पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी शिक्षक पर्व परिषदेच्या उद्घाटन समारंभास केले संबोधित
शिक्षण क्षेत्रातील अनेक प्रमुख उपक्रमांचा केला प्रारंभ
आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत सुरू करण्यात आलेले अनेक उपक्रम हे शैक्षणिक क्रांती घडवतील आणि भारतीय शिक्षण
व्यवस्थेला जागतिक नकाशावर स्थान देतील : पंतप्रधान
आपण परिवर्तनाच्या मध्यावर आहोत आणि सुदैवाने आपल्याकडे आधुनिक आणि भविष्यवादी नवीन शिक्षण धोरण आहे : पंतप्रधान
लोकसहभाग ही भारताची नव्याने राष्ट्रीय ओळख बनतेय : पंतप्रधान
पंतप्रधानांच्या विनंतीवरून प्रत्येक ऑलिम्पिक आणि पॅरालिम्पिक खेळाडू देशातील 75 शाळांना भेट देणार
शिक्षण क्षेत्रातील परिवर्तन हे निव्वळ धोरण आधारित नाही तर सहभागावर आधारित: पंतप्रधान
'सब का प्रयास' सह 'सबका साथ', 'सबका विकास', 'सबका विश्वास' देशाच्या या संकल्पांचे व्यासपीठ 'विद्यांजली 2.0' आहे: पंतप्रधान
सर्व शैक्षणिक उपक्रमांचा सेतू म्हणून N-DEAR कार्यरत असेल : पंतप्रधान
निष्ठा 3.0 हे क्षमता- आधारित शिक्षण, कला एकत्रीकरण आणि सर्जनशील आणि गुंतागुंतीच्या विचारांना प्रोत्साहित करेल
Posted On:
07 SEP 2021 2:58PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 7 सप्टेंबर 2021
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिक्षक पर्व परिषदेच्या उद्घाटन समारंभास आभासी माध्यमातून (व्हिडिओ कॉन्फरन्सिंग) संबोधित केले. भारतीय सांकेतिक भाषा शब्दकोष (श्रवण दोष असलेल्यांसाठी ऑडिओ आणि मजकूर अंतर्भूत असलेली सांकेतिक भाषा व्हिडिओ, वैश्विक शिक्षण रचनेला अनुरूप), बोलणारी पुस्तके (दृष्टिहीनांसाठी ऑडिओ बुक्स), सीबीएसईच्या शालेय गुणपत्ता हमी आणि मूल्यांकन आराखडा, NISHTHA - निपुण भारत (NIPUN Bharat) आणि विद्यांजली पोर्टल साठी शिक्षकांचा प्रशिक्षण कार्यक्रम (शालेय विकासासाठी शिक्षण स्वयंसेवक / देणगीदार/व्यावसायिक सामाजिक जबाबदारीतून योगदान देणाऱ्यांच्या सोयीसाठी) आदी उपक्रमांचेही पंतप्रधानांनी उद्घाटन केले.
पंतप्रधानांनी यावेळी राष्ट्रीय पुरस्कार मिळविलेल्या शिक्षकांचे अभिनंदन केले. देशात कठीण काळामध्ये देखील मुलांचे भविष्य घडविण्यासाठी शिक्षकांनी दिलेल्या योगदानाचे त्यांनी कौतुक केले. ते म्हणाले की, देश सध्या आझादी का अमृत महोत्सव साजरा करीत आहे, त्यामुळे आज, या शिक्षक पर्व परिषदेनिमित्त, अनेक नवीन योजना देखील सुरू करण्यात आल्या आहेत ज्या विशेष महत्त्वाच्या आहेत. स्वातंत्र्याच्या 100 वर्षांनंतर भारत कसा असेल यासाठी नवीन संकल्प करावयाचा आहे. महामारीच्या काळात ही शिक्षणाचे आव्हान पेलल्याबद्दल पंतप्रधांनांनी विद्यार्थी, शिक्षक आणि समस्त शिक्षण क्षेत्राचे कौतुक केले आणि या कठीण काळाला सामोरे जाण्यासाठी ज्या क्षमता निर्माण झाल्या आहेत, त्या तशाच कायम ठेवण्याचे आवाहन केले. ``जर आपण परिवर्तनाच्या मध्यावर असू, तर सुदैवाने आपल्याकडे आधुनिक आणि भविष्यवादी नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आहे,`` ते म्हणाले.
राष्ट्रीय शिक्षण धोरणाची बांधणी आणि त्याच्या अंमलबजावणीमध्ये प्रत्येक पातळीवर सहभाग नोंदविणाऱ्या शिक्षण तज्ज्ञ, शिक्षक, अभ्यासकांचे पंतप्रधानांनी कौतुक केले. यातील सहभाग एका नव्या पातळीवर नेताना संपूर्ण समाजाला देखील यामध्ये सहभागी करून घ्यावे, असे आवाहन त्यांनी प्रत्येकाला केले. शिक्षण क्षेत्रातील हे परिवर्तन केवळ धोरणआधारित नाही तर ते जनसहभागावर आधारित आहे, त्यांनी नमूद केले.
देशाच्या संकल्पांपैकी असलेल्या ‘सबका प्रयास’ सह, ‘सबका साथ’, ‘सबका विकास’, ‘सबका विश्वास’ यांच्यासाठी ‘विद्यांजली 2.0’ हे एका व्यासपीठासारखे आहे. सरकारी शाळांमधील शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी खासगी क्षेत्राने पुढे येऊन आपला सहभाग नोंदविला पाहिजे असे पंतप्रधान म्हणाले.
पंतप्रधान म्हणाले की, गेल्या काही वर्षांत लोकसहभाग हा पुन्हा एकदा भारताचा राष्ट्रीय चेहरा बनू लागला आहे. गेल्या सहा ते सात वर्षांमध्ये, लोकसहभागाच्या ताकदीमुळे, अनेक गोष्टी भारतात घडू लागल्या आहेत, ज्यांची पूर्वी केवळ कल्पना करणे देखील शक्य नव्हते. जेव्हा समाज एकत्रितपणे काहीतरी करतो, तेव्हा इच्छित परिणाम नक्कीच साध्य होतात, असे ते म्हणाले. पंतप्रधान म्हणाले की, जीवनाच्या कोणत्याही क्षेत्रात युवकांचे भविष्य घडविण्यात प्रत्येकाची भूमिका असते. अलिकडेच पार पडलेल्या ऑलिम्पिक, पॅरालिम्पिक मधील आपल्या खेळाडूंच्या उत्कृष्ट कामगिरीची आठवण त्यांनी करून दिली. आझादी का अमृत महोत्सव दरम्यान प्रत्येक खेळाडूने किमान 75 शाळांना भेट देण्याच्या त्यांच्या विनंतीला खेळाडूंनी होकार दिल्याबद्दल पंतप्रधानांनी आनंद व्यक्त केला. यामुळे विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळेल आणि अनेक प्रतिभावंत विद्यार्थ्यांना क्रीडा क्षेत्रात पुढे येण्यासाठी प्रेरणा मिळेल,असे ते म्हणाले.
पंतप्रधान म्हणाले की, कोणत्याही देशाच्या प्रगतीसाठी शिक्षण केवळ सर्वसमावेशक नसावे, तर ते न्याय्य असले पाहिजे. त्यांनी असेही नमूद केले की, नॅशनल डिजिटल आर्किटेक्चर म्हणजेच N-DEAR हे शिक्षणातील असमानता दूर करण्यात आणि आधुनिकीकरणात महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. यूपीआय इंटरफेसने बँकिंग क्षेत्रात क्रांती घडविल्याप्रमाणे विविध शैक्षणिक उपक्रमांमध्ये N-DEAR हे `सुपर - कनेक्ट` म्हणून काम करेल. टॉकिंग बुक्स आणि ऑडिओ बुक्स यासारख्या तंत्रज्ञानाला आपला देश आता शिक्षणाचाच एक भाग बनवित असल्याचे त्यांनी सांगितले.
शालेय गुणवत्ता मूल्यांकन आणि आश्वासक चौकट (S.Q.A.A.F),जी आज कार्यान्वित झाली आहे, अभ्यासक्रम, अध्यापनशास्त्र, मूल्यांकन, पायाभूत सुविधा, सर्वसमावेशक पद्धती आणि शासन प्रक्रिया या सारख्या परिमाणांसाठी सामान्य वैज्ञानिक चौकटीच्या अनुपस्थितीची कमतरता देखील दूर करेल. SOAAF ही असमानता दूर करण्यात मदत करेल.
या झपाट्याने बदलणाऱ्या युगात, आपल्या शिक्षकांना देखील नवीन शिक्षण प्रणाली आणि तंत्रज्ञान या गोष्टी झपाट्याने आत्मसात कराव्या लागत आहेत. या बदलांसाठी `निष्ठा` या प्रशिक्षण कार्यक्रमाद्वारे देश आपले शिक्षक घडविणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.
पंतप्रधान म्हणाले की, भारतातील शिक्षक केवळ कोणत्याही जागतिक मानकांपर्यंत पोहोचत नाहीत, तर त्यांच्याकडे त्यांचे स्वतःचे असे शिक्षण विषयक वेगळे भांडवल आहे. या विशेष भांडवलामध्ये, भारतीय संस्कृती हीच त्यांची विशेष ताकद आहे. ते म्हणाले की, आपले शिक्षक त्यांच्या शिकविण्याच्या कार्याला केवळ एक व्यवसाय किंवा त्यांचे काम मानत नाहीत, तर त्यांच्यासाठी शिकविणे किंवा विद्या प्रदान करणे हे मानवी सहजाणीव आणि एक पवित्र नैतिक कर्तव्य आहे. म्हणूनच आपले शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यात केवळ व्यावसायिक नाते नाही तर कौटुंबिक नाते असते आणि हे नाते आयुष्यभरासाठी असते, पंतप्रधानांनी नमूद केले.
Jaydevi PS/S.Shaikh/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1752812)
Visitor Counter : 431
Read this release in:
Kannada
,
Telugu
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Assamese
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Malayalam