पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांच्या हस्ते सरदारधाम भवनाचे लोकार्पण आणि सरदार धाम टप्पा दोन अंतर्गत कन्या छात्रालयाचे भूमीपूजन
महान तामिळ कवी सुब्रमण्य भारती यांच्या 100 व्या पुण्यतिथी निमित्त वाराणसीत बनारस हिंदू विद्यापीठात फॅकल्टी ऑफ आर्ट्स मधे तामिळच्या अभ्यासासाठी अध्यासन स्थापन करण्याची पंतप्रधानांची घोषणा
सरदार साहेब ज्या "एक भारत-श्रेष्ठ भारताच्या दिशेने काम करत होते, तेच दर्शन महाकवी भारती यांच्या तमिल लेखणीत दिव्यतेने झळाळत आहे
संपूर्ण जगाला आज जाणीव होत आहे की 9/11 सारख्या आपत्तींचे स्थायी समाधान, मानवतेच्या याच मूल्यांआधारे होईल: पंतप्रधान
महामारीचा भारतीय अर्थव्यवस्थेला फटका मात्र नुकसानापेक्षा अधिक वेगाने आपण सावरतो आहोत: पंतप्रधान
मोठ्या अर्थव्यवस्था सावध भूमिकेत असताना भारत सुधारणा करत होता : पंतप्रधान
प्रविष्टि तिथि:
11 SEP 2021 6:28PM by PIB Mumbai
पंतप्रधान श्री नरेन्द्र मोदी यांच्या हस्ते सरदारधाम भवनाचे लोकार्पण आणि सरदार धाम टप्पा दोन अंतर्गत कन्या छात्रालयाचे आज व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून भूमीपूजन झाले. गुजरातचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देखील यावेळी उपस्थित होते.
गणेशोत्सवाच्या मुहुर्तावर सरदारधाम भवनाचा प्रारंभ होत असल्याबद्दल पंतप्रधान श्री नरेन्द्र मोदी यांनी आनंद व्यक्त केला.
त्यांनी सगळ्यांना गणेश चतुर्थी, गणेशोत्सव, ऋषी पंचमी आणि क्षमावाणी दिवसाच्या शुभेच्छा दिल्या. सरदारधाम विश्वस्तमंडळा संबंधित सर्व सदस्यांच्या मानवतेच्या सेवेसाठी असलेल्या निष्ठेबद्दल पंतप्रधानांनी कौतुक केले. पाटीदार समाजाच्या तरुणांसोबतच गरीब आणि विशेषतः महिलांच्या सबलीकरणासाठी करत असलेल्या कामाचीही पंतप्रधानांनी प्रशंसा केली.
आज उद्धाटन केलेल्या वसतीगृहाच्या सुविधेमुळे अनेक मुलींना पुढे येण्यासाठी मदत होईल असे ते आपल्या संबोधनात म्हणाले.
अत्याधुनिक इमारत, मुलींचे वसतीगृह आणि आधुनिक ग्रंथालय तरुणांचे सशक्तीकरण करेल असे ते म्हणाले.
उद्योजकता केन्द्राच्या माध्यमातून गुजरातची समृध्द व्यापारी ओळख आणखी मजबूत केली जात आहे. तर नागरी सेवा केन्द्राच्या माध्यमातून नागरी, संरक्षण आणि कायद्याच्या क्षेत्रात कारकिर्द घडवू इच्छिणाऱ्या तरणांना नवी दिशा मिळत आहे.
सरदारधाम केवळ देशाच्या भविष्य निर्माणाचे अधिष्ठानच होणार नाही तर येणाऱ्या पिढ्यांसाठी सरदार साहेबांच्या आदर्शांवर चालण्याची प्रेरणाही देईल असे ते म्हणाले.
आज 11 सप्टेंबर जगाच्या इतिहासातली अशी तारीख जिला मानवतेवरच्या आघाताच्या रुपात ओळखलं जातं. मात्र या तारखेनं संपूर्ण जगाला खूप काही शिकवलंही असे पंतप्रधानांनी अधोरेखित केले.
एका शतकापूर्वी 11 सप्टेंबर 1893 च्याच दिवशी शिकागो इथे विश्व धर्म संसदेचं आयोजन झालं होते. स्वामी विवेकानंदांनी आजच्याच दिवशी त्या वैश्विक व्यासपीठावरून साऱ्या जगाला भारताच्या मानवीय मूल्यांची ओळख करुन दिली होती. संपूर्ण जगाला आज जाणीव होत आहे की 9/11 सारख्या आपत्तीचे स्थायी समाधान, मानवतेच्या याच मूल्यांआधारे होईल असे पंतप्रधानांनी सांगितले.
आज 11 सप्टेंबरला आणखी एक मोठा, महत्वाचा क्षण आहे.
भारताचे महान तत्वज्ञ, विद्वान, दार्शनिक आणि स्वातंत्र्य सैनिक ‘सुब्रमण्य भारती’जी यांची आज 100 वी पुण्यतिथी आहे. सरदार साहेब ज्या "एक भारत-श्रेष्ठ भारताच्या तत्वज्ञानाच्या आधारे काम करत होते, तेच दर्शन महाकवी भारती यांच्या तमिल लेखणीत दिव्यतेने झळाळत आहे असे पंतप्रधान म्हणाले.
सुब्रमण्यम भारती यांनी स्वामी विवेकानंद यांच्याकडून प्रेरणा घेतली होती आणि श्री अरबिन्दो यांचाही त्यांच्यावर प्रभाव होता असे पंतप्रधानांनी सांगितले. काशीच्या वास्तव्यात भारती यांनी आपल्या विचारांना नवी उर्जा आणि दिशा दिली.
बनारस हिंदू विद्यापीठात सुब्रमण्य भारतीजी यांच्या नावाने एक अध्यासन स्थापन करण्याचा निर्णय घेतल्याची घोषणा पंतप्रधानांनी केली. तामिळ अभ्यासासाठी ‘सुब्रमण्य भारती अध्यासन’ बनारस हिंदू विद्यापीठाच्या फॅकल्टी ऑफ आर्ट्स मधे स्थापित होणार आहे.
भारताच्या, मानवतेच्या एकतेवर भारती यांचा भर होता असेही पंतप्रधानांनी सांगितले. त्यांचा हा आदर्श भारताच्या तत्वज्ञान आणि दर्शनाचा अविभाज्य भाग आहे.
गुजरात ऐतिहासीक काळापासून ते आजपर्यंत एकत्रित प्रयत्नांची भूमी राहिली आहे. स्वातंत्र्यलढ्यात गांधीजीनी इथून दांडी यात्रेची सुरुवात केली होती. आजही ती स्वातंत्र्यासाठी देशाच्या एकजुटीने केलेल्या प्रयत्नांचे प्रतीक आहे याचा उल्लेख पंतप्रधानांनी केला.
याचप्रकारे, खेडा आंदोलनात सरदार पटेल यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी, तरुण, गरीब एकजुटीने इंग्रजांना झुकण्यास भाग पाडलं होतं. ती प्रेरणा, ती ऊर्जा आजही गुजरातच्या धरतीवर सरदार साहेबांच्या गगनचुंबी पुतळ्याच्या, ‘स्टॅच्यू ऑफ यूनिटी’च्या रूपात आपल्या समोर उभी आहे असे ते म्हणाले.
समाजातील जे वर्ग, जे लोक मागे राहिले आहेत त्यांना पुढे आणण्याचा सातत्याने प्रयत्न होत आहे. आज एकीकडे दलित मागासवर्गाच्या अधिकारांसाठी काम होत आहे तिथेच आर्थिकदृष्टय़ा मागासांनाही 10% आरक्षण दिले आहे. या प्रयत्नांमुळे समाजात नवा आत्मविश्वास निर्माण झाल्याचे त्यांनी सांगितले.
भविष्यात बाजारात कोणत्या कौशल्याची गरज भासेल, भावी जगात नेतृत्व करण्यासाठी आपल्या तरुणांना काय करायला हवे, यासाठी राष्ट्रीय शिक्षण धोरण, विद्यार्थ्याना सुरुवातीपासूनच या जागतिक वास्तवाकरता घडवेल असे पंतप्रधान म्हणाले.
स्किल इंडिया मिशन देखील देशासाठी प्रमुख प्राथमिकता आहे. या अंतर्गत लाखो तरुणांना विविध कौशल्य शिकून आत्मनिर्भर होण्याची संधी मिळेल असे ते म्हणाले.
राष्ट्रीय शिष्यवृत्ती प्रोत्साहन योजने अंतर्गत विद्यार्थ्याना शिक्षणाबरोबरच कौशल्य विकासााचीही संधी मिळत असून ते कमवत देखील आहेत.
अनेक वर्षांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे गुजतरातमधील शालेय विद्यार्थ्यांची गळती 1 टक्के पेक्षा कमी झाली आहे. तिथेच विविध योजनांच्या माध्यमातून लाखो तरुणांना नवे भविष्य उपलब्ध होत आहे. स्टार्ट अप इंडिया सारख्या अभियानामुळे गुजरातमधल्या प्रतिभावान तरुणांना नवी व्यवस्था मिळत आहे असे पंतप्रधान म्हणाले.
पाटीदार समाजाची तर ही ओळखच बनली आहे की ते जिथे जातील तिथे व्यापाराला नवी ओळख देतात. आपलं हे कौशल्य आता गुजरात आणि देशातच नाही तर जगभरात ओळखलं जातं. पाटीदार समाजाचे आणखी एक मोठं वैशिष्टय हे देखील आहे, की ते कुठेही राहिले तरी भारताचे हित सर्वोच्च मानतात या शब्दात पंतप्रधानांनी पाटीदार समाजाचे कौतुक केले.
महामारीचा भारतीय अर्थव्यवस्थेला फटका बसला, मात्र नुकसानापेक्षा अधिक वेगाने आपण सावरतो आहोत. मोठ्या अर्थव्यवस्था सावध भूमिकेत असताना भारत सुधारणा करत होता असे पंतप्रधान म्हणाले.
जागतिक पुरवठा साखळी विस्कळित झाली होती तेव्हा भारताने परिस्थिती आपल्या बाजूने वळवण्यासाठी पीएलआय योजना आणली. या योजनेचा लाभ वस्त्रोद्योगाला, सूरत सारख्या शहरांना मोठ्या प्रमाणावर होईल असे पंतप्रधान म्हणाले.
***
Jaydevi PS/V.Ghode/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1754149)
आगंतुक पटल : 302
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam