युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय
क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांनी घेतली जागतिक युवा तिरंदाजी अजिंक्यपद स्पर्धेतील विजेत्यांची भेट; मोठ्या संख्येने पदके प्राप्त केल्याबद्दल केले अभिनंदन
तळागाळातल्या प्रतिभेचा विकास आणि जोपासना करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या उपक्रमांचे उत्तम परिणाम दिसून येत आहेत : अनुराग ठाकूर
Posted On:
17 AUG 2021 7:25PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 17 ऑगस्ट 2021
अभिमानाची बाब
- पोलंडमधील व्रोकला येथे झालेल्या जागतिक युवा तिरंदाजी स्पर्धेत 8 सुवर्ण, 2 रौप्य आणि 5 कांस्य अशा एकूण 15 पदकांची कमाई भारतीय संघाने केली.
जागतिक युवा तिरंदाजी अजिंक्यपद स्पर्धेतील विजेत्यांशी केंद्रीय युवा आणि क्रीडा खात्याचे मंत्री अनुराग ठाकूर यांनी मंगळवारी एका कार्यक्रमादरम्यान संवाद साधला आणि देशाचे नाव उज्ज्वल केल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले. भारतीय संघाने पोलंडमधील व्रोकला येथे झालेल्या तिरंदाजी स्पर्धेत 8 सुवर्ण, 2 रौप्य आणि 5 कांस्य अशा एकूण 15 पदकांची कमाई केली.
कनिष्ठ स्तरापासूनच देशात वैविध्यपूर्ण बुद्धिमत्ता मोठया प्रमाणावर उदयाला येत असल्याची प्रशंसा त्यांनी केली. “तळागाळातील स्तरावरील प्रतिभेचा विकास आणि संवर्धन करण्यासाठी खेलो इंडिया सारख्या योजना विकसित करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून झालेल्या प्रयत्नांचे उत्तम परिणाम यासारख्या अजिंक्यपद स्पर्धांमधून दिसून येत आहेत. देशभरातील आपले अनेक तरुण सर्व खेळांमध्ये नावलौकिक मिळवत आहेत आणि प्रगती करत आहेत हे अत्यंत आनंददायी आहे, मोठ्या आशा पल्लवित करणारे आहे. मी सर्व तरुण तिरंदाजांचे अभिनंदन करतो आणि त्यांना पुढील स्पर्धांसाठी शुभेच्छा देतो. वरिष्ठ संघात स्थान मिळवण्यासाठी त्यांची वाटचाल सुरू असताना, उच्च स्तरावर स्पर्धा करण्यासाठी आवश्यक सर्वोतोपरी सहकार्य त्यांना मिळेल, ” असे ठाकूर यांनी सांगितले.
सुवर्णपदक विजेत्यांमध्ये कॅडेट कंपाउंड महिला संघ, कॅडेट कंपाउंड पुरुष संघ, कनिष्ठ रिकर्व्ह पुरुष संघ, कॅडेट रिकर्व्ह पुरुष संघ, कॅडेट कंपाउंड पुरुष संघ, कॅडेट रिकर्व्ह मिश्र संघ, कनिष्ठ रिकर्व्ह मिश्र संघ आणि महिलांच्या वैयक्तिक स्तरीय ज्युनिअर रिकर्व्ह प्रकारात सुवर्णपदक जिंकलेल्या कोमोलिका बारी हिचा समावेश आहे.
वैयक्तिक आणि मिश्र दुहेरीत दोन सुवर्णपदके जिंकणाऱ्या कोमोलिकाने 2019 च्या जागतिक कॅडेट अजिंक्यपद स्पर्धेतही पदक जिंकले. टार्गेट ऑलिम्पिक पोडियम स्कीम कोर टीमचा एक भाग असलेली कोमलिका, टाटा अक़दमीची आणखी एक विद्यार्थिनी असून , मार्च 2021 मध्ये देहरादून येथे आयोजित 41 व्या एनटीपीसी कनिष्ठ तिरंदाजी राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत महिला वैयक्तिक रिकर्व्हमध्ये राष्ट्रीय विजेती ठरली. खेलो इंडिया युवा खेळांपासून यशाची अनेकानेक शिखरे ती सर करताना दिसू लागली. 2019, 2020 च्या या स्पर्धा तसेच गेल्या वर्षी झालेल्या विद्यापीठ स्पर्धांमध्ये तिने पदके जिंकली.
दरम्यान, पोलंडमधील रौप्यपदक विजेत्यांमध्ये कॅडेट कंपाउंड वैयक्तिक स्पर्धा जिंकणारी प्रिया गुर्जर आणि कंपाउंड कनिष्ठ वैयक्तिक (पुरुष आणि महिला) स्पर्धेतून साक्षी चौधरी यांचा समावेश आहे. कांस्यपदक विजेत्यांमध्ये कंपाउंड कॅडेट महिला गटात परनीत कौर, कंपाउंड कनिष्ठ वैयक्तिक (पुरुष आणि महिला) स्पर्धेत ऋषभ यादव, रिकर्व्ह कॅडेट वैयक्तिक (पुरुष आणि महिला) स्पर्धेत, तसेच कैडेट रिकर्व्ह महिला संघ स्पर्धेत मंजिरी मनोज अलोन आणि विशाल चांगमाई यांचा समावेश आहे.
M.Chopade/S.Kulkarni/P.Malandkar
(Release ID: 1746761)
Visitor Counter : 284