पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अलिगढ इथे राजा महेंद्र प्रताप सिंह राज्य विद्यापीठाचे केले भूमिपूजन

उत्तर प्रदेश संरक्षण औद्योगिक कॉरिडॉरच्या अलिगढ नोडच्या प्रस्तावित आराखडा मांडलेल्या प्रदर्शनाला पंतप्रधानांनी दिली भेट

राष्ट्रीय नायकांच्या बलिदानाची अनेक पिढ्यांना जाणीव करून देण्यात आली नाही. 20 व्या शतकातल्या या चुकीची दुरुस्ती 21 व्या शतकातला भारत करत आहे

राजा महेंद्र सिंह यांचे जीवन आपल्याला दुर्दम्य इच्छा आणि आपल्या ध्यासाची पूर्तता करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करण्याची तयारी याची शिकवण देते : पंतप्रधान

संरक्षण साहित्याचा मोठा आयातदार ही भारताची प्रतिमा धूसर होत असून जगातला महत्वाचा संरक्षण निर्यातदार अशी नवी ओळख भारताला प्राप्त होत आहे- पंतप्रधान

देश आणि जगातल्या लहान-मोठ्या गुंतवणूकदारांसाठी अतिशय आकर्षक स्थान म्हणून उत्तर प्रदेश पुढे येत आहे : पंतप्रधान

दुहेरी इंजिन सरकारच्या दुहेरी फायद्याचे मोठे उदाहरण उत्तर प्रदेश ठरत आहे : पंतप्रधान

Posted On: 14 SEP 2021 4:40PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 14 सप्टेंबर 2021

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज अलिगढ इथे राजा महेंद्र प्रताप सिंह राज्य विद्यापीठाचे भूमिपूजन केले. उत्तर प्रदेश संरक्षण औद्योगिक कॉरिडॉरच्या अलिगढ नोड आणि राजा महेंद्र प्रताप सिंह राज्य विद्यापीठ यांचा प्रस्तावित आराखडा मांडलेल्या  प्रदर्शनाला पंतप्रधानांनी भेट  दिली.

या कार्यक्रमाला संबोधित करताना पंतप्रधानांनी दिवंगत कल्याण सिंग यांचे स्मरण केले. संरक्षण क्षेत्रात अलिगढची साकारणारी रूपरेखा आणि राजा महेंद्र प्रताप सिंह राज्य विद्यापीठाची होणार असलेली उभारणी  पाहून कल्याण सिंह यांना आनंद झाला असता    असे पंतप्रधान म्हणाले. स्वातंत्र्य चळवळीत अनेक महान व्यक्तींनी आपले सर्वस्व अर्पण केल्याची बाब त्यांनी अधोरेखित केली. मात्र स्वातंत्र्यानंतर, अशा महान स्त्री-पुरुषांच्या बलिदानाची देशाच्या पुढच्या पिढ्यांना जाणीव करून देण्यात आली नाही हे देशाचे दुर्दैव असल्याचे ते म्हणाले. देशाच्या अनेक पिढ्या अशा कथांपासून वंचित राहिल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. 21 व्या शतकातला भारत, 20 व्या शतकातल्या या चुकांची दुरुस्ती करत असल्याचे त्यांनी सांगितले. राजा महेंद्र प्रताप सिंह जी यांना आदरांजली अर्पण करत राजा महेंद्र सिंह यांचे जीवन आपल्याला दुर्दम्य इच्छा आणि आपल्या ध्यासाची पूर्तता करण्यासाठी कितीही कठोर मेहनत करण्याची तयारी याची शिकवण देते. राजा महेंद्र प्रताप सिंह यांनी भारताच्या स्वातंत्र्याचा ध्यास घेतला होता आणि यासाठी त्यांनी आपल्या आयुष्याचा प्रत्येक क्षण वेचला. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव काळात  भारत,हा  शिक्षण आणि कौशल्य विकासाच्या मार्गावरून आगेकूच करत असताना भारत मातेच्या या सुपुत्राच्या नावाने विद्यापीठाची उभारणी ही त्यांना खरी कार्यांजली आहे  असे पंतप्रधान म्हणाले. हे विद्यापीठ उच्च शिक्षणाचे मोठे केंद्र   ठरण्याबरोबरच आधुनिक संरक्षण अभ्यास,संरक्षण उत्पादनशी  संबंधित तंत्रज्ञान आणि मनुष्य बळ विकास यांचे केंद्र म्हणूनही उदयाला येईल असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला. स्थानिक भाषेत शिक्षण आणि कौशल्य या नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या वैशिष्ट्याचा या विद्यापीठाला मोठा लाभ होईल असेही त्यांनी सांगितले.

भारतात अत्याधुनिक ग्रेनेड, बंदुकांपासून ते लढाऊ विमाने, ड्रोन, युद्ध नौका, यासारख्या संरक्षण सामग्री भारतात निर्माण असल्याचे, देशच नव्हे तर संपूर्ण जग आज बघत आहे असे पंतप्रधान म्हणाले. एकेकाळी असलेली संरक्षण सामग्रीचा मोठा आयातदार ही आपली प्रतिमा मोडून काढत, भारत आज जगातला महत्वाचा संरक्षण सामुग्री निर्यातदार देश बनत आहे, असे ते म्हणाले. उत्तर प्रदेश या मोठ्या बदलाचे केंद्र बनत आहे  आणि अशा उत्तर प्रदेशातून आपण खासदार असल्याचा आपल्याला अभिमान आहे, असे पंतप्रधान म्हणाले. ते म्हणाले की अर्धा डझन संरक्षण सामुग्री उत्पादक कंपन्या हजारो कोटी रुपयांची गुंतुवणूकीतून हजारो रोजगार निर्माण करतील. संरक्षण उत्पादन मार्गिकेच्या अलीगड नोड मध्ये छोटी हत्यारेशस्त्रे, हवाई संरक्षणाशी निगडीत उत्पादने बनवणारे नवीन कारखाने सुरु होत आहेत. यामुळे अलीगड आणि आसपासच्या प्रदेशाला एक ओळख मिळेल. घरे आणि दुकानांचे संरक्षण करण्यासाठी कुलुपे बनविण्यासाठी प्रसिद्ध असलेले अलीगड आता देशाच्या सीमांचे संरक्षण करणारी उत्पादने बनवणारे शहर म्हणून प्रसिद्ध होईल. यामुळे युवकांसाठी तसेच लघु आणि मध्यम उद्योगांसाठी यातून नवनव्या संधी निर्माण होतील, याकडे पंतप्रधानांनी लक्ष वेधले.

देशातील आणि जगातील सर्व लहान आणि मोठ्या गुंतवणूकदारांसाठी उत्तर प्रदेश आकर्षक ठिकाण म्हणून पुढे येत आहे, यावर पंतप्रधानांनी आज भर दिला. गुंतवणुकीसाठी गरजेचे वातावरण तयार केले, आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून दिल्या, तरच हे घडून येते,असे  मोदी म्हणाले. दुहेरी इंजिन असलेल्या सरकारच्या दुहेरी लाभाचे मोठे उदाहरण म्हणून उत्तर प्रदेश समोर येत आहे. एकेकाळी देशाच्या प्रगतीतील अडथळा म्हणून हिणवले गेलेल्या उत्तर प्रदेश या राज्यात आज अनेक आघाडीच्या कंपन्या गुंतवणूक करत आहेत, याविषयी पंतप्रधानांनी आनंद व्यक्त केला.

उत्तरप्रदेशातील 2017 पूर्वीच्या परिस्थितीवर देखील पंतप्रधानांनी  भाष्य केले. त्या काळात राज्यात ज्या प्रकारचे घोटाळे होत असत, तसेच सरकारचा कारभार कसा भ्रष्ट हातांमध्ये गेला होता, हे उत्तरप्रदेशातली जनता कधीही विसरु शकणार नाही. मात्र आज, योगी आदित्यनाथ यांचे सरकार उत्तरप्रदेशाचा विकास करण्याचे प्रामाणिक प्रयत्न करत आहे. एक काळ असा होता, जेव्हा उत्तरप्रदेशातील प्रशासन हे  गुंड आणि माफिया लोकांच्या हातात गेले होते. मात्र आता, असे खंडणीखोर आणि माफिया राज चालवणारे गुंड गजाआड गेले आहेत, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

कोविड महामारीचा सर्वाधिक फटका बसलेल्या दुर्बल घटकांची सुरक्षितता तसेच, त्यांना त्रास होणार नाही, यासाठी उत्तरप्रदेश सरकारने केलेल्या कामांबद्दल पंतप्रधानांनी त्यांचे अभिनंदन केले. तसेच, गरीब घटकांपर्यंत अन्नधान्य पोचवण्यासाठी यंत्रणानी केलेले परिश्रम देखील कौतुकास्पद असल्याचे पंतप्रधान म्हणाले. छोटे, अल्पभूधारक शेतकऱ्यांना अधिक बळ देण्यासाठी केंद्र सरकार सातत्याने प्रयत्न आहे,असे पंतप्रधानांनी सांगितले. या दृष्टीने, किमान हमीभावात दीडपट वाढ, किसान क्रेडिट कार्ड योजनेचा विस्तार, विमा योजनेत सुधारणा, शेतकऱ्यांना 3000 रुपये महिना निवृत्तीवेतन , अशा सर्व उपाययोजनांमुळे शेतकरी अधिकाधिक सक्षम होत आहे, असे मोदी म्हणाले.

त्याशिवाय, उत्तरप्रदेशातील सर्व ऊस उत्पादकांना एक लाख 40 हजार कोटी रुपये देण्यात आले आहेत, असेही पंतप्रधान म्हणाले. पेट्रोल मधील इथेनॉलच्या वाढत्या प्रमाणाचा लाभ  पश्चिम उत्तरप्रदेशातील ऊस उत्पादकांना मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

 

Jaydevi PS/NC/RA/PM

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai@gmail.com(Release ID: 1754788) Visitor Counter : 45