनिष्ठ संबंध लक्षात घेता, कौशल्य विकास मंत्री म्हणून माझ्या इतर भूमिकेमध्ये, मी डिजिटल तंत्रज्ञान आणि सॉफ्ट स्किल्सच्या क्षेत्रामध्ये रोजगारक्षम कौशल्यांच्या विकासाला गती देण्यासाठी उद्योगाबरोबर काम करत आहे. भारत जगासाठी जागतिक डिजिटल प्रतिभा केंद्र बनू शकेल हे सुनिश्चित करण्यासाठी काम करत आहे.

माझा विश्वास आहे की सध्या भारताकडे जागतिक ईआर अँड डी आउटसोर्सिंग बाजारात 32% हिस्सा आहे. आपल्याकडे असलेल्या महत्वपूर्ण घटक आणि संपूर्ण माहिती तंत्रज्ञान उद्योगासह सरकारची प्रोत्साहन देणारी भूमिका लक्षात घेता ईआर अँड डी मधे पुढील पाच वर्षांत जागतिक बाजारपेठेतील 50% हिस्सा आपला असेल अशी सदिच्छा व्यक्त करतो. तुम्ही यशस्वी व्हावे यासाठी शक्य ते सगळे सरकार म्हणून आम्ही करू. "आपण करू शकतो" या भावनेने पुढे जा आणि आपण दरवर्षी ईआर अँड डीचे यश साजरे करूया. "

 

S.Tupe/V.Ghode/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai@gmail.com(Release ID: 1761898) Visitor Counter : 73