माहिती आणि प्रसारण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

पत्रकार कल्याण योजनेच्या मार्गदर्शक सूचनांचा आढावा घेण्यासाठी मंत्रालयाकडून समितीची स्थापना


समिती दोन महिन्यांत आपला अहवाल सादर करणार

Posted On: 02 SEP 2021 5:35PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 2 सप्टेंबर 2021

माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या पत्रकार कल्याण योजनेच्या मार्गदर्शक सूचनांचा आढावा घेण्यासाठी मंत्रालयाने, सुप्रसिद्ध वरिष्ठ पत्रकार आणि प्रसारभारतीचे सदस्य, अशोक कुमार टंडन यांच्या नेतृत्वाखाली एक दहा सदस्यीय समिती नियुक्त केली आहे. ही समिती, या योजनेसाठी सध्या असलेल्या मार्गदर्शक तत्वांचा आढावा घेणार असून, त्यात बदल करण्यासाठी आवश्यक त्या शिफारसी सूचवणार आहे. पत्रकारीतेच्या क्षेत्रात, अलीकडच्या काळात बदललेली परिस्थिती तसेच कोविड-19 मुळे अनेक पत्रकारांचा झालेला मृत्यू, या सगळ्या पार्श्वभूमीवर, हा निर्णय महत्वाचा मानला जात आहे. त्याशिवाय, अशा योजनांसाठी ग्राह्य धरल्या जाणाऱ्या वर्किंग जर्नालीस्टसअर्थात   ‘श्रमिक पत्रकारांच्या’ व्याख्येचीही यानिमित्ताने समीक्षा केली जाणार आहे.  

पत्रकार कल्याण योजना गेल्या अनेक वर्षांपासून अस्तित्वात असून, भविष्यातील दृष्टिकोन आणि जास्तीत जास्त पत्रकारांना या योजनेच्या कक्षेत सामावून घेण्यासाठी, त्याचे निकष आणि मार्गदर्शक तत्वामध्ये बदल करण्याची गरज आहे. व्यावसायिक सुरक्षा, आरोग्य आणि कामाच्या ठिकाणी असलेली स्थिती याविषयीची संहिता-2020 लागू झाल्यानंतर, श्रमिक पत्रकारांच्या व्याख्येतही बदल होत, त्याची व्याप्ती वाढली आहे. पारंपरिक आणि डिजिटल अशा दोन्ही माध्यमात काम करणाऱ्या पत्रकारांना यात सामावून घेण्यात आले आहे. त्याशिवाय, अधिस्वीकृतीधारक पत्रकार आणि अधिस्वीकृती नसलेल्या पत्रकारांना या कल्याणकारी योजनेत समानतेने बघण्याची गरज असून, त्यांनाही या योजनेचे लाभ मिळवून देणे महत्वाचे आहे.

माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने अलीकडच्या काळात, कोविडमुळे निधन झालेल्या पत्रकारांच्या कुटुंबीयांना सानुग्रह अनुदान मिळवून देण्यासाठी सक्रियपणे पुढाकार घेतला असून, अशा 100 हून अधिक पत्रकारांना प्रत्येकी पांच लाखांची मदत देण्यात आली आहे. 

ही समिती येत्या दोन महिन्यात आपला अहवाल देणार आहे. तिच्या शिफारसींच्या आधारावर जास्तीत जास्त पत्रकारांना लाभ मिळू शकेल, अशा रीतीने नवी मार्गदर्शक तत्वे तयार करणे सरकारला शक्य होईल. अशोक टंडन यांच्या नेतृत्वाखालील या समितीत, द वीक चे निवासी संपादक, सच्चिदानंद मूर्ती, मुक्त पत्रकार शेखर अय्यर, न्यूज 18 चे अमिताभ सिन्हा, बिझनेस लाईन चे शिशिर कुमार सिन्हा, झी न्यूजचे विशेष प्रतिनिधि रवींद्र कुमार, पांचजन्यचे संपादक हितेष शंकर, हिंदुस्थान टाइम्स च्या स्मृति काक रामचंद्रन, टाइम्स नाऊचे अमित कुमार, इकॉनॉमिक टाइम्सच्या वसुधा वेणुगोपाल, आणि पत्रसूचना कार्यालयाच्या अतिरिक्त महा संचालक श्रीमती कांचन प्रसाद या सदस्यांचा  समावेश आहे.

 

Jaydevi PS/R.Aghor/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1751448) Visitor Counter : 454