नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय
2030 पर्यंत कार्बन उत्सर्जन 35% कमी करण्याच्या उद्दिष्टाच्या पार्श्वभूमीवर भारताने 2005 च्या स्तराच्या तुलनेत 28% उत्सर्जन केले कमी
100 गिगावॅट स्थापित नविकरणीय उर्जा क्षमता साध्य करणे ही भारतीय उर्जा क्षेत्रासाठी आनंदाची आणि अभिमानाची बाब
भारत- आंतरराष्ट्रीय सौर आघाडी उर्जा संक्रमण संवाद 2021 मध्ये केंद्रीय उर्जा मंत्री आर के सिंग यांनी दिले बीज भाषण
Posted On:
25 AUG 2021 7:38PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 25 ऑगस्ट 2021
2030 पर्यंत कार्बन उत्सर्जन 35% कमी करण्याच्या राष्ट्रीय निर्धार योगदानासाठी दिलेल्या कटिबद्धतेमध्ये ठेवण्यात आलेल्या उद्दिष्टाच्या पार्श्वभूमीवर भारताने 2005 च्या स्तराच्या तुलनेत 28 % कार्बन उत्सर्जन कमी करणे साध्य केले आहे. यामुळे नविकरणीय उर्जा क्षमतेत झपाट्याने वाढ करतानाच पॅरीस हवामान बदल ( सीओपी21 ) परिषदेत व्यक्त करण्यात आलेल्या कटीबद्धतेची पूर्तता करणाऱ्या जगातल्या मोजक्या देशात भारताची गणना होत आहे. केंद्रीय उर्जा आणि नविकरणीय मंत्री आणि आंतरराष्ट्रीय सौर आघाडीचे अध्यक्ष आर के सिंह यांनी भारत- आंतरराष्ट्रीय सौर आघाडी उर्जा संक्रमण संवाद 2021 मध्ये बीज भाषण देताना ही माहिती दिली. आंतरराष्ट्रीय सौर आघाडी आणि केंद्रीय नविकरणीय उर्जा मंत्रालयाने काल हा संवाद आयोजित केला होता.
गेल्या दोन दशकांपासून कल्पक बाजारपेठ यंत्रणा आणि व्यापार मॉडेल, संस्थात्मक बळकटी आणि क्षमता उभारणी तसेच मागणी निर्मितीसाठी उपाययोजनांद्वारे भारत उर्जा क्षमता सुधारणा धडाक्याने राबवत असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
2050 पर्यंत भारताच्या एकूण उर्जा क्षमतेपैकी 80-85% उर्जा नविकरणीय स्त्रोतातून येईल अशी अपेक्षा आहे.
100 गिगावॅट स्थापित नविकरणीय उर्जा क्षमता साध्य करणे ही भारतीय उर्जा क्षेत्रासाठी आनंदाची आणि अभिमानाची बाब असल्याचे त्यांनी सांगितले. स्थापित नविकरणीय उर्जा क्षमतेत जगात भारताचा चौथा क्रमांक तर सौर उर्जेत पाचवा आणि पवन उर्जा क्षमतेत चौथा क्रमांक आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या द्रष्ट्या नेतृत्वाखाली स्वच्छ उर्जा क्षेत्रातली ही गती अशीच कायम राखण्यासाठी भारत प्रयत्नशील आहे. यासाठी 2022 पर्यंत 175 गिगावॅटचे सध्याचे उद्दिष्ट वाढवून 2030 पर्यंत 450 गिगावॅट स्थापित नविकरणीय उर्जेचे उद्दिष्ट करण्याची योजना असल्याचे ते म्हणाले. खाजगी क्षेत्राच्या सक्रीय सहभागाने पुरवठाविषयक बाजू बळकट होत असल्याचे ते म्हणाले.
महत्वाच्या विषयावर चर्चा घडवत उच्च नविकरणीय उर्जा आणि वास्तव उर्जा संक्रमण सुलभ करण्यासाठीचे मार्ग यावरही देशांनी चर्चा करावी असे आवाहन त्यांनी यावेळी केले. या संवाद दरम्यान दोन पॅनेल चर्चा झाल्या.
आंतरराष्ट्रीय सौर आघाडीचे सदस्य देश, वरिष्ठ सरकारी अधिकारी, उद्योग आणि शिक्षण क्षेत्रातले प्रतिनिधी, संशोधक आणि जगभरातल्या विविध वित्तीय संस्थाचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.
* * *
Jaydevi PS/N.Chitale/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1749010)
Visitor Counter : 378