पंतप्रधान कार्यालय

दुबई एक्स्पो 2020 प्रदर्शनात भारतीय पॅव्हेलियनमध्ये पंतप्रधानांनी दिलेला संदेश


“संयुक्त अरब अमिरात आणि दुबईसोबत असलेल्या आपल्या दृढ आणि ऐतिहासिक नातेसंबंधांमध्ये आणखी भर घालण्यासाठी हे प्रदर्शन आपल्याला खूप उपयुक्त ठरेल”

हे प्रदर्शन म्हणजे शतकातून एकदाच कोसळणाऱ्या महामारीच्या संकटाविरुद्ध मनुष्यजातीने दर्शविलेल्या कणखरपणाचा पुरावा देखील आहे

भारत तुम्हांला अधिकाधिक प्रमाणात विकास देऊ करत आहे, श्रेणीविषयक विकास, महत्त्वाकांक्षेतील विकास, परिणामांतील विकास. भारतात या आणि आमच्या विकासकथेचा भाग व्हा

भारतात परंपरेने चालत आलेले उद्योग आणि स्टार्टअप्स यांच्या संयोजनाने आमच्या आर्थिक विकासाला सक्षमता प्रदान केली आहे

“गेल्या सात वर्षांत, भारत सरकारने आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी अनेक सुधारणा केल्या आहेत. आणि ही पद्धत यापुढेही कायम सुरु ठेवण्यासाठी आम्ही याबाबतीत अधिकाधिक काम करू”

Posted On: 01 OCT 2021 8:53PM by PIB Mumbai

नवी दिल्ली 01 ऑक्टोबर

 

दुबई एक्स्पो 2020 प्रदर्शनात भारतीय पव्हेलियनला दिलेल्या संदेशात या प्रदर्शनाला ऐतिहासिक असे संबोधत  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे की, “मध्य पूर्व, आफ्रिका आणि दक्षिण आशियाई प्रदेशात प्रथमच हे प्रदर्शन भरत आहे. संयुक्त अरब अमिरात आणि दुबईशी असलेले आमचे दृढ आणि ऐतिहासिक नातेसंबंध अधिक चांगल्या पद्धतीने जपण्यासाठी हे प्रदर्शन दीर्घकाळ मदत करेल.”  पंतप्रधानांनी संयुक्त अरब अमिरातीचे राष्ट्रपती आणि अबुधाबीचे राज्यकर्ते महामहीम शेख खलिफा बिन झायेद बिन अल् नह्यान  तसेच संयुक्त अरब अमिरातीचे पंतप्रधान आणि उपराष्ट्रपती व दुबईचे राज्यकर्ते शेख मोहम्मद बिन रशिद अल् मक्तोम यांचे अभिनंदन केले. “आपल्या धोरणात्मक भागीदारीबाबत प्रगती करण्यात दोन्ही देशांना जे यश मिळाले आहे त्यासाठी राजपुत्र महामहीम शेख मोहम्मद बिन झायेद अल् नह्यान यांनी महत्त्वाचा हातभार लावला आहे, दोन्ही देशांची प्रगती आणि समृद्धी साधण्यासाठी आपण असेच एकत्रितपणे काम करत राहू अशी अशा मी व्यक्त करतो,” असे गौरवोद्गार काढत पंतप्रधानांनी राजपुत्र महोदयांना शुभेच्छा दिल्या.  

‘मने जोडून,भविष्य उभारू’ ही एक्स्पो 2020 या प्रदर्शनाची मुख्य मध्यवर्ती कल्पना असल्याचा उल्लेख करून पंतप्रधान म्हणाले, “या मध्यवर्ती कल्पनेमागील उर्जा आपण नव्या भारताची निर्मिती करण्यासाठी केलेल्या भारताच्या प्रयत्नांमध्ये देखील दिसून येते. हे प्रदर्शन म्हणजे शतकातून एकदाच कोसळणाऱ्या महामारीच्या संकटाविरुद्ध मनुष्यजातीने दर्शविलेल्या कणखरपणाचा पुरावा देखील आहे”

भारतीय पॅव्हेलियनच्या ‘खुलेपणा, संधी आणि विकास’ या मध्यवर्ती कल्पनेचा संदर्भ देत पंतप्रधानांनी  आज भारत हा शिक्षणासाठी जगातील सर्वात जास्त खुलेपणा असणाऱ्या देशांपैकी एक झाला आहे या मुद्द्यावर भर दिला. भारतात शिक्षणाच्या क्षेत्रात, दृष्टीकोनांच्या बाबतीत आणि  गुंतवणुकीच्या दृष्टीने देखील खुलेपणा निर्माण झाला आहे असे त्यांनी सांगितले. गुंतवणूकदारांना भारतात गुंतवणूक करण्यासाठी आमंत्रित करताना पंतप्रधान म्हणाले, “भारत तुम्हांला अधिकाधिक प्रमाणात विकास देऊ करत आहे, श्रेणीविषयक विकास, महत्त्वाकांक्षेतील विकास, परिणामांतील विकास. भारतात या आणि आमच्या विकासकथेचा भाग व्हा.”

 

भारतातील चैतन्य आणि विविधता यांच्याविषयी बोलताना पंतप्रधान म्हणाले की भारत हा बुद्धिमत्तेचे उर्जाकेंद्र आहे. भारत तंत्रज्ञान, संशोधन आणि अभिनव शोधांच्या विश्वात खूप प्रगती करत आहे असा उल्लेख करुन ते म्हणाले, “भारतात परंपरेने चालत आलेले उद्योग आणि स्टार्टअप्स यांच्या संयोजनाने  आमच्या आर्थिक विकासाला सक्षमता प्रदान केली आहे. भारतीय पॅव्हेलियन या विविध क्षेत्रांमध्ये भारतातर्फे   झालेली सर्वोत्तम कामगिरी दाखवेल,” गेल्या सात वर्षांत, भारत सरकारने आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी अनेक सुधारणा केल्या आहेत. “ही पद्धत यापुढेही कायम सुरु ठेवण्यासाठी आम्ही याबाबतीत अधिकाधिक काम करू” असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुढे सांगितले.

 *******

MC/CY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1760286) Visitor Counter : 170